राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांनी काय साधलं जातं आहे?

राहुल गांधी

फोटो स्रोत, @INC

पुढची लोकसभा निवडणूक 2024 च्या मध्यात आहे. पण भारताची भूमी जेवढं या निवडणुकीचं मैदान असेल, तेवढंच हे मैदान परदेशी भूमी असेल असंही दिसतं आहे.

राहुल गांधीच्या सध्याच्या अमेरिका दौऱ्यावरुन, त्यावरच्या कॉंग्रेस विरुद्ध भाजपा यांच्या प्रतिक्रियांवरुन, राहुल गांधींच्या विधानांवरुन आणि त्यावरुन विभागल्या गेलेल्या जनमानसावरुन हे दिसतंच आहे देशातलं मैदान या लढाईला कमी पडतं आहे. मतदार नसलेले अनिवासी भारतीयही यात महत्वाची भूमिका साकारत करत आहेत.

राहुल यांच्या पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदीही अधिकृत दौऱ्यासाठी याच महिन्यात अमेरिकेत असणार आहेत. गांधी दोन महिन्यांपूर्वी इंग्लंडचाही दौरा करुन आले आहेत आणि तिथे विविध संस्था आणि विद्यापीठांमध्ये भारताच्या राजकीय परिस्थितीवर बोलले आहेत.

नरेंद्र मोदीही जपान, ऑस्ट्रेलिया, पापुआ न्यू गिनी च्या अधिकृत दौऱ्यांवर त्यानंतर गेले होते आणि ऑस्ट्रेलियात भारतीय समाजासाठी त्यांची एक सभाही झाली. मोदींनी अधिकृत दौ-यांदरम्यान अमेरिका, इंग्लंड इथेही पूर्वी भारतीय समाजासमोर (इंडियन डायस्पोरा) सभा घेतल्या आहेत आणि त्याची राजकीय चर्चाही भरपूर झाली आहे.

आता 'भारत जोडो यात्रा', त्यानंतर कर्नाटकचा विजय यानंतर राहुल गांधी आणि कॉंग्रेसनंही परदेशातल्या भारतीय समाजावर आणि त्यांच्या प्रभावाकडे नजर फिरवली आहे असं दिसतं आहे.

मोठ्या प्रमाणात अनिवासी भारतीय युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आफ्रिका आणि इतर देशांतही पसरले आहेत.

त्यांचा त्या देशातील राजकीय, आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर प्रभाव असतो. शिवाय ते भारतातल्या ज्या प्रदेश वा सामाजिक गटांतून गेलेले असतात, त्यांच्यावरही या डायस्पोराचा प्रभाव असतो. परिणामी त्यांना आपल्या बाजूला आणणं हा भारतीय राजकारणातला महत्वाचा घटक बनला आहे.

शिवाय अमेरिका, इंग्लंड इथल्या व्यासपीठांवर मांडल्या जाणा-या मतांवर भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चा होते.

राहुल गांधींची प्रतिमा 'भारत जोडो यात्रे'नं बदलण्याचा प्रयत्न करणा-या कॉंग्रेसनं आता परदेशातल्या या कार्यक्रमांनीही त्यांच्याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल यांच्या विधानांची, विरोधात आणि समर्थनात सगळ्या बाजूंनी चर्चाही होते आहे.

राहुल यांच्या विधानांवरुन वाद-विवाद

राहुल गांधींच्या इंग्लंड आणि अमेरिका दौ-यादरम्यान त्यांनी भारतातल्या राजकीय परिस्थितीबद्दल मोकळेपणानं मतं व्यक्त केली. त्यात त्यांनी देशांतर्गत लोकशाही, मोदी सरकार, रा.स्व.संघाची भूमिका, भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध यावर टीकात्मक भाष्य केलं.

ते विद्यापीठांमध्ये बोलले, छोटेखानी सभांमध्ये भाषणं दिली, मुलाखती दिल्या आणि पत्रकारांशी बोलले.

सहाजिक होतं की ज्या राजकीय प्रतिस्पर्ध्यावर ते बोलत होते त्या भाजपानंही त्यांच्यावर हल्ला चढवला. भाजपानं राहुल यांच्या या परदेश दौ-याबद्दल सातत्यानं ही भूमिका मांडली की ते परदेशात जाऊन भारताच्या प्रतिमेला हानी पोहोचवत आहेत.

कॉंग्रेस सतत प्रत्युत्तरादाखल विचारत राहिली की मोदींनी यापूर्वी परदेशात केलेल्या भाषणांमध्ये अशा प्रकारची टीका नव्हती का?

लंडनमधल्या एका भाषणानंतर राहुल यांच्यावर टीका झाली की भारतीय प्रश्न सोडवण्यासाठी परदेशी शक्तींना आवाहन करत आहेत. ते भारतीय लोकशाहीसमोर असणा-या आव्हानाबद्दल बोलत होते. त्यावरुन बराच गदारोळ उठला.

राहुल गांधी, काँग्रेस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राहुल गांधी
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्यावर पुढच्या लंडनमधल्या मुलाखतीतच गांधी म्हणाले, "सगळ्यात पहिलं म्हणजे हा आमचा प्रश्न आहे, हा अंतर्गत प्रश्न आहे आणि याचं उत्तरही आमच्या देशामधूनच येणार आहे. ते बाहेरुन येणार नाही. पण भारतीय लोकशाहीची भव्यता पाहता, ती जागाच्या भल्यासाठी आवश्यक आहे. तिचा परिणाम आणि प्रभाव तिच्या सीमांपलिकडेही आहे."

हे सांगतानाच गांधी यांनी आवाहन केलं की, "तुम्हाला म्हणून भारतात काय होतं आहे याची जाणीव असायला हवी. लोकशाहीच्या कल्पनेवर हल्ला होतो आहे आणि तिला धोका निर्माण झाला आहे."

अमेरिकेचा त्यांचा दौरा सुरु झाल्यावरही त्यांनी सुरुवातीपासूनच त्यांच्या भारतीय प्रतिस्पर्ध्याविषयी जाहीरपणे भाष्य केलं, प्रसंगी टीका केली.

"जग गुंतागुंतीचं आहे, क्लिष्ट आहे. पण इथे भारतात काहींना असं वाटतं की त्यांना सगळं माहित आहे. मोदी हे त्याच प्रकारातले आहेत. त्यांच्यासमोर प्रत्यक्ष देवही आला तर ते त्याला समजावतील की विश्व कसं आहे आणि देवही गोंधळून जाईल, "सॅन फ्रान्सिस्को मधल्या त्यांच्या भाषणात ते म्हणाले होते. त्यावरुनही भाजपाचा रोष त्यांच्यावर ओढवला.

वॉशिंग्टनच्या एका क्रार्यक्रमात त्यांनी 'मुस्लिम लीग धर्मनिरपेक्ष आहे' असं म्हटल्यावर भाजपानं त्यांच्यावर जोरदार टीका सुरु केली. पण कॉंग्रेसनं त्यांना 'जिनांची मुस्लिम लीग वेगळी आणि केरळमध्ये तीन खासदार असणारी लीग वेगळी जिच्यासोबत कधी भाजपानंही युती केली होती' असं म्हणून प्रतिवाद केला.

राहुल भारतातल्या विरोधी पक्षांच्या एकजुटीपासून ते 2024 साली होणा-या लोकसभा निवडणुकीचा संभाव्य निकाल, या सगळ्या मुद्द्यांवर सविस्तर बोलतात. कोणत्याही प्रश्नाला टाळत नाहीत.

पण मुद्दा हा आहे की व्यापार, नोकऱ्या, शिक्षण या क्षेत्रांमध्ये मोठ्या संख्येनं आणि प्रभावशील असणाऱ्या अमेरिकेतल्या भारतीयांसमोर राहुल गांधी भारतीय राजकीय स्थितीबद्दल मोकळेपणानं बोलत आहेत. त्याचा प्रभाव भारतातही पडण्याची कॉंग्रेसची अपेक्षा आहे.

अमेरिकेतले अभ्यासक काय म्हणतात?

राहुल गांधी असो वा नरेंद्र मोदी, कॉंग्रेस असो वा भारतीय, भारतीय राजकीय नेते आणि पक्षांना परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्याची अशी गरज का वाटावी? सहाजिक आहे की त्यांचा राजकीय आणि आर्थिक प्रभाव अधिक आहे.

विशेषत: अमेरिकेत स्थित भारतीयांच हे एकूण उत्पन्नामध्ये इतर स्थलांतरितांपेक्षा अग्रेसर आहेत आणि अमेरिकन आणि भारतीय राजकीय पक्षांना मदतही करतात. अमेरिकेत 2029 मध्ये झालेला एक अभ्यास सांगतो की भारतीय समुदायानं तिथल्या डेमोक्रटिक पक्षाला इतर कोणत्याही आशियाई समुदायापेक्षा सर्वाधिक देणग्या दिल्या होत्या.

पण राजकीय अभ्यासकांना वाटतं की गेल्या काही काळात नरेंद्र मोदींनी केलेल्या परदेशातल्या सभा आणि राहुल गांधींचे दौरे याची तुलना होणार आणि त्याचा राजकीय परिणामही होताना पहायला मिळेल. अमेरिकास्थित 'कार्नेजी एडॉव्हमेंट फॉर इंटरनॅशनल पीस' या संस्थेचे मिलन वैष्णव म्हणतात की या दौ-यांबद्दल भारतात होणारं वार्तांकन हे निवडणुकीच्या भवितव्यावर परिणाम करेलच.

पण त्याच वेळेस गांधींचा अमेरिका दौरा हा मोदींच्या दौ-याअगोदर करणं हे टायमिंग चुकलं असंही त्यांना वाटतं. मोदी २२ जूनपासून अमेरिकेच्या दौ-यावर आहेत आणि या दरम्यान ते 'व्हाईट हाऊस' आणि अमेरिकन कॉंग्रेसलाही भेट देणार आहेत.

"या दोन्ही दौ-यांच्या ऑप्टिक्सची स्पर्धाच करता येणार नाही. तुम्ही जर परदेशी राजकीय नेते असाल तर हा तुम्हाला मिळणारा सरोच्च सन्मान आहे. मोदी आणि गांधीच्या दौ-यांची तुलना या नजरेतून होणारच, " वैष्णव यांनी 'बीबीसी'शी बोलतांना सांगितलं.

राहुल गांधी, काँग्रेस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राहुल गांधी

"मोदींची प्रतिमा इथल्या भारतीय समुदायात एखाद्या रॉकस्टार सारखी आहे. संपूर्ण मेडिसन स्क्वेअर गार्डन भरण्याइतपत प्रभाव जगातल्या अन्य कोणत्या नेत्याकडे आहे का?" ते पुढे म्हणतात.

"अशा स्थितीत स्वत:ची प्रतिमा मोठी करणं हे राहुल गांधींसाठी मोठं आव्हान असेल. गांधीना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:चं नाव आणायचं असेल, पण तरीही अनेक वर्तुळांमध्ये त्यांना यापूर्वी कमी गांभीर्यानं घेतलं गेलं आहे. ते बदलण्याचा, गांभीर्यानं घ्यायला लावण्याचा हा प्रयत्न असू शकतो," असं लेखक संजोय चक्रवर्ती 'बीबीसी'शी बोलतांना म्हणतात.

भारताचं जागतिक अर्थव्यवस्थेतलं स्थान महत्वाचं होत गेलं आणि अमेरिकेबरोबरचे देशाचे संबंध घट्ट होत गेले, तसं भारतीय अमेरिकनांचे दोन्ही देशांच्या आंतरराष्ट्रीय धोरणांवरचा प्रभावही वाढत गेला. अटल बिहारी वाजपेयींच्या काळात इथल्या भारतीय समुदायासोबत असा संवाद वाढवण्याचे प्रयत्न 2000 च्या दशकात सुरु झाले.

2014 मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यावर मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये 20000 भारतीय त्यांच्या सभेला ज्मले होते. 2019 मध्ये तर हुस्टनमध्ये तत्कालिन अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या सह मोदींच्या कार्यक्रमाला 50000 जणांची उपस्थिती होती.

"असं नाही की भारतीय पंतप्रधान इथे कधी आले नाहीत आणि त्यांच्यासाठी एवढी मोठी गर्दी उसळली नव्हती. हे अगोदरही घडलं आहे. पण त्यांनी अशा प्रकारे सभांचे कार्यक्रम कधी केले नाहीत. मोदींनी ते त्यांच्या स्टाईलमध्ये मोठे आणि नजरेत येणारे केले," चक्रवर्ती म्हणतात.

राहुल गांधी अशाच प्रकारे या भारतीय समुदायाला आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरमध्येही त्यांचा कार्यक्रम होणार असल्याचं सांगितलं जातं आहे.

गांधीच्या दौऱ्यांचा अमेरिकन भारतीयांवर परिणाम काय?

राहुल गांधी, काँग्रेस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राहुल गांधी

राहुल गांधींच्या या दौ-यांबद्दल भारतात मोठी चर्चा होते आहे. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप होत आहेत. पण ज्यांच्यावर प्रभाव पाडण्यासाठी हे प्रयत्न होत आहेत त्यांना याबद्दल काय वाटतं? याचा निवडणुकीवर काय परिणाम होईल? याबद्दल 'बीबीसी'नं या कार्यक्रमांना उपस्थित राहिलेल्यांना विचारलं.

डेलवेअर विद्यापीठाचे प्राध्यापक मुक्तदर खान राहुल गांधींना हडसन इन्स्टिट्यूटमधल्या बैठकीत भेटले. त्यांच्या मते, "समुदायासमोर केलेल्या भाषणांना गर्दी झाली होती आणि लोकही ऐकायला उत्सुक होते. गांधी भारत जोडो यात्रेबद्दल खूप बोलले. त्यांना या यात्रेमुळे आत्मविश्वास आला आहे असं वाटलं."

पण खान यांना असं वाटत नाही की याचा निवडणुकीत काही फायदा कॉंग्रेसला होईल. "2024 च्या निवडणुकींना अजून बरेच महिने आहेत आणि निवडणुकीच्या राजकारणात एक आठवडाही भरपूर असतो," ते म्हणतात.

राहुल गांधींच्या सभेत असेही लोक आले होते जे पूर्वी मोदींचे समर्थक होते. यापैकी एक होते तामिळनाडूचे वसंत कुमार. ते म्हणतात,"2014 मध्ये मी मोदींचा समर्थक होतो. पण नोटबंदीनंतर वाटलं की सरकार आता बरोबर काम करत नाही. लोकशाहीसाठी मजबूत विरोधी पक्ष आवश्यक आहे."

भारतीय असलेले पण आता न्यूयॉर्कमध्ये राहणारे असलम मोहम्मद हे मूळचे नांदेडचे आहेत. "माझा जन्म नांदेडचा. माझं मन भारतातच आहे. माझी मुलं छोटी आहेत आणि त्यांचंही भारताशी नातं तयार व्हावं असं मला वाटतं. माझ्या मुळाशी मला जोडलेलं रहायचं आहे."

राहुल गांधींच्या अमेरिका दौ-यात त्यांना ऐकायला येणा-या भारतीयांकडून अशा संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला येतात. पण प्रश्न हा आहे की राहुल यांची प्रतिमा या परदेशी भूमीतल्या प्रयत्नामुळे बदलणार का? येत्या काही काळात, विशेषत: या निवडणूक वर्षात, कॉंग्रेस आणि भाजपा दोघांकडूनही असे अधिक प्रयत्न पहायला मिळतील. कारण मुख्य प्रश्न प्रतिमेचा आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)