पिकासोचं नग्न महिलांचं ते जगप्रसिद्ध चित्र, एकाचवेळी तिरस्कार आणि प्रेमास पात्र का ठरलं?

फोटो स्रोत, The Museum of Modern Art, New York/ Aurélien Mole/ Henry Taylor
- Author, प्रिशियस अडेसिना
- वाचन वेळ: 7 मिनिटे
एक जगप्रसिद्ध चित्र, ज्याच्या वाट्याला एकाच वेळी तिरस्कार आणि प्रेम आलं आहे. 'लेस डेमॉइसेलेस डी'अविग्नॉन' असं या संघर्ममय चित्राचं नाव आहे.
अनेक दशकांपासून हे चित्र वादग्रस्त राहिलं आहे. जगप्रसिद्ध चित्रकार पिकासो यानं काढलेलं हे चित्र आहे.
पिकासोनं ही कलाकृती निर्माण केल्यानंतर एक शतकानं, अमेरिकेतील ख्यातनाम कलाकार हेन्री टेलर यांनी या चित्राचा नवा अर्थ मांडला आणि त्याला आव्हानच दिलं.
हेन्री टेलर यांची ही आवृत्ती आता पॅरिसमधील म्युसे पिकासोमधील एका मोठ्या प्रदर्शनाच्या केंद्रस्थानी आहे.
पाब्लो पिकासोनं 1907 मध्ये त्याच्या पॅरीसमधील स्टुडिओमध्ये कलाकार आणि मित्रमंडळी अशा काही जणांना बोलावलं. तो 6 महिन्यांपासून ज्या चित्रावर काम करत होता, ते त्यांना दाखवण्यासाठी स्टुडिओमध्ये बोलावलं होतं.
ते चित्र पाहून तिथे आलेल्या सर्वच जणांनी जवळपास एकमतानं, 'धक्का, भीती आणि तिरस्कार' अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
'हे चित्र पाहणं म्हणजे पेट्रोल पिण्यासारखं'
फ्रेंच चित्रकार जॉर्जेस ब्रॅक यानं हे चित्र पाहण्याचा अनुभव म्हणजे पेट्रोल पिण्यासारखा होता, असं म्हटलं आहे.
तर हेन्री मॅटिस यानं या चित्रातील महिला 'भयंकर किंवा विद्रूप' आहेत असं म्हटल्याचं सांगितलं जातं.
त्यानंतर जवळपास एक दशकानं, म्हणजे 1916 पर्यंत हे चित्र सार्वजनिकरित्या दाखवलं गेलं नाही.
एक शतकाहून अधिक काळ लोटल्यानंतर, हे चित्र पिकासोच्या सर्वाधिक परिचित आणि वादग्रस्त कलाकृतींपैकी एक ठरलं आहे.
अमेरिकेतील प्रख्यात चित्रकार हेन्री टेलर यांनीही या चित्राची पुनर्मांडणी केली आहे. टेलर यांनी या चित्राची केलेली मांडणी म्हणजेच चित्र सध्या पॅरीसमधील 'म्युसे नॅशनल पिकासो' मधील एका प्रमुख प्रदर्शनात मांडण्यात आलं आहे.
आधीच्या चित्राबद्दलच्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर टेलर यांनी भर दिला आहे. तो म्हणजे, पिकासोनं त्यांच्या हयातीत या चित्राला जोडलं होतं, त्यापेक्षा कितीतरी अधिक ते पारंपारिक आफ्रिकन कलेशी निगडीत होतं.

फोटो स्रोत, The Museum of Modern Art, New York
पिकासोनं त्याच्या मित्र, समकालिनांना बोलावून दाखवलेल्या चित्राचं नाव होतं, 'लेस डेमॉइसेलेस डी'अविग्नॉन' (1907). ते एक मोठं तैलचित्र होतं.
त्यात बार्सिलोनाच्या एका वेश्यावस्तीतील 5 नग्न महिला प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. त्यातील 2 महिलांचे चेहरे मुखवट्यासारखे आहेत. तर 3 जणी पाहणाऱ्यांकडे रोखून पाहत आहेत. त्या सर्वांची शरीरं खडबडीत आणि विखुरलेली, तुटलेली आहेत.
या चित्रामुळे पिकासोच्या सर्जनशील प्रवासानं एक मोठं वळण घेतलं. तसंच त्या काळातील कलात्मक नियम किंवा मानकांपासून एक नाट्यमय फारकत घेतली.
"पिकासो भावनिक, आलंकारिक चित्रकलेपासून दूर गेला आणि आकार, रचनांचे तुकडे करण्याकडे तसंच अवकाश, शरीरं यांची मांडणी कशाप्रकारे करता येईल, याच्या पुनर्विचाराकडे वळला. क्युबिझम आणि आधुनिक कलेचा विकास करण्यामध्ये त्याला आकार देण्यामध्ये हा बदल महत्त्वाचा ठरला," असं जोआन स्न्रेच बीबीसीला म्हणाले. ते म्युसे नॅशनल पिकासोचे क्युरेटर आहेत.
'लेस डेमॉइसेलेस डी'अविग्नॉन' या चित्रातून क्युबिझमची सुरुवात
'लेस डेमॉइसेलेस डी'अविग्नॉन' म्हणजे अविग्नॉनच्या तरुण महिला. या चित्राचं नाव सुरुवातीला 1916 पर्यंत 'ले बोर्डेल डी'अविग्नॉन' म्हणजे अविग्नॉनचे वेश्यालय असं होतं. त्यानंतर त्यांचं शीर्षक कमी वादग्रस्त ठरावं यासाठी बदलण्यात आलं.
क्युबिझमच्या उदयातील एक मूलभूत कलाकृती अशी या चित्राची ओळख आहे. क्युबिझम ही 20 व्या शतकातील एक कलेच्या विश्वातील चळवळ आहे. पांरपारिक, वास्तववादी चित्रणाच्या, मांडणीच्या पद्धती सोडून त्याऐवजी विखंडित आणि भौमितिक आकारांना पसंती देण्यासाठी ही चळवळ ओळखली जाते.

फोटो स्रोत, Getty Images
पिकोसानं डेमॉईसेलेसमध्ये केलं तसं, क्युबिझमनं एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीचे अनेक उपयुक्त बिंदू किंवा दृष्टीकोन एकाच प्रतिमेत विलीन केले.
"या बदलावर इतकी तीव्र स्वरुपाची प्रतिक्रिया येण्याागचं एक कारण म्हणजे पिकासोनं फक्त एकच गोष्ट बदलली नाही. तर त्यानं एकाचवेळी सर्वकाही बदललं. अगदी असे कलाकार, जे आधीच नवीन शैलींचे प्रयोग करत होते, त्यांनादेखील हा बदल जरा जास्तच वाटला," असं स्न्रेच म्हणाले.
पिकासोवरील आफ्रिकन कलेचा प्रभाव
मात्र पिकोसाच्या या नाविन्यपूर्ण कल्पना अचानक कुठुनही आल्या नव्हत्या. त्यातील काही तर थेट आफ्रिका खंडातून आल्या होत्या, असं म्हणता येईल.
पिकासोनं हे चित्र साकारण्याच्या काही महिने आधी आफ्रिकन मुखवटे आणि शिल्पं, यांच्यामध्ये पिकासोची विशेष आवड निर्माण झाली होती.
पिकासोला याची प्रेरणा 1906 मध्ये पॅरिसमध्ये मॅटिसनं खरेदी केलेल्या एका छोट्या मूर्ती किंवा पुतळ्यामधून मिळाली होती. त्यानं ती आताच्या डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगोमधून घेतली होती.
मग पिकासो 'म्युसे द एथनोग्राफी ड्यू ट्रोकडेरो'मधील आफ्रिका विभागामध्ये नियमितपणे जाऊ लागला होता. त्यातून त्यानं त्याच्या या नव्या मास्टरपीस म्हणजे अफलातून कलाकृतीसाठीची शेकडो प्राथमिक रेखाचित्रं तयार केली होती.
"त्या कलाकृतींचं फक्त दिसणंच त्याला भावलं नव्हतं. तर त्या काम कसं करतात, याचाही त्याच्यावर प्रभाव पडला होता. ते चेहरे सोपे आहेत, विकृत आहेत, काहीवेळा तर खूपच तीव्र स्वरुपाचे आणि अस्वस्थ करणारे आहेत," असं स्न्रेच म्हणाले.
"मानवी चेहऱ्यांच्या बाबतीतील या वेगळ्या दृष्टीकोनामुळे तो स्पष्टपणे प्रभावित झाला होता, त्याला त्यामधून प्रेरणा मिळाली होती. त्यातून त्याला निसर्गवादापासून दूर जाऊन अधिक अमूर्त आणि संघर्षमय, थेट भिडणाऱ्या विषयांकडे वळता आलं," असं स्न्रेच पुढे नमूद करतात.
पिकासोनं आफ्रिकन कलेचा प्रभाव स्पष्टपणे मान्य केला नाही
पिकासोवर आफ्रिकन कलेच्या पडलेल्या प्रभावामुळे, त्याच्याशी आलेल्या संबंधांमुळे त्याच्या या आणि इतर अनेक कलाकृती साकारल्या गेल्या होत्या. मात्र असं असूनही पिकासोनं त्याचं महत्त्व पुरेसं मान्य केलं नव्हतं, असं म्हटलं जातं.
एक समीक्षक 1920 मध्ये एका मासिकासाठी आफ्रिकन कलेवर एक लेखमाला लिहित होता. या शैली किंवा कलेबद्दल पिकासो त्याला जे म्हणाला होता, ते प्रसिद्ध आहे. पिकासो त्याला म्हणाला होता की, मी "याबद्दल कधीही ऐकलेलं नाही".
एकीकडे पिकासो आफ्रिकन कलेचा थेट फायदा घेत होता. तर दुसऱ्या बाजूला तो त्याच्यावर असणारा आफ्रिकन कलेचा प्रभाव मान्य करण्यास फारसा तयार नव्हता. यामुळे नंतर सांस्कृतिक गैरवापर किंवा अपहाराचे आरोप झाले.
पिकासोनं पाहिलेल्या, मात्र वरवर पाहता दुर्लक्षित केलेल्या वस्तूंचे सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक महत्त्व समीक्षक अधोरेखित करतात. तसंच आफ्रिकन कलेकडे त्याकाळात 'आदिम' स्वरुपातील कला म्हणून पाहण्याच्या व्यापक मांडणीमध्ये या गोष्टीनं कशी भर घातली हेदेखील समीक्षक सांगतात.
'लेस डेमॉईसेलेस' चित्राची पुनर्मांडणी आणि आफ्रिकन कलेचा संदर्भ
पिकासोच्या या ख्यातनाम चित्राकडे हेन्री टेलर 2007 मध्ये वळले. ते त्यावेळेस त्यांच्या पहिल्या सोलो म्हणजे एकल युरोपियन प्रदर्शनासाठी पॅरीसला गेलेले होते.
पिकासोनं हे चित्र साकारल्याच्या जवळपास बरोबर एक शतकानंतर हे झालं होतं. या चित्राच्या टेलर यांच्या आवृत्तीचं शीर्षक, 'फ्रॉम काँगो टू द कॅपिटल अँड ब्लॅक अगेन' (2007) असं आहे.
हे चित्र आता पॅरिसमधील म्युसे नॅशनल पिकासोमध्ये प्रदर्शनात मांडलं आहे. व्हेअर थॉट्स प्रोव्होक हे त्यांचं युरोपमधील पहिलं सिंहावलोकनात्मक प्रदर्शन असून त्यात हे चित्र मांडण्यात आलं आहे.
त्यांनी या चित्रात 5 नग्न महिलांची रचना आणि मुद्रा तशाच ठेवल्या आहेत. तसंच 2 वैशिष्ट्यपूर्ण मुखवटाधारी महिलांची रचनाही तशीच ठेवली आहे. मात्र आधीच्या पांढऱ्या आकृत्या आता काळ्या झाल्या आहेत. त्यातून आफ्रिकन कला अधिक स्पष्टपणे समोर येते.

फोटो स्रोत, New York/ Aurélien Mole c Henry Taylor Courtesy the artist
हेन्री टेलर अमेरिकेतील कृष्णवर्णियांच्या जीवनाचं चित्रण करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. वेगळी सांस्कृतिक आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेला एक कलाकार म्हणून त्यांनी त्यांच्या स्वत:च्या दृष्टीकोनातून या कलाकृतीची नव्यानं कल्पना केली आहे किंवा मांडणी केली आहे.
"ऐतिहासिकदृष्ट्या ज्या लोकांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नाही, अशा लोकांवर टेलर यांची कलाकृती केंद्रित असते. त्यातून अशा लोकांना एक अस्तित्व आणि वेगळेपण मिळतं. पिकासो आणि टेलर यांच्या कलाकृती एकत्र मांडल्यानंतर त्यातून फक्त कलात्मक फरकच समोर येत नाही. तर सत्ता, प्रभाव आणि कोणाच्या कथा सांगितल्या जात आहेत, याविषयीचे व्यापक प्रश्नदेखील त्यातून समोर येतात," असं स्न्रेच म्हणाले.
एकाच चित्राच्या 2 मांडण्यांमधील विरोधाभास
या 2 कलाकृतींमधून महिलांबद्दलचे वेगवेगळे दृष्टीकोनदेखील अधोरेखित होतात, समोर येतात. पिकासोचं महिलांच्या बाबतीत ऐतिहासिकदृष्ट्या गुंतागुंतीचं नातं होतं. त्याचा प्रभाव त्यांच्या चित्रांमधून वेगळं करणं कठीण झालं आहे. पिकासो अनेक ताणतणावांनी भरलेल्या प्रेमसंबंधांसाठी ओळखला जातो.
त्यानं चित्रकार फ्रँकोईस गिलोट याला कथितरित्या सांगितलं होतं की, सर्व महिला एकतर 'देवी' असतात किंवा 'पायपुसणं' असतात आणि 'दु:ख देणारी यंत्र' असतात. त्यामुळे पिकासोच्या चित्रांमधील विखंडित शरीरांमधील हिंसा, काही समीक्षकांना सौंदर्यात्मक किंवा कलात्मक वाटण्याऐवजी वैयक्तिक स्वरुपाची वाटते.
"वेश्यालयातील नग्न महिलांचा समूह हा विषय आधीच प्रक्षोभक होता. मात्र पिकासोनं त्यातील मृदूपणादेखील काढून टाकला," असं स्न्रेच म्हणाले.
या चित्राच्या नव्या आवृत्तीत, अमूर्त स्वरुपात असूनदेखील महिलांचे शरीर कमी विस्कळीत किंवा विखंडित स्वरुपात आहेत. याचा अंतिम परिणाम आक्रमक असण्यापेक्षा अधिक शक्तिशाली स्वरुपाचा आहे.
टेलर यांच्या चित्रातील मध्यवर्ती आकृती किंवा व्यक्तिरेखा म्हणजे महिला, तिचे हात थोडेसे पाठीमागे ठेवून उभी आहे. तिची आखूड अप्रमाणबद्ध केशरचना ही जोसेफिन बेकर यांच्याशी मिळती जुळती आहे. त्या एक अमेरिकन-फ्रेंच नर्तकी आणि गायिका होत्या.
जागतिक ख्यातीच्या पहिल्या कृष्णवर्णीय सुपरस्टार म्हणून त्या ओळखल्या जातात. असं चित्रण करून कलाकार "अस्मिता, वंश आणि प्रतिनिधित्व या मुद्द्यांचे प्रश्न उपस्थित करतो," असं स्न्रेच म्हणाले.
आफ्रिकन व्यक्तिरेखेचा आफ्रिका ते पॅरिसपर्यंतचा प्रवास
टेलर यांच्या चित्राचं शीर्षक, 'फ्रॉम काँगो टू द कॅपिटल अँड ब्लॅक अगेन' (2007) असं आहे. त्यात मॅटीस यांच्या काँगोलीज व्यक्तिरेखेचा संदर्भ आहे. या व्यक्तिरेखेमुळेच पिकासोची आफ्रिकन कलेमधील रुची, आवड निर्माण झाली होती.
चित्रातून या व्यक्तिरेखेच्या आफ्रिकेतून पॅरिसपर्यंतच्या प्रवासावर प्रकाश टाकण्यात आला आहे. टेलर यांनी या चित्रात कृष्णवर्णीयांचा समावेश करून ते पुन्हा कसं 'कृष्णवर्णीय बनवलं' (ब्लॅक अगेन) याचाही तो संदर्भ आहे.
तरीदेखील, यात अगदी डाव्या कोपऱ्यात सोन्याचं घड्याळ घातलेला एक श्वेतवर्णीय पुरुषाचा हात दिसतो आहे. तो शरीरापासून वेगळा होऊन तरंगतो आहे. तो हात या चित्रातील एका व्यक्तिरेखेला चाचपडतो किंवा स्पर्श करतो आहे.
हा त्या 2 पुरुषांनी दिलेला संकेत असू शकतो. 2 पुरुष म्हणजे एक खलाशी आणि दुसरा वैद्यकीय शाखेचा विद्यार्थी. सुरुवातीला पिकासोनं त्यांचा समावेश चित्रात करण्याबद्दल विचार केला होता.
"यातून चित्रकार फक्त पिकासोचाच संदर्भ देत नाहिये, तर तो त्याबद्दल प्रश्न उपस्थित करतो आणि त्याची नव्यानं मांडणी करतो आहे," असं स्न्रेच पुढे म्हणाले.
आधी तिरस्कार नंतर गौरव
ब्रेकनं सुरुवातीला 'लेस डेमॉईसेल्स' या चित्रबद्दल टिप्पणी केली होती. मात्र त्यानंतर लवकरच त्यानं त्याच्या चित्रांच्या बाबतीत अनेक कोनांचा विचार करण्याचा दृष्टीकोन स्वीकारला.
तर 1920 च्या दशकापर्यंत ज्या गोष्टीमुळे पिकासोच्या चित्रांबद्दल सुरुवातीच्या काळात तिरस्कार निर्माण झाला होता. त्याच गोष्टीमुळे त्याच्या चित्राला एक अप्रतिम, उत्कृष्ट कलाकृती म्हणून मान्यता मिळाली.
लेखक आणि कवी आंद्रे ब्रेस्टन यांनी या चित्राचा गौरव क्रांतिकारी असा केला. ते चित्र विकत घेण्याबाबत त्यांनी फ्रेंच फॅशन डिझायनर आणि कला संग्रहक जॅक्वेस डुसेट यांचं मन वळवलं.
मग 1939 मध्ये न्यूयॉर्कच्या म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टनं ते चित्र एक प्रमाणभूत किंवा नियमसंगत कलाकृती म्हणून मिळवलं. आजही ते चित्र तिथेच आहे.
'लेस डेमॉईसेलेस डी'अविग्नॉन' या चित्राला 100 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. मात्र हे चित्र आजदेखील इतकं वादग्रस्त आहे की कलाकार अजूनही त्यातील मांडणी आणि संकल्पनांशी झगडत आहेत.
एकाच चित्राचा एकाच वेळी कशाप्रकारे मोठ्या प्रमाणात तिरस्कार केला जाऊ शकतो आणि त्यावर प्रेमदेखील केलं जाऊ शकतं, तसंच कलेच्या इतिहासाला ते चित्र कसं एक नाट्यमय वळण देऊ शकतं, याचा हा निश्चितच एक पुरावा आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



























