सोन्या-चांदीच्या किंमतींनी शिखर गाठल्यानंतर अचानक घसरण कशी सुरू झाली?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, पीटर हॉस्किन्स, निक एडसर आणि एमर मोरेऊ
- वाचन वेळ: 4 मिनिटे
सोनं आणि चांदीचे भाव घसरत असताना, एफटीएसई 100 निर्देशांक विक्रमी उच्चांकावर पोहोचला. जागतिक बाजार पेठेतील जोखमीच्या मालमत्तांवर दबाव दिसत असला तरी, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा विश्वास कायम आहे.
विक्रमी पातळीवर पोहोचलेल्या सोन्या-चांदीचे भाव आता घसरत असून, बाजारात पूर्णपणे उलटा कल दिसू लागला आहे.
जानेवारीमध्ये जागतिक तणावामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोनं-चांदीत पैसे गुंतवले आणि भाव विक्रमी पातळीवर गेले. परंतु, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखपदी केविन वॉर्श यांची निवड जाहीर होताच धातूंच्या किंमती घसरल्या.
शुक्रवारी स्पॉट गोल्डच्या (सोनं) किमतीत 1983 नंतरची एका दिवसातील सर्वात मोठी घसरण झाली आणि भाव 9 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले. त्याचवेळी चांदीचे भाव 27 टक्क्यांनी कोसळले, मात्र सोमवारी (2 फेब्रुवारी) यात थोडीशी सुधारणा दिसली.
डॉलर थोडा मजबूत झाला असतानाही, FTSE (एफटीएसई) 100 ने (यूकेमधील टॉप 100 मोठ्या कंपन्यांचा शेअर निर्देशांक) सुरुवातीच्या घसरणीकडे दुर्लक्ष करत जोरदार उसळी घेतली.
निर्देशांक 1.2 टक्क्यांनी वाढून 10,341.56 अंकांवर बंद झाला, जो आतापर्यंतचा सर्वोच्च इंट्रा-डे ठरला. व्यवहारादरम्यान त्याने 10,345.48 असा नवा उच्चांकही गाठला.
सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत (जीएमटी) सोन्याचा दर 4.6 टक्क्यांनी घसरून प्रति औंस 4,659.16 डॉलर झाला, तर चांदीचा दर 7.63 टक्क्यांनी घसरून 78.70 डॉलरवर आला.
यामुळे सोनं आणि चांदी दोन्हींचे भाव मागच्या आठवड्यात गाठलेल्या रेकॉर्ड पातळीपेक्षा खूपच खाली आले आहेत. तेव्हा सोनं 5,500 डॉलरच्या (साधारण 497155 रुपये) वर, तर चांदी 120 डॉलरपर्यंत (10847 रुपये) पोहोचले होते.
जागतिक राजकीय घडामोडींचा परिणाम
तज्ज्ञांनी असंही सांगितलं की, एका प्रमुख एक्स्चेंजवरील व्यवहार (ट्रेडिंग) नियम बदलल्यामुळे सट्टेबाजांसाठी व्यवहार करणे महाग झाले, आणि त्यामुळे किमतींवर आणखी दबाव वाढला.
"जागतिक राजकीय घडामोडींच्या अनिश्चिततेपासून बचाव म्हणून अनेक गुंतवणूकदारांनी सोने-चांदी खरेदी केली. पण या मालमत्ताही अस्थिर असू शकतात, हे त्यांना कठीण अनुभवातून कळलं," असं एजे बेलचे गुंतवणूक संचालक रुस मोल्ड यांनी सांगितलं.
अमेरिकेची मध्यवर्ती बँक (फेडरल रिझर्व्ह) स्वतंत्रपणे काम करेल की नाही, याची बाजाराला चिंता होती. परंतु, शुक्रवारी (30 जानेवारी) केंद्रीय बँकेचे माजी गव्हर्नर केविन वॉर्श यांचं नाव पुढे येताच आर्थिक बाजारांनी त्याचं स्वागत केलं आणि डॉलरच्या किमतीत सुमारे 1 टक्क्यांची वाढ झाली.
या निवडीमुळे फेडची स्वायत्तता धोक्यात आहे की काय, ही चिंता काहीशी कमी झाली. कारण व्याजदर लवकर कमी न केल्यामुळे विद्यमान प्रमुख जेरोम पॉवेल यांच्यावर राष्ट्राध्यक्षांकडून सातत्याने टीका होत होती.
मोठी घसरण झाली असली तरी सोन्याची किंमत फक्त दोन आठवड्यांपूर्वीच्या पातळीवर आली आहे. तरीही गेल्या वर्षी याच काळाच्या तुलनेत सोनं सुमारे 70 टक्क्यांनी अजूनही महाग आहे.
सोमवारी कमोडिटी बाजारात विक्रीचा दबाव कायम राहिला आणि त्याचा परिणाम आशियाई शेअर बाजारांवरही झाला. दक्षिण कोरियाचा प्रमुख निर्देशांक कोस्पी सुमारे 5 टक्क्यांनी घसरला, तर हाँगकाँगचा हँग सेंग 2 टक्क्यांनी खाली आला. जपानचा निक्केई 225 निर्देशांकही 1 टक्क्यांहून अधिक घसरला.

फोटो स्रोत, Getty Images
युरोपमध्ये सुरुवातीला ब्रिटनचा एफटीएसई 100 निर्देशांक घसरला, पण नंतर सावरत 1.2 टक्क्यांनी तो वाढला. मात्र कमोडिटीच्या किमती घसरल्यामुळे खाण कंपन्यांवर दबाव राहिला आणि सोने उत्खनन करणाऱ्या फ्रेझनिलो आणि एन्डेव्हर मायनिंगच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांहून अधिक घसरण झाली.
अमेरिकेच्या शेअर बाजारात सुरुवातीला घसरण झाली, पण नंतर थोडी सुधारणा झाली आणि एस अँड पी 500 निर्देशांक 0.5 टक्क्यांनी वाढून बंद झाला.
जागतिक ऊर्जा बाजारात कच्च्या तेलाचे दर जवळपास 5 टक्क्यांनी घसरले. प्रमुख तेल उत्पादक देशांनी उत्पादनात बदल न करण्याचा निर्णय घेतला आणि अमेरिका-इराणमधील तणाव कमी होत असल्याची चिन्हे दिसल्यामुळे ही घसरण झाली.
डॉलर्सच्या किमतीत वाढ झाल्यामुळे देखील तेलाचे दर घसरले असू शकतात, कारण तेलाचा व्यवहार डॉलर्समध्ये होतो आणि त्यामुळे अमेरिकेबाहेरील खरेदीदारांसाठी ते महाग पडते.
सोनं आणि चांदीसह मौल्यवान धातूंनी 2025 मध्ये जबरदस्त कामगिरी केली, आणि सोन्यामध्ये 1979 नंतरची सर्वात मोठी वार्षिक वाढ दिसून आली.
सोन्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ते कमी प्रमाणात उपलब्ध आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या मते, आतापर्यंत फक्त सुमारे 2,16,265 टन सोनंच उत्खनन झाले आहे.
'बिटकॉइनचे भाव घसरले'
सोमवारी बिटकॉइनचा भाव 75,000 डॉलर्सच्या खाली गेले. शुक्रवारीही भाव घसरले होते, कारण गुंतवणूकदारांनी धोका असलेल्या मालमत्तेतील पैसा कमी केला आणि अमेरिकेतही क्रिप्टो नियमाबाबत काही प्रगती झाली नव्हती.
नोव्हेंबर 2024 मध्ये ट्रम्प पुन्हा निवडून आले. त्यानंतर डिजिटल चलनांचे भाव जोरात वाढले, कारण त्यांना या क्षेत्राचे मजबूत समर्थक मानले जात होते.
पण आता बिटकॉइनचा भाव पुन्हा निवडीनंतरच्या आधीच्या पातळीवर घसरला आहे, कारण अनेक गुंतवणूकदार जोखमीच्या मालमत्तेची विक्री करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
याव्यतिरिक्त, अमेरिकेच्या सिनेटमध्ये क्रिप्टोवर नियम बनवण्याचे प्रयत्न थांबले आहेत, ज्यामुळे अनिश्चितता वाढली आहे.
त्याचवेळी, ट्रम्प यांचा क्रिप्टो क्षेत्राशी जवळचा संबंध आणि पुन्हा एकदा अध्यक्षांच्या कार्यालयात परतल्यापासून त्यांच्या काही प्रकल्पांमुळे त्यांच्यावर हितसंबंधांचे आरोप पुन्हा सुरु झाले आहेत.
ब्लूमबर्गच्या अलीकडच्या अंदाजानुसार, केवळ डिजिटल मालमत्तेमुळेच त्याच्या कुटुंबाची संपत्ती गेल्या वर्षी 1.4 अब्ज डॉलर्सने वाढली. जानेवारी 2025 मध्ये शपथ घेण्यापूर्वी त्यांनी आपली स्वतःची क्रिप्टोकरन्सी $TRUMP सुरू केलं, जे त्याच्या सर्वोच्च भावापासून सुमारे 90 टक्क्यांनी घसरलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











