‘गोपीनाथ मुंडेची हत्या 2014 लोकसभा निवडणुकीत EVM छेडछाडीमुळे’: लंडनमध्ये ‘हॅकर’चा सनसनाटी आरोप

फोटो स्रोत, AFP / Getty Images
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात EVM मध्ये छेडछाड होऊ शकते का, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे, आणि यंदा याचं निमित्त ठरलीये लंडनमध्ये झालेली एक पत्रकार परिषद.
2014च्या लोकसभा निवडणुका आणि 2015मधल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये EVM हॅक करण्यात आल्या होत्या, असा दावा भारतीय वंशाच्या एका कथित हॅकरने लंडनमध्ये इंडियन जर्नलिस्ट्स असोसिएशन ने आयोजित एका पत्रकार परिषदेत केला आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने मात्र हे आरोप फेटाळून लावत, EVM अगदी फुलप्रुफ आणि सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. सोबतच, या प्रकरणात काय कायदेशीर कारवाई करता येईल, तेही पाहत असल्याचं आयोगाने म्हटलं आहे.
सय्यद शुजा नावाच्या एका व्यक्तीने कॅलिफोर्नियाहून व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या पत्रकार परिषदेत असा दावा केला आहे की 2014च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतदान यंत्रांबरोबर छेडछाड करण्यात आली होती, आणि यात सर्वच राजकीय पक्ष सामील होते.
आपण असं हॅकिंग भारतात निवडणुकांमध्ये केलेलं आहे, असा दावाही या कथित हॅकरने केला आहे.
या माहितीला दुजोरा देणारा कुठलाही पुरावा मात्र शुजा नावाच्या या व्यक्तीने सादर केला नाही. आपली ओळख गोपनीय ठेवण्यासाठी त्याने स्वतःचा चेहराही झाकला होता.
दरम्यान, निवडणूक आयोगाने एक सविस्तर निवेदन जारी करत हे आरोप फेटाळून लावले आहेत.
"EVM भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) या दोन सरकारी कंपन्यांमध्ये अत्यंत गोपनीय आणि काटेकोर पद्धतीने ईव्हीएम मशीन्स तयार होतात. 2010 साली काही नामवंत तंत्रज्ञांना एकत्र घेऊन तयार करण्यात आलेल्या एका समितीने काही EVM निर्मितीचे नियम आणि दर्जा निर्धारित केला होता. त्यांचं या निर्मितीच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन केलं जातं," असं निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
आता आरोप करणारी व्यक्ती स्वतःला इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) चा एक माजी कर्मचारी असल्याचं सांगत आहे. तसंच 2014 साली EVM तयार करणाऱ्या टीमचा आपण भाग होतो, असा दावा त्याने केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या संपूर्ण प्रकरणाची माहिती ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांनाही होती. त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली होती, असा खळबळजनक आरोपही त्या हॅकरने केला आहे.
गोपीनाथ मुंडे यांचा 3 जून 2014 रोजी दिल्लीत एका रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हाही त्यांची हत्या झाल्याचे अनेक आरोप झाले होते, ज्यानंतर CBIने या प्रकरणाचा स्वतंत्र तपास केला होता. तपासाअंती त्यांनी घातपाताची अशी कुठलीही शक्यता फेटाळून लावली होती आणि दुसऱ्या एका वाहनचालकावर गुन्हा दाखल केला होता.
...म्हणून VVPAT जोडलं गेलं
या आधीही मतदान यंत्रं हॅक करता येतात, असे आरोप अनेकदा निवडणुकीत पराभूत होणाऱ्या पक्षांनी केले आहेत. त्यांचे हे आरोप निवडणूक आयोगाने प्रत्येक वेळी फेटाळून लावले आहेत, तरीही प्रत्येक निवडणुकीच्या वेळी हा वाद नव्याने तोंड वर करत असतो.
शिवाय, गेल्या काही विधानसभा निवडणुकांमध्ये VVPAT नावाचं एक यंत्रही आयोगाने मतदान यंत्राच्या जोडीला देण्यास सुरुवात केली आहे.
VVPAT म्हणजे 'Voter Verifiable Paper Audit Trail'. मतदार एका विशिष्ट उमेदवाराला मतदान करतो. मतदारानं ज्या उमेदवाराला मत दिलं आहे; ते मत त्याच उमेदवाराला मिळाले आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी VVPAT वापरलं जातं.
EVM मशीनद्वारे मतदान होतं. मात्र या यंत्रणेत काही बिघाड झाल्यास किंवा तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास VVPAT द्वारे मतमोजणी केली जाऊ शकते. दुसऱ्या शब्दांत मतदारानं उमेदवाराला दिलेलं मत सुरक्षित ठेवण्यादृष्टीनं तयार करण्यात आलेली ही दुसरी पर्यायी यंत्रणा आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








