लैंगिक संसर्ग की गोगलगायीची अंडी? या गोगलगायी माणसाच्या शरीरात कशा घुसत आहेत? महत्त्वाची माहिती

शिस्टोसोमा नावाच्या जंतूचे थ्रीडी रेंडर केलेले फोटो निळ्या आणि काळ्या पार्श्वभूमीवर दाखवले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नवीन 'हायब्रिड' परजीवी ही एक मोठी समस्या ठरू शकते. कारण डॉक्टरांना अजून हे रुग्ण कसे हाताळायचे हे माहीत नाही.
    • Author, केट बोवी
    • Role, ग्लोबल हेल्थ, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

'स्नेल फीवर' हा परजीवी रोग आता फक्त आफ्रिकेतच नाही, तर जगभर पसरताना दिसत आहे. हे नवीन 'हायब्रिड' परजीवी मनुष्य आणि प्राण्यांना संसर्ग करू शकतात, आणि त्यावर नियंत्रण करणे अधिक कठीण बनवतात, असं संशोधनातून समोर आलं आहे.

हा परजीवी त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करतो आणि रक्तात लपतो. त्याची अंडी नंतर यकृत, फुफ्फुस आणि लिंगात (जननेंद्रिय) सापडतात. आणि तो अनेक वर्षे लक्षातही येत नाही.

शास्त्रज्ञ इशारा देतात की, स्नेल फीवर नावाचा परजीवी रोग आता बदलत आहे आणि त्यावर नियंत्रण करणे आणखी कठीण जाऊ शकते.

दरवर्षी 2.5 कोटी लोकांना हा आजार होतो. यातील बहुतांश लोक हे आफ्रिकेत राहतात, कारण तेथे हा परजीवी स्नेल नैसर्गिकरित्या आढळतो.

या परजीवीचे संक्रमण जगभर 78 देशांमध्ये आढळून आले आहे, ज्यात चीन, व्हेनेझुएला आणि इंडोनेशिया यांचा समावेश आहे.

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) म्हणते की, हे एक 'जागतिक चिंतेचं' कारण आहे. कारण संशोधनात समोर आलं आहे की, परजीवी बदलत आहेत आणि त्यामुळे ते नवीन भागात किंवा प्रदेशात पसरू शकतात.

हा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. डब्ल्यूएचओ 'वर्ल्ड निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीजेस डे' (उपेक्षित उष्णकटिबंधीय रोग दिन) साजरा करत आहे.

हा दिवस अशा आजारांकडे लक्ष वेधण्यासाठी आहे जे व्हायरस (विषाणू), बॅक्टेरिया (जीवाणू), परजीवी आणि बुरशीमुळे होतात आणि प्रामुख्याने गरीब प्रदेशात राहणाऱ्या एक अब्जाहून अधिक लोकांना प्रभावित करतात.

'स्नेल फीवर म्हणजे काय?'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जेव्हा माणूस किंवा प्राणी गोगलगायीतून बाहेर पडलेले सूक्ष्म जंतू असलेल्या पाण्यात जातो, तेव्हा स्नेल फीवर होतो. हे जंतू त्वचा विरघळवणारे द्रव्य सोडतात आणि त्वचेतून आत शिरून शरीरात जातात.

हे जंतू पुढे मोठ्या कृमी (वर्म्स) बनतात आणि रक्तवाहिन्यांमध्ये राहतात. मादी कृमी अंडी घालते. काही अंडी मल किंवा लघवीतून बाहेर पडतात, तर काही शरीराच्या आतच अडकतात.

या अंड्यांवर शरीराची प्रतिकार शक्ती म्हणजेच संरक्षण यंत्रणा प्रतिक्रिया देते आणि त्यामुळे आजूबाजूचे निरोगी ऊतक (कोशिका) खराब होते. यामुळे अवयवांचे नुकसान होऊ शकते.

काही अंडी पोटाच्या खालच्या भागातील अवयवांमध्ये अडकतात. याला 'युरोजेनिटल शिस्टोसोमायसिस' म्हणतात. या आजारामुळे पोटदुखी, कर्करोग होऊ शकतो आणि गंभीर परिस्थितीत मृत्यूही होऊ शकतो.

स्नेल फीवरवर परजीवीविरोधी (अँटी पॅरासिटिक) औषधांनी उपचार होऊ शकतात. डब्ल्यूएचओच्या मते धोका असलेल्या गटांनी, जसे लहान मुले, शेतकरी आणि मासेमारी करणारे कामगार. यांनी काही वर्षे ही औषधे घ्यावीत.

परंतु, शास्त्रज्ञ सांगतात की परजीवीचे नवे प्रकार सध्याच्या उपचारांमध्ये लक्षातही येत नाहीत. त्यामुळे काही रुग्णांवर योग्य उपचार होत नाहीत, असे मलावी लिव्हरपूल वेलकम क्लिनिकल रिसर्च प्रोग्रामच्या सहयोगी संचालक प्रो. जेनेलिसा मुसाया म्हणतात.

'ही तर फक्त सुरुवात आहे'

मग हे रोग किंवा आजार वारंवार का पसरत आहेत? संशोधनात समोर आले आहे की, माणसांमधील आणि प्राण्यांमधील परजीवी एकमेकांशी संकर (ब्रिडींग) करत आहेत. त्यामुळे परजीवींचे नवे 'हायब्रिड' प्रकार तयार होत आहेत.

हे हायब्रिड परजीवी माणूस आणि प्राणी दोघांनाही संसर्ग किंवा संक्रमित करू शकतात, त्यामुळे रोगाचा फैलाव रोखणे अधिक कठीण होते.

शास्त्रज्ञांना आधीच माहीत होतं की, माणसांमधील आणि प्राण्यांमधील परजीवी एकमेकांशी संकर करत आहेत. मात्र या हायब्रिड परजीवींची अंडी शरीराबाहेर यशस्वीपणे उबवतात का आणि टिकतात का, याची त्यांना खात्री नव्हती.

हे खरं आहे का, हे तपासण्यासाठी त्यांनी मलावीतील काही भागांमध्ये मनुष्य आणि प्राण्यांचे नमुने घेतले. तपासणीमध्ये आढळलं की, त्यांनी पाहिलेल्या परजीवींमधील सुमारे 7 टक्के परजीवी हे बदललेले हायब्रिड प्रकारचे होते. त्यांच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त होते.

याचा अर्थ असा की, हे बदललेले परजीवी यशस्वीपणे वाढत आहेत आणि पुढे जाऊन पसरतील.

"निसर्गात हा संसर्ग सतत पसरत राहिला, तर ही मोठी समस्या आहे," असे मुसाया यांनी बीबीसीला सांगितले.

त्यांच्या टीमने फक्त काही भागांतच तपासणी केली असल्याने, ही समस्या अजून खूप मोठी असू शकते. कारण चाचण्यांमध्ये हा संसर्ग नेहमी सापडतही नाही. त्यामुळे 'ही तर फक्त सुरुवात असू शकते,' असा इशारा त्यांनी दिला आहे.

भविष्यात हे नवीन परजीवी मूळ परजीवींवर मात करू शकतात, असा इशारा मुसाया देतात.

ही मोठी समस्या ठरू शकते, कारण डॉक्टरांना अजूनही हे समजलेले नाही की हायब्रिड परजीवी असलेल्या रुग्णांवर उपचार कसे करायचे, असं त्या सांगतात.

"आम्ही सरकारला सांगत आहोत, 'अहो, जागे व्हा... लवकर लक्ष द्या, ही समस्या मोठी होण्यापूर्वी आपण काही करू शकतो का?'

'चाचण्या हायब्रिड संसर्ग ओळखत नाहीत'

संशोधनात असंही समोर आलं आहे की, हायब्रिड परजीवी माणसांच्या गुप्तांगावर संसर्ग करत आहेत. हे ओळखणं कठीण आहे, कारण या परजीवींची अंडी मायक्रोस्कोपखाली (सूक्ष्मदर्शक) सामान्य परजीवींच्या अंड्यांसारखी दिसत नाहीत. आरोग्यसेवा कर्मचारीही याची लक्षणे लैंगिक संसर्ग म्हणून चुकीचे समजू शकतात.

यावर उपचार न केल्यास, युरोजेनिटल शिस्टोसोमियासिसमुळे लिंगावर जखमा, वंध्यत्व आणि एचआयव्हीचा धोका वाढू शकतो. महिलांसाठी याचे शारीरिक, सामाजिक आणि प्रजननाचे परिणाम अधिक गंभीर मानले जातात.

"जरा विचार करा, एखादी महिला गर्भधारणा करू शकत नाही... आपल्या स्थानिक संस्कृतीत मूल होणं खूप महत्त्वाचं मानलं जातं, त्यामुळे लोक तिला नावं ठेवू लागतात. हा आजार खूपच वाईट आणि दुःखद आहे," असे मुसाया म्हणतात.

'तणावाखाली प्रगती'

हायब्रिड परजीवी रोगाला नवीन प्रदेशात पसरायला मदत करू शकतात, असे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.

हवामानातील बदल, प्रवासी आणि स्थलांतर यामुळे स्नेल फीवर पसरू शकतो, आणि हायब्रिड परजीवींमुळे हा रोग नियंत्रित करणे अधिक कठीण होते. हायब्रिड संसर्ग दक्षिण युरोपच्या काही भागात आधीच नोंदवला गेला आहे.

"ही जागतिक चिंतेची बाब आहे," असे डॉ. अमाडू गार्बा डिजिरमे सांगतात. डॉ. अमाडू हे डब्ल्यूएचओच्या शिस्टोसोमियासिस नियंत्रण कार्यक्रमाचे नेतृत्व करतात.

हा रोग पूर्णपणे मिटवणे अवघड होऊ शकते, असं जागतिक आरोग्य संघटना म्हणते.

"काही देशांमध्ये माणसांमध्ये कोणताही संसर्ग नाही, पण परजीवी प्राण्यांमध्ये तो टिकून राहतो आणि त्यामुळे माणसांसाठी तो धोका असू शकतो," असे ते सांगतात.

डब्ल्यूएचओ नवीन धोका लक्षात घेऊन आपली रणनीती बदलत आहे. यावर्षी ते प्राण्यांमधील रोग नियंत्रित करण्यासाठी नवीन मार्गदर्शन देणार आहेत आणि हायब्रिड परजीवींबाबत देशांना आधीच जागतिक अलर्ट पाठवले आहेत.

मोठ्या प्रमाणावर परजीवीविरोधी औषधोपचार कार्यक्रमांमुळे 2006 ते 2024 दरम्यान स्नेल फीवरच्या प्रकरणांमध्ये 60 टक्क्यांची घट दिसून आली.

परंतु, यात सुधारणा होण्यासाठी निधीचं सातत्य लागतं. पण 2018 ते 2023 दरम्यान निगलेक्टेड ट्रॉपिकल डिसीजसाठीची (दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजार) मदत 41 टक्क्यांनी कमी झाली, असं डब्ल्यूएचओने म्हटलं आहे.

रोग पूर्णपणे रोखला जाऊ शकतो, याबाबत मुसाया अजूनही आशावादी आहेत.

"हा रोग आपण पूर्णपणे मिटवू शकतो, पण हे फक्त एका व्यक्तीचे काम नाही. 'समस्या समजली, आता लगेच उपाय करूया', असं आम्ही म्हणतो."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)