You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राजू शेट्टींविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार, ठाकरे गटाची 4 जणांची दुसरी यादी जाहीर
लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाने दुसरी आणि शेवटची यादी जाहीर केलीय. कल्याण मतदारसंघातून वैशाली दरेकर, तर हातकणंगलेमधून सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. दुसऱ्या यादीत एकूण चार उमेदावर उद्धव ठाकरेंनी घोषित केले.
यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली. पालघर लोकसभा मतदार संघातून भारती कांबळी, जळगावमधून करण पवार आणि हातकणंगलेतून सत्यजित आबा पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
याआधी शिवसेने 17 जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली होती.
आतापर्यंत (3 एप्रिल) उद्धव ठाकरे यांनी 48 पैकी 22 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंची लोकसभा निवडणुकांसाठी सर्व उमेदवार घोषित करून झाले आहेत.
ठाकरेंच्या शिवसेना उमेदवारांची संपूर्ण यादी
- मुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई
- मुंबई-ईशान्य - संजय दिना पाटील
- मुंबई-दक्षिण - अरविंद सावंत
- मुंबई-वायव्य - अमोल कीर्तिकर
- कल्याण लोकसभा - वैशाली दरेकर
- बुलढाणा - नरेंद्र खेडेकर
- यवतमाळ-वाशिम - संजय देशमुख
- मावळ - संजोग वाघेरे-पाटील
- सांगली -चंद्रहार पाटील
- हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर
- छत्रपती संभाजीनगर - चंद्रकांत खैरे
- धाराशिव - ओमराजे निंबाळकर
- शिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरे
- नाशिक - राजाभाई वाजे
- रायगड - अनंत गीते
- सिंधुदुर्ग-रत्नागिरी - विनायक राऊत
- ठाणे - राजन विचारे
- परभणी - संजय जाधव
- हातकणंगले - सत्यजीत पाटील
- पालघर - भारती कामडी
- जळगाव - करण पवार
पहिली यादी जाहीर करताना पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की 'हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे.'
16 जणांची नावं असलेली यादी आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील उमेदवाराची वेगळी घोषणा यावेळी करण्यात आली.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गट महाराष्ट्रात एकूण 22 जागांवार लोकसभा निवडणूक लढणार आहे.
उरलेल्या 5 जागा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. पालघर, कल्याण, उत्तर मुंबई यासारख्या जागांचा त्यात समावेश आहे. तर हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी पाठिंबा मागतायत. सध्या ती जागा शिवसेनेकडे आहे त्याबाबत लवकरच निर्णय होईल.
काँग्रेसकडून सांगलीसाठी उमेदवार जाहीर केला जाईल, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी याआधी म्हटलं होतं. पण तिथून ठाकरे गटाने महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
ठाण्यातून राजन विचारे, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, परभणीतून संजय जाधव, उस्मानाबाद (धाराशिव)मधून ओमराजे निंबाळकर, सिंधुदुर्ग मधून विनायक राऊत या खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
मुंबईतील दोन जागांवरही काँग्रेसने दावा केला होता. पण तिथेही ठाकरे गटाने अमोल किर्तीकर आणि अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
संभाजीनगर येथून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना संधी देण्यात आली आहे. नाशिकमधून राजाभाऊ वाजे, रायगडमधून अनंत गीते आणि हिंगोलीतून नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
बुलढाणा नरेंद्र खेडेकर, यवतमाळमधून संजय देशमुख आणि मावळमधून संजोग वाघेरे पाटील यांना लोकसभा निवडणुकीसाठी संधी दिली आहे.