बलिप्रतिपदा : 'इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो' असं का म्हणतात आणि 'बळीराजा' नेमका कोण होता?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रविण सिंधू
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
दिवाळीत बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या दोन्ही दिवशी महिला ओवाळताना 'इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो' अशी मनोकामना करताना आपण प्रत्येकानेच अनुभवलं असेल. इतकंच काय, शेतकऱ्याला पर्यायी शब्द म्हणून 'बळीराजा' या शब्दाचाही वापर होतो.
संत तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्येही बळीचा उल्लेख येतो. समाजसुधारक महात्मा फुले यांनीही त्यांच्या समग्र साहित्यात याच बळीराजाविषयी विस्ताराने लिहिलं आहे. तसंच, एका अखंडाच्या माध्यमातून बळीराजाचं महत्त्व विशद केलं आहे.
विशेष म्हणजे, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिवाळीच्या काळात बलिप्रतिपदेच्या दिवशी बळीराजा गौरव मिरवणुकाही निघतात.
- सर्वसामान्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेला हा बळीराजा कोण आहे?
- शेतकऱ्याला बळीराजा का म्हटलं जातं? महात्मा फुलेंनी या बळीराजाविषयी काय म्हटलं आहे?
- संत तुकारामांनी बळीराजाचा अभंगात उल्लेख करताना काय म्हटलं आहे?
या सर्वच गोष्टींविषयी आपण या विशेष लेखातून जाणून घेणार आहोत.
बळी कोण होता?
महात्मा जोतिबा फुले यांनी त्यांच्या समग्र साहित्यात बळी कोण होता यावर भाष्य केलं आहे.
त्यांच्यानुसार, 'बळी हा प्रल्हादाचा पुत्र विरोजन याचा मुलगा आहे. बळीराजा हा खूप पराक्रमी होता. बळीराजाने आधी त्याच्यासोबत असलेल्या तत्कालीन अनेक लहान लहान क्षेत्रपतींना दुष्ट दंगेखोरांपासून होणाऱ्या त्रासातून मुक्त केलं. त्यामुळे बळीराजाचं राज्य उत्तरोत्तर वाढत गेलं.'
बळीराजाचं राज्य किती मोठं होतं?
बळीराजाचं राज्य किती मोठं होतं, हे सांगताना महात्मा फुले म्हणतात, "बळीराजाच्या ताब्यात अनेक राज्यं होती. सिव्हलद्वीपाच्या आजूबाजूची अनेक बेटेही त्याच्या ताब्यात होती. तेथे बळी नावाचे एक बेटही आहे. दक्षिणेत कोल्हापूरच्या पश्चिमेला कोकण आणि मावळातील काही क्षेत्रेही बळीराजाच्या ताब्यात होती. तेथे जोतीबा नावाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. तो कोल्हापुरच्या उत्तरेस रत्नागिरी नावाच्या पर्वतावर राहायचा."
"दक्षिणेत बळीराजाच्या ताब्यात असलेल्या दुसऱ्या राज्याला महाराष्ट्र असे म्हटले जायचे. या राज्यात राहणाऱ्यांना महाराष्ट्री म्हणत असतं. पुढे त्याचा अपभ्रंश मराठे असा झाला. हे महाराष्ट्र राज्य खूप मोठे असल्याने बळीराजाने त्याचे 9 खंड (भाग) केले होते. या प्रत्येक खंडाच्या अधिकाऱ्यास खंडोबा नाव पडले. याशिवाय बळीराजाने महाराष्ट्रात महासुभा आणि 9 खंडांचा न्यायी असे दोन अधिकारी वसुली आणि न्याय करण्यासाठी नेमले होते. त्या महासुभ्याचा अपभ्रंश म्हसोबा असा झाला. तो सर्व पिकांची तपासणी करून त्याप्रमाणे सुट तुट द्यायचा आणि सर्वांना आनंदात ठेवायचा," असं महात्मा फुले सांगतात.

फोटो स्रोत, Rakesh Salunkhe
बळीराजाच्या राज्याचा विस्तार महाराष्ट्राबाहेर होता. त्याबाबतही महात्मा फुले माहिती देतात. ते पुढे सांगतात, "अयोध्येजवळ काशीक्षेत्राच्या आजूबाजूलाचा काही भागही बळीराजाच्या ताब्यात होता. त्याला दहावा खंड म्हटलं जायचं. तेथील अधिकाऱ्यांचे नाव काळभैरी होते. एकूण क्षेत्रपतींपैकी सात क्षेत्रपतींनी तर त्यांच्या भागाचा कारभार बळीराजाकडेच दिला होता. त्यामुळे त्यांना सात आश्रयीत असंही म्हटलं जायचं."

फोटो स्रोत, Maharashtra Government
"बळीचे राज्य फार मोठे होते आणि तो खूप बलवान होता. म्हणूनच 'बळी तो कान पिळी' अशी म्हणही वापरात असल्याचं दिसतं. बळीच्या सर्व महावीरांपैकी भैरोबा, जोतीबा व 9 खंडोबा रयतेच्या सुखासाठी झटण्याची शर्थ करत असे. त्यामुळेच सर्व मऱ्हाठ्यांनी प्रत्येक शुभकार्य सुरू करण्याआधी भैरोबा (बहिरोबा), जोतीबा व खंडोबाला देव मानून तळी उचलण्याची परंपरा सुरू केली," असंही महात्मा फुले नमूद करतात.


बळीराजा आणि बलिप्रतिपदेच्या संबंधावर बोलताना सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्त्या प्रतिमा परदेशी सांगतात, "बळीराजाची आठवण म्हणून दिवाळीत बलिप्रतिपदा साजरी केली जाते. पुराणांमध्ये बळी राजा उदार होता, दानशूर होता असं म्हणत बळीराजाचा महिमा गायलेला दिसतो."
"हाच धागा पकडून बळी राजा कोण होता हे शोधलं तर प्राच्यविद्यापंडीत शरद पाटील यांनी यावर प्रकाशझोत टाकलेला दिसतो. शरद पाटील सांगतात की, सिंधू संस्कृतीच्या उत्तरार्धात बळीचं राज्य अस्तित्वात होतं. स्त्री सत्तेनंतरच्या काळात बळीराजाचा इतिहास सापडतो," असं प्रतिमा परदेशी सांगतात.

फोटो स्रोत, Facebook/Pratima Pardeshi
भाऊबीजेच्या दिवशी वापरल्या जाणाऱ्या म्हणीतील बळीच्या उल्लेखावर बोलताना प्रतिमा परदेशी सांगतात, "हजारो वर्षे बहुजन समाजातील स्त्रिया इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो अशी मंगलकामना करतात. ही मंगलकामना ज्या दिवशी करतात तो दिवस महत्त्वाचा आहे आणि तो भाऊबीज आहे."
"भाऊबीजेला महिला भावाला ओवाळून इडा पिडा टळो बळीचं राज्य येवो अशी मंगलकामना करतात. म्हणजे या महिला आपल्या भावात बळीराजाचं प्रतिरुप पाहतात. भावानं बळीराजासारखं वर्तन करावं, त्याच्यासारखे नीती नियम, धोरणं घ्यावीत आणि तसा एक समाज अस्तित्वात यावा अशी मंगलकामना हजारो वर्षे या स्त्रिया करतात," असं सांगत परदेशी सध्या प्रचलित असणाऱ्या परंपरांचा इतिहास नमूद करतात.
बळीराजा इतका लोकप्रिय का?
इतक्या वर्षांनंतरही बळीच्या राज्याचा प्रभाव सर्वसामान्यांवर म्हणीच्या रुपाने दिसतो. बळीराजाची ही लोकप्रियता का आहे, असं बळीराजाने कोणतं काम केलं यावरही प्रतिमा परदेशींनी भाष्य केलं.
त्या सांगतात, "बळीच्या राज्यात धान्य पिकवणाऱ्या, सृजनाचं काम करणाऱ्या शेतकऱ्याकडे बघण्याचा उदार दृष्टिकोन होता. बळीच्या राज्यात तगईचं धोरण होतं. तगई म्हणजे तगून धरणं. ज्या शेतकऱ्यांना पेरायला धान्य नाही त्यांना बळीराज्याने त्याच्या धान्य कोषातून धान्य दिलं."
"विशेष म्हणजे शेतकऱ्यांना धान्य दिल्यानंतर त्याच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांमागे तगादा लावू नये, असंही धोरण होतं. शेतकऱ्याला जमेल तसं त्याने परत करावं, असं हे शेतकऱ्यांना तगवून धरणारं धोरण होतं. तगईचं धोरणं म्हणजे आजच्या भाषेत अनुदानाचं (सबसिडी) धोरण. यावरून अनुदानाच्या धोरणाची बीजं बळीराजाच्या राज्यात दिसतात," असंही त्या नमूद करतात.
ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी बळीराजाविषयी संशोधन करत 'बळीवंश' नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी सविस्तरपणे बळीराजावर मांडणी केली आहे. याशिवाय 'शिवधर्म गाथा' या पुस्तकातही त्यांनी दिवाळी सण आणि बळीराजाचा संबंध यावर भाष्य केलं आहे.
डॉ. साळुंखे बळीराजाला 'समविभागी' म्हणजे 'समसमान वाटा करणारा' असं म्हणतात.

फोटो स्रोत, Narendra Jadhav/Satara
बळीराजा आणि दिवाळीचा संबंध
बळीराजा आणि दिवाळीचा संबंध यावर भाष्य करताना डॉ. आ. ह. साळुंखे 'शिवधर्म गाथा'मध्ये सांगतात, "महाराष्ट्रात शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जातं. हा शेतांमधील सुगीचा काळ असल्याने या काळात भारतीयांचा प्रेरणापुरुष असलेल्या बळीराजाच्या आठवणी निघणं स्वाभाविक आहे. खरे तर दिवाळीचा हा सगळा सण अतिशय कृतज्ञतापूर्वक बळीमहोत्सव साजरा करण्याचा आहे. त्याचे मूळ स्वरूप बळीराजाला आणि कृषीला केंद्रस्थानी ठेवून निश्चित करण्यात आले आहे."
"सध्या साजऱ्या केल्या जाणाऱ्या दिवाळीत कार्तिक शुक्ल प्रतिपदा ही बलिप्रतिपदा म्हणून साजरी केली जाते. कार्तिक शुक्ल द्वितीयेला भाऊबीज साजरी करण्याच्या दिवशी बहीण भावाला ओवाळताना 'इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो' अशी सदिच्छा अंतःकरणपूर्वक व्यक्त करते. याचा अर्थ केरळमध्ये ज्याप्रमाणे सुगीचा सण असलेला 'ओणम्' साजरा केला जातो, तसेच दिवाळीचेही स्वरूप आहे," असं डॉ. साळुंखे सांगतात.
'बळीराजा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही'
बळीराजाचा महिमा केवळ महाराष्ट्रात मराठी संस्कृतीत होताना दिसत नाही.
महात्मा फुलेंनी भारत, हिंदूस्थान असे शब्द न वापरता बळीस्थान असा शब्द वापरला. ते या भूभागाला बळीस्थान म्हणायचे.
फुलेंनी त्यांच्या समग्र साहित्यात बळीराजाचं राज्य महाराष्ट्राबाहेर अगदी अयोध्येपर्यंत असल्याचाही उल्लेख आढळतो.

फोटो स्रोत, Rakesh Salunkhe
बळीराजाचा महाराष्ट्राबाहेर असलेल्या प्रभावावर बोलताना प्रतिमा परदेशी म्हणाल्या, "मल्याळी स्त्रिया लोकगीतं गातात. त्यात 'आटा माटा गायीगोमटा, दही दुधाने भरले डेरे' असा उल्लेख आढळतो. म्हणजे बळीचं राज्य संपन्न होतं आणि तेथे डेरे दही दुधाने भरलेले असायचे, अशी बळीराजाच्या राज्याची वर्णनं मल्याळी भाषेतही सापडतात."
"केरळमध्ये ओणमचा सण महाबली उत्सव म्हणूनच साजरा केला जातो. केरळमध्ये बळीराजाचा हा उत्सव म्हणजे आनंदाचा उत्सव असतो. गावागावात लहान मुलं बळीराजाचा वेश धारण करतात. आपला बळीराजा आपल्याला भेटायला येणार आहे असंच या उत्सवात सांगितलं जातं. स्त्रिया घरासमोर अंगणात शेणाचा एक उंचवटा तयार करतात. त्याच्याभोवती रांगोळी काढतात," अशी माहिती प्रतिमा परदेशी देतात.
"नारळ, तांदुळ, गुळ याचे गोड पदार्थ केले जातात आणि आपला राजा आपली चौकशी करायला येणार आहे म्हणून नवे कपडे घालतात. बळीचा वेश धारण केलेली लहान मुलं घराघरासमोर जातात आणि मायमाऊली तुझं बरं आहे ना अशी विचारणा करतात. त्यावेळी नवे कपडे घालून तयार असलेल्या मायमाऊल्या त्या बरे असल्याचं प्रतिरुप बळीराजाला सांगतात, असं केरळमधील या उत्सवाचं स्वरुप आहे," असंही परदेशी नमूद करतात.
महात्मा फुलेंनी बळीराजावर लिहिलेल्या अखंडात आमच्या देशातील अतुल स्वामीवीर बळीराजा आहे असं म्हटलं आहे.
बळीविषयी संत तुकाराम काय म्हणतात?
संत तुकाराम महाराजांच्या अंभगातही बळीचा उल्लेख आढळतो. याबाबत संत तुकाराम आणि महात्मा फुले यांच्या साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. विजय भगत यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "तुकोबांनी त्यांच्या अभंगात बळी सर्वस्वी उदार राजा होता, प्रजावत्सल राजा होता, असं म्हटलं आहे. बळी राजाने ‘कर’ उभारून तिजोरीत धन जमा केले होते. समाजातील दुर्बल घटकांना मदत करणे, दुष्काळ-पूर यासारख्या आपत्तीच्या काळात रयतेला मदत करणे, यासाठी तिजोरीत जमा झालेल्या धनाचा बळी राजाने उपयोग केला होता."
"तुकोबा सांगतात, त्या बळीचा मी ‘वंशज’ आहे, बळी विचाराचा वंशज आहे. मी बळी आहे, बळीपासूनच माझा जन्म झाला आहे, मी बळीच्या विचाराचा आहे, मला बळीच्या मार्गावर चालायचं आहे," असं सांगत प्रा. विजय भगत तुकोबाने स्वतःला 'बळी' असे संबोधल्याचं अधोरेखित करतात.
“बळी सर्वस्वे उदार | जेणे उभारिला कर |
करुनी काहार | तो पाताळी घातला ||”
-संत तुकाराम
विजय भगत पुढे सांगतात, "बळीराजा शोषणपूर्व समाजातील बहुजनांच्या हिताचे रक्षण करणारा महानायक होता. तो सिंधुजनांच्या प्रगतीचा पोशिंदा होता. महात्मा फुल्यांच्या संबोधाप्रमाणे आपण ज्यांना ग्रामदैवत संबोधतो ते खंडोबा, बहिरोबा, जोतिबा, म्हसोबा हे बळीराजाचे ‘सुभेदार’ होते. बळीराजाने या सुबेदारांच्या मदतीने सामाजिक ‘न्याय’ स्थापित करणारी ‘शासन’ व्यवस्था निर्माण केली होती. म्हणून तुकोबा म्हणतात ‘बळी दिला जिवाभावा | धरीला एक भाव | तो विश्वास फळला |’"
बळियाचे अंकित । आम्ही जालों बळिवंत ॥१॥
लाता हाणोनि संसारा । केला षडूर्मीचा मारा ॥ध्रु.॥
जन धन तन । केलें तृणाही समान ॥२॥
तुका म्हणे आतां । आम्ही मुक्तीचिया माथां ॥३॥
- संत तुकाराम
"बळी उदार होता. त्याने सामाजिक न्यायासाठी आपले हात पुढे केले. श्रमाला प्रतिष्ठा देऊन शेतीच्या विकासासाठी सिंचन, जलसंधारण यासारख्या व्यवस्था निर्माण केल्या. साधन संपदांचे समन्यायी वाटप केले. नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी प्रजाजनांना सरकारी भांडारातून ‘तगई’ देऊन आधार दिला होता. म्हणून महात्मा फुल्यांना बळी सद्गुणी राजा वाटतो," असंही भगत नमूद करतात.
दिवाळीत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बळीराजा गौरव मिरवणूक
2003 मध्ये पुण्यात सत्यशोधक कार्यकर्त्यांनी एकत्र येत दिवाळीत बलिप्रतिपदेच्या दिवशी बळी गौरव मिरवणूक सुरू केली. त्यात महात्मा फुलेंनी सांगितलेल्या बळीराजाच्या आठवणींना उजाळा दिला जातो.
हे सत्यशोधक केरळमधील ओणम सणाच्या धर्तीवर महात्मा फुलेवाडा (समता भूमी) ते स्वराज्याचं प्रतिक असलेल्या लाल महालापर्यंत बळीराजाची गौरव मिरवणूक काढतात. यात एक बैलगाडा शेंगा, बोरं, टोमॅटो, काकड्या या शेती धनाने सजवला जातो. त्यावर बळीराजाचा वेश धारण केलेला एक व्यक्ती उभा राहतो. तो इडा पिडा टळून बळीचं राज्य येणार आहे, असा प्रतिकात्मक संदेश देतो.
या मिरवणुकीत कृषीधनाचं वाटप करत, इडा पिडा टळून बळीचं राज्य येणार, सत्य की जय असं म्हणत ही मिरवणूक फुलेवाड्याहून लाल महल येथे येते.

बळीराजाच्या स्मरणात महाराष्ट्रात बळीपूजन, बळी गौरव मिरवणूक, भेटकार्ड देऊन बळीचा इतिहास जागृत करणं, बळीराजाचा कंदील घराला लावणं, अंगणात बळीराजाच्या रांगोळ्या काढणं असे अनेक उपक्रम केले जातात. याशिवाय बळीराजाच्या इतिहासाची व्याख्याने आयोजित केली जातात.
बळीराजा गौरव मिरवणुकीची संकल्पना पुढे कशी आली?
बळीराजा गौरव मिरवणुकीची संकल्पना मुंबईतील सत्यशोधक कार्यकर्ते अजित देशमुख यांनी मांडली. यानंतर सत्यशोधक महाप्रबोधन महासभेने ती संकल्पना विकसित केली. त्याचं रुप म्हणजे आज निघणारी बळीराजा गौरव मिरवणूक आहे.
पुढे ही संकल्पना किशोर ढमाले, दादा जगताप, प्रतिमा परदेशी, किशोर मांदळे, दिनकर दळवी इत्यादी सत्यशोधक कार्यकर्त्यांनी विकसित केली.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी ही संकल्पना उचलून धरत व्यापक केली. ते दरवर्षी या मिरवणुकीत सहभागी होतात, अशी माहिती प्रतिमा परदेशी यांनी दिली.
महाराष्ट्रात कोठे कोठे बळीगौरव यात्रा निघते?
पुण्यानंतर दुसऱ्या वर्षीपासून धुळ्यातही सत्यशोधकांच्या पुढाकाराने 9 ठिकाणी बळीराजा गौरव मिरवणुका निघतात. त्यात बैलगाडा, नांगर यांचा समावेश असतो. 3 वर्षांनी अहमदनगरमध्येही ही मिरवणूक सुरू झाली. ही सुरू करण्यात अभिजीत अनाप, बहिरनाथ वाकळे यांनी पुढाकार घेतला.
पुण्यातील बळीराजा गौरव मिरवणूक झाली की मावळमध्येही अशी मिरवणूक काढली जायची. कारण शेतकरी सायंकाळी उपलब्ध असायचे. याशिवाय पुण्यातील धनकवडी येथेही अशी मिरवणूक काढली जायची.

महाराष्ट्रात धुळ्यासह जळगाव, नंदूरबार, मुंबई, ठाणे, अहमदनगर (अहिल्यानगर), संगमनेर, अकोले, लातूर, उदगीर, नागपूर, कोल्हापूर, ओतूर इत्यादी ठिकाणीही अशा मिरवणूक निघतात. अकोले तालुक्यात विजय भगत, विकास पवार यांनी बळीराजा गौरव समिती, अकोले अंतर्गत अशी मिरवणूक काढण्यात पुढाकार घेतला.
सांगलीत महिला एकत्र येऊन दिवाळीत मातीचं बळी राजाचं राज्य मांडतात. याशिवाय मातीचा राजवाडा तयार करून बळीराजा, त्याचं सैन्य आणि बाजूला शेती करणारे शेतकरी असं दाखवलं जातं. तसेच पणत्या एकत्र बांधून त्या कुटतात. यातून त्या महिला भावाच्या शत्रूला आम्ही कुटतो आहे आणि आमचा भाऊ महाबळी आहे असं प्रतिकात्मपणे सांगतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











