You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
निमिषा प्रियाच्या मृत्युदंडाचा दिवस टाळण्यासाठी कारणीभूत ठरलेले मौलवी कोण आहेत?
- Author, इम्रान कुरैशी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
येमेनमध्ये तुरुंगात असलेल्या निमिषा प्रिया हिच्या मृत्युदंडाचा दिवस टळला आहे. या बातमीमुळे कंथापुरम एपी अबूबकर मुसलियार हे 94 वर्षांचे मौलवी चर्चेत आले आहेत.
निमिषा यांच्यावर येमेनी नागरिक तलाल अब्दो महदी यांच्या हत्येचा आरोप आहे. महदी कुटुंबीयांनी त्यांना माफ केल्यास हा मृत्युदंड टळू शकतो.
निमिषा यांना वाचवण्यासाठी 'सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशन ॲक्शन कौन्सिल' काम करत आहे. 14 जुलै रोजी केरळमधील एक मोठे मुस्लीम धर्मगुरू समजले जाणारे 'ग्रँड मुफ्ती एपी अबूबकर मुसलीयार' यांनी येमेनमधील काही शेख लोकांशी चर्चा केली, असं या कौन्सिलनं सांगितलं.
सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि कौन्सिलचे सदस्य सुभाष चंद्रा यांनी बीबीसी हिंदीला माहिती दिली. ते म्हणाले होते, "सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशन ॲक्शन कौन्सिलच्या सदस्यांनी ग्रँड मुफ्ती यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी येमेनच्या काही प्रतिष्ठित शेख लोकांशी चर्चा केली."
चंद्रा म्हणाले, "महदीचे काही नातेवाईक आणि काही प्रतिष्ठित लोक यांची बैठक होईल असं आम्हाला सांगण्यात आलं आहे."
16 जुलै रोजी निमिषा यांच्या शिक्षेची अंमलबजावणी होणार होती मात्र त्याआधी फक्त 48 तास कंथापुरम मुसलियार यांनी हस्तक्षेप केल्यामुळे महदी कुटुंबाशी सुरू असलेल्या चर्चेला गती आली आहे.
मुसलीयार कोण आहेत?
मुसलीयार यांना अनौपचारिकरित्या भारताचे 'ग्रँड मुफ्ती' अशी पदवी देण्यात आली आहे. सुन्नी सुफीवाद आणि शिक्षणक्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानासाठी ते ओळखले जातात. अर्थात महिलांबाबतीत त्यांनी केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर अनेकदा टीकाही झाली आहे.
केरळ विद्यापीठातले इस्लामी इतिहासाचे प्राध्यापक अश्रफ कडक्कल बीबीसी हिंदीशी बोलताना म्हणाले, "त्यांच्या अनुयायांसाठी ते एखाद्या पैगंबरांसारखे आहेत. त्यांच्याकडे काही जादुसारखी शक्ती आहे असंही काही लोकांना वाटतं."
ते बरेलवी संप्रदायाचे पाईक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना सुफी संमेलनात सन्मानित केलं होतं.
परंतु, महिलांबाबतीत त्यांची भूमिका वादग्रस्त राहिली आहे, त्यामुळे त्यांच्यावर भरपूर टीका होते.
सांस्कृतिक आणि राजकीय अभ्यासक शाहजहाँ मदापत यांनीही बीबीसी हिंदीशी चर्चा केली. ते म्हणाले, "भारतात चंद्रास्वामी यांना तोड कोणी असेल तर ते मुसलीयार आहेत असं मला वाटतं. ते चंद्रास्वामींप्रमाणेच आहेत. राजकीय आणि सामाजिक बाबींशी ते एकदम चांगल्याप्रकारे संबंधित आहेत. ते एखाद्या कसलेल्या खेळाडूसारखे आहेत."
मदापत यांनी तांत्रिक चंद्रास्वामी यांचा उल्लेख केलाय त्या चंद्रास्वामी यांचं 90 च्या दशकात भारतातल्या राजकीय नेत्यांशी अत्यंत जवळचे संबंध होते. तेव्हाचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांची जवळची व्यर्ती म्हणून त्यांची ओळख होती. त्या काळात चंद्रास्वामी यांचा मोठा दबदबा होता.
अनेक नेते त्यांच्या दरबारात हजर राहाण्यासाठी धडपडायचे. निमिषा प्रिया प्रकरणात मुसलीयार यांनी हस्तक्षेप केला असला, तरी त्यांच्या महिलांबाबतची मतं चर्चेत आहेत. लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. खदिजा मुमताज यांनी बीबीसी हिंदीकडे आपलं मत मांडलं. त्या म्हणाल्या, "सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यावर त्यांनी काहीतरी करुन दाखवलं. याबद्दल मी आनंदी आहे."
मुसलीयार यांनी केलं तरी काय?
मुसलीयार यांनी आपले जुने मित्र आणि येमेनी सुफी पंथ 'बा अलावी तरीका'चे प्रमुख शेख हबीब उमर बिन हाफिज यांच्याशी असलेल्या संबंधाचा तलाल महदीच्या कुटुंबाशी संपर्क करण्यास वापर केला.
शेख हबीब उमर हे येमेनमधील 'दार उल मुस्तफ'' या धार्मिक संस्थेचे संस्थापक आहेत. तिथं केरळसह जगभरातले लोक शिकायला येतात. शेख हबीब उमर हे येमेनी गृहयुद्धात सहभागी असलेल्या गटांशीही चांगल्याप्रकारे संबंधित आहेत.
मुसलियार यांच्या प्रवक्त्याने बीबीसी हिंदीला माहिती दिली. ते सांगतात, "मुसलीयार यांनी केलेला हस्तक्षेप हा केवळ मानवतावादी दृष्टीने केलेला आहे. ब्लड मनी देऊन व्यक्तीला बिनशर्त माफ केलं जाऊ शकतं अशी तरतूद शरीया कायद्यात आहेत हे त्यांनी सांगितलं. शुक्रवारपासून त्यांनी प्रयत्न केले."
अजून मुसलियार यांच्याशी थेट संवाद झालेला नाही.
शेख हबीब उमर यांनी केरळला भेट दिलेली आहे. ते मलप्पुरमच्या नॉलेज सिटीमधील एका मशिदीच्या आणि 'मादीन सादात' अकॅडमीच्या उद्घाटन कार्यक्रमात आले होते. या नॉलेज सिटीची स्थापना मुसलियार यांच्या मुलाने केली आहे.
मौलवी मुसलियार चर्चेत कसे आले?
1926 साली स्थापन झालेल्या 'समस्त केरळ जमायतुल उलेम' या संस्थेशी फारकत घेतल्यावर ते मुस्लीम समुदायात चर्चेत आले. 1986 पर्यंत ही संस्था एकत्र होती मात्र त्यानंतर त्यांच्या विचारप्रवाहातील मतभेद ठळक होऊ लागले.
प्राध्यापख अश्रफ सांगतात, मुसलीयार हे कट्टरपंथी सलफी आंदोलनाच्या विरोधात होते. हे कट्टरपंथी मुसलमानांनी इंग्रजी शिकू नये असं म्हणत त्यांच्यामते ती 'नरकाची भाषा' आहे. आणि मल्याळम 'नायर लोकांची भाषा' आहे म्हणून शिकू नये असं त्यांचं मत होतं. तसेच महिलांच्या शिक्षणालाही त्यांचा विरोध होता. परंतु मुसलियार यांनी याविरोधात भूमिका घेतली.
त्यांनी परदेशातून आलेल्या निधीतून शैक्षणिक संस्था तयार करण्याकडे लक्ष दिलं.
अश्रफ सांगतात, "किमान 40 टक्के सुन्नी मुसलमान मुसलियार यांच्या बाजूचे आहेत. पारंपरिकरित्या सुन्नींची संघटना इंडियन मुस्लीम लीगबरोबर होती. हा पक्ष युनायटेड फ्रंटमध्ये आहे. मात्र मुसलियार यांनी मात्र शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे तत्व लक्षात घेतलं आणि त्यांनी सीपीएमला पाठिंबा दिला. त्यामुळे लोक त्यांनी अरिवल सुन्नी म्हणू लागले. मल्याळममध्ये कोयत्याला अरिवल म्हटलं जातं. सीपीएमचं निवडणूक चिन्ह कोयता आहे म्हणून असं नाव पाडलं गेलं."
ते एपी सुन्नी समुहाच्या समस्त केरळ जमायतुल उलेमाचे सरचिटणीस आहेत.
प्राध्यापक अश्रफ यांच्याप्रमाणे शाहजहाँसुद्धा शैक्षणिक संस्थांच्या उभारणीतलं त्यांचं योगदान मान्य करतात.
ते म्हणतात, "केरळमध्ये त्यांचे भरपूर चाहते आहेत. कारण ते कुशल आयोजक आहे. मात्र, महिलांसंदर्भातील विचार आणि इंटर इस्लामिक सहकाराबद्दल त्यांचे विचार अत्यंत जुनाट आहेत. सलफी पंथातल्या लोकांना सलामही करता कामा नये, असं ते एकदा म्हणाले होते."
महिलांबाबत वादग्रस्त विधानं
मुसलमानांनी एकापेक्षा जास्त विवाह करणं गरजेचं आहे, असं त्यांनी विधान केलेलं. त्यावर टीका करताना डॉ. मुमताज म्हणाल्या, "पहिल्या पत्नीच्या मासिकधर्माच्यावेळेस पुरुषाची शारीरिक गरज भागवण्यासाठी दुसरी बायको असली पाहिजे, असं त्यांचं मत आहे. महिलांबाबतचे त्यांचे विचार असे चिंताजनक आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर टीका केली. असे विचार चुकीचे आहेत."
असं असलं तरी मुमतात सांगतात, "निमिषा मुस्लीम आहे की नाही हे न पाहाता त्यांनी या प्रकरणात आपल्या व्यापक संपर्कांचा वापर केला हे मात्र आपणं स्वीकारलं पाहिजे."
मुंबईत 26/11 हल्ला झाल्यावर मुसलियार यांनी एक मुस्लिमांचं एक मोठं संमेलन आयोजित केलं होतं. इस्लाममध्ये दहशतवादाला थारा नाही, असा संदेश देणं हा या संमेलनाचा मुख्य उद्देश होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)