KCR सभा: ‘आमच्या गावात लोक BRS आणा म्हणताहेत, कारण बाकीच्या पक्षातले नुसते भांडून राहिलेत’

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

तेलंगानाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांची जाहीर सभा 24 एप्रिलच्या संध्याकाळी संभाजीनगर येथे पार पडली.

ज्या जंबिदा मैदानावर ही सभा झाली, ते मैदान संपूर्णपणे भरेल की नाही ही शंका सुरुवातीच्या काळात म्हणजे सुमारे 7 वाजेपर्यंत होती. पण त्यानंतर मात्र लोकांचे लोंढे मैदानात यायला लागले आणि मैदान पूर्णपणे भरलं.

सभास्थळी दलित आणि मुस्लिमांची संख्याही मोठ्या प्रमाणावर होती.

सभा सुरू होण्याच्या पूर्वी माझी भेट मूळ कन्नडचे पण सध्या संभाजीनगर येथे वास्तव्यास असलेल्या विठ्ठल गवांडे यांच्याशी झाली.

त्यांना सभा नेमकी कुणाची माहिती आहे, ते काही माहिती नव्हतं. पण, कन्नड मतदारसंघातून 100 एसटी बसेस हर्षवर्धन जाधव यांनी बूक केल्या आणि गावातले लोक येणार असल्यामुळे ते त्यांना भेटायला म्हणून आले होते.

लोक केसीआर यांना मत देतील का, असं विचारल्यावर ते म्हणाले, “राज ठाकरेंच्या सभेला इतकी गर्दी होऊनही मतं मिळत नाही. हे (केसीआर) तर परराज्यातले आहेत.”

संध्याकाळी साडे सहा वाजेपर्यंत सभास्थळी गर्दी होत नव्हती. त्यामुळे मागच्या बाजूच्या लाल खुर्च्या उलचून ठेवण्यात येत होत्या.

'लोक बीआरएस आणा म्हणताहेत'

सव्वा सात वाजता माझी भेट पंडित भोसले यांच्याशी झाली. त्यांच्या गळ्यात बीआरएसचा रुमाल आणि शर्टवर शेतकरी संघटनेचा बिल्ला होता. ते परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यातल्या गवळी पिंपरी गावातून आले होते.

पंडित यांच्याकडे 12 एकर शेती असून त्यात कापूस, तूर, सोयाबीन ही पिके ते घेतात.

ते शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत आणि आता बीआरसची भूमिका त्यांना पसंत पडत आहे.

केसीआर यांचा कोणता मुद्दा पटतोय, असं विचारल्यावर पंडित म्हणाले, “केसीआर यांनी सिंचनावर भर दिला. 50 % जमीन बागायती केली. जागोजागी बंधारे बांधले. एकरी 5-5 हजार रुपये दर हंगामाला शेतकऱ्याला देत आहेत. किती एकर क्षेत्र असो याची मर्यादा नाही. तुमचं 20 एकर क्षेत्र असेल तर खरिपाला 1 लाख आणि रबीला 1 लाख रुपये तुम्हाला मिळणार.”

“आमच्या गावात लोक बीआरएस आणा म्हणताहेत, कारण बाकीच्या पक्षातले लोक नुसते भांडून राहिले,” असंही ते पुढे म्हणाले.

सभास्थळी स्थानिक नेत्यांची भाषणं सुरू झाली होती. सभास्थळी मध्यभागी गेलो तर माझी नजर एका ज्येष्ठ व्यक्तीकडे आपसूकच खेचली गेली. कारण ते काहीतरी वाचत असल्याचं दिसून आलं.

प्रल्हाद काळे असं त्यांचं नाव. ते जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातल्या रोहणा गावातून आले होते. वय वर्ष 67.

केसीआर यांच्या सभेवेळी वाटण्यात आलेली पुस्तिका ते वाचत होते. यात केसीआर यांनी तेलंगानात राबवलेल्या योजनांची माहिती देण्यात आली होती.

“केसीआर नेमकं काय बोलतात, ते ऐकायला मी आलो आहे,” असं ते म्हणाले.

“हे सगळे केसीआर यांच्या कामाचे पुरावे आहेत,” असं ते ती पुस्तिका दाखवत म्हणाले.

“पिकाला उत्पादन खर्चावर आधारित भाव पाहिजे, मोफत वीज पाहिजे. शिंदे-फडवणीस सरकारच्या काळात विमा नाही मिळाला, दुष्काळी मदतही नाही मिळाली,” असंही त्यांनी सांगितलं.

'उत्पादन खर्चावर भाव दिला तर काहीच नको'

प्रल्हाद यांच्याशी चर्चा सुरू असताना याच गावातील नंदकिशोर काळे बोलायला आमच्याजवळ येऊन बसले.

ते म्हणाले, “मला केसीआर यांनी शेतकऱ्यांना वीज फुकट दिलीय, उत्पादन खर्चावर भाव दिलाय, हे मुद्दे पटतात. केसीआर यांनी तेलंगाना पॅटर्न 8 वर्षं राबवला. आम्हाला राज्य सरकारचे 12 हजार नको. उत्पादन खर्चावर भाव दिला तर काहीच नको.”

“सोयाबीन यंदा 5 हजाराच्या वर जाईना, कापूस गेल्यावर्षी 12 हजार रुपये क्विंटल होता. आता मात्र 7 हजाराच्या वर जाईना, शेतकरी यातच ठार झालाय,” ते पुढे म्हणाले.

महाराष्ट्र मोठं राज्य, त्यामुळे तेलंगानातल्या योजना जशाच्या तशा इथं राबवणं शक्य नाही, असंही अनेक जण म्हणत आहेत.

यावर नंदकिशोर काळे म्हणाले, “महाराष्ट्र मोठं राज्य आहे बरोबर आहे. पण, आपल्या राज्यात उत्पन्नाचे सोर्सेस पण जास्त आहेत. एकटी मुंबई महाराष्ट्राला सांभाळू शकते.”

केसीआर यांच्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे मतविभाजन होणार आणि भाजपला फायदा होणार, असं विश्लेषक सांगत आहेत.

यावर नंदकिशोर म्हणाले, “ते काही माहिती नाही. पण आमचा केसीआर यांच्यावर विश्वास बसलाय. राजकारणाचं काहीही असो.”

एव्हाना कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचं भाषण सुरू झालं होतं. काही वेळानं त्यांनी केसीआर यांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षात प्रवेश केला.

राज्यात वीज कुणाला मोफत पाहिजे असा सवाल जाधव यांनी भाषणादरम्यान केला, तेव्हा अनेकांनी त्यांचे हात वर केले.

'आम्हाला चटके मिळाले म्हणून इथपर्यंत आलो आम्ही', असे उद्गार प्रल्हाद काळे यांच्या तोंडून बाहेर पडले.

मी सभास्थळी अजून पुढच्या बाजूस गेलो. तर तिथं निलेश शिंदे त्यांच्या मित्रांसोबत बसले होते. कन्नडच्या जेऊर आडगातून ते आले होते.

कशासाठी आलात, असं विचारल्यावर ते म्हणाले, “आम्ही सगळे शिकेल आहोत. पण सगळे शेती करत आहोत. नोकरीच भेटेना. शेतकऱ्याला सरकारनं वीज मोफत द्यायला हवी, गरज पडेल तेव्हा हमीभाव भेटला तर आत्महत्या थांबतील.

"आम्ही तेलंगणात जाऊन आलो. तिथं शेतकऱ्याला जागेवर नुकसान भरपाई भेटते. यावेळी केसीआर यांना राज्यात नक्की मतं मिळतील.”

केसीआर यांचं व्यासपीठावर आगमन झालं होतं. समोरच्या लोकांशी बोलून मी मागच्या बाजूस आलो.

‘जय भीम’चा दुपट्टा गळ्यात घातलेला एक मोठा गट तिथं दिसला.

दलित बंधू योजना राज्यातही असावी?

राहुल गायकवाड त्यापैकी एक होते. ते संभाजीनगरच्या भाऊसिंग पुऱ्यातून सभा ऐकायला आले होते. ते कॉम्प्युटर ऑपरेटर आहेत.

“संभाजीनगरमध्ये आज लाखो बेरोजगार आहेत. सरकारनं स्टार्ट अप इंडियातून कुणाला रोजगार दिला?,” तुमच्यासाठी मुख्य मद्दा कोणता, या प्रश्नावर ते बोलत होते.

केसीआर यांच्या दलित बंधू योजनेविषयी काय वाटतं, यावर ते म्हणाले, “केसीआर यांच्यामुळे जर तेवढी प्रोग्रेस होत असेल तर काय हरकत आहे? आपल्या राज्यातही अशी योजना यायला हवी.”

अजून दलित लोकांपर्यंत ही योजना तेवढ्या प्रमाणात पोहचली नाही, ती पोहचली की लोक जागरुक होतील, असंही ते म्हणाले.

'दलित बंधू' योजनेअंतर्गत तेलंगाना सरकार दलित कुटुंबाला त्यांच्या पसंतीनुसार उद्योग सुरू करण्यासाठी 10 लाख रुपये आर्थिक मदत देतं.

अशोक शिंगारेही राहुल यांच्याबरोबर होते.

ते म्हणाले, “मी ट्रक ड्रायव्हर आहे, तेलंगानात 3 महिने होतो. तिथं मला कुणीही माझी जात विचारली नाही. तिथं प्रत्येक शेतकऱ्याकडे डीपी आहे.”

दरम्यान, केसीआर यांचं भाषण सुरू झालं होतं. 8.17 वाजता मागच्या बाजूस बसलेले अनेक जण सभास्थळ सोडून जात होते.

केसीआर यांनी त्यांच्या भाषणात तेलंगानात सुरू केलेल्या योजनांचा उल्लेख केला आणि आगामी महापालिका निवडणुकीत बीआरसचा गुलाबी झेंडा विजयी करा, असं आवाहन केलं.

‘अब की बार, किसान सरकार’ची घोषणा देत त्यांनी भाषण संपवलं.

केसीआर यांची सभा सुरू होण्यापूर्वी दुपारी सभास्थळी पोहचल्यावर माझी भेट काही पत्रकारांशी झाली.

केसीआर त्यांच्या सभांमध्ये कुणावरही टीका करत नाहीये. फक्त त्यांच्या योजनांबद्दल सांगत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये आकर्षण आहे, असं पत्रकार सांगत होते.

त्यामुळे केसीआर यांच्याविषयी लोकांमध्ये आकर्षण असेल, तर येणाऱ्या निवडणुकीत ते किती प्रमाणात मतांमध्ये रुपांतरित होतं, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)