PAK vs SA : चुरशीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तानवर 1 विकेटनं विजय

रिझवान आणि मार्को भर मैदानात भिडले; बाबर आझमला करावी लागली मध्यस्थी

फोटो स्रोत, Getty Images

आयसीसी वन-डे विश्वचषक 2023 मधील आजवरचा सर्वात रंगतदार सामना चेन्नईत झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानचा 1 विकेटनं पराभव केला. या पराभवामुळे पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान धोक्यात आलं आहे.

पाकिस्तानच्या गोलंदाजांनी ठराविक अंतरानं विकेट्स घेत सामन्यावर पकड मिळवली होती. केशव महाराज आणि तरबेझ शम्सी या जोडीनं शेवटच्या विकेटसाठी नाबाद 11 धावांची भागिदारी करत आफ्रिकेला संस्मरणीय विजय मिळवून दिला.

1992 साली विश्वचषक स्पर्धा जिंकलेल्या पाकिस्तानचा या स्पर्धेतील सलग चौथा पराभव आहे. यापूर्वी त्यांचा भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्ताननं पराभव केला होता.

पाकिस्ताननं दिलेल्या 271 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची अवस्था 4 बाद 136 झाली होती. त्यावेळी मार्कारामनं आफ्रिकेला संकटातून बाहेर काढलं.

मार्काराम आणि मिलर जोडीनं पाचव्या विकेटसाठी 70 धावांची महत्त्वाची भागिदारी केली. मिलर 29 धावांवर बाद झाला.

मिलरनंतर जेन्सन बाद झाल्यानंतरही मार्कारामनं प्रतिकार सुरू ठेवला होता. उसामा मीरनं त्याला 91 धावांवर बाद करत आफ्रिकेला मोठा धक्का दिला.

मार्कारामनंतर कोएट्झी आणि एन्गिडीही बाद झाल्यानं दक्षिण आफ्रिका संकटात सापडली होती. त्यावेळी शेवटच्या जोडीनं डोकं शांत ठेवत आफ्रिकेला विजय मिळवून दिला.

पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीनं 3, तर हॅरीस रौफ, उसामा मीर आणि मोहम्मद नवाझ यानं प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

दली खेळाडूनं बदललं पाकिस्तानचं नशीब, स्पर्धेतील आव्हान ठेवलं जिवंत

फोटो स्रोत, Getty Images

मैदानात आणावं लागलं स्ट्रेचर

दक्षिण आफ्रिकेच्या डावातील पहिल्याच ओव्हरमध्ये पाकिस्तानला मोठा धक्का बसला. पाकिस्तानचा उपकर्णधार शादाब खान क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला.

पहिल्या ओव्हरचा दुसरा बॉल शादाबनं अडवला. त्यानंतर तो बॉल वेगानं फेकताना शादाब खांद्यावर पडला. तो बराच काळ जमिनीवरच पडून होता.

शादाबला बाहेर नेण्यासाठी मैदानात स्ट्रेचर आणण्यात आलं. त्यावेळी तो स्वत: उठला आणि चालत मैदानाबाहेर गेला. या दुखापतीनंतर शादाब पुन्हा मैदानात उतरला नाही.

शादाबच्या जागी उसामा मीर उर्वरित सामना खेळला. उसामानं पहिल्याच ओव्हरमध्ये रॅसी वेन देर ड्युसेनला 21 धावांवर बाद करत पाकिस्तानला महत्त्वाचं यश मिळवून दिलं

रिझवान आणि मार्को भर मैदानात भिडले; बाबर आझमला करावी लागली मध्यस्थी

TWITTER/VIDEO GRAB

फोटो स्रोत, TWITTER/VIDEO GRAB

क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात दोन खेळाडूंमधील वादामुळे काही काळ वातावरण तापलं होतं. या प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान आणि आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सन यांच्यात हा वाद झाला. हा वाद आणखी वाढू नये यासाठी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मध्यस्थी करावी लागली.

काय घडला प्रकार ?

पाकिस्तानच्या इनिंगमधील सातव्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर जॅन्सननं इमाम उल हकला बाद करत पाकिस्तानला दुसरा धक्का दिला होता.

इमाम बाद झाल्यानंतर रिझवान फलंदाजीसाठी आला. पहिल्याच बॉलवर त्याला जीवदान मिळालं. जॅन्सनला त्याचा झेल पकडता आला नाही.

जॅन्सनचा पुढच्या बॉलवर रिझवाननं थर्ड मॅनच्या दिशेनं चौकार लगावला. या चौकारानंतर रिझवान आणि जॅन्सन यांच्यात वादावादी झाली.

हा वाद आणखी वाढू नये म्हणून बाबर आझमनं मध्यस्थी केली. त्यानं रिझवानला शांत केलं. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज जेरॉल्ड कोट्झी देखील धावत बाबर आणि रिझवान यांच्या जवळ आला होता. त्यावेळी मैदानातील अंपायरनी त्याला परत जाण्याची सूचना केली.

जॅन्सनच्या पुढच्या बॉलवर रिझवानला धाव काढता आली नाही. त्यानंतर जॅन्सननं त्याला स्लेज करण्याचा प्रयत्न केला. पण, रिझवाननं स्मित हास्य करत हा विषय आणखी वाढणार नाही याची काळजी घेतली.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

आयसीसी वन-डे विश्वचषक स्पर्धेतील चेन्नईत सुरू असलेल्या सामन्यात पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 271 धावांचं आव्हान ठेवलं होतं. लोअर ऑर्डरच्या फलंदाजांचा प्रतिकार हे पाकिस्तानच्या डावाचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं.

दक्षिण आफ्रिकेनं वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात 260 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग फक्त एक वेळा यशस्वीपणे केला होता.

लोअर ऑर्डरचा प्रतिकार

तबरेझ शम्सी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तबरेझ शम्सी

कर्णधार बाबर आझम बाद झाल्यानंतर पाकिस्तानची अवस्था 5 बाद 141 झाली होती. त्यानंतर पाकिस्तानी फलंदाजांनी प्रतिकार केला.

सौद शकीलनं या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक झळकावलं. त्यानं शादाब खानसह सहाव्या विकेटसाठी 84 धावांची महत्त्वाची भागिदारी केली. पाकिस्तानच्या डावातील ही सर्वात मोठी भागिदारी ठरली.

जेराल्ड कोट्झी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जेराल्ड कोट्झी

शादाब खान 43 तर शकील 52 धावांवर बाद झाले. हे दोघं बाद झाल्यानंतर मोहम्मद नवाझनं फटकेबाजी करत पाकिस्तानला 270 धावांचा टप्पा गाठून दिला.

शम्सीचा भेदक मारा

दक्षिण आफ्रिकेकडून तबरेझ शम्सी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. या स्पर्धेतील दुसरा सामना खेळणाऱ्या शम्सीनं 60 धावांमध्ये 4 विकेट्स घेतल्या.

मार्को जॅन्सननं 3 जेराल्ड कोट्झीनं 2 विकेट्स घेतल्या. तर ल्युंगी एंगिडीला एक विकेट मिळाली.

बाबरचं अर्धशतक

उपांत्य फेरीसाठीचं आव्हान कायम राखण्यासाठी पाकिस्तानला हा सामना जिंकणे आवश्यक आहे.

कर्णधार बाबर आझमनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बाबरनं या स्पर्धेतील त्याचं तिसरं अर्धशतक 64 बॉलमध्ये झळकावलं. अर्धशतक झाल्यानंतर लगेच 50 धावांवरच तो बाद झाला.

सौद शकील आणि शादाब खान फटकेबाजी करत असताना पाकिस्तान 325 धावा करेल असं वाटत होतं. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी त्यावेळी सामन्यात पुनरागमन करत पाकिस्तानला 275 धावांच्या आत रोखलं.

हे वाचलंत का ?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)