सुरतमध्ये भाजप उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध विजयी, काँग्रेसने केला लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप

भाजप उमेदवार मुकेश दलाल.

सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपला लोकसभा निवडणुकीतील पहिला विजय मिळाला आहे. याठिकाणी भाजप उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध विजयी झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी त्यांना संसद सदस्यत्वाचं प्रमाणपत्र दिलं.

सूरतमधले काँग्रेस उमेदवार नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर याठिकाणच्या निवडणुकीत एक रंजक वळण आलं. इतर सर्व उर्वरित उमेदवारांनीही

अर्ज मागे घेतल्यानं दलाल विजयी झाले.

भाजपनं तर त्यांच्या उमेदवाराच्या विजयाचा जल्लोषही सुरू केला आहे.

सोशल मीडियावरही भाजप उमेदवार मुकेश दलाल यांना "बिनविरोध" निवडीवर अभिनंदनाचे मेसेज मिळायला सुरुवात झाली आहे.

सी.आर.पाटील यांच्यासह मुकेश दलाल

सूरतमधील बीबीसीचे प्रतिनिधी रूपेश सोनवणे यांच्या मते, नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर सूरत लोकसभा जागेवरील उमेदवारांचा आकडा नऊ वर आला होता. त्यानंतर सर्व अपक्ष उमेदवारांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला.

त्यानंतर सर्वांच्या नजरा बहुजन समाजवादी पार्टीचे उमेदवार प्यारेलाल भारती यांच्यावर होत्या. पण अखेर प्यारेलाल भारती यांनीही उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला.

सगळ्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळं अखेर भाजप उमेदवार मुकेश दलाल यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आलं. यानंतर लगेचच मुकेश दलाल यांनी सी.आर. पाटील यांची भेट घेतली.

कुंभानी यांचा अर्ज का रद्द झाला?

गुजरातच्या सूरत लोकसभा मतदारसंघातील या प्रकारानंतर विरोधकांना मतदानापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. भाजपनं काँग्रेस उमेदवार नीलेश कुंभानी यांच्या उमेदवारीवर आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला.

वादानंतर काँग्रेस उमेदवारांचे समर्थक उपस्थित राहिले नाही, त्यामुळं हा फॉर्म रद्द करण्यात आला. त्यानंतर काँग्रेसचे डमी उमेदवार सुरेश पडसाला यांचा अर्जही रद्द करण्याचा आदेश देण्यात आला.

भाजपा उमेदवार मुकेश दलाल यांचे निवडणूक एजंट दिनेश जोधानी यांनी कुंभानी यांच्या समर्थकांवर आक्षेप गेतला होता. रविवारी निवडणूक अधिकाऱ्यांसमोर दोन्ही पक्षांनी युक्तिवाद सादर केले. त्यानंतर यावर निर्णय सुनावण्यात आला.

नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे.

नीलेश कुंभानी यांचे समर्थक म्हणून सह्या करणाऱ्या चार जणांपैकी तिघांनी फॉर्मवर सह्या केल्या नसल्याची शपथ घेतली होती. त्यामुळं ही स्थिती निर्माण झाली.

जिल्हाधिकाऱ्यांनी नीलेश कुंभानी यांच्याकडं याबाबत त्यांचं काय म्हणणं आहे, असं स्पष्टीकरण मागितलं होतं. त्यासाठी त्यांना रविवारी 21 एप्रिलच्या सकाळी 11 वाजेपर्यंतचा वेळ दिला होता.

रमेशभाई बलवंतभाई पोलारा, जगदीश नागजीभाई सावलिया आणि ध्रुविन धीरुभाई धमेलिया यांनी नीलेश कुंभानी यांचे समर्थक म्हणून सह्या केल्या. जगदीश सावलिया नीलेश कुंभानी यांचे जावई तर ध्रुविन धमेलिया त्यांचे पुतणे आहेत. तसंच रमेश पोलारा त्यांचे व्यवसायातील भागिदार राहिलेले आहेत.

हे तिघेही नीलेश कुंभानी यांचे नीकटवर्तीय असल्यामुळं, त्यांनी असं का केलं? असा प्रश्न उपस्थित होत आहे. फण या प्रकारानंतर हे सगळे संपर्कात नाहीत.

अपहरणाचा दावा

काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी त्यांच्या उमेदवारांच्या समर्थकांचं अपहरण करण्यात आल्याचा दावा केला आहे.

"नीलेशभाईंच्या समर्थकांचं 'अपहरण' करण्यात आलं आहे. तसंच त्यांना गोपनीय ठिकाणी नेलं आहे. त्यांचे फोन सुरू नाहीत. कुणीतरी धमकी देऊन, दबाव निर्माण करून शपथपत्र घेतलं आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात नेऊन दिलं," असा आरोप आप नेते गोपाल इटालिया यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना केला.

उमेदवारी अर्ज रद्द केल्याचा आदेश.

दरम्यान, कुंभानी यांनी उमरा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत त्यांच्या समर्थकांच्या अपहरणाचा आरोप केला आहे.

'समर्थकांचं अपहरण' झाल्याच्या मुद्द्यावर भाजप नेते आणि सूरतचे माजी महापौर जगदीश पटेल म्हणाले की, "निवडणूक असो की नसो, काँग्रेस नेत्यांना भाजपवर आरोप करण्याचंच काम आहे. सर्वांच्या उपस्थितीत फॉर्म दाखल करण्यात आले आहेत. पण काँग्रेस उमेदवारांच्या समर्थकांनी अचानक शपथ घेतली. ते त्यांचे लोक होते. भारतीय जनता पक्षाचा या सर्वाशी काहीही संबंध नाही."

दरम्यान, पत्रकारांनी दलाल यांना, तुम्ही उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी पैसे दिले असा आरोप होत असल्याचा प्रश्न केला.

तेव्हा ते म्हणाले की, “भारतीय जनता पार्टी देशात 400 जागा जिंकत आहे. त्यामुळं अशा छोट्यामोठ्या गोष्टी करण्याची आम्हाला गरज नाही.”

लोकशाही धोक्यात असल्याचा काँग्रेसचा आरोप

सुरतमधील काँग्रेस उमेदवाराचा अर्ज फेटाळल्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी संपूर्ण घटनाक्रम समजावून सांगत लोकशाही धोक्यात असल्याची टीका केली आहे.

"सुरतच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द ठरवला आहे. तीन प्रस्तावकांच्या सह्यांच्या तपासणीदरम्यान त्रुटी आढळण्याचं कारण सांगण्यात आलं आहे," अशी पोस्ट त्यांनी एक्सवर केली.

काँग्रेस नेते जयराम रमेश.

फोटो स्रोत, ANI

"अशाच प्रकारचं कारण सांगून अधिकाऱ्यांनी सुरतमधील काँग्रेसचे पर्यायी उमेदवार सुरेश पडसाला यांचा अर्जही फेटाळला आहे. त्यामुळं इथं काँग्रेस पक्षाकडं उमेदवारच नाही."

"भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांना सोडून इतर सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे."

"7 मे 2024 ला मतदान होणार आहे. त्याच्या जवळपास दोन आठवड्यांपूर्वी 22 एप्रिल 2024 ला सुरतच्या जागेवरून भाजपच्या उमेदवाराला "बिनविरोध" विजयी केलं आहे.

"पंतप्रधान मोदींच्या अन्यायायाच्या काळात एमएसएमई मालक आणि उद्योजकांचा राग पाहून भाजप एवढं घाबरलं की त्यांनी लोकसभेला "मॅच फिक्स" करण्याचा प्रयत्न केला आहे. या जागेवरून 1984 नंतर सातत्यानं त्यांचाच विजय झाला आहे."

"आपल्या निवडणुका, आपली लोकशाही, बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान - सर्वकाही भयंकर धोक्यात आहे. मी पुन्हा सांगेन-ही आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे."

आधीही बिनविरोध निवडून आले आहेत खासदार

भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून जाणारे पहिलेच खासदार आहेत, असं नाही.

2012 मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनल्यानंतर अखिलेश यादव यांनी कन्नौज लोकसभा मतदारसंघातून राजीनामा दिला होता. तिथून त्यांच्या पत्नी डिंपल यादव उभ्या होत्या.

याठिकाणी काँग्रेस, बहुजन समाज पार्टी आणि भारतीय जनता पार्टी या तिन्ही प्रमुख विरोधी पक्षांनी उमेदवार दिले नव्हते.

डिंपल यादव.

फोटो स्रोत, ANI

त्यानंतर संजू कटियार आणि दशरथ शंखवार नावाच्या दोन अपक्ष उमेदवारांनीही उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर डिंपल यादव कन्नौजमधून बिनविरोध विजयी झाल्या होत्या.

त्याशिवाय महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे पाचवे उपपंतप्रधान यशवंत राव चव्हाणही 1963 मध्येनाशिकमधून काँग्रेसकडून बिनविरोध विजयी झाले होते.

लक्षद्वीपमधून दहावेळा खासदार राहिलेले पी.एम सईद 1971 मध्ये बिनविरोध विजयी झाले होते.

1962 मध्ये उत्तराखंड (तेव्हाचं उत्तर प्रदेश) च्या टिहरी मतदारसंघातून महाराजा मानवेंद्र शाह बिनविरोध विजयी झाले होते.