अमृतसरमधील मध्यरात्रीचे स्फोटांचे आवाज आणि ब्लॅकआऊटविषयी स्थानिक काय म्हणतात?

पहाटे पावणेदोनच्या सुमारास झालेल्या स्फोटांच्या आवाजांमुळे अमृतसरचे स्थानिक घाबरुन जागे झाले. या आवाजांमुळं शहरात घबराट पसरली होती.

बीबीसीचे प्रतिनिधी रविंदरसिंग रॉबिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, "या आवाजांनंतर लोक घाबरुन घराबाहेर पडले होते. तसेच हे आवाज कोठून आले हे न समजल्यामुळे एक भीतीचे वातावरण तयार झाले."

काही मिनिटांनंतर प्रशासनाने व्हॉट्सअपवर एक संदेश पाठवला. त्यानुसार पुन्हा ब्लॅक आऊट सुरू झाल्याचं लोकांना कळवण्यात आले.

अमृतसरचे जिल्हा माहिती अधिकारी शेरजंग सिंह यांनीही असे आवाज ऐकू आल्याचे स्पष्ट केले. मात्र, या स्फोटांबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

शेरजंग सिंह म्हणाले की, "खबरदारीचा उपाय म्हणून रात्री पुन्हा एकदा ब्लॅकआऊट लागू करण्यात आला आणि शक्य त्या मार्गांनी हा संदेश लोकांपर्यंत पाठवण्यात आला."

एका दिवसापूर्वीच भारताने पाकिस्तानच्या हद्दीत लष्करी कारवाई केली होती आणि त्यामुळे दोन्ही देशांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भारताने पाकिस्तानातल्या 9 जागांवर हल्ले केल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानातील दोन डझनांहून जास्त लोक मेल्याचा आणि 50 हून जास्त जण जखमी झाल्याचं पाकिस्ताननं सांगितलं आहे.

भारताची पाच लढाऊ विमानं पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे, मात्र भारताने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण

बीबीसीचे प्रतिनिधी रविंदर सिंग रॉबिन यांनी, "हे आवाज आले तेव्हा मी घरात वाचत बसलो होतो", असं सांगितलं.

ते म्हणाले, "स्फोटाचे आवाज झाले तेव्हा मी जागा होतो, मात्र माझे कुटुंबीय गाढ झोपेत होते. पण हे आवाज एवढे मोठे होते की, सगळे झोपेतून उठले आणि घराबाहेर आले."

"या आवाजांच्या दहा मिनिटांनंतर दाट काळोख पसरला आणि प्रशासनानं व्हॉट्सअपवरुन संदेश पाठवायला सुरुवात केली."

रॉबिन सांगतात की, "आधी एकदा मॉकड्रील झाली तेव्हा लोक इतके गंभीर नव्हते. अनेक घरांमध्ये तेव्हा लाईट सुरू असल्याचं दिसत होतं. मात्र रात्री दीड वाजता ब्लॅकआऊट झाला आणि सगळीकडे काळोख पसरला."

"दुसऱ्या ब्लॅकआऊटच्यावेळी प्रशासनाने लाईट बंद केले होते, लोकांनीही घरातील आणि घराबाहेरील लाईट बंद केले. त्यानंतर 4.35 वाजता वीजपुरवठा सुरू झाला."

"ब्लॅकआऊट हा ड्रीलचा भाग असल्याचं प्रशासनानं सांगितलं असलं तरी स्फोटांचे आवाज कसले होते याबद्दल माहिती दिलेली नाही."

स्फोटांबद्दल अमृतसरचे लोक काय म्हणतात?

अमृतसरचे स्थानिक नागरिक अशोक सेठी सांगतात की, "स्फोट झाले तेव्हा मी अर्धवट झोपेत होतो. पण नंतर रात्रभर आम्ही चिंतेत होतो, नागरिक आम्हाला फोन करुन चौकशी करत होते. स्फोटाचा आवाज आल्याचं मी पत्नीला सांगितलं. तिला वाटलं मी स्वप्न पाहिलं, पण त्यानंतर मी पुन्हा मोठा आवाज ऐकला."

"असं असलं तरी कुठूनही काहीच माहिती मिळत नव्हती. 1965 आणि 1971 ची युद्धही मी पाहिली आहेत. त्यामुळं मी स्फोटांचे आवाज ओळखले."

लोकांमध्ये अफवा पसरू नयेत यासाठी सरकारने स्पष्ट माहिती द्यायला हवी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

इथले दुसरे नागरिक अमित म्हणाले की, "मी माझ्या मुलांबरोबर झोपलो होतो. पहिला आवाज ऐकला तेव्हा लग्नाच्या वरातीतला वगैरे असेल असा विचार केला. फटाक्यांचा आवाज असेल असं आम्हाला वाटलं."

"पण मग नंतर पुन्हा स्फोटाचा आवाज आला, त्यानंतर आणखी एक आला. मग मुलंही घाबरली. शेजारचे लोक घरांबाहेर आले. दिवे गेले आणि भीतीचं वातावरण पसरलं."

प्रशासनाने मध्यरात्री सूचना दिल्या

शेरजंग सिंह म्हणाले की, ही स्थिती पाहाता प्रशासनाने लोकांना काळजी घेण्यासाठी तत्काळ काही सूचना दिल्या.

लोकांना घरातच राहाण्यास सांगितलं तसंच घराबाहेर किंवा रस्त्यांवर जमू नका असं सांगितलं. तसंच घरातले लाईट बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या व अनधिकृत माहिती पसरवू नका असे सांगण्यात आले.

भटिंडामधील ढिगाऱ्याबद्दल काय माहिती मिळाली?

भटिंडा जिल्ह्यातल्या गोनियना येथील अक्लियान कालन या गावात एका कोसळलेल्या विमानाचे अवशेष सापडल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या.

बीबीसीचे प्रतिनिधी राजेशकुमार गोल्डी याठिकाणी गेले होते. ते म्हणाले, "बुधवारी या जागेपासून एक किलोमीटर अंतरावर माध्यमांना रोखण्यात आलं होतं. ढिगारा कशाचा आहे याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली नाही. माध्यमांना आणि लोकांनाही अनधिकृत माहिती पसरवण्यास मज्जाव करण्यात आला आहे."

आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी ढिगारा पाहिला

एका खासगी युट्यूब चॅनल चालवणाऱ्या व्यक्तीनं (सुरक्षेच्या कारणांवरून ओळख जाहीर करण्यात आलेली नाही) अक्लियान कालन या भटिंडामधल्या घटनेचं संपूर्ण चित्रिकरण केलं होतं, मात्र प्रशासनाने नियमावली जाहीर केल्यावर ते प्रसिद्ध केलं नाही.

भटिंडातील अक्लियान कालन गावात विमानाच्या अवशेषांसारखे अवशेष सापडले असून फरिदकोट जिल्ह्यात बाशनंदी इथल्या शेतातही काही तुकडे पडल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

बीबीसी पंजाबीशी बोलताना ते म्हणाले की, "बाशनंदी गावात जिथं अवशेष पडलेले आहेत तिथल्या व्यक्तीचा मला फोन आला होता."

"घराच्या अंगणात असा ढिगारा पडल्याचं पाहिल्याचा दावा ते करत होते. त्याचं काही चित्रिकरणही आहे, पण ते आम्ही प्रसिद्ध केलेलं नाही."

"ढिगारा दिसताच माझ्या एका सहकाऱ्यानं पोलिसांना कळवलं. पोलीस थोड्याच वेळात तिथं आले आणि त्यांनी तो परिसर सील केला."

माध्यमांना या जागेपासून 1 किमी अंतरावर थांबण्यास सांगितलं असून, माध्यम प्रसिद्धीसाठी फरिदकोट जिल्हा प्रशाननानं नियमावली जाहीर केली.

जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या परवानगीशिवाय कोणताही फोटो अथवा व्हीडिओ सोशल मीडियात प्रसिद्ध करू नये, अशा सूचनाही प्रशाननानं व्हॉट्सअपच्या माध्यमातून दिल्या आहेत.

याबाबत कोणत्याही माहितीची पुष्टी भारत सरकार अथवा संबंधित जिल्ह्यांच्या प्रशासनानं केलेली नाही.

या माहितीची पडताळणी बीबीसीने स्वतंत्ररित्या केलेली नाही.

भटिंडा जिल्हा प्रशासनाची माध्यमांसाठी सूचनावली

बीबीसी प्रतिनिधी गोल्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार भटिंडा जिल्हा प्रशासनाने माध्यमकर्मींसाठी सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.

दिवाणी अथवा पोलीस प्रशासनाच्या परवानगीशिवाय या स्थितीचा फोटो अथवा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये असं त्यात म्हटलं आहे. तसंच यामुळं देशविरोधात वातावरण किंवा अफवा अथवा भीती निर्माण होऊ शकते असं म्हटलं आहे.

अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल असंही सांगितलं जात आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)