तेज प्रताप यादव यांना लालू प्रसाद यादव यांनी कुटुंबातून का काढलं होतं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सीटू तिवारी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
महुआ मतदारसंघातून उभे असलेले जनशक्ती जनता दलाचे अध्यक्ष आणि लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेज प्रताप यादव हे पिछाडीवर आहेत.
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार महुआतून लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे संजय कुमार सिंह हे आघाडीवर आहेत. ते 2,294 मतांनी पुढे आहेत.
राजदचे मुकेश कुमार रोशन हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर AIMIM चे अमित कुमार आहेत तर चौथ्या क्रमांकावर तेज प्रताप यादव आहेत.
राजदमधून बाहेर काढल्यानंतर तेज प्रताप यांनी जनशक्ती जनता दलाची स्थापना केली आणि स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला.
राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी त्यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांना पक्षातून यावर्षी मे महिन्यात 6 वर्षांसाठी निलंबित केलं. त्यासह कुटुंबातूनही काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेजप्रताप यांच्या काही मुलाखती बिहार निवडणुकांच्यावेळेस अनेकवेळा सोशल मीडियावर गाजत होत्या.
तेज प्रताप यांची आता कुटुंबात कोणतीही भूमिका राहणार नसल्याचं लालू प्रसाद यादव यांनी सोशल प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत म्हटलं होतं.
नुकतंच तेज प्रताप यादव यांनी सोशल मीडियावर आपल्या नात्याचा खुलासा करणारी एक पोस्ट केली होती. इथूनच वादाला सुरुवात झाली.

फोटो स्रोत, Getty Images
तेज प्रताप यादव यांनी या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, एका तरुणीसोबत आपले प्रेमसंबंध असून गेल्या 12 वर्षांपासून दोघे एकत्र आहोत.
मात्र, या पोस्टनंतर वादाला तोंड फुटलं.
तेज प्रताप यादव यांनी काही तासानंतर ती पोस्ट डिलीट करत आपलं सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याचं म्हणत सारवासारवही केली होती. परंतु, प्रकरण वाढतंच गेलं आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
दरम्यान, तेज प्रताप यादव एखाद्या वादामुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही वेगवेगळ्या कारणांमुळे ते चर्चेत राहिले आहेत.
1. जहानाबादमधून उतरवला उमेदवार, आरजेडीचा पराभव
लालू प्रसाद यादवांची दोन्ही मुलं, तेजस्वी आणि तेज प्रताप यादव, 2015 मध्ये विधानसभेत पोहोचले होते. गेल्या वर्षी तेजस्वी यांनी स्वतःला राजकीयदृष्ट्या घडवलं. पण तेज प्रताप यांचा अजूनही राजकारणात स्वतःची जागा तयार करण्यासाठीचा संघर्ष सुरू आहे.

फोटो स्रोत, ANI
2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान तेज प्रताप यादव यांनी 'लालू राबडी' मोर्चाची उभारणी केली. त्यांच्या आवडत्या उमेदवाराला निवडणुकीत उतरवण्याची त्यांची इच्छा होती. पण तसं झालं नाही तेव्हा त्यांनी जहानाबाद लोकसभा मतदारसंघातून स्वतंत्र उमेदवार म्हणून चंद्र प्रकाश यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं. त्या निवडणुकीत आरजेडीचे उमेदवार सुरेंद्र यादव यांची 1,751 मतांनी पिछेहाट झाली.
तेज प्रताप यांच्याकडून उतरलेल्या चंद्र प्रकाश यांना निवडणुकीत 7,755 मतं मिळाली. विश्लेषकांचं म्हणणं होतं की, सुरेंद्र यादव यांच्या अपयशामागचं मुख्य कारण चंद्र प्रकाश यांना मिळालेली उमेदवारी हेच होतं.
2. 'छात्र आरजेडी'च्या अध्यक्षपदासाठी भावासोबत भांडण
छात्र आरजेडीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून ऑगस्ट 2021 मध्ये तेज प्रताप यादव यांचा सामना जगदानंद सिंह यांच्याशी झाला. त्यांनी तेव्हाचे छात्र आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष आकाश यादव याला निलंबित केलं होतं.

फोटो स्रोत, ANI
तेज प्रताप यांनी त्यावर नाराजी जाहीर करत आरजेडीला घटनाविरोधी म्हटलं. पण तेजस्वी यादव यांनी जगदानंद सिंह यांचं समर्थन केलं. संघटनेत फेरबदल करण्याचे अधिकार त्यांच्याकडे असून कोणीही त्यात हस्तक्षेप करू शकत नाही अशी भूमिका त्यांनी घेतली.
त्याआधी तेज प्रताप यांनी जगदानंद सिंह यांना हिटलरची उपमा दिली होती. नाराज जगदानंद जवळपास दहा दिवस पक्षाच्या कार्यालयात येत नव्हते आणि पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमातही सामील झाले नव्हते. या प्रकरणात लालू प्रसाद यादव मध्ये पडल्यावर परिस्थिती पूर्ववत झाली.
3. होळीचा व्हायरल व्हीडिओ आणि भाषणबाजी
2025 च्या होळीला तेज प्रताप यादव यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यात होळीच्या एका कार्यक्रमात सामील झालेले तेज प्रताप त्यांचे अंगरक्षक दीपक कुमार यांना म्हणालेत, "ए हवालदार, कंबर हलव नाहीतर सस्पेंड केलं जाईल,"
तेज प्रताप यांच्या या वक्तव्यावर राजकीय आणि सामाजिक पातळीवर कडाडून टीका झाली. त्यानंतर पटना पोलिसांनी हवालदार दीपक कुमार यांना पोलीस सेवेत परत बोलावून घेतलं. आणि त्यांच्या जागी दुसरा अंगरक्षक नेमला.

फोटो स्रोत, ANI
होळीच्या दिवशीच तेज प्रताप दुचाकी वाहनावरून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या घरासमोर फेऱ्या मारताना दिसले.
"पलटू काका कुठे आहेत?" असंही ते ओरडत होते.
4. वरिष्ठ नेत्यांसोबत केला उद्धटपणा
'तेजू भैय्या' म्हणून प्रसिद्ध असलेले तेज प्रताप यादव राजकारणात सक्रीय झाले तेव्हा त्यांनी आरजेडीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांबद्दल अस्वस्थ करणारी विधानं केली.
जगदानंद सिंह, शिवानंद तिवारी यांंच्यासह रघुवंश प्रसाद सिंहसारख्या नेत्यांवरही त्यांनी तीव्र टीका केली.
जेव्हा आरजेडीचे प्रमुख राजपूत नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह पक्षावर नाराज झाले, तेव्हा तेज प्रताप यादव यांनी म्हटलं की, "समुद्रातून एक लोटा पाणी कमी झालं, तर काही फरक पडत नाही."

फोटो स्रोत, ANI
मे 2024 मध्येही एका कार्यक्रमादरम्यान तेज प्रताप यांनी मंचावर उपस्थित आरजेडीचे प्रदेश महासचिव यांना सर्वांसमोर दोन थोबाडीत मारल्या आणि धक्का देऊन मंचावरून खाली उतरवलं होतं.
5. देवी-देवतांच्या वेषात वावरल्यामुळेही चर्चेत राहिले
दोन वेळा आमदार आणि बिहार सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केलेले तेज प्रताप यादव त्यांचं राहणीमान आणि जीवनशैलीमुळेही सतत चर्चेत असतात.
कधी ते श्रीकृष्णाचा वेष धारण करतात तर कधी महादेवाचा. ते स्वतःला बिहारचा दुसरा लालू, किंगमेकर आणि तेजस्वी यादव यांचा सारथी असल्याचं म्हणतात.
जिलेबी तळतानाचा त्यांचा एक फोटोही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

फोटो स्रोत, ANI
2018 मध्ये त्यांचं लग्न बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा प्रसाद राय यांची नात ऐश्वर्या राय हिच्याशी झालं होतं. मात्र, हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. आणि घटस्फोटाचा खटला अजूनही कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित आहे.
तेज प्रताप यांची अनेक प्रेमप्रकरणंही वेळोवेळी चर्चेत राहिली आहेत. युट्यूबर्स आणि पत्रकारांप्रती त्यांची वागणूकदेखील अनेकदा वादाचे कारण ठरल्याचे दिसून येते.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











