आईचं दूध 'जादूई रसायन', पण स्तनपान सुरळीत होत नसेल, तर काय आहेत उपाय?

ग्राफिक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 'आईचं दूध' हे निसर्गानी निर्मिलेलं एक जादुई रसायन आहे- जे कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत पिल्लाला जगवतं, टिकवतं.
    • Author, ओजस सु. वि.
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"मला वाटलं होतं, प्रसूती वेदना हा आई होण्यातला सर्वात अवघड टप्पा असतो. पण छे! तो तर खूपच सोपा वाटवा इतकं त्यानंतरचे स्तनपान म्हणजे दिव्य प्रकरण आहे!" सोनिया कळकळीने म्हणाली.

ती तिच्या 12 दिवसाच्या बाळाला घेऊन क्लिनिकला आली होती. बाळाच्या भुकेची वेळ झाली, तसा सोनियाच्या चेहऱ्यावर ताण दिसू लागला.

तिने तिच्या मोठ्याशा पिशवीतून बाळाला दूध पाजण्यासाठीच्या गोष्टींचा जामानिमा बाहेर काढला. भुकेने बाळ रडू लागलं. तशी ती अस्वस्थ झाली. तिला अक्षरशः घाम फुटला. गडबडीत तिने बाळाला छातीवर घेतलं.

बाळाला निपलशील्ड शिवाय दूध पिण्याची सवय नव्हती. ते शोधून, अंगाला लावून, तत्काळ बाळाच्या तोंडात दूध जावं, यासाठी तिची तारांबळ उडू लागली. बाळाने आणखीन जोरात भोकाड पसरलं.

सोनियासोबत आलेल्या तिच्या आईने आणखीन सूचना द्यायला सुरुवात केली. "बाळ भुकेलं आहे, आधी बाटलीने दूध पाज." असा आग्रह ती करू लागली. आणखीन गोंधळ वाढला. सोनियाचा ही अश्रूंचा बांध फुटणार हे दिसू लागलं.

मी सोनियाला म्हणलं, "सोनिया, तू छान करते आहेस. बाळाला प्रेमाने जवळ घे. बाळाशी गप्पा मार. आणि छाती व्यवस्थित उघडून बाळाला फक्त थोपट." बाळाला उघड्या छातीजवळ नेल्याने बाळ स्तन शोधू लागलं. जिथून दूध येते ती जागा चाटू लागलं आणि थोड्याच वेळात स्वत:हून शील्डशिवाय निपल पकडून स्तनपान करू लागलं.

सोनियाचा चेहरा आनंदाने आणि आश्चर्याने खुलला. ती म्हणाली "गेल्या 12 दिवसात पहिल्यांदाच बाळ कोणत्याही उपकरणांशिवाय छातीवर दूध पिते आहे!"

आई- बाळ स्तनपान करण्यात रुळल्यावर आम्ही तिच्या अनुभवाविषयी बोलू लागलो. सोनियाची प्रसूती एका निष्णात प्रसूतिगृहात झाली होती. प्रसूतीकाळाचा तिला चांगला अनुभव होता.

"पहिले दोन- तीन दिवस तर दूध येतच नाही ना. त्यामुळे डॉक्टरांनी पावडरचं दूध द्यायला सांगितलं. बाळ दुसऱ्या खोलीत ठेवलं होतं त्यामुळे सिस्टर त्याला पावडरचे दूध पाजायच्या. तिसऱ्या दिवशी थोडं दूध आलं तेव्हा बाळाला माझ्याकडे दिलं. दुधाला लावायचा प्रयत्न केला पण त्याला ओढताच आलं नाही, कारण माझे निपल नीट नव्हते."

"सिस्टरनी मला निपल पुलर आणि शील्ड दिलं. ते वापरल्यावर बाळ स्तन चोखत झोपून जातं. पुन्हा रडायला लागतं. कारण मला दूध पुरेसं येत नाही. मी खूप औषधे घेतली दूध वाढवायला. पण दूध कमीच आहे. मग मी त्याला बाटलीने पावडरचं दूध देते. पण त्याला खूप गॅसेस होताहेत. आणि सहा महिने आईचं दूध द्यायला पाहिजे असं म्हणतात. मला खूप वाईट वाटतंय की मला माझ्या बाळासाठी एवढेही करता येत नाहीये", असं म्हणत सोनियाने आवंढा गिळला आणि रडू दाबायला ओठ घट्ट मिटून घेतले.

आई म्हणून आपण कमी पडतोय का?

आई म्हणून आपण कमी पडतोय, अशा न्यूनगंडातून तिचा आत्मविश्वास ढासळत होता. त्यातून तिला सर्व बाजूंनी घरचे लोक, शेजारच्या काकू, कामाला आलेल्या बाया, मैत्रिणी, अनोळखी लोक, गूगल अल्गोरिथम यांकडून अनेक अनाहूत सल्ले, परस्परविरोधी माहिती मिळत होती. त्यातून तिचा गोंधळ आणखीनच वाढत होता.

सोनियाची गोष्ट हे आजच्या आईचे प्रातिनिधिक चित्र आहे. स्तनपान सल्लागार म्हणून काम करताना अनेक नवमाता मला भेटतात. त्यांचा थोड्याबहुत फरकाने असाच अनुभव असतो.

'स्वत:च्या बाळासाठी पुरेसं दूध निर्माण करण्याच्या आणि बाळाशी संवाद साधत स्तनपान करता येण्याच्या आईच्या क्षमतेवर विश्वास न ठेवणे.' हा त्यांच्या अनुभवांमध्ये समान धागा असतो.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आईच्या स्तनांविषयी, निपलच्या आकाराविषयी, शारीरिक क्षमतेविषयी, तिच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. त्याचे दीर्घकालीन परिणाम आई-बाळाच्या नात्यावर आणि त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतात.

आईच्या स्तनांविषयी, निपलच्या आकाराविषयी, शारीरिक क्षमतेविषयी, तिच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. सहजच उपलब्ध दूध पावडरचा पर्याय पुढे केला जातो. त्याचे दीर्घकालीन परिणाम आई-बाळाच्या नात्यावर आणि त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतात.

सोनियाला मी म्हणाले, "एकतर स्तनपान होऊ शकत नाही हे आई किंवा बाळाचे अपयश नाही. तर संपूर्ण सपोर्ट सिस्टम म्हणून आपण सगळेच थोडे कमी पडलो. गैरसमजातून अनेक अनावश्यक गोष्टी केल्या गेल्या. जे झालं ते मागे सोडून आपण पुन्हा नव्याने तणावमुक्त स्तनपानाची प्रक्रिया सुरू करू. बाळाशी नाते जोडू आणि बाळाला पुरेल एवढे दूध तयार करण्याची शरीराची तयारी करू."

समुपदेशनाच्या दीर्घ प्रक्रियेनंतर सोनियाची स्तनपानाची गाडी रुळावर आली आणि आनंदाने आई- बाळ त्या प्रवासाचा आनंद घेऊ लागले.

आईचं दूध बाळासाठी 'बेस्ट पॅकेज'

काही सरळ साध्या सोप्या गोष्टी आपण उगाचच अवघड करून ठेवलेल्या असतात. त्यामुळे जे आपसूकच साध्य व्हायला पाहिजे ते अप्राप्य ध्येय होऊन बसतं.

आईने तान्ह्या बाळाला योग्य वेळी, पोटभर, बाळ पुरेसे मोठे होईपर्यंत दूध पाजणे ही किती सहज, नैसर्गिक गोष्ट आहे. सगळ्या सस्तन प्राण्याच्या मादींना आणि बाळांना आपसूकच ही गोष्ट माहिती असते.

बाळाला जन्मल्यावर एका तासाच्या आत आईच्या स्तनावर लावायचे, म्हणजे ते नैसर्गिक उर्मीने चोखू लागते. त्यानंतर दर दोन तासानी किंवा बाळाने भूकेचे संकेत दिल्यावर बाळाला आईच्या छातीजवळ न्यायचे म्हणजे स्तनपानाचा प्रवास सुरळीत सुरू होतो.

आई-बाळाला एकमेकांची सवय होऊन आईचे शरीर बाळाच्या गरजेनुसार त्याला हवे तितके 'टेलरमेड' दूध बनवते. 'आईचं दूध' हे निसर्गानी निर्मिलेलं एक जादुई रसायन आहे, जे कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत पिल्लाला जगवतं, टिकवतं.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आईच्या दुधात बाळासाठी कर्बोदकं, प्रथिनं, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व आणि पाणी याचं ''बेस्ट पॅकेज'' असतं.

ते केवळ पोट भरणारे अन्न नाही तर अनेक सूक्ष्मजीवांपासून बचाव करणारी लस आहे. त्यात अनेक प्रतिजैविकं, संप्रेरक, प्रोबायोटिक, प्रीबायोटिक असलेल्या कोट्यवधी पेशी असतात.

आईच्या दुधात बाळासाठी कर्बोदकं, प्रथिनं, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व आणि पाणी याचं ''बेस्ट पॅकेज'' असतं. बाळ जसजसं मोठं होतं तसं आईचं दूधही 'मोठं' होतं. तर मूल मोठं झाल्यावर त्याच्या बदलत्या गरजांनुसार दुधाचे घटक बदलतात.

बाळ आजारी असेल तर त्याच्यासाठी औषधी ठरणारे 'दाहविरोधक' दुधात तयार होतात. वातावरणात असणाऱ्या रोगजंतुंविरोधी अँटीबॉडीज ही आईच्या दुधात तयार होतात आणि बाळाला मिळतात. आईचं दूध हे बाळाचं संरक्षक कवच असतं.

आईच्या दुधातूनच बाळाला मिळते रोगप्रतिकारक शक्ती

आयुष्याचे किमान पहिले सहा महिने बाळ केवळ आईच्याच दुधावर वाढतं. दोन वर्ष वयाचं होईपर्यंत बाळाला लागणारी रोगप्रतिकार शक्ती आईच्या दुधातून मिळते.

मात्र स्तनपान सुरळीत होण्यासाठी आईला योग्य वेळेस योग्य ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन मिळाले पाहिजे. कधी स्तनपान सुरळीत व्हावे यासाठी प्रोफेशनल मदतही लागू शकते. यासाठी स्तनपान सल्लागारांना संपर्क करावा.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO), इंडियन पेरियाट्रिक असोसिएशन (IPA) यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, बाळाला किमान सहा महिन्यांपर्यंत केवळ आईचे दूध पाजावे.

किमान दोन वर्षापर्यंत स्तनपान चालू ठेवावे. आईचं दूध हा बाळासाठी सर्वोत्तम आहार आहे, हे माध्यमांमधून सतत सांगितले जाते.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रत्येक दोन मुलांमागे एक बाळच सहा महिन्यांपर्यंत केवळ आईचे दूध पिते.

पण याबाबतीत भारताची अधिकृत आकडेवारी बघू. 2021 च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 नुसार, भारतात जन्मल्यानंतर पहिल्या तासात (गोल्डन अवर मध्ये) बाळाला स्तनपान देण्याचं प्रमाण केवळ 41.6% आहे.

सहा महिने केवळ आईचे दूधच बाळाला देण्याचे (Exclusive Breastfeeding) प्रमाण सुमारे 53% आहे. म्हणजे प्रत्येक दोन मुलांमागे एक बाळच सहा महिन्यांपर्यंत केवळ आईचे दूध पिते.

साधारण निम्म्या बाळांना सहा महिन्याच्या आतच आईच्या दुधासोबत किंवा दूधाखेरीज अन्य आहार दिला जातो. त्यामुळे, 38% बाळांची वाढ खुंटली (stunting) आहे.

WHO नुसार सहा महिने केवळ स्तनपानाचे देशातील प्रमाण किमान 70% असायला हवं.

म्हणजे आपल्याला अजुन किती मजल गाठायची आहे. अर्थात ही आकडेवारी NFHS-4 हून चांगली आहे. याचा अर्थ आपली आरोग्य यंत्रणा योग्य दिशेने प्रयत्न करत आहे. पण अजूनही आपण कुठे कमी पडतोय?

स्तनपान हा सगळ्या समाजाचा प्रश्न

आता इथे 'आपण' का म्हणलं? स्तनपान तर आई आणि बाळाचा प्रश्न आहे ना? इथेच तर गडबड होतीय. स्तनपान हा सगळ्या समाजाचा प्रश्न आहे.

बाळांचं शारीरिक आरोग्य चांगलं राहिलं, आईचं मानसिक आरोग्य चांगलं राहिलं तर त्यातूनच पुढचा सुदृढ, निरोगी, मानसिकदृष्ट्या शांतीपूर्ण समाज निर्माण होत राहणार, यासाठी सुयोग्य स्तनपानला पर्याय नाही.

पण स्तनपान करतांना आईचं स्वतःचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडलेलं असेल, तिच्यावर गृहकलहांपासून ते लवकरात लवकर करीयरमध्ये परतण्याचे कित्येक सारे ताण असतील, घरात आणि घराबाहेर स्तनपान करण्याची मोकळीक नसेल, अनेक निर्बंध असतील तर स्तनपान करण्यात खूप साऱ्या अडचणी येतात.

त्यांना कंटाळून, अवघडून, कधी चुकीचे सल्ले मिळाले म्हणून या नवमाता दूध पाजणे लवकर सोडून देतात. स्तनपानच्या ऐवजी फॉर्म्युला किंवा पावडरचे दूध द्यायला सुरुवात करतात.

बाळाची पचनशक्ती तयार व्हायच्या आधी वरचा आहार द्यायला लागतात. त्याचा बाळांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.

स्तनपानाचे अर्थकारण

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

फॉर्मुला किंवा दूध पाउडर बनवणाऱ्या कंपन्या ही बहू अब्जावधी डॉलरची इंडस्ट्री आहे. आजच्या घडीला जगात फार्मूला कंपन्यांची 90 अब्ज अमेरिकन डॉलरची उलाढाल आहे.

आपल्या देशात इन्फान्ट फॉर्मुलाचे मार्केट सुमारे 6 अब्ज अमेरिकन डॉलरचे आहे. यामध्ये काही मोजक्याच बहुराष्ट्रीय कंपन्यांची मक्तेदारी आहे.

ह्या कंपन्यांनी विकसनशील देशात आपले पाय रोवण्यासाठी तात्विकदृष्ट्या खूप गैरमार्गांचा वापर केला. आक्रमक जाहिरात तंत्राने न्यूनगंड निर्माण करत 'आईच्या दुधापेक्षा फॉर्मुला जास्त चांगला' असे ठसवले. विकसित देशात फॉर्मुला 'नॉर्मलाईज' केला गेला.

काही गरीब देशात तर हॉस्पिटल करवी फॉर्मुलाची फ्री सॅम्पल वाटली गेली. त्यामुळे, आईच्या दूध करण्याच्या क्षमतेवर दुष्परिणाम झाल्यामुळे त्यांना फॉर्मुला विकत घेण्यावाचून पर्याय राहिला नाही.

फॉर्मुला बनवण्यासाठी वापरले गेलेले खराब पाणी यामुळे मुलांचे आरोग्य बिघडू लागले आणि महाग असल्यामुळे पातळ फार्मूला मुलांना पाजल्याने कुपोषणात भर पडू लागली.

विकसित देशात याउलट परिणाम दिसू लागला, मुलांमध्ये लठ्ठपणा वाढीस लागला. बाळांच्या म्हणजेच पुढच्या पिढीच्या आरोग्यावर गरज नसताना दिल्या जाणाऱ्या फॉर्मुला दुधाचे असंख्य दुष्परिणाम मुलांमध्ये दिसू लागले.

त्यामुळे 70 च्या दशकात जागतिक पातळीवरच्या बालहक्क संघटनांनी या कंपन्यांच्या भांडवलखोरी आक्रमक जाहिरातबाजीविरुद्ध आवाज उठवला. त्यावर WHO ने फॉर्मुलाच्या विक्री आणि जाहिरात संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे (WHO कोड) तयार केला.

हा कोड सर्व आरोग्यसेवा केंद्र, दवाखाने, डॉक्टर, नर्सेस, स्तनपान सल्लागार, औषधविक्रेते यांना बंधनकारक आहे. या अंतर्गत फार्मूला दुधाची प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जाहिरात करण्यास मनाई आहे. फॉर्मुलाचे फ्री सॅम्पल देण्यास मनाई आहे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फॉर्मुला किंवा दूध पाउडर बनवणाऱ्या कंपन्या ही बहू अब्जावधी डॉलरची इंडस्ट्री आहे.

फॉर्मुला कंपनीने कोणतेही आरोग्यविषयक कार्यक्रम, शिबिरे, लंच मिटिंग, कार्यशाळा, डॉक्टरांच्या भेटी आयोजित करण्यास मनाई आहे. कोणत्याही पोस्टरवर, पालकांना देण्याच्या गिफ्टवर फॉर्मुला कंपनीचे नाव अथवा लोगो लावण्यास मनाई आहे.

गरज नसताना विशिष्ट कंपनीचाच फॉर्मुला सर्व बाळांना सरसकट द्यायला लावणे, यास प्रतिबंध आहे. आपल्याकडे हा WHO कोड किती पातळीवर पाळला जातो, हे सहजच बघत येते.

कौटुंबिक पातळीवर पाहता, फार्मूलाचा खर्च अनेक कुटुंबांना परवडण्यासारखा नसतो. अगदी तान्ह्या बाळासाठी 2-3 दिवसासाठीच्या फॉर्म्युलाचा खर्च 500 रुपयेच्या घरात जातो. केवळ फॉर्म्युलाचेच दूध पिणाऱ्या बाळासाठी महिन्याभरात पाच हजार ते वीसेक हजार रुपये खर्च होतात.

आईचं खास बाळासाठी बनत असलेलं टेलर मेड दूध तर चक्क फुकट असतं. मग त्याला प्रोत्साहन का दिलं जात नाही? GDP मध्ये बाजारू फार्मूलाचे मूल्य पकडले जाते परंतु आईच्या दुधाची GDP मध्ये मोजदादच नाही.

आईच्या दुधाचे मोल जर पैशात केले तर, जगभरातील दूध उत्पादनाचे मूल्य 3.6 ट्रिलियन अमेरिकन डॉलर एवढे आहे! (Lancet 2023) असे असूनही स्तनदा मातांना 'वर्क फोर्स' मानले जात नाही.

निम्म्याहून अधिक स्तनदा मातांना कामावरून सशुल्क रजा मिळत नाही. अनेकींना काम सोडावे लागते नाहीतर बाळाला सुयोग्य स्तनपान देणे थांबवावे लागते.

पुढच्या पिढीच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करता या स्थितीमध्ये बदल घडवायला हवा. सुयोग्य स्तनपानात पुढच्या पिढीला सुदृढ, आरोग्यवान, बुद्धिमान बनवण्याची शक्ती आहे हे जाणून, जगभरात ऑगस्टचा पहिल्या आठवड्यात 'स्तनपान जागरूकता सप्ताह' साजरा केला जातो.

यामध्ये स्तनपानाचे महत्व नवमातेला, नवपित्याला समजावून सांगणे हा भाग आहेच पण समाज म्हणून- आरोग्यव्यवस्था म्हणून आपण काय बदल करू शकतो ह्याचे आत्मचिंतन आणि प्रत्यक्ष कृती करणेही महत्त्वाचे आहे.

स्तनपान सुरळीत न होण्याची कारणे

1) 'आईचं दूध बाळाला पुरेल का?' असा अविश्वास घरच्यांकडून दर्शवला गेला तर आईचाही आत्मविश्वास ढासळतो. बाळ रडतंय म्हणजे दूध पुरत नाहीये हा गैरसमज आहे. बाळ वेगवेगळ्या कारणांसाठी रडत असतं. कधी आई हवी म्हणून, कधी गॅसेस झाले म्हणून, कधी नुसतं कुशीत झोपायच म्हणून. प्रत्येकवेळी बाळ रडते म्हणून गरज नसताना वरचे दूध दिले जाते.

2) हॉस्पिटलमध्ये पहिल्या दिवसापासून सरसकट दिला जाणारा फॉर्म्युला. पहिल्या दिवसात आईचे चिकदूध (जे पाण्यासारखे किंवा चिकट स्त्रावासारखे असते) बाळाला पुरेसे नाही असा गैरसमज असतो. ते बहुतेक बाळांना पुरेसं असतं, बाळाची तहान भूक त्याने भागणार असते. तरीही हॉस्पिटलमध्ये गैरसमजामुळे किंवा भीतीमुळे सुरुवातीचे दोन तीन दिवस फॉर्म्युला द्यायला लावतात. त्यातूनच आईचे दूध पुरेसे तयार होण्याचं चक्र गडबडतं.

3) आईच्या निपलच्या आकाराविषयीही गैरसमज असतात. खरेतर बहुतांश बाळे पुरेशी सुयोग्य मदत दिल्यावर कोणत्याही आकाराच्या निपलवर दूध पिऊ शकतात. पण निपलच्या किंवा स्तनांच्या आकारावरून अनेकदा आईला न्यूनगंड दिला जातो.

4) आईला स्तनपान करताना स्तन दुखावतात, कधी त्यातून रक्त येतं, कधी त्यात जंतू संसर्ग होऊ शकतो. यामुळे स्तनपान करणं अवघड जातं. अशावेळी कुठल्या आरोग्य यंत्रणेकडे जायचं ते कळत नाही. अशावेळी वेदनेमुळे स्तनपान बंद केले जाते. स्तनपान सल्लागारांच्या मार्गदर्शनाने व डॉक्टरांच्या ट्रीटमेंटने हा प्रश्न सुटू शकतो आणि स्तनपान सुरळीत सुरू होई शकते.

5) फॉर्मुला कंपन्यांचे आक्रमक मार्केटिंग ज्यामुळे आईला स्वतःच्या दुधापेक्षा फॉर्म्युला जास्त सोयीचा वाटतो. आजूबाजूच्या अनेकींनी बाळाला फॉर्म्युला दिला तर आपणही द्यायला हवा, असा संभ्रम निर्माण होतो. कामावर जावे लागल्यामुळे स्तनपान सुटते.

काय व्हायला हवं?

1) सुधारणेची सुरुवात हॉस्पिटल पासून होऊ शकते. हॉस्पिटलमध्ये युनिसेफने सांगितलेल्या बालक स्नेही हॉस्पिटलच्या दहा पायऱ्या (10 steps for Baby Friendly Hospital Initiative) अंगिकारल्या जाव्यात. सरसकट फार्मूला देऊ नये. आई-बाळाला सतत सोबत ठेवावे. आईच्या छातीवर कांगारू केअर देण्याची पद्धती शिकवली जावी.

2) स्तनपानाचे महत्व जाणून त्यासाठी स्वतंत्र, स्तनपान सल्लागार (IBCLC किंवा LP) प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जोडलेले असावेत. त्यांच्याकरवी गर्भवती व स्तनदा मातांना मार्गदर्शन दिले जावे; तसेच स्तनदा मातांना मदत देण्यासाठी मॅटर्निटी वार्डातील नर्सेसना विशेष प्रशिक्षण दिले जावे. गाव पातळीवर अंगणवाडी सेविका, आशावर्कर यांना स्तनपान साहाय्यनासाठीचे प्रशिक्षण दिले जावे.

ग्राफिक

फोटो स्रोत, Getty Images

3.) स्तनपान करताना येणाऱ्या छोट्या मोठ्या अडचणींकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर स्तनपान सल्लागारांची मदत घ्यावी. बहुतेक मोठ्या शहरात आंतरराष्ट्रीय बोर्ड प्रमाणित स्तनपान सल्लागार (IBCLC) असतात किंवा त्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन घेता येते.

4) बाळाला किमान सहा महिने संपूर्ण व दोन वर्षापर्यंत अंशतः आईचे दूध मिळावे यासाठी कामाच्या ठिकाणी सामाजिक जाणिवेने, पुरेशी पगारी सुट्टी (मॅटर्निटी लिव्ह) देण्यात यावी. तसेच ब्रेस्ट पंपिंगचीची सोय सर्व कामाच्या व सार्वजनिक ठिकाणी करावी.

5) बाळाला दूध पुरते आहे याची एक सोपी चाचणी म्हणजे बाळाची शू. 24 तासात बाळाला सहापेक्षा जास्त वेळा शू होत असेल आणि बाळाची वाढ व विकास योग्य प्रमाणात होत असेल, तर बाळाला दूध व्यवस्थित पुरत आहे, अशी शाबासकी आईने स्वतःला द्यावी आणि कुठल्याही अनाहुत सल्ल्यांना बळी न पडता संपूर्ण आत्मविश्वासाने बिनधास्त बाळासोबत स्वत:चंही वाढत जाणं एन्जॉय करावं.

'बालकस्नेही हॉस्पिटल उपक्रमाच्या'च्या दहा पायऱ्या

जागतिक आरोग्य संघटनेने आणि युनिसेफने 1991 मध्ये बालकस्नेही रुग्णालय उपक्रम (BFHI) सुरू केला जेणेकरून जगभरातील माता आणि नवजात शिशु यांना आरोग्यसेवा देणाऱ्या सुविधांना यशस्वी स्तनपानासाठी दहा पायऱ्या लागू करण्यास प्रेरित करता येईल.

या दहा पायऱ्या खालीलप्रमाणे :

1) स्तनपानाच्या पर्यायी उत्पादनांच्या आंतरराष्ट्रीय विक्री संहिता आणि संबंधित जागतिक आरोग्य संघटनेच्या ठरावांचे पूर्णपणे पालन करावे.

स्तनपान धोरणाचे लेखी स्वरूप असावे जे नियमितपणे कर्मचारी आणि पालकांना कळवले जावे.

स्तनपानविषयक सेवेची सतत देखरेख करणे आणि त्याची माहिती व्यवस्थापन प्रणाली स्थापित करणे.

2) स्तनपानाला पाठिंबा देण्यासाठी इस्पितळाच्या कर्मचाऱ्यांकडे पुरेसे ज्ञान, क्षमता आणि कौशल्ये असल्याची खात्री करणे व त्यासाठी सतत विशेष प्रशिक्षणे देणे.

3) गर्भवती महिला आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत स्तनपानाचे महत्त्व आणि व्यवस्थापन यावर चर्चा करणे.

4) जन्मानंतर शक्य तितक्या लवकर स्तनपान सुरू करण्यासाठी मातांना बाळांसोबत त्वरित आणि अखंड स्पर्श करता यावा यासाठी सुविधा देणे आणि त्यांना त्यासाठी मदत करणे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मातांना त्यांच्या बाळांचे भुकेचे संकेत ओळखण्यास आणि त्यांना प्रतिसाद देण्यास मदत करणे.

5) स्तनपान सुरू करण्यासाठी आणि ते टिकवून ठेवण्यासाठी, तसेच स्तनपानात येणाऱ्या सामान्य अडचणी सोडवण्यासाठी मातांना मदत करणे.

6) वैद्यकीय सूचना असल्याशिवाय, स्तनपान करणाऱ्या नवजात बालकांना आईच्या दुधाशिवाय इतर कोणतेही अन्न किंवा द्रव देऊ नका.

7) माता आणि त्यांच्या बाळांना एकत्र राहण्यास आणि 24 तास रूमिंग-इनचा सराव करण्यास सक्षम करणे.

8) मातांना त्यांच्या बाळांचे भुकेचे संकेत ओळखण्यास आणि त्यांना प्रतिसाद देण्यास मदत करणे.

9) बाटल्या, टीट्स आणि पॅसिफायर्स वापरण्यातील धोक्यांबद्दल मातांना सल्ला देणे.

10) पालकांना आणि त्यांच्या बाळांना योग्य वेळी मदत मिळावी म्हणून डिस्चार्जच्या वेळी पुढे घेण्याच्या काळजीविषयक व्यवस्थित सूचना लिखित स्वरुपात देणे.

(या लेखाच्या लेखिका ओजस सु. वि. या स्तनपान सल्लागार आहेत.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)