शहीद दिवस: भगत सिंह यांना जेलमधून सोडवण्यासाठी ट्रेन लुटण्याचा प्रयत्न करणारे शेर जंग कोण होते?

फोटो स्रोत, sumresh jung
- Author, हरमनदिप सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
आज शहीद दिवस आहे. आजच्याच दिवशी म्हणजेच 23 मार्च 1931 रोजी भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांनी भारतासाठी बलिदान दिले होते. त्यांच्या या लढ्यात अनेक क्रांतिकारक सहभागी होते. आज शहीद दिवसाच्या निमित्ताने भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या एका साथीदाराची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ब्रिटिशांविरोधातल्या भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात भगत सिंह आणि इतर काही प्रमुख क्रांतीकारकांची सोबत करणारा एक क्रांतीवीर म्हणजे शेर जंग.
भगत सिंह आणि बटुकेश्वर दत्त यांना जेलमधून सोडवण्यासाठी ट्रेन लुटल्याबद्दल त्यांनी 14 वर्ष जेलमध्ये काढली. जैतो मोर्चात सहभागी झाल्यानंतर लहान वयातच त्यांनी 3 महिने तुरूंगवास भोगला.
स्वातंत्र्यानंतरही ते वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन लढत राहिले. पण त्यांचं नाव इतिहासात उपेक्षित राहिलं.
शेर जंग यांचा इतिहास समजून घेण्यासाठी आम्ही शक्ती सिंह चंदेल आणि राकेश कुमार या दोन इतिहासकारांशी आम्ही बोललो.
सुनाममध्ये राहणारे इतिहासकार राकेश कुमार यांनी शेर जंग यांच्यावर एक पुस्तक लिहिलंय. या पुस्तकाचं नाव आहे 'क्रांतिकारी शेर सिंह - अ लायन लाइक लायन्स'. अलीकडेच राकेश कुमार यांना या पुस्तकासाठी भाषा विभागाकडून भाई वीर सिंह पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
तसंच, लेखक शक्ती एस. चंदेल यांनी 'शेर जंग-द वॉरियर सन ऑफ इंडिया' या नावाचं पुस्तक लिहिलंय.
"शेर जंग यांचं नाव इतिहासाच्या पुस्तकात नमूद केलेलं नाही. त्यांच्या शौर्याची कुठेही नोंद नाही. भारताच्या राजकारणात ते फारसे महत्त्वाचे नेते म्हणूनही पुढे आले नाही. पण त्यांचं योगदान फार मोठं आहे," चंदेल सांगतात.
तर इतिहासकार राकेश कुमार म्हणतात, "शेर जंग यांनी त्यांचं जीवन देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि सेवेसाठी दिलं होतं. तरुण वयातच आराम आणि ऐश्वर्य सोडून ते जेलमधलं कठीण आयुष्य जगत होते. मारहाण, बेड्या, हातकड्यांच्या विखळ्यात उपासमारीच्या शिक्षा भोगत होते. तरीही मुख्यधारेतून त्यांना वगळलं गेलं."
शेर जंग यांचं कुटुंब आणि लहानपण
शेर जंग यांचे नातू 54 वर्षांचे समरेश जंग हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे नेमबाज आहेत.
बीबीसी पंजाबीशी बोलताना आपल्या आजोबांचा (शेर जंग) जन्म 27 नोव्हेंबर 1904 ला आत्ताच्या हिमाचल प्रदेशला झाला होता असं समरेश यांनी सांगितलं.
शेर जंग यांचे वडील प्रताप सिंह सिरमौर राज्यात कलेक्टर होते. आईचं नाव होतं मुन्नी. त्यांना एकूण 5 भावंडं होती.
चौथीपर्यंत ते एका स्थानिक शाळेत शिकले आणि नंतर शाळा सोडून दिली, असं समरेश सांगत होते. त्यानंतर त्यांच्या अभ्यासासाठी एका फ्रेंच शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली. त्यांना बिबट्यांचं फार आकर्षण होतं. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी एका नरभक्षक बिबट्याची शिकारही केली होती.


भगत सिंह यांच्याशी मैत्री आणि क्रांतिवीर बनण्याची गोष्ट
तरुण असल्यापासूनच शेर जंग यांचे विचार विद्रोही होते असं राकेश कुमार सांगतात. त्यामुळेच त्यांच्या वडिलांनी विद्या देवी या त्यांच्या मोठ्या बहिणीसोबत त्यांना लाहोरला पाठवून दिलं. विद्या यांचे पती उदय वीर लाहोरच्या शास्त्री नॅशनल कॉलेजमध्ये संस्कृत शिकवत. त्यांचं घर क्रांतीकाऱ्यांचं एकत्र जमण्याचं ठिकाण होतं.
राकेश यांच्या म्हणण्यानुसार तिथेच त्यांची भेट भगत सिंह, भगवती चरण वोहरा आणि दुर्गा भाभी यांच्याशी झाली. त्यांच्या क्रांतीकारी विचारांचा प्रभाव शेर जंग यांच्यावर पडला. युवा भारत सभेचे ते सक्रिय कार्यकर्ते झाले आणि ऐन तारूण्यातच भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात त्यांचा प्रवेश झाला.
समरेश जंग यांनीही तेच सांगितलं. मेव्हणे उदय वीर यांच्यामुळेच त्यांचे आजोबा भगत सिंग आणि भगवती चरण वोहरा यांच्या संपर्कात आल्याचं ते म्हणाले. सगळे पिस्तुल चालवण्याचा सराव करण्यासाठी शेर जंग यांच्या मूळ गावी सिरमोरच्या हरिपूरला जात असत.

फोटो स्रोत, Rakesh Kumar
अहमदगड ट्रेनची लूट
भगत सिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी 8 एप्रिल 1929 ला नवी दिल्लीच्या सेंट्रल असेंब्लीच्या सभागृहामध्ये दोन बॉम्ब फेकले. त्या प्रकरणात 16 जून 1929 ला दोघांनाही आजीवन कारावासाची शिक्षा झाली.
या दरम्यान इतर क्रांतिकारी या दोघांना कारागृहातून सोडवण्याचे प्रयत्न करत होते असं राकेश कुमार सांगतात. त्यासाठी पैशाची गरज होती.
त्यासाठी जाखलवरून संगरूरमार्गे लाहोरला जाणारी ट्रेन लुटण्याचं त्यांनी ठरवलं. 15 ऑक्टोबर 1929 ला दरोडा घालायचं ठरलं.
"शेर जंग, साहिब सिंह सलाना, जसवंत सिंह, मास्टर गुरदयाल सिंह, चरण सिंह आणि हरनाम सिंह चमक एवढे लोक यात सामील होते."

फोटो स्रोत, Rakesh Kumar
त्या दिवशी काय झालं?
राकेश कुमार पुढे सांगतात की ठरवल्यानुसार सगळेजण धुरीमध्ये जमले. तिथं गेल्यावर गाडीत एक बंदुकधारी पोलीस चढला असल्याचं त्यांना समजलं. मालेरकोटलापर्यंत हा अधिकारी गाडीत प्रवास करणार होता. त्याशिवाय कोणीही गाडीत नव्हतं.
गाडी थांबल्यावर सगळे उतरले आणि आपल्या आपल्या कामाला लागले.
तेव्हा शेर जंग आणि साथीदारांनी गाडीत जाऊन खजिन्याची पेटी उघडायचा प्रयत्न सुरू केला. पण त्याला लावलेलं कुलूप उघडलंही जात नव्हतं आणि तुटतही नव्हतं.

फोटो स्रोत, Rakesh Kumar
कुलूपाची चावी मिळेल अशी आशा सगळ्यांना वाटत होती. त्यामुळे कुलूप तोडण्याचं सामानही त्यांनी सोबत नेलं होतं.
गरजेसाठी लागेल म्हणून एक हातोडासोबत नेला होता. पण त्याने कुलूप तुटेना. पेटी ट्रेनमधून खाली फेकून द्यायचा विचारही झाला. पण ती अवजड पेटी घेऊन जाणं फार अवघड झालं असतं.
यात जवळपास अर्धा तास गेला. पेटी तुटण्याचं नाव घेत नव्हती. तेव्हा सगळ्यांनी तिथून काढता पाय घ्यायचं ठरवलं.
समर्पण का केलं?
राकेश कुमार यांच्या म्हणण्यानुसार शेर जंग यांनी मार्च 1930 मध्ये पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. उदयवीर शास्त्री आणि डॉ. हरदुआरी सिंह या त्यांच्या दोन महुण्यांच्या हातून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केलं गेलं.
31 मे 1930 ला त्यांना लुधियाना न्यायालयात शिक्षा सुनवली गेली. तिथून त्यांना थेट लाहोरमधल्या मध्यवर्ती कारागृहात आणलं गेलं. नंतर फिरोजपूर, लुधियाना, ओल्ड सेंट्रल मुल्तान, न्यू सेंट्रल मुल्तान अशा अनेक कारागृहात ठेवण्यात आलं होतं.
राकेश कुमार सांगतात की स्वातंत्र्य आंदोलनात नवी चेतना आणि जोश जागवण्यासाठी त्यांनी आत्मसमर्पण करायचा निर्णय घेतला. शेर जंग यांना अटक करवून दिल्याबद्दल मेहुण्यांना मिळालेली बक्षिसी क्रांतिकारकांना पुढच्या कामासाठी दिली गेली. हे आत्मसमर्पण ठरवून योजनेनुसार केलं गेलं होतं.

फोटो स्रोत, Rakesh Kumar
कारागृहात राहताना या आत्मसमर्पणाबद्दल शेर जंग यांनी लिहिलं, "आपल्यापैकी ज्याला मृत्यूदंडाची शिक्षा मिळण्याची शक्यता आहे त्यांनी आत्मसमर्पण करावं असं आमच्या क्रांतिकारी संघटनेनं ठरवलं होतं. त्याने आंदोलनात नवी चेतना जागवली जाईल. म्हणून मी स्वतःचं समर्पण केलं."
"अटकेची व्यवस्था संघटनेचे कार्यकर्ते आणि माझ्या एका मित्राने केली. त्यातून मिळणारं बक्षीसही संघटनेला दिलं जाईल हेही आधीच ठरलेलं."
आपल्या जेलमधल्या काळाबद्दल शेर जंग यांनी 1991 मध्ये एका इंग्रजी पुस्तकात लिहिलं. 'प्रिझन डेज रिकलेक्शन अँड रिफ्लेक्शन' हे ते पुस्तक.
जेलमधून सुटका आणि लग्न
साहित्यकार राकेश कुमार सांगतात की शेर जंग यांच्या पत्नी निर्मला यांचा जन्म 31 डिसेंबर 1914 ला लाहोरमध्ये झाला होता. त्यांचे वडील फकीर चंद वकील होते. 1936 मध्ये विश्वविद्यालयात त्या मानसशास्त्र शिकत होत्या त्यावेळी शेर जंग मध्यवर्ती कारागृहात कैद होते.
आपल्या एका वकील मित्रासोबत त्या शेर जंग यांना भेटायला गेल्या. त्यानंतर निर्मला आणि त्यांची सतत भेट होत राहिली.

फोटो स्रोत, Rakesh Kumar
त्यांनी शेर जंग यांच्यावर 'हिमाचलचा सिंह : शेर जंग सिंह' हे पुस्तकही लिहिलं. या पुस्तकात त्यांनी शेर जंग यांच्यासोबतच्या भेटींबद्दल लिहिलं आहे.
2 मे 1938 मध्ये शेर जंग यांची सुटका झाली आणि 12 मे ला त्यांनी निर्मला यांच्यासोबत लग्न केलं. दोन वर्षांत 1940 मध्ये त्यांना एक मुलगा झाला. त्याचं नाव शिलीश जंग ठेवलं.
जैतो मोर्चा आणि बब्बरांशी संबंध
जैतो मोर्चात शेर जंग यांचाही समावेश होता असं राकेश कुमार सांगतात. ते बब्बरांच्याही संपर्कात होते आणि इंग्रजांविरोधातल्या जवळपास प्रत्येक संघर्षात सहभागी होत असत.
राकेश कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे शेर जंग यांची बहीण लिलावती यांनी वहिनी निर्मला हिला लहानपणीची एक घटना सांगितली होती. शेर जंग घरी कोणालाही न सांगता गपचूप मोर्चात सहभागी झाले. तेव्हा त्यांना तीन महिने तुरूंगवासही झाला होता. पोलिसांची काठी खाऊन ते जखमीही झाले होते.

फोटो स्रोत, Rakesh Kumar
1923 मध्ये बब्बर अकाली आंदोलनाने जोर पकडला तेव्हा शेर जंग त्यांच्या संपर्कात आले. ट्रेनवर डाका घालताना त्यांच्यासोबत असणाऱ्या साहिब सिंह सलाना यांच्यासोबत ते शेखा गावात बब्बर अकाली दलाच्या बैठकीलाही गेले होते.
लग्नानंतरही शेर जंग वेगवेगळ्या प्रकारे आंदोलनांच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत राहिले. 1940 पासून 1944 पर्यंत त्यांनी दिल्लीच्या मध्यवर्ती कारागृहात आणि देवळीच्या छावणीत अटकेत ठेवलं होतं. त्यांनी सैनिकांविरोधात अनेक उपक्रमात भाग घेतला होता.
फाळणीनंतर केलेली मदत
"पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मनात शेर जंग यांच्याबद्दल खूप आदर होता. फाळणीनंतर दंगली थांबवण्याच्या आणि शरणार्थींची काळजी घेण्याच्या शेर जंग यांच्या कामचं नेहरूंनी अनेकदा कौतुकही केलं होतं," शक्तीसिंह चंदेल सांगतात.
1947 मध्ये सांप्रदायिक दंगलींच्या घटना वाढत होत्या. त्यावेली शेर जंग यांनी मुस्लिमांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केलं. अनेक आश्रय छावण्या बनवल्या. शेर जंग यांनी त्याचं नेतृत्व केलं.
दिल्लीतलं शेर जंग यांचं घरही शरणार्थींसाठी छावणी केंद्र बनलं होतं. अनेक घाबरलेले मुस्लिम त्यांच्या घरात राहत होते, असं राकेश कुमार म्हणतात.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर पार पाडलेल्या जबाबदाऱ्या
दोन्ही इतिहासकार सांगतात की फाळणीनंतर दंगली थांबवण्यासाठी शेर जंग यांची नियुक्ती स्थानिक दंडाधिकारी म्हणून केली गेली होती.
त्यांचं कार्यालय चांदणी चौकातल्या टाऊन हॉलमध्ये होतं. गोंधळ सुरू झाल्याची खबर येताच शेर जंग खुद्द तिथं जात होते. दिल्लीत दंगल होऊ नये हेच त्यांचं ध्येय होतं.

फोटो स्रोत, Rakesh Kumar
"त्यानंतर ऑक्टोबर 1947 मध्ये पाकिस्तानी मुजाहिदीनांनी जम्मू काश्मीरवर हल्ला केला. त्यावेळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शेर जंग यांना 25 ऑक्टोबर 1947 ला काश्मीरला पाठवलं गेलं. नेहरूंच्या उपस्थितीत काश्मीर सरकारने 28 मार्च 1948 ला शेर जंग यांना कर्नल हे पद बहाल केले," असं राकेश कुमार सांगतात. शक्ती चंदेल यांच्या पुस्तकातही त्याचा उल्लेख आहे.
शेवटचा श्वास
शेवटच्या काळात शेर जंग त्यांची पत्नी, मुलं आणि कुटुंबासोबत दिल्लीतल्या खेबर पासमधल्या बुटा सिंह बिल्डिंग मध्ये राहत होते. शेवटपर्यंत त्याचं लिहिणं-वाचणं सुरू होतं. 15 डिसेंबर 1996 च्या सकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

फोटो स्रोत, Rakesh Kumar
त्याच्या आदल्या रात्री 14 दिसंबर 1996 ला त्यांच्या नातवाचं लग्न होतं. सोहळा पहाटे तीनपर्यंत सुरू होता. कार्यक्रम संपल्यावरच त्यांनी जीव सोडला. तेव्हा त्यांचं वय 92 वर्ष होतं.
दिल्लीतल्या त्यांच्या घरी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











