लॉरेन्स बिश्नोईला साबरमतीच्या तुरुंगातील हाय सिक्युरिटी सेलमध्येच का ठेवतात?

फोटो स्रोत, Getty Images/ANI
लॉरेन्स बिश्नोई. गुजरातमधील अहमदाबादच्या साबरमती तुरुंगात बंद असलेल्या या कैद्याचं नाव सध्या राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चेचा विषय झाला आहे.
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या, बाबा सिद्दिकी खून प्रकरणातील कथित सहभाग, अलीकडेच कॅनडातील खलिस्तान समर्थकांना लक्ष्य करण्यात भारतीय एजंटना मदत केल्याचा आरोप अशा अनेक आरोपांच्या केंद्रस्थानी लॉरेन्स आणि त्याची टोळी आहे.
गुजरातच्या किनारपट्टीवरून ड्रग्सचं नेटवर्क चालवल्याच्या आरोपावरून लॉरेन्स बिश्नोई गेल्या दीड वर्षांपासून साबरमती कारागृहातील हाय सिक्युरिटी सेलमध्ये कैद आहे.
सध्या लॉरेन्सच्या नावाची चर्चा होत असतानाच गुजरातमधील साबरमती तुरुंगातील या हाय सिक्युरिटी सेलचीही चर्चा होत आहे.
बीबीसी गुजरातीने काही सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. त्यांनी यापूर्वी साबरमती कारागृहात काम केलं आहे. त्याचप्रमाणे हाय सिक्युरिटी सेल काय असतात आणि तिथे कोणाला ठेवलं जातं याबद्दलही त्यांनी माहिती दिली.
हाय सिक्युरिटी सेलमध्ये कोणाला ठेवलं जातं?
गुजरात पोलीस दलात तुरुंग विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून दीर्घकाळ काम केलेले निवृत्त अधिकारी टी. एस. बिश्त यांच्याशी बीबीसी गुजरातीने संवाद साधला.
साबरमती कारागृहात निर्माण करण्यात आलेल्या हाय सिक्युरिटी सेलबद्दल माहिती देताना ते म्हणाले की, "न्यायालयाच्या आदेशानुसार साबरमती कारागृहात हाय सिक्युरिटी सेलची निर्मिती करण्यात आली होती. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन किंवा त्यांच्या वागणुकीनुसार त्यांना तिथे ठेवलं जातं.”
लॉरेन्स बिश्नोई सध्या अशाच एका हाय सिक्युरिटी सेलमध्ये कैदेत आहे.
बिश्त सांगतात की, सामान्यतः ड्रग्सची तस्करी करणारे, गंभीर खुनाचे आरोपी, तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न केलेले कैदी, तसंच बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी इत्यादी आरोपींना हाय सिक्युरिटी सेलमध्ये ठेवलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
उत्तर प्रदेशातून गुजरातमध्ये आणलेल्या अतिक अहमदला गुजरातच्या साबरमती कारागृहात आणलं गेलं तेव्हा त्यालाही याच सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं.
बीबीसी गुजरातीने तुरुंग विभागाचे विद्यमान पोलीस महानिरीक्षक ए. जी. चौहान यांच्याशीही बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र ते सध्या दिल्लीत असल्याने त्यांनी बोलण्यास नकार दिला.
याशिवाय गुजरातचे सध्याचे तुरुंग विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक के. एल. एन. राव यांच्याशीही बीबीसीनं बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.


हाय सिक्युरिटी सेल कसा असतो?
बिश्त यांनी बीबीसीबरोबर बोलताना हाय सिक्युरिटी सेल कसा असतो याची माहिती दिली.
ते म्हणतात, “हा सेल इतर सेलपेक्षा वेगळा आहे, त्याला दुहेरी सुरक्षा कवच असतं. तुरुंगाच्या इतर भागांपेक्षा इथं जास्त प्रशिक्षित कर्मचारी तैनात असतात आणि या हाय सिक्युरिटी सेलभोवती वॉच टॉवर बांधलेले असतात.”
'गुजरात तुरुंग नियमावली' नुसार, या प्रकारच्या सेलच्या आजूबाजूला ‘नो मॅन्स लँड क्षेत्र’ असतं. त्यामुळं फक्त ऑन-ड्युटी तुरुंग कर्मचारीच तिथे प्रवेश करू शकतात.
हाय सिक्युरिटी सेलबद्दल माहिती देताना बिश्त म्हणाले की, “या सेलमधील कैद्याला कोणत्याही न्यायालयीन सुनावणीसाठी सोडले जात नाही. त्यांना व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारेच न्यायालयात हजर केलं जातं. त्यांना तुरुंगातून पळून जाण्याची संधी मिळणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतलेली असते.
त्यामुळं बिश्नोई आणि त्यांच्यासारख्या हाय सिक्युरिटी सेलमधील कैद्यांना कोणाचीही भेट घेण्याची परवानगी नाही. कारागृहातील कैद्यांना साधारणपणे आठवड्यातून दोन दिवस भेटीची परवानगी दिली जाते.

फोटो स्रोत, Getty Images
गुजरातमधील अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून काम केलेले निवृत्त आयपीएस अधिकारी. एच. पी. सिंह बीबीसी गुजरातीशी बोलताना म्हणाले, “तुरुंगातील कैद्यांचं वेगवेगळ्या श्रेणींमध्ये वर्गीकरण केलं जातं. हाय सिक्युरिटी सेलमध्ये कच्चे कैदी (ज्यांच्यावर न्यायालयात खटला सुरू आहे), तसेच अनुभवी कैदी (ज्यांना आधीच शिक्षा झाली आहे). विविध गंभीर गुन्ह्यांसाठी अटक करण्यात आलेल्या कैद्यांना हाय सिक्युरिटी कैदी म्हणून वर्गीकृत करून तिथे पाठवलं जातं.
गृह मंत्रालयाच्या आदर्श तुरुंग नियमावलीत, नक्षलवाद, दहशतवादाचे आरोप असलेल्या कैद्यांना हाय सिक्युरिटी कैदी मानलं जावं आणि दर दोन आठवड्यांनी त्यांची सखोल तपासणी करण्यात यावी असं सांगितलं आहे.
या नियमावलीनुसार, श्रेणी-1 मध्ये कच्चे कामगार कैदी, दहशतवादी आणि अतिरेकी कारवायांमध्ये गुंतलेले कैदी, हिंसक कैदी किंवा पूर्वी तुरुंगातून पळून गेलेले कैदी, तर श्रेणी-2 मध्ये कच्चे कैदी, खुनाचे आरोपी, व्यावसायिक मारेकरी इत्यादींचा समावेश आहे.
हाय सिक्युरिटी सेल मजबूत भिंतींचा बनलेला असतो. त्याच्या सर्व बाजूंला 20 फूट उंचीवर वॉच टॉवर असावे. आकाशाच्या दिशेला असलेल्या भागाला लोखंडी जाळी असावी. हाय सिक्युरिटी सेलची खोली10 बाय 9 ची असावी. आत शौचालयं आणि अंघोळीची सोय असावी आणि या सेलला खिडक्या नसाव्यात असेही नियम आहेत.

या बातम्याही वाचा:

लॉरेन्स बिश्नोई साबरमती कारागृहात का आहे?
एका पाकिस्तानी बोटीतून 40 किलोग्रॅम हेरॉइन जप्त केल्यापासून लॉरेन्स बिश्नोईवर कारवाई करण्यात आली.
गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ही कारवाई केली तेव्हा त्याला पंजाबमधील कपूरथाला तुरुंगात ठेवण्यात आलं होतं.
2023 मध्ये जेव्हा बिश्नोईला गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा एटीएसचे पोलिस अधीक्षक सुनील जोशी बीबीसी गुजरातीशी बोलताना म्हणाले होते,"आमच्या माहितीनुसार, त्याने तुरुंगात बसून ड्रग्सची तस्करी करण्याची योजना आखली होती. गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरुन पकडले गेलेले ड्रग्स त्याच्या माणसांसाठीच आले होते."

फोटो स्रोत, Getty Images
पोलिसांना तपासादरम्यान बिश्नोईकडून काय जाणून घ्यायचे आहे, यावर ते म्हणाले, तुरुंगात असताना त्याने हे कसं केलं, हे आधी जाणून घेणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे कच्छच्या नलिया न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असताना त्याला साबरमती कारागृहात ठेवण्यात आलं.
कच्छमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणात अटक केल्यानंतर त्याला दिल्लीहून विशेष पोलिस कोठडीत कच्छ आणि त्यानंतर अहमदाबादला आणण्यात आलं होतं.
कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?
सिद्धू मूसेवालाच्या हत्या प्रकरणानंतर लॉरेन्स बिश्नोईचं नाव देशभर चर्चेत आलं.
जुलै 2024 मध्ये, ज्येष्ठ पत्रकार संजीव चौहान यांनी बीबीसीसाठी एक लेख लिहिला होता. त्यात ते म्हणतात की, प्रसारमाध्यमातील बातम्यांनुसार लॉरेन्स बिश्नोईचा जन्म 22 फेब्रुवारी रोजी पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील फाजिलाका येथे झाला. मात्र काही ठिकाणी त्यांची जन्मतारीख 12 फेब्रुवारी 1993 दिली आहे. म्हणजे लॉरेन्स सध्या 31 वर्षांचा आहे.
लॉरेन्सचे मूळ नाव सतविंदन सिंग असं आहे.
प्रसारमाध्यामांतील बातम्यांनुसार लॉरेन्स जन्मतः दुधाळ-गोरा होता, परंतु त्याच्या आईनेच त्याचे नाव 'लॉरेन्स' ठेवले. पुढे तेच नाव लोकप्रिय झाले.
त्यांचे वडील लविंदर सिंग हरियाणा पोलिसात हवालदार होते, तर आई सुशिक्षित गृहिणी होती. लॉरेन्स लहान असतानाच त्याचे वडील सरकारी नोकरी सोडून गावी परतले आणि वडिलोपार्जित शेती करू लागले.
लॉरेन्स पंजाबमधील अबोहर येथे बारावीपर्यंत शिकला आणि पुढील शिक्षणासाठी 2010 मध्ये चंदिगडला गेला.
त्याने पंजाब विद्यापीठातून कायद्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि तो पंजाब विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा नेता होता.

फोटो स्रोत, TWITTER
लॉरेन्सने डीएव्ही कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि विद्यार्थी राजकारणात प्रवेश केला. तिथेच त्याची गोल्डी ब्रारशी भेट झाली. गोल्डी ब्रार हा परदेशात लॉरेन्स बिश्नोई टोळीसाठी काम करत होता आणि एक प्रकारे टोळीचा ताबा घेत होता.
लॉरेन्स हा बिश्नोई समुदायाचा आहे. हा समुदाय पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये राहतो.
लॉरेन्स बिश्नोईच्या विद्यार्थीदशेत त्याच्याबरोबर शिकलेले त्याचे वर्गमित्र सांगतात की, त्याला पंजाबी, बागरी आणि हरियाणवी भाषा येतात.
विद्यार्थीदशेच्या अखेरीस खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला.
लॉरेन्स बिश्नोईविरुद्ध सध्या 22 खटले प्रलंबित असून त्याच्याविरुद्ध सात प्रकरणांची चौकशी सुरू आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, त्याच्या टोळीतील 700 सदस्य वेगवेगळ्या राज्यांमध्ये पसरले आहेत.
याआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला मारण्याची धमकी दिली होती. बिश्नोई समाजात काळवीट पूजनीय आहे आणि सलमान खानला काळवीटाच्या हत्येच्या एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यामुळं सलमानला धमकी दिली होती.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











