सुनेत्रा पवारांच्या निवडीबद्दल 'मला माहिती नाही', या शरद पवारांच्या विधानावर सुनील तटकरे काय म्हणाले?

सुनेत्रा पवारांच्या निवडीबद्दल 'मला माहिती नाही', या शरद पवारांच्या विधानावर सुनील तटकरे काय म्हणाले?

फोटो स्रोत, Getty Images

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठी पोकळी तयार झाली आहे.

त्यांच्या जाण्यानंतर आता उपमुख्यमंत्रिपदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडण्यात यावं, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांची आज (31 जानेवारी) दुपारी दोन वाजता बैठक होणार आहे.

या बैठकीनंतर लगेचच शपथविधी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी नुकत्याच पोहोचल्या आहेत.

यादरम्यानच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आहेत.

या पत्रकार परिषदेनंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी-एससीपी नेत्यांची बैठक सुरू आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

शरद पवार काय म्हणाले?

एकीकडे सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात येईल, अशा स्वरूपाच्या सगळ्या हालचाली मुंबईमध्ये सुरू झालेल्या असताना दुसरीकडे बारामतीमध्ये शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आहेत.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, "सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याबद्दलची कोणतीही चर्चा आमच्याशी झालेली नाही. तसा प्रस्तावही नाही आणि विचारणाही झालेली नाही. कदाचित तो त्यांच्या पक्षाचा निर्णय असू शकतो. पण मला याबद्दल काहीही माहिती नाही."

आता सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत सुरूये, त्याबद्दल मला काहीच माहिती नाही. प्रस्ताव नाही, विचारणा, चर्चा नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.

फोटो स्रोत, Sunetra Ajit Pawar/Facebook

फोटो कॅप्शन, आता सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत सुरूये, त्याबद्दल मला काहीच माहिती नाही. प्रस्ताव नाही, विचारणा, चर्चा नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर ते म्हणाले की, "अशा स्वरूपाची सकारात्मक चर्चा गेल्या चार महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादींमध्ये सुरू होती. अजित पवार आणि जयंत पाटील याबद्दल चर्चा करत होते. गेल्या 12 तारखेला हा निर्णय जाहीर करण्यात येणार होता. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, ही दादांची इच्छा होती. ती पूर्ण व्हावी, हीच आमची इच्छा आहे," असंही ते म्हणाले.

मात्र, आता जे उपमुख्यमंत्रीपदाबाबत सुरूये, त्याबद्दल मला काहीच माहिती नाही. प्रस्ताव नाही, विचारणा, चर्चा नाही, हेदेखील ते म्हणाले.

अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे निर्णय आता त्यांच्या अनुपस्थितीत भाजपकडून घेतले जात आहेत का, या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, मला याबद्दल काहीही माहिती नाही.

पुढे, विलिनीकरणाच्या चर्चेत आता खंड पडलेला दिसतोय, असंही ते म्हणाले आहेत. आमची चर्चा झाली होती, त्यात भाजपसोबत जायचा संबंध नव्हता, असंही एक महत्त्वाचं विधान त्यांनी केलं आहे.

याशिवाय, सुप्रिया सुळे, रोहीत पवार यांना मंत्रिपदं देण्यात येणार, या चर्चांना अर्थ नाही. शिवाय, सुनेत्रा पवार यांच्या निवडीचा निर्णय त्यांच्या पक्षाकडून घेण्यात येत असेल, असंही ते म्हणाले आहेत.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की, "सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत आमच्याशी कसलीही चर्चा करण्यात आलेली नाही. सुनेत्रा पवारांना नेता निवडण्याक घाई का करण्यात येतेय, याबाबत मला माहिती नाही. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबतच्या चर्चा नक्कीच झाल्या होत्या. म्हणून तर आम्ही आता घड्याळावर लढतोय. 12 फेब्रुवारीला विलीनीकरणाची घोषणा होणार होती," असं त्यांनी म्हटलंय.

शरद पवारांच्या वक्तव्यावर सुनील तटकरे काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी केलेल्या विधानांवर सध्या काहीही बोलायचं नाहीये, अशी प्रतिक्रिया दिलेली आहे.

ते म्हणाले की, "आज विधिमंडळ पक्षाची बैठक आहे. आम्ही सर्वजण बसू. मग त्यानंतर आम्हाला बोलता येईल."

शरद पवार यांनी केलेल्या विधानांवर प्रश्न विचारल्यावर ते पुन्हा एकदा म्हणाले की, "जे आमच्या बैठकीत घडेल आणि निर्णय होईल तो आम्ही मुख्यमंत्र्यांना कळवू. तो त्यांच्या अखत्यारितला विषय आहे."

शपथविधी सोहळ्याला शरद पवारांना बोलवणार का, या प्रश्नावर सुनील तटकरे यांनी मौन बाळगलं.

सुनेत्रा पवार यांच्या नावाबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले?

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याबद्दलच्या चर्चांबद्दल विचारलं असता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल."

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Shahid Shaikh/BBC

फोटो कॅप्शन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढे ते म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल, त्याच्या पाठीशी आम्ही सरकार म्हणून आणि भाजप म्हणून ठामपणे उभे राहू. त्यामुळे मी सध्या एवढेच सांगू शकतो की, अजितदादांचे कुटुंब असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, त्यांच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत. त्यांच जो काही निर्णय होईल, त्यांना योग्य ते समर्थन आमच्याकडून दिले जाईल."

सुनेत्रा पवार यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादीचे नेते काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "उद्या विधिमंडळ नेते निवडीच्या बैठकीनंतर पत्र मुख्यमंत्र्यांना देणार. त्यानंतर शपथविधीची वेळ ठरणार आहे."

राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी यासंदर्भात म्हटलंय की, महाराष्ट्राचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ म्हणाले, "सुनेत्राताईंना हे पद देण्याची मागणी माध्यमांमध्ये आणि अनेक लोकांकडून होत आहे. त्या चूक आहेत असं मला वाटत नाही पण शेवटी उद्याच्या (31 जानेवारी) बैठकीतच हा निर्णय होईल."

या बैठकीनंतर लगेचच शपथविधी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, या बैठकीनंतर लगेचच शपथविधी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

"आम्ही आज (30 जानेवारी) मुख्यमंत्री यांना भेटायला गेलो होतो, तिथे टेन्टेटीव्ह असे ठरले होते की सीएलपीची मिटिंग बोलवायची आणि उद्या करायचे. पण दुखवटा असतो तर त्यामुळे अजून असे काही पत्र काढण्यात आलेले नाही."

पुढे ते म्हणाले की, "आज आमच्या समोर सीएलपी लिडर यांची नेमणुक करणे म्हणजेच उपमुख्यमंत्री पदाची नेमणूक करणे हे महत्वाचे आहे. आधी प्राधान्य काय आहे की सीएलपी नेमणे . त्यामुळे त्यादृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहे. पुढल्या एक दोन तासात निर्णय होईल."

सुनेत्रा पवार

फोटो स्रोत, Sunetra Ajit Pawar/Facebook

शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांनी या विषयावर बीबीसीशी बोलताना म्हटलंय की, "पवार कुटुंबियांनी एकत्र बसून शरद पवार यांच्या कार्यानुभवाचा उपयोग करून योग्य तो निर्णय घ्यावा. पदं कोणाला द्यायची. सुनेत्रा पवार वहिनींना काही जबाबदारी द्यायची का? पक्षाध्यक्षाच्या बाबतीत काय करायला पाहीजे असे सगळेच निर्णय पवार कुटुंबियांनी घ्यायला पाहीजेत. मर्जरबाबत बैठका सुरू होत्या यात तथ्य आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावेत ही अजित पवार यांची अंतिम इच्छा होती."

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील खासदार प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की, "आम्हाला लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल. सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा केलेली नाही. पण पक्षाचा निर्णय, आमदारांचा निर्णय आणि आमची स्वतःचीही भावना आहे की योग्य निर्णय आम्ही केला पाहीजे आणि त्या दिशेने आम्ही विचार करू. अजून तसा विषय आलेला नाही. अजून राजकीय दुखवटा आहे. आज तिसरा दिवस आहे. पवार परिवारातही त्यांचे कार्यक्रम सुरू आहेत.

सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, "सुनेत्रा वहिनींशीही बोलावं लागेल, पार्थ पवार जय पवार यांच्याशी बोलावं लागेल. आजचा दिवस जाऊदे. आम्ही रात्री किंवा उद्या त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू. आमचीही भावना आहे हे पुन्हा पुन्हा सांगतो. योग्य निर्णय व्हावा."

शॉर्ट व्हीडिओ पाहा
व्हीडिओ कॅप्शन, अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी ठाकरे बंधू बारामतीत दाखल

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला म्हणजेच अजित पवार यांना निरोप दिल्यानंतर मैदानातून बाहेर पडताना पक्षाचा उत्तराधिकारी कोण असेल, याबद्दल महत्त्वाचं विधान केलं होतं.

एकप्रकारे त्यांनी या चर्चेला अधिकृतरीत्या तोंड फोडलेलं होतं.

"अजित पवारांचा उत्तराधिकारी सुनेत्रा वहिनीच असाव्यात. राष्ट्रवादीची धुरा आता सुनेत्रा अजित पवार या सांभाळतील ही सर्वांचीच भावना आहे," असं नरहरी झिरवाळ म्हणाले आहेत.

आता तुतारी, घड्याळ वेगळं नाही, दोन्ही एकच, असल्याचंही झिरवाळ म्हणालेत. आधीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेल्याच आहेत आता इथून पुढे एकत्रच असणार यात शंका नाही, असंही झिरवाळ यांनी म्हटलेलं आहे.

लोकमत (नागपूर आवृत्ती) चे संपादक श्रीमंत माने यांच्याशीही बीबीसीने चर्चा केली.

ते म्हणतात, " 'पवार' कुटुंबाबाहेर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस चालवणं कठीण आहे. अजित पवार हे पक्षाचा मुख्य चेहरा होते आणि पवार कुटुंबाशी संबंधित असलेला सदस्यच हा पक्ष चालवू शकतो," असं ते सांगतात.

(ही बातमी सातत्याने अपडेट होत आहे.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)