राग, आनंद, दु:ख - आपल्या 'मूड स्विंग्स'मागचं नेमकं कारण काय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जस्मिन फॉक्स- केली
- Role, बीबीसी फ्युचर
हार्मोन्स आपले शरीर योग्यप्रकारे कार्यरत राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. पण ही हार्मोन्स आपल्या मानसिक स्थितीवर आणि आरोग्यावरही प्रभाव टाकू शकतात आणि तो प्रभाव कधी कधी नकारात्मकही असतो.
आपल्या इच्छा आणि भावना आपल्या नियंत्रणात आहेत असं आपल्याला वाटतं, पण खरंच तसं आहे का? वैज्ञानिकांना खूप आधीपासून माहीत आहे की न्यूरोट्रान्समीटर नावाचे रासायनिक संदेशवाहक आपल्या मेंदूवर मोठा प्रभाव टाकतात. पण आता वैज्ञानिकांना हेही लक्षात येत आहे की हार्मोन्स देखील आपल्या विचारांवर आणि भावनांवर अनपेक्षित प्रकारे परिणाम करू शकतात.
आता काही वैज्ञानिक या माहितीचा उपयोग करून नैराश्य आणि चिंता यांसारख्या मानसिक आजारांवर नवीन उपचार शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
हार्मोन्स हे रासायनिक संदेशवाहक असतात जे विशिष्ट ग्रंथी, अवयव आणि ऊती म्हणजे टिश्यूमधून सोडले जातात. हे रक्तप्रवाहात मिसळून शरीरभर फिरतात आणि विशिष्ट ठिकाणी असलेल्या रिसेप्टर्सशी जोडले जातात. ही जोडणी म्हणजे एक प्रकारची जैविक "हातमिळवणी" असते, जी शरीराला काहीतरी करण्याचा संकेत देते. उदाहरणार्थ, इन्सुलिन हा हार्मोन यकृत आणि स्नायूंच्या पेशींना रक्तातील अतिरिक्त ग्लुकोज शोषून घेऊन ग्लायकोजन स्वरूपात साठवण्यास सांगतो.
हार्मोन्सचे अदृश्य नियंत्रण
आतापर्यंत वैज्ञानिकांनी मानवी शरीरात 50 पेक्षा जास्त हार्मोन्स शोधले आहेत. हे हार्मोन्स एकत्रितपणे शरीरातील शेकडो प्रक्रिया नियंत्रित करतात जसे की अवयवांची वाढ, लैंगिक क्रिया, पुनरुत्पादन, झोप आणि जागरणाचे चक्र आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानसिक आरोग्य.

फोटो स्रोत, Getty Images
युनिव्हर्सिटी ऑफ ओटावा, कॅनडा येथील मानसशास्त्राच्या प्राध्यापिका नफिसा इस्माईल सांगतात की "हार्मोन्स आपल्या मनःस्थितीवर आणि भावनांवर खूप प्रभाव टाकतात."
"हे हार्मोन्स मेंदूतील विशिष्ट भागांमध्ये तयार होणाऱ्या आणि रिलीज होणाऱ्या न्यूरोट्रान्समीटरशी संवाद साधून काम करतात. तसेच पेशींचा मृत्यू किंवा नवीन न्यूरॉन्स तयार होण्याच्या प्रक्रियांवरही प्रभाव टाकतात."
हार्मोनल बदल आणि मानसिक आरोग्य
नैराश्य, चिंता आणि पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD)यांसारख्या मानसिक आजारांचे प्रमाण मोठ्या हार्मोनल बदलांच्या काळात अधिक असते. हे विशेषतः महिलांमध्ये दिसून येते. बालपणात मुलं आणि मुली यांच्यात नैराश्याचे प्रमाण जवळजवळ समान असते, पण किशोरवयात मुलींना नैराश्य येण्याची शक्यता मुलांपेक्षा दुप्पट असते आणि हा फरक आयुष्यभर राहतो.
तर मग हार्मोन्स जबाबदार असू शकतात का? जर तुम्ही महिला असाल, तर लैंगिक हार्मोन्स तुमच्या मनःस्थितीवर व्यापक प्रभाव टाकतात हे ऐकून आश्चर्य वाटणार नाही.
मासिक पाळीच्या आधीच्या दिवसांत इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरोनचे प्रमाण कमी होते आणि याच काळात काही महिलांना चिडचिड, थकवा, उदासीनता आणि काळजी जाणवते. काही महिलांना प्रीमेनस्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर (PMDD) देखील होतो.
हा एक गंभीर हार्मोन-संबंधित मानसिक आजार आहे ज्यामध्ये तीव्र मनःस्थितीतील चिंता, नैराश्य आणि कधी कधी आत्महत्येचे विचार येतात.

फोटो स्रोत, Getty Images
"PMDD असलेल्या अनेक महिलांसाठी हा दर महिन्याला येणारा दीर्घकालीन त्रास असतो, आणि तो त्यांच्या आयुष्यावर खोल परिणाम करू शकतो," असं अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या मानसशास्त्र आणि वर्तनशास्त्राच्या सहाय्यक प्राध्यापिका लीसा हंटसू सांगतात.
याउलट, स्रीबीज बाहेर पडण्याच्या प्रक्रियेआधी इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढते आणि यामुळे आनंदी वाटण्याची भावना निर्माण होते. प्रोजेस्टेरोनच्या विघटनातून तयार होणारा अलोप्रेग्नॅनोलोन हा हार्मोन शांतता देणारा म्हणून ओळखला जातो.
"जर एखाद्याला अलोप्रेग्नॅनोलोनचा इंजेक्शन दिलं, तर त्याला शांत वाटेल," असं हंटसू सांगतात.
महिलांना फक्त मासिक पाळीच नव्हे तर गर्भधारणा, पेरिमेनोपॉज आणि मेनोपॉजच्या काळातही हार्मोनल बदलांमुळे मानसिक आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. गर्भधारणेनंतर सुमारे 13% महिलांना नैराश्याचा अनुभव येतो.
पण असं का होतं? बाळंतपणानंतर लगेचच स्त्रियांच्या शरीरात प्रोजेस्टेरोन आणि इस्ट्रोजेन या हार्मोन्सचं प्रमाण अचानकपणे खूप कमी होतं. तसंच, पेरिमेनोपॉजच्या काळात देखील स्त्रियांना अंडाशयातील हार्मोन्समध्ये मोठ्या चढ-उतारांचा अनुभव येतो.
हे बहुधा हार्मोन्सच्या नेमक्या प्रमाणावर अवलंबून नसतं. कॅनडाच्या युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो, येथील मानसशास्त्राच्या प्राध्यापिका लीसा गालिया सांगतात की, "हे फक्त हार्मोन्सचे प्रमाण नसून, कमी ते जास्त किंवा जास्त ते कमी होणाऱ्या संक्रमणाचा परिणाम असतो."
पुढे त्या असंही सांगतात की, "काही लोक अशा बदलांबाबत अधिक संवेदनशील असतात. तर काही लोक सहजपणे मेनोपॉजचा काळ पार करतात आणि त्यांना काहीही त्रास होत नाही."
पुरुषांमध्येही हार्मोनल बदल
फक्त महिलांनाच नव्हे, तर पुरुषांमध्येही वय वाढल्यावर टेस्टोस्टेरोनचे प्रमाण कमी होते. जरी हा बदल हळूहळू आणि सौम्य स्वरूपात होतो. तरीही काही पुरुषांमध्ये या बदलामुळे मनःस्थितीत फरक पडतो.
"आम्ही पाहतो की काही पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोनच्या बदलामुळे मनःस्थितीत बदल होतो, आणि ही बाब पुरेशी लक्षात घेतली जात नाही," असं इस्माईल सांगतात.
लैंगिक हार्मोन्स मेंदूमधील सेरोटोनिन आणि डोपामिन या न्यूरोट्रान्समीटरचे प्रमाण वाढवून मनःस्थितीवर प्रभाव टाकू शकतात. सेरोटोनिनचे कमी प्रमाण नैराश्याचे कारण मानले जाते आणि आधुनिक अँटीडिप्रेसंट औषधं यांचे प्रमाण वाढवतात. काही इस्ट्रोजेन सेरोटोनिन रिसेप्टर्स अधिक संवेदनशील करतात आणि डोपामिन रिसेप्टर्सची संख्या वाढवतात.

फोटो स्रोत, Getty Images
एक दुसरी मांडणी अशी आहे की इस्ट्रोजेन न्यूरॉन्सचे नुकसान टाळते आणि मेंदूतील हिपोकॅम्पस भागात नवीन न्यूरॉन्स तयार होण्यास मदत करते. हा भाग स्मरणशक्ती आणि भावना नियंत्रित करतो. नैराश्य आणि अल्झायमर असलेल्या लोकांमध्ये हिपोकॅम्पस भागातील न्यूरॉन्स कमी होतात. अँटीडिप्रेसंट औषधं आणि सायकेडेलिक औषधं (जसे की मॅजिक मशरूममधील सायलोसायबिन) हिपोकॅम्पस भागात नवीन न्यूरॉन्स तयार करतात.
"इस्ट्रोजेन मेंदूचे संरक्षण करते आणि न्यूरोजेनेसिसला प्रोत्साहन देते," असं इस्माईल सांगतात. "म्हणूनच जेव्हा महिलांची मेनोपॉजची अवस्था सुरू होते, तेव्हा मेंदूतील न्यूरॉन्सच्या शाखा (डेंड्राइट्स) मागे घेतल्या जातात." यामुळे मेनोपॉजच्या काळात महिलांना मेंदूतील धुंदी आणि स्मृतीसंबंधी समस्या जाणवतात.
जेव्हा आपल्या शरीराची तणाव प्रतिक्रिया चुकीच्या मार्गाने जाते
हिपोकॅम्पस भागातील न्यूरॉन्सची संख्या कमी झाल्यास, त्याचा परिणाम दुसऱ्या हार्मोन प्रणालीवर होऊ शकतो ज्याला हायपोथॅलॅमस-पिट्युटरी-अॅड्रेनल (HPA) अॅक्सिस म्हणतात. ही प्रणाली शरीराचा तणाव कसा हाताळायचा याच्याशी संबंधित प्रतिक्रिया नियंत्रित करते.
जेव्हा आपल्याला चिंता वाटते, तेव्हा मेंदूतील हायपोथॅलॅमस जो शरीरातील बहुतांश हार्मोन्सच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवतो. पिट्युटरी ग्रंथीला एक सिग्नल पाठवतो, ज्यामुळे अॅड्रेनोकोर्टिकोट्रॉपिक हार्मोन (ACTH) नावाचा हार्मोन सोडला जातो. ACTH मग अॅड्रेनल ग्रंथींनाकॉर्टिसोल नावाचा तणाव हार्मोन सोडण्यास उत्तेजित करतो. कॉर्टिसोल शरीराला रक्तात साखर सोडण्यास सांगतो, जेणेकरून मेंदू आणि शरीराला आपत्कालीन परिस्थितीत कार्य करण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळते.
"जेव्हा एखादी व्यक्ती तणावात असते, तेव्हा HPA अॅक्सिस सक्रिय होते, आणि अल्पकालीन तणावासाठी हे उपयुक्त असते कारण ते शरीराला तणावाशी सामना करण्यास मदत करते," असं हंटसू सांगतात. "पण दीर्घकालीन तणावासाठी हे हानिकारक ठरू शकते."
सामान्यतः, शरीरात कॉर्टिसोल वाढल्यावर नकारात्मक फीडबॅक लूपसक्रिय होतो, तर दुसरीकडे हिपोकॅम्पस हायपोथॅलॅमसला पिट्युटरी ग्रंथीशी संवाद थांबवण्यास सांगतो, आणि तणाव संपुष्टात येतो. पण जर एखादी व्यक्ती अत्याचार किंवा हिंसाचाराच्या अनुभवातून गेल्यामुळे दीर्घकालीन तणाव अनुभवत असेल तर ही प्रक्रिया बंद होते आणि मेंदू कॉर्टिसोलने भरून जातो. हे धोकादायक आहे, कारण कॉर्टिसोल मेंदूमध्ये दाह वाढवतो, हिपोकॅम्पस भागातील न्यूरॉन्स नष्ट करतो आणि नकारात्मक फीडबॅक देण्याची क्षमता कमी करतो. याशिवाय, कॉर्टिसोल इतर मेंदूच्या भागांतील न्यूरॉन्सही नष्ट करू शकतो जसे की अॅमिगडाला आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स ज्यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मनःस्थितीवर परिणाम होतो.
"अॅमिगडाला हा मेंदूचा भाग आपल्याला भावना नियंत्रित करण्यास मदत करतो, आणि या भागाचा आकार कमी झाल्यास भावनिक अस्थिरता, चिडचिड आणि नकारात्मक भावना नियंत्रित करण्यात अडचण येते," असं इस्माईल सांगतात.
"प्रीफ्रंटल कॉर्टेक्समध्ये होणारी झीज ही एकाग्रता आणि योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम करते. आणि हिपोकॅम्पस भागातील झालेली झीज ही माहिती लक्षात ठेवण्यात अडचण निर्माण करते."
ऑक्सिटोसिन – प्रेमाचं हार्मोन
कॉर्टिसोल आपल्याला तणावग्रस्त करतो, तर "प्रेमाचा हार्मोन" म्हणून ओळखला जाणारा ऑक्सिटोसिन याच्या उलट काम करतो. हा हार्मोन प्रेमळ भावना आणि दयाळूपणा वाढवतो. तो प्रसूती, स्तनपान आणि कामोत्तेजनाच्या वेळी रीलिज होतो, तसेच प्राणी आणि माणसांमधील जिव्हाळ्याचं नातं निर्माण करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतो.
"ऑक्सिटोसिनचा संबंध जिव्हाळ्याच्या भावना आणि सुरक्षिततेच्या भावनेशी आहे, आणि हे तणावाचे परिणाम कमी करण्यात मदत करते," असं इस्माईल सांगतात. जेव्हा आपल्याला सुरक्षित वाटतं आणि आपल्याभोवती आधार आहे असं वाटतं, तेव्हा तणावामुळे वाढलेले कॉर्टिसोलचे प्रमाण कमी होते.
संशोधनातून असंही दिसून आलं आहे की, ऑक्सिटोसिनचा नाकातून स्प्रे घेतल्यावर लोक अधिक उदार, मदतशील आणि सहानुभूतीशील होतात, तसेच त्यांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवण्याची शक्यता वाढते.
तरीही प्रत्येक जण यावर विश्वास ठेवत नाहीत. उदाहरणार्थ, ऑक्सिटोसिन ब्लड-ब्रेन अडथळा पार करू शकतो का, हे अजून निश्चितपणे सिद्ध झालेले नाही.
थायरॉईड ग्रंथी (गळ्यातील फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी) द्वारे तयार होणाऱ्या दोन मुख्य हार्मोन्समधील असंतुलन नैराश्य आणि चिंता निर्माण करू शकतो हे अधिक प्रमाणात मान्य केलेले आहे.
हे हार्मोन्स म्हणजे ट्रायआयोडोथायरोनिन (T3) आणि थायरॉक्सिन (T4) जे हृदयगती आणि शरीराचे तापमान नियंत्रित करतात. जर हे हार्मोन्स जास्त प्रमाणात असतील जसे की थायरॉईड अतिसक्रिय असेल तर चिंता निर्माण होऊ शकते. आणि जर हे हार्मोन्स कमी प्रमाणात असतील.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











