You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सायबर किडनॅपिंग काय आहे? तुमचे नातलग, मुलं परदेशात असतील तर नक्की वाचा
- Author, मॅडेलाईन हेल्पर्ट
- Role, बीबीसी न्यूज, न्यूयॉर्क
नुकताच अमेरिकत एक ‘सायबर किडनॅपिंग’ स्कॅम झाला. यात एका अमेरिकेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या चिनी कुटुंबाकडून खंडणी वसूल करण्यात आली.
या गुन्ह्याचा ट्रेंड आता जगभरात दिसून येतोय, आणि याला इतरही देशातले लोक बळी पडले असतील असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
काई झुआंग नावाचा विद्यार्थी बेपत्ता आहे अशी तक्रार त्याच्या शाळेने नोंदवली होती. त्यानंतर हा मुलगा ‘घाबरलेल्या आणि थंडीने कुडकुडलेल्या’ अवस्थेत युटाह राज्यातल्या ग्रामीण भागातल्या एका तंबूत सापडला.
अज्ञात स्कॅमर्सनी त्याला एकटं राहायला भाग पाडलं होतं असं स्थानिक पोलिसांचं म्हणणं आहे.
हा मुलगा निर्जनस्थळी एकटा आहे याची खात्री पटल्यानंतर खंडणीखोरांनी त्याचा फोटो (जो झुआंगने स्वतःच काढला होता) त्याच्या कुटुंबाला चीनमध्ये पाठवला आणि दावा केला की त्यांनी झुआंगचं अपहरण केलं आहे. त्याची सुटका करायची असेल तर खंडणी द्यावी लागेल.
शेवटी झुआंगच्या कुटुंबाने 80,000 डॉलर्स खंडणीखोरांना दिले.
तज्ज्ञांनी बीबीसीला सांगितलं की, तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे खंडणीखोर आता अशाप्रकाचे गुन्हे करून पैसे उकळू शकतात.
अशा सायबर किडनॅपिंगच्या किती घटना घडल्या आहेत याची पूर्ण आकडेवारी समोर आली नसली तरी झुआंगसारख्या अनेकांना असा अनुभव आलेला असू शकतो.
जोसेफ स्टाईनबर्ग एक सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ आहेत. ते म्हणतात, “आता लोकांवर पाळत ठेवून त्यांना लक्ष्य करणं सोपं आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यात खंडणीही जास्त उकळली जाते.”
सायबर किडनॅपिंग म्हणजे काय?
स्टाईनबर्ग म्हणतात की सायबर किडनॅपिंग म्हणजे खंडणीखोर एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबाला किंवा जवळच्यांना खोटं सांगतात की त्यांच्या माणसाचं अपहरण झालेलं आहे, आणि खंडणी मागतात. प्रत्यक्षात ती व्यक्ती सुरक्षित असते आणि तिचं अपहरण झालेलं नसतं. खंडणीखोर फक्त असं भासवतात.
झुआंगच्या बाबतीतही असंच झालं. 20 डिसेंबरला हा 17 वर्षांचा मुलगा युटाह राज्यातल्या निर्जनस्थळी तंबू ठोकून कॅम्पिंग करायला गेला होता.
खंडणीखोरांनी त्याला फसवून तिथेच थांबायला लावलं. त्यांनी आपल्या बोलण्याच्या जाळ्यात त्याला अडकवलं.
अशा खोट्या अपहरण प्रकरणात कुटुंबाला फोन केला की हे खंडणीखोर फोनवर आरडाओरडा ऐकवतात आणि म्हणतात की तुमचा माणूस धोक्यात आहे, लगेचच पैसे द्या.
डॉ मारी-हेलन मारास या जॉन जे कॉलेज ऑफ क्रिमिनल जस्टीसमध्ये सायबर क्राईम विभागाच्या संचालक आहेत.
त्या म्हणतात, “तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलत राहावं म्हणून ते खंडणीखोर काहीही करू शकतात. जर तुम्ही फोन ठेवला किंवा इतर कोणाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या माणसाला इजा करण्याची धमकीही ते देऊ शकतात.”
तुम्ही घाईघाईत निर्णय घ्यावा आणि पैसे देऊन टाकावे यासाठी ते दबाव आणत असतात.
अमेरिका, कॅनडा आणि इतर युरोपियन देशात शिकणाऱ्या चिनी विद्यार्थ्यांच्या बाबतीतही अशा घटना घडल्या आहेत. या विद्यार्थ्यांना जाळ्यात अडकवलं जातं आणि स्वतःच्या किडनॅपिंगचा बनाव रचायला सांगितला जातो.
कधी कधी तर त्या विद्यार्थ्यांना जबरदस्ती केली जाते असा बनाव रचण्यासाठी, अशी माहिती डॉ मारास यांनी दिली.
या घटनांची व्याप्ती किती ?
व्हर्च्युअल किडनॅपिंगची कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाहीये. याबद्दल फारशा तक्रारीच दाखल होत नाहीत असं तज्ज्ञांचं मत आहे.
तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे असे गुन्हे करणं अगदी सोपं झालं आहे.
स्टाईनबर्ग म्हणतात की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आपल्या जवळच्या व्यक्तींचा हुबेहुब आवाज काढणं ही शक्य आहे. त्यामुळे खंडणीसाठी समोरच्याला असा आवाज ऐकवून घाबरवणं शक्य होणार आहे.
“तंत्रज्ञान आता अशा पातळीला पोचलं आहे की आपल्या सख्ख्या मुलांना जवळून ओळखणारे पालकही फसू शकतात.”
सोशल मीडियामुळे अशा गुन्हेगारांना सगळी माहिती आयतीच मिळते. त्या व्यक्तीच्या आयुष्यात काय घडलं आहे, काय नाही याचे सगळी खबरबात त्यांना असते. याचा त्यांना फायदाच होतो.
“गुन्हेगार तुमचे फसवे फोन नंबरही तयार करतात म्हणजे जर तुमच्या घरच्यांना फोन गेला तर तो तुम्हीच केला आहे असं वाटेल. फसवणूक करण्यात ते पटाईत झाले आहेत.”
बरं यातले खंडणीखोर सहसा पकडलेही जात नाहीत.
याआधी असे खंडणीखोर गरीब किंवा अडचणीत सापडलेल्या लोकांना फसवायचे आणि त्यांच्याकडून लहान लहान रक्कम खंडणी म्हणून वसूल करायचे.
पण आत झुआंगच्या प्रकरणात त्याच्या घरच्यांकडून मोठी खंडणी उकळल्याचं समोर आलं आहे.
स्टाईनबर्ग म्हणतात, “सायबर क्राईम कदाचित सर्वात जास्त पैसे देणारे गुन्हे आहेत. तुम्ही लोकांना वेगवेगळ्या भाषेत गंडवू शकता, लक्ष्य करू शकता आणि तुम्ही हा गुन्हा कुठूनही करू शकता.”
असे गुन्हे कसे थांबवावेत?
तज्ज्ञ म्हणतात की सायबर क्राईमला कोणालाही बळी पडू शकतात. पण काही पावलं उचलली तर स्वतःचं संरक्षण करता येतं.
पहिलं म्हणजे मुळात आपल्या आसपास काय घडतंय त्यावर लक्ष ठेवा. आपली खाजगी माहिती सार्वजनिक करताना काळजी घ्या.
जर तुम्हाला कोणी लक्ष्य करत असेल पोलिसांना तातडीने संपर्क करा.
स्टाईनबर्ग म्हणतात की जर असा काही कॉल किंवा मेसेज तुम्हाला आला तर तुमच्या घरच्यांना किंवा जवळच्यांना संपर्क करून ते कुठे याची खातरजमा करा.
कुटुंबात तुम्ही कोडवर्ड ठरवू शकता जे आणीबाणीच्या परिस्थितीत वापरू शकता.
स्टाईनबर्ग यांच्यामते सरकारं आणि टेलिकॉम कंपनीदेखील असे गुन्हे थांबवू शकतात. ते असे कॉल ट्रेस करून गुन्हेगारांना पकडून देऊ शकतात.
किती लोक नक्की याला बळी पडलेत हे माहीत नसलं तरी स्टाईनबर्ग म्हणतात की, “आपल्यासारखीच माणसं याला बळी पडलीत, त्यांची फसवणूक झालीये.”
हेही वाचलंत का?
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.