पिवळं सोनं, गुलाबी सोनं काय असतं? सोन्याची शुद्धता आणि किंमत कशी ठरवली जाते?

पिवळं सोनं, गुलाबी सोनं काय असतं? सोन्याची शुद्धता आणि किंमत कशी ठरवली जाते?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, के. षण्मुगम
    • Role, बीबीसी तमीळ

सोन्याच्या दागिन्यांचे उत्पादन आणि विक्री यामुळे सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीनुसार सोन्याच्या जागतिक मागणीचा सुमारे 50 टक्के वाटा हा दागिन्यांचा आहे. भारत आणि चीन हे दोन देश सोन्याच्या दागिन्यांच्या सर्वांत मोठ्या बाजारपेठा आहेत.

गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यासोबतच सोन्याच्या दागिन्यांची गुणवत्ता ठरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'कॅरेट' या मोजमापाबाबत आणि ते मोजण्याच्या पद्धतीबद्दलही अनेकांना उत्सुकता निर्माण झालेली दिसते.

सध्या सोनं केवळ पिवळ्या रंगातच नाही, तर गुलाबी (रोझ गोल्ड) आणि पांढऱ्या (व्हाईट गोल्ड) रंगातही उपलब्ध आहे.

स्वाभाविकपणे या वेगवेगळ्या प्रकारांच्या मूळ स्वरुपाबद्दल प्रश्नही उपस्थित होतात. सोन्याचे हे प्रकार जाणून घेण्यासाठी बीबीसीने सोनार तसंच सोन्याचे दागिने घडवणारे उत्पादक यांच्याशी संवाद साधला.

कॅरेट हे सोन्याच्या गुणवत्तेचे मोजमाप आहे का?

कॅरेट हे 'कॅरेटेज' (caratage) या शब्दाचे संक्षिप्त रूप असून सोन्याची शुद्धता मोजण्याचे मानक आहे. इतर धातूंसोबत मिसळलेल्या सोन्याची शुद्धता मोजण्यासाठी कॅरेट हे मानक वापरलं जातं. एखाद्या धातूला कायदेशीररित्या 'सोने' म्हणण्यासाठी आवश्यक असलेला किमान कॅरेट दर्जा देशानुसार वेगवेगळा असतो.

अमेरिकेत 10 कॅरेट हा कायदेशीररीत्या मान्य असलेला किमान दर्जा आहे. फ्रान्स, ब्रिटन, ऑस्ट्रिया, पोर्तुगाल आणि आयर्लंडसारख्या देशांमध्ये किमान कॅरेट दर्जा 9 आहे.

सोन्याचे दागिने

फोटो स्रोत, Getty Images

भारतात 'ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स'ने 9 कॅरेट सोन्याला मान्यता दिली असून त्याच्या विक्रीला परवानगी दिली आहे. सोन्यामध्ये मिसळलेल्या इतर धातूंच्या प्रमाणानुसार कॅरेटचे मोजमाप बदलते.

उदाहरणार्थ18 कॅरेट सोन्यामध्ये 75 टक्के शुद्ध सोनं आणि 25 टक्के तांबं आणि चांदीसारखे इतर धातू असतात. 24 कॅरेट सोनं हे पूर्णपणे शुद्ध असतं आणि त्यात इतर कोणताही धातू मिसळलेला नसतो.

दागिने बनवण्याचा 45 वर्षांचा अनुभव असलेले सुवर्णकार सुब्रमण्यम यांच्या मते मात्र, तांबे आणि चांदीसारखे इतर धातू मिसळल्याने मऊ असलेल्या सोन्याला मजबूती आणि टिकाऊपणा येतो.

कॅरेटच्या आधारे सोन्याची गुणवत्ता कशी ठरवली जाते?

सोन्याचे दागिने साधारणपणे 22 कॅरेट, 18 कॅरेट, 14 कॅरेट, 10 कॅरेट आणि 9 कॅरेट अशा मानकांमध्ये उपलब्ध असतात.

कोईमतूर गोल्ड प्रोड्युसर्स असोसिएशनचे अध्यक्ष मुथु वेंकटारामन सांगतात की, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.7 टक्के शुद्ध सोनं असतं.

भट्टीतलं सोनं

फोटो स्रोत, Getty Images

कॅरेटमधला फरक स्पष्ट करताना ते सांगतात की, "21 कॅरेट सोन्यामध्ये 88 टक्के शुद्ध सोनं असतं. त्याचा अर्थ असा असतो की, 100 ग्रॅममध्ये 88 ग्रॅम शुद्ध सोनं असतं. उदाहरणार्थ- जर 100 ग्रॅमच्या दागिन्यात 8 ग्रॅम तांबे आणि चांदी मिसळली असेल आणि त्यात 91.700 ग्रॅम शुद्ध सोनं असेल, तर तो 22 कॅरेट किंवा 916 दर्जाचा सोन्याचा दागिना ठरतो."

"त्याचप्रमाणे 14 कॅरेट सोन्यामध्ये 58.3 टक्के शुद्ध सोनं असतं आणि उर्वरित भाग तांबे आणि चांदीच्या मिश्रणाचा असतो. 18 कॅरेट सोन्यामध्ये 75 टक्के सोने आणि 25 टक्के तांबे-चांदीचे मिश्रण असते."

वेंकटारामन पुढे सांगतात की, जेव्हा शुद्ध सोन्याचे प्रमाण केवळ 37.5 टक्के असते आणि तांबे-चांदीचे प्रमाण 62.5 टक्के असतात, तेव्हा त्याला 9 कॅरेट सोने मानले जाते. त्यांच्या मते, कॅरेट दर्जा दागिने बनवताना मिसळल्या जाणाऱ्या शुद्ध सोन्याच्या आणि इतर धातूंच्या प्रमाणावर अवलंबून असतो.

सोन्याच्या दागिन्यांच्या गुणवत्तेत काय फरक असतो?

मुथु वेंकटारामन आणि सुब्रमण्यम दोघेही सांगतात की, 18 कॅरेटपेक्षा कमी दर्जाच्या सोन्यापासून बनवलेले दागिने कमी टिकाऊ असतात.

वेंकटारामन सांगतात, "पूर्वी हिऱ्यांनी जडवलेले दागिने बनवण्यासाठी 18 कॅरेट सोन्याचा वापर केला जात असे. नंतर 14 कॅरेट सोन्याचाही वापर सुरू झाला. यापेक्षा कमी कॅरेट वापरल्यास दागिन्यांमधील शुद्ध सोन्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटतं."

सोनं

फोटो स्रोत, Getty Images

सुब्रमण्यम म्हणतात, "जेव्हा 9 किंवा 14 कॅरेट सोन्याचे दागिने तयार केले जातात, तेव्हा शुद्ध सोन्याच्या मोठ्या भागाचं बाष्पीभवन होतं. दागिन्यांवर त्याचा एक थर तयार होतो, पण त्याची गुणवत्ता फारशी चांगली नसते." त्यामुळे दागिन्यांमध्ये पुरेसं सोनं नसेल, तर त्याची चांगली पुनर्विक्री किंमत (रिसेल व्हॅल्यू) येत नाही.

ते पुढे सांगतात, "जेव्हा धातूंना काही विशिष्ट मिश्र द्रावणांमध्ये बुडवले जाते, तेव्हा दागिन्यांचा रंग सोन्यासारखा पिवळा दिसू लागतो. या प्रक्रियेमुळे 14 कॅरेटचे दागिनेही 22 कॅरेट सोन्यासारखे चमकू लागतात. मात्र, जसजसे ते वापरले जातात, तसतसा घामामुळे 14 कॅरेट सोन्याचा खरा रंग बाहेर येतो. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची चमक दीर्घकाळ टिकते, पण कमी कॅरेटच्या दागिन्यांवरील सोन्याचा थर तितका काळ टिकत नाही."

पिवळे, गुलाबी (रोझ पिंक) आणि पांढरे सोने यामध्ये काय फरक आहे?

आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की, सोन्याचे दागिने फक्त पिवळ्या रंगातच असतात. मात्र, अलीकडच्या काळात सोन्याचे दागिने पिवळ्या, गुलाबी (रोझ पिंक) आणि पांढऱ्या रंगांतही उपलब्ध झाले आहेत.

पांढरे सोने हे शुद्ध सोन्यात पॅलेडियम किंवा चांदीसारखे पांढरे धातू मिसळून तयार केले जाते. ते अधिक कडक होण्यासाठी त्यावर रोडियमचा थर चढवला जातो. पांढरे सोने 22 कॅरेटमध्ये तयार केले जात नाही. 18 कॅरेट पांढऱ्या सोन्यामध्ये 75 टक्के शुद्ध सोने आणि 25 टक्के पॅलेडियम असते.

सोनं

फोटो स्रोत, Getty Images

हे प्रामुख्याने 14, 10 आणि 9 कॅरेटमध्ये तयार केले जाते. 14 कॅरेट पांढऱ्या सोन्यामध्ये 58.3 टक्के शुद्ध सोने, 32.3 टक्के चांदी आणि 9.5 टक्के पॅलेडियम असते. त्याचप्रमाणे, 10 कॅरेट आणि 9 कॅरेट पांढऱ्या सोन्यामध्ये अनुक्रमे 41.7 टक्के आणि 37.5 टक्के शुद्ध सोने असते.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलनुसार, गुलाबी (रोझ पिंक) रंगाचे दागिने तयार करण्यासाठी त्यात तांबे मिसळलं जातं. तांबे मिसळल्यामुळे सोन्याला फिकट गुलाबी रंग प्राप्त होतो.

22 कॅरेट रोझ गोल्डमध्ये 91.6 टक्के शुद्ध सोने आणि 8.4 टक्के तांबे असते, तर 18 कॅरेट रोझ गोल्डमध्ये 75 टक्के शुद्ध सोने, 22.2 टक्के तांबे आणि 9.2 टक्के चांदी असते.

14, 10 आणि 9 कॅरेटसारख्या कमी दर्जाच्या रोझ गोल्डमध्ये तांब्याचे प्रमाण अधिक असते. 14 कॅरेट रोज गोल्डमध्ये 32.5 टक्के तांबे असतं, तर 10 कॅरेट आणि 9 कॅरेट रोझ गोल्डमध्ये अनुक्रमे 38.3 टक्के आणि 42.5 टक्के तांबे असतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)