लातूर-नांदेडमध्ये बर्ड फ्लूमुळे खळबळ, पण 'त्या' 4 हजार कोंबड्यांच्या मृत्यूचे कारण वेगळे

मृत पक्षांचे नमुने पुणे आणि भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.

फोटो स्रोत, Mustan Mirza

    • Author, मुस्तान मिर्झा
    • Role, बीबीसी मराठीसाठी

नांदेड आणि लातूर जिल्ह्यात बर्ड फ्लूबाधित पक्षी आढळल्याने पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. यामुळे एक शंकेचे वातावरण नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये दिसून येत आहे.

तर प्रशासनाकडून देखील उपाययोजना म्हणून संबधित परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

केवळ पोल्ट्री पक्षीच नाही तर कावळ्यांचाही मृत्यू देखील परिसरात चर्चेचा विषय झाला होता.

लातूर जिल्ह्यातील उदगीर शहराच्या वेगवेगळ्या परिसरात 13 जानेवारी ते पुढील 8 दिवस जवळपास 64 कावळे अचानक मृतावस्थेत अढळले होते.

त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी मृत पक्षांचे नमुने पुणे आणि भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. या अहवालात कावळ्यांना बर्ड फ्लू झाल्याचे समजले होते. त्यानंतर परिसरात अलर्ट जारी करण्यात आला होता.

आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नागपुरात ताज बाग परीसरात बर्ड फ्लूमुळे 3 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने 3 हजार कोंबड्या महापालिकेने नष्ट केल्या आहेत.

प्रशासनाने तत्काळ परिसरातील असणाऱ्या कुक्कुट पालनातील कोंबड्यांचे नमुने प्रयोगशाळेला पाठवले तर संबधित क्षेत्र अलर्ट झोन म्हणून घोषित केला.

अहमदपूरमध्ये कुक्कुटपालनात 4204 कोंबड्यांचा मृत्यू

अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील सचिन गुळवे यांचे पोल्ट्रीफार्म आहे. त्यांनी 15 जानेवारी रोजी 4,500 कुक्कुट पक्ष्यांची पिल्ले आणली होती.

रात्री पिल्ले सोडल्यानंतर अचानक लाईट गेली. त्यानंतर 16 ते 23 जानेवारीदरम्यान 4,204 पिल्ले दगावली.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

सचिन गुळवे यांनी तत्काळ पशूसंवर्धन विभागाला कळवल्यानंतर मृत पिल्ल्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले.

25 जानेवारी रोजी अहवाल प्राप्त झाला, ज्यामध्ये पोल्ट्रीफार्ममधील पिल्लांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाला नसल्याचे स्पष्ट झाले.

लाईट गेल्याने घाबरून व एकमेकांखाली दबून पिल्लांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.

उदगीरच्या कोंबड्यांचा अहवालही निगेटिव्ह

उदगीरमध्ये 64 कावळ्यांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या होत्या.

उपाययोजना म्हणून 5 किमी परिघातील सर्व कुक्कुट फार्म, चिकन सेंटर आणि पक्ष्यांशी संबधित ठिकाणाहून 48 पक्ष्यांचे नमुने संकलित करुन पुणे आणि भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.

त्याचे आहवाल बर्ड फ्लू निगेटिव्ह आल्याचं जिल्हा पशूसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यातही बर्ड फ्लूबाधित पक्षी अढळले

लोहा तालुक्यातील किवळा येथील शेतकरी पंजाब टरके यांच्या मोकळ्या कुक्कुट पालन केंद्रातील कोंबड्याचे 20 पिल्ले मृत आढळले होते.

किवळा परिसरात कोंबडी आणि काही ठिकाणी कावळे मृतावस्थेत अढळले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून मृत पक्षांचे नमुने पशूरोग अन्वेषण प्रयोगशाळा पुणे आणि भोपाळ येथील कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशूरोग संस्था या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.

हे नमुने पॉझिटिव्ह आले असून कुक्कुट पक्षांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

परिणामी किवळा येथील 10 किलोमीटरचा परिसर जिल्हा प्रशासनाच्या वतीने अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

नांदेड आणि लातूर मध्ये बर्ड फ्लू बाधित पक्षी आढळल्याने चिंता वाढली आहे.

फोटो स्रोत, Mustan Mirza

फोटो कॅप्शन, नांदेड आणि लातूर मध्ये बर्ड फ्लू बाधित पक्षी आढळल्याने चिंता वाढली आहे.

खबरदारीच्या उपाययोजना म्हणून 565 कुक्कुट पशुसंवर्धन विभागाने ताब्यात घेतले असून त्यांची आता शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार आहे.

खबरदारी म्हणून 'या' करण्यात आल्या उपाययोजना

प्रभावित क्षेत्रात जिवंत व मृत कुक्कुट पक्षी, अंडी, कोंबडीखत, पक्षीखाद्य, अनुषंगिक साहित्य व उपकरणे इ. च्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. प्रभावित पोल्ट्री फार्मच्या परिसरात नागरिकांच्या हालचालीस, तसेच इतर पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आली आहे.

बर्ड फ्लूबाबत अनावश्यक भीती बाळगू नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे

फोटो स्रोत, Mustan Mirza

फोटो कॅप्शन, बर्ड फ्लूबाबत अनावश्यक भीती बाळगू नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे

प्रभावित पोल्ट्री फार्मचे प्रवेशद्वार आणि परिसर 2 टक्के सोडियम हायपोक्लोराईट किंवा पोटॅशियम परमॅग्नेटने निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रभावित क्षेत्राच्या 5 कि.मी. त्रिज्येतील परिसरात कुक्कुट पक्ष्यांची खरेदी-विक्रीची दुकाने, व कुक्कुट मांसाची चिकन दुकाने, वाहतूक, बाजार व यात्रा, प्रदर्शन आदी बाबी बंद राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

बर्ड फ्लूबाबत अनावश्यक भीती बाळगू नये - प्रशासन

नांदेड जिल्ह्यातील कुक्कुट पक्षांचे अहवाल जरी बर्ड फ्लू बाधित आले असले तरी या बाबतीत भीती बाळगू नये तसेच अफवा पसरवू नये, असे आवाहन नांदेड जिल्हा पशूसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. राजकुमार पडीले यांनी केले.

संबधित क्षेत्राचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

फोटो स्रोत, Mustan Mirza

फोटो कॅप्शन, संबधित क्षेत्राचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

खबरदारी म्हणून आम्ही योग्य त्या उपाययोजना करत आहोत. यापुढे तीन महिन्यापर्यंत बाधित क्षेत्रापासून 10 किमी अंतरावर असणारे कुक्कुट पक्ष्यांचे दर 15 दिवसाला नमुने पाठवून अहवाल तपासत राहू, असे डॉ. पडीले म्हणाले.

राज्यात बर्ड फ्लूच्या वाढत्या केसेस

याआधी रायगड जिल्ह्यातील उरणजवळ चिरनेर या गावात सूर्यकांत म्हात्रे यांच्या कुक्कुटपालनात बाधित होऊन मृत पावल्या होत्या. तपासणी केल्यानंतर त्यांना बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले होते.

उरण परिसरात 9 फेब्रुवारीपर्यंत कोंबड्यांच्या खरेदी विक्री बाजार यावर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यानंतर आता नांदेड आणि लातूर मध्ये बर्ड फ्लू बाधित पक्षी आढळल्याने चिंता वाढली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)