You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ज्ञानरंजन : अकोल्यात जन्मलेला आणि हिंदी साहित्यसृष्टीत नावाजलेला साहित्यकार
- Author, आलोक पुतुल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
ज्ञानरंजन यांचं साहित्य वाचताना 'घंटा' या त्यांच्या कथेतील पेट्रोलाचं ते निर्जन, आतल्या बाजूचं ठिकाण समोर येतं. जिथे नागरिकत्व कमकुवत होतं, भाषा उग्र होती आणि सत्य बोलण्याची किंमत ठरलेली होती.
घंटा या कथेत 'पेट्रोला' हे एक असं ठिकाण होतं, ज्याच्याशी नागरिकांना काहीही देणंघेणं नव्हतं. ते त्याचा विचार करत नव्हते.
'घंटा' या कथेचा नायक तिथे बसून फक्त मद्यपान करत नाही, तर त्याच्या काळातील सत्ता, संस्कृती आणि बौद्धिक युक्तिवादांमध्ये भरडलेला असतानाही, तो अचानक इतक्या मोठ्यानं हसतो की काचा फुटाव्यात.
हे हास्य दिलाशाचं नाही, तर आतमध्ये रुजलेल्या आक्रोश, पश्चाताप आणि असहाय प्रतिकाराचं हास्य आहे. ज्ञानरंजन देखील असेच कथाकार होते. त्यांचं लेखन सोयीच्या गोष्टींमधून नाही, तर समाजाच्या तळागाळातील, गरीब आणि वंचितांबद्दल केलेलं होतं.
बुधवारी (7 जानेवारी) वयाच्या 90 व्या वर्षी जबलपूरमध्ये ज्ञानरंजन यांचं निधन झालं.
त्यांच्या निधनानंतर असं वाटतं की जणूकाही त्या पेट्रोलामध्ये बसलेला आणखी एक माणूस निघून गेला आहे आणि समाजाच्या रस्त्यावर वेळेचा आणखी एक तुकडा किंवा भाग पडला आहे. ज्यावर गर्दी थोडंसं हसून पुढे निघून गेली आहे. मात्र ज्याच्या पडण्याचा आवाज बराच वेळ आतमध्ये घुमत राहतो.
त्यांचे मित्र आणि हिंदीतील प्रसिद्ध कवी आलोक धन्वा भावनिक स्वरात म्हणतात, "त्यांचं नसणं आता त्यांच्या असण्यापेक्षा कितीतरी पट अधिक जाणवतं आहे. जवळपास 60 वर्षांपासून आमचा एकमेकांशी परिचय होता."
"मी 70 च्या दशकात, जबलपूरच्या अग्रवाल कॉलनीतील त्यांच्या घरात महिनाभर त्यांच्यासोबत राहिलो होतो. आज एक-एक करत त्यांच्या सर्व कथा आठवत आहेत. त्यांनी एकूण 25 कथा लिहिल्या आणि प्रत्येक कथा अमर झाली."
'पहल'च्या संपादनासाठी सोडलं कथालेखन
ज्ञानरंजन यांचा जन्म महाराष्ट्रातील अकोल्यात, 21 नोव्हेंबर 1936 ला झाला होता. अलाहाबाद विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर ते जबलपूरच्या जी एस कॉलेजमध्ये हिंदीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते.
तिथून ते 1996 मध्ये निवृत्त झाले. प्रगतिशील लेखक संघातदेखील त्यांची मध्यवर्ती भूमिका होती. तसंच जबलपूरच्या नाट्यविश्वातदेखील त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
त्यांच्या साहित्याचा अनेक राष्ट्रीय सन्मानांनी गौरव करण्यात आला. यामध्ये सोव्हिएत लँड नेहरू अवॉर्ड, साहित्य भूषण सन्मान, शिखर सन्मान, मैथिलीशरण गुप्त सन्मान आणि ज्ञानपीठचा ज्ञानगरिमा मानद अलंकरण यांचा समावेश आहे.
ज्ञानरंजन अशा मोजक्या कथाकारांपैकी एक होते ज्यांनी खूप कमी लेखन केलं. मात्र त्यांच्या लेखनाचा दीर्घकाळ आणि दूरगामी प्रभाव पडला.
फक्त 25 कथांद्वारे त्यांनी हिंदी कथा-साहित्यात जे स्थान आणि आदर मिळवला, ते दुर्मिळ आहे.
मात्र याहून असामान्य गोष्ट होती, ती म्हणजे त्यांनी घेतलेला तो निर्णय. त्यांनी कथा-लेखन जवळपास सोडलं आणि पूर्णपणे 'पहल' मासिकाच्या संपादनापुरतं स्वत:ला मर्यादित करून घेतलं.
पारंपारिक चाकोरी मोडणाऱ्या कथा
ज्ञानरंजन यांच्या कथा साठच्या दशकातील रोमँटिक मध्यमवर्गीय आत्मसंतुष्टपणाविरुद्धचा एक निर्णायक हस्तक्षेप होता. या आत्मसंतुष्टपणामध्ये जीवनाच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या भावनांनाच वास्तव मानलं होतं.
त्यांच्या कथा घटनांच्या माध्यमातून नाही, तर प्रक्रियांमधून आकार घेतात. ते जीवनाकडे घटत जाणारी किंवा स्थिर बाब म्हणून पाहत नव्हते. तर चढउतारांची प्रक्रिया म्हणून पाहत होते. त्यांच्या कथा वाचताना हे स्पष्ट दिसतं की त्यांना दृश्य किंवा प्रसंगांपेक्षा त्यामागच्या मानसिक, सामाजिक आणि नैतिक शक्तींमध्ये अधिक रस होता.
साहित्यिक, संपादक, शिल्पकार शंपा शाह म्हणतात की पारंपारिक आणि आधुनिक जीवनशैलींचं रणांगण बनलेले आपले शहरी मध्यमवर्गीय कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक हे ज्ञानरंजन यांच्या कथांची पार्श्वभूमी आहेत.
या वातावरणातील तुटकेपणा, हतबदलता, स्वाभिमान, विश्वासघात, घाणेरडेपणा, खोटेपणा, खरेपणा या सर्व गोष्टी त्यांच्या कथांमध्ये अत्यंत गुंतागुंतीनं आणि सखोलपणे सामावलेल्या आहेत.
त्यांना वाटतं की ज्ञानरंजन यांनी हिंदीमध्ये जितक्या कमी शब्दात, अधिक प्रभावीपणे कथा लिहिल्या तसंच त्यांनी कथाकथनाच्या कलेवर जे प्रभुत्व मिळवलं होतं, तसं इतर कोणत्याही कथाकाराला जमलेलं नाही.
त्यांची भाषाशैली अतिशय नेमकेपणाची, रोखठोक आणि एखाद्या घट्ट विणलेल्या दोरीसारखी आहे. त्याची गुंफण आणि मांडणी इतकी अचूक आहे की त्यातील एकही घटक इकडचा तिकडे केला जाऊ शकत नाही.
शंपा शाह म्हणतात, "ज्ञानरंजन यांच्या कथांमध्ये भाषा-मांडणी-कथानक एकमेकांमध्ये इतके घट्ट गुंफलेले आहेत की त्यांना वेगळं करता येत नाही. इतकंच काय यातल्या एखाद्या घटकावर स्वतंत्रपणे चर्चादेखील करता येत नाही."
"त्यांनी लिहिलेली एखादी कथा, उदाहरणार्थ, 'बहिर्गमन', 'घंटा' किंवा 'फैन्स के इधर-उधर' किंवा 'पिता', दुसऱ्याला ऐकवण्याचा प्रयत्न करून, तुम्ही याची पडताळणी करू शकता. किंवा त्या कथेतून एखादं वाक्य बाजूला काढून ते वेगळं ऐकवून पाहा."
"कथेच्या मांडणीतून बाहेर काढताच ते वाक्य तितकं प्रभावी राहत नाही. तर कथेत मात्र अनेकदा ते वाक्य असं चपखल बसलेलं असतं की त्याला थोडंदेखील हलवता येत नाही. काढून टाकणं तर दूरच राहिलं."
ज्ञानरंजन यांच्या कथांमधील पात्र खूप विचारशील आहेत. ती फारशी व्यक्त होणारी नाहीत, मात्र तरीदेखील त्यांच्यामध्ये सतत एक अस्वस्थता निर्माण होत असते. त्यांच्या कथेतील नातेसंबंध भावनिक सजावटीचे नाहीत तर तणाव, अपयश, अपराधीपणा आणि नैतिक संघर्षातून विणलेल्या गुंतागुंतीच्या रचना आहेत.
कवी आलोक धन्वा म्हणतात, "शहराबद्दल आकर्षण असलेले ते हिंदीतील पहिले कथाकार होते. मात्र त्याचबरोबर त्यांच्या प्रत्येक कथेत निसर्ग हादेखील एक आवश्यक घटक आहे. ते स्वत:देखील म्हणायचे की निसर्गाव्यतिरिक्त, ते त्यांच्या कथांमध्ये कधीही शहराबाहेर केले नाहीत."
"मात्र या निसर्गाचा वापर त्यांनी निव्वळ एक पडदा किंवा पार्श्वभूमी म्हणून केला नाही. ते ज्या शहरी आणि निमशहरी मध्यमवर्गाचं चित्रण करतात, तेच संपूर्ण सामाजिक व्यवस्थेचं केंद्र आहे, जिथे संधीसाधूपणादेखील आहे, हतबलता आहे आणि प्रतिकाराची अपूर्ण इच्छादेखील आहे."
आलोक धन्वा यांच्या मते, ज्ञानरंजन त्यांच्या बहुचर्चित 'पिता' या कथेमध्ये देखील कोणत्याही नायकत्व किंवा नायकाची व्यक्तिरेखा निर्माण करत नाहीत. या कथेत वडिलांच्या शक्तीचं गुणगान, वाहवा केली जात नाही. उलट त्या शक्ती, सत्तेमध्ये लपलेलं एकटेपण, कठोरपणा आणि करुणा एकत्रितपणे दिसते. वाचक बराच काळ विचार करत राहतो की कोणाची बाजू घ्यावी?
याचप्रमाणे, 'बहिर्गमन' या कथेत बौद्धिक अभिजातपणातील अमानवी क्रौर्याला उघडं होतं, जे त्याच्या वैचारिक भव्यतेखाली संवेदना, सहानुभूतीला चिरडून टाकतं. 'घंटा' ही जीवनाच्या खोलीत, गाळात अडकलेल्या पात्रांची कथा आहे. ही पात्र कोसळतात, पडतात, त्यातून बाहेर पडण्याचाही प्रयत्न करतात आणि त्याच अधोगतीचा पाठलागदेखील करत राहतात.
ज्ञानरंजन यांनीच, 'मनहूस बंगला' आणि 'दिवास्वप्नी' या त्यांच्या सुरुवातीच्या कथांना काल्पनिक, निराधार आणि खोलीच्या मर्यादेतच उडवलेले पतंग म्हणण्याचं धाडस दाखवलं. तेदेखील, 'दिवास्वप्नी' ही कथा तेव्हाचे सुप्रसिद्ध संपादक भैरव प्रसाद गुप्त यांनी प्रकाशित केलेली असताना. या कथांनंतर ज्ञानरंजन यांचा सूर बदलला.
ज्ञानरंजन स्वत:च्या कथांबद्दल म्हणाले होते, " 'शेष होते हुए' या कथेचं खूप कौतुक झालं. ती खूप लोकप्रिय झाली. तिच्यामुळे मला प्रसिद्धी मिळाली. ही प्रेमाच्या निर्मितीबद्दलची कथा होती. त्यानंतर मी वेगळा मार्ग निवडला. मी प्रेमाच्या अमरत्वावर नाही, तर प्रेमाच्या विनाशाबद्दलच कथा लिहिल्या आहेत."
'पहल' मासिकाचं संपादन
कथांसाठी प्रसिद्ध असलेल्या, मार्क्सवादी विचारसरणी आणि संघटनांशी जोडलेल्या ज्ञानरंजन यांनी जेव्हा 'पहल' या मासिकाचं प्रकाशन सुरू केलं, तेव्हा त्याकडे एक महत्त्वाचा सार्वजनिक हस्तक्षेप म्हणून पाहिलं गेलं.
हेदेखील लक्षात घेतलं पाहिजे की 'पहल' हे एखाद्या विशिष्ट प्रवृत्ती, गट किंवा विचारसरणीच्या संकुचित अस्मितेपुरतं मर्यादित नव्हतं. उलट साहित्यिक विवेक, बौद्धिक प्रामाणिकपणा आणि प्रश्न विचारणारं मासिक म्हणून 'पहल'नं स्वत:ची ओळख निर्माण केली.
त्यांच्या संपादनाखाली कथा, साहित्य त्याच्या नैसर्गिक स्वर, वैचारिक जोखीम आणि कलात्मक प्रतिष्ठेसह पुढे येत राहिलं. असे अनेक लेखक आणि कथाकार आहेत, ज्यांची सर्जनशील ओळख 'पहल'च्या माध्यमातून तयार झाली किंवा त्यात भर पडली.
या मासिकाची प्रतिष्ठा फक्त त्यात प्रकाशित झालेल्या साहित्यामुळेच तयार झाली नाही, तर त्याच्या संपादकाची वैचारिक सक्रियता, लेखकांशी जिवंत संवाद, वादविवाद आणि वैचारिक संघर्ष करण्याची त्याची तयारी, यातूनही निर्माण झाली.
अर्थात, जवळपास 47 वर्षे प्रकाशित होत राहिल्यानंतर, 2021 मध्ये 'पहल' बंद झालं. 'पहल' बंद झाल्यामुळे कुठेतरी ज्ञानरंजन काहीसे एकाकी झाले.
'पहल'च्या शेवटच्या अंकातील संपादकीयमध्ये ज्ञानरंजन यांनी लिहिलं होतं, "प्रत्येक गोष्टीचं आयुष्य असतं. आम्ही आमच्या श्वासांपेक्षा अधिक काळ जगलो आहोत. आम्ही कधीही 'पहल'ला एक संस्था किंवा सत्तेची व्यवस्था होऊ दिलं नाही. गोष्टी येत राहिल्या, आम्ही त्याला तोंड देत राहिलो. आम्ही भ्रष्ट होण्यापासून स्वत:चं रक्षण करत राहिलो..."
"आम्हाला आमच्याच रेषेत वारंवार बदलता काळ आणि त्यात येणाऱ्या-जाणाऱ्या वादळांना तोंड द्यायचं होतं आणि खऱ्या प्रतिभांना ओळखायचं होतं. त्यामुळे आम्हाला तटस्थपणा आणि कठोरपणाच्या शैलीचं पालन करावं लागलं."
"आम्ही जे करू शकलो, ते प्रामाणिक होतं...प्रगती विरोधी, सांप्रदायिक आणि हुकुमशाही शक्ती आणि घराण्यांशी आमचा संघर्ष सुरूच राहिला. आम्ही संघर्ष करत जगत राहिलो. 'पहल'शी अनेकजण जोडले गेले. मात्र त्यातले काहीजण मध्येच निघून गेले."
"काहीजण आयुष्यभर त्याच्यासोबत राहिले. त्यासाठी जी कटिबद्धता आवश्यक होती, ती आमच्या रक्तात आणि नसांमध्ये होती."
कथाकार प्रभू नारायण वर्मा म्हणतात की "ज्ञानरंजन यांची वेगळी अशी व्यंगात्मक भाषाशैली आणि अद्वितीय वर्णनं यामुळे त्यांच्या कथा वाचकांना आश्चर्यचकित करतात. अवाक करतात आणि विचारमग्न करतात. हिंदीतील कथांमधील वास्तवाची जाणीव त्यांच्या कथांमधूनच झेप घेत पुढे सरकली."
"अनेक कथाकारांवरील त्यांचा हा प्रभाव आजदेखील दिसून येतो. मात्र ज्ञानरंजन यांचा दुसरा महत्वाचा पैलू म्हणजे, 'पहल' मासिकाचं दीर्घकाळ आणि उच्च दर्जाचं केलेलं संपादन. 'पहल' हे मासिक प्रदीर्घ काळ, सर्वोत्तम साहित्य आणि विचारांचं हिंदी मासिक होतं."
प्रभू नारायण वर्मा म्हणतात, "पहलमध्ये जे प्रकाशित झालं आहे, ते उच्च दर्जाचं लिखाण असेल, असं जवळपास मानलं जात होतं. पहलचे अनेक विशेषांक खूप लोकप्रिय झाले. विशेषकरून दोन कविता विशेषांक."
"याव्यतिरिक्त वेळोवेळी पहलनं एखादी व्यक्ती किंवा एखाद्या विषयावर केंद्रित असलेल्या अनेक पुस्तिकादेखील प्रकाशित केल्या. त्यांचं खूप कौतुक झालं. ज्ञानरंजन लेखकांच्या संघटनांशी देखील दीर्घकाळ जोडलेले होते. वैयक्तिक पातळीवर ते अत्यंत उत्साही, मनमिळाऊ आणि मित्रत्व जपणारे व्यक्ती होते."
मतभेदाचा आदर करणारा, लोकशाही मूल्यं जपणारा साहित्यिक
ज्ञानरंजन यांच्याबद्दल ही गोष्ट प्रसिद्ध होती की ते मनापासून मैत्री निभवतात आणि मतभेददेखील तितक्याच तीव्रतेनं निभवतात. त्यांनी साहित्य विश्वाला कधीच निवांत होऊ दिलं नाही. त्यांची उपस्थिती नेहमीच गैरसोयीची होती. मात्र हीच गैरसोय हिंदी साहित्याला जिवंत ठेवत राहिली.
हिंदीतील प्रसिद्ध कथाकार हृषीकेश सुलभ म्हणतात की ज्ञानरंजन त्यांच्या कथा, त्यांचा संपादकीय प्रामाणिकपणा आणि त्यांच्या मानवी संबंधांमध्ये खूप मोठे होते.
ते म्हणतात, "ज्ञानरंजनजींनी नामवर सिंह किंवा राजेंद्र यादव यांच्यावर वैचारिक पातळीवर टीका केली तरीदेखील वैयक्तिक पातळीवर त्यांच्याबद्दल कोणतीही शत्रुत्वाची भावना नव्हती. ते फक्त मोठ्या, ख्यातनाम लेखकांचे संपादक नव्हते. देशातील लहान शहरांमधील असंख्य वाचक आणि फारसे माहित नसलेले लेखक पत्रांद्वारे त्यांच्याशी जोडले गेले होते."
ते पुढे म्हणतात, "ते जवळपास प्रत्येक पत्राला उत्तर द्यायचे. किमान एक पोस्टकार्ड तरी नक्कीच पाठवलं जायचं. कोणत्याही रुबाब किंवा मोठेपणाशिवाय, एखाद्या अज्ञात लेखकाशी सतत संवाद साधत राहणं, त्याच्या कल्याणाची काळजी करणं, हा गुण हिंदीतील फार थोड्या महान लेखकांमध्ये आढळतो."
श्रीकांत वर्मा पीठ (श्रीकांत वर्मा चेअर) चे माजी अध्यक्ष आणि कवी-कथाकार रामकुमार तिवारी, ज्ञानरंजन यांच्याबद्दल म्हणतात की हिंदी साहित्यात त्यांची उपस्थिती म्हणजे एक शक्तिशाली सर्जनशील ऊर्जा होती. हे एक असं गुरुत्वाकर्षण होतं, जे सर्वांना आकर्षित करत असे. अगदी त्यांच्याशी वैचारिक मतभेद असलेल्यांनाही ते आकर्षित करत असत.
रामकुमार तिवारी म्हणतात की 80 च्या दशकात जेव्हा ते छत्तीसगडमधील लैलूंगा या छोट्या शहरात नोकरी करत होते, तेव्हा त्यांना ज्ञानरंजनजींनी पाठवलेलं एक पोस्टकार्ड मिळालं. त्यात लिहिलं होतं, "प्रिय रामकुमार, पहलसाठी कविता पाठवा. मला आनंद होईल."
रामकुमार तिवारी म्हणतात, "मी कविता पाठवल्या आणि त्या प्रकाशित झाल्या. नंतर त्यांनी अनेक कथा प्रकाशित केल्या. माझे दोन कथासंग्रहांच्या शीर्षक कथा - कुतुब एक्सप्रेस आणि जगह की जगह, सर्वात आधी 'पहल'मध्येच प्रकाशित झाल्या होत्या."
तिवारी पुढे म्हणतात, "ज्ञानरंजन यांची लोकशाहीबद्दलची भावना खोलवर रुजलेली होती. मी मार्क्सवादी नाही हे माहीत असूनदेखील त्यांनी मला भरपूर प्रेम दिलं."
"एकदा माझ्या मूर्ख युक्तिवादानं चिडून ते म्हणाले - हे पहा, राजकुमार, मी चळवळीचा माणूस आहे...मी म्हणालो- दादा, मी चळवळीतील माणसाशी बोलत नाहिये आणि पहलच्या संपादकांशीही बोलत नाहिये. मी माझ्या ज्येष्ठ कथाकाराशी बोलतो आहे."
"काही दिवसांनी त्यांचा पुन्हा फोन आला - राजकुमार, पहलसाठी काहीतरी पाठवा."
अर्थात, हिंदीतील ज्येष्ठ कवी नरेश सक्सेना, ज्ञानरंजन यांना एक कथाकार आणि संपादक याच्यासह एक अत्यंत संवेदनशील आणि प्रामाणिक माणूस म्हणून देखील लक्षात ठेवतात.
ते म्हणतात की कसं वर्षानुवर्षे कविता लिहिल्यानंतर वयाच्या 61 व्या वर्षी, ज्ञानरंजन यांनीच 'समुद्र पर हो रही है बारिश' हा त्यांचा पहिला संग्रह तयार करून, त्याच्या प्रकाशनाची व्यवस्था केली.
86 वर्षांचे नरेश सक्सेना म्हणतात, "एक कथाकार आणि एक संपादक म्हणून त्यांना जितकं प्रेम आणि आदर मिळाला, तितका हिंदी साहित्यविश्वात कोणालाही मिळाला नाही. पहल मासिक तर एका संस्थेसारखंच होतं."
"कधी मित्रांच्या मदतीनं तर कधी स्वत:च्या पैशांनी ते मासिक प्रकाशित करत राहिले. सरकारची मदत न घेता, पहल सन्मानाचं आयोजन करत राहिले. असं दुसरं कोणतंही उदाहरण तुम्हाला सापडणार नाही."
"सर्वसामान्यपणे संपादक लेखकांशी जोडलेले असतात. मात्र ज्ञानरंजन जी ज्याप्रकारे त्यांच्या वाचकांशी जोडलेले होते, ती बाब आश्चर्यचकित करते."
सक्सेना म्हणतात की एका बाजूला ज्ञानरंजन अत्यंत संवेदनशील आणि प्रेमळ व्यक्ती होते. तर दुसऱ्या बाजूला त्यांनी कधीही वैचारिक तडजोड केली नाही.
ते म्हणतात, "मध्यप्रदेश सरकारनं ज्ञानजींना मुक्तिबोध फेलोशिप देण्यासाठी पत्र लिहिलं. मात्र सरकारशी त्यांचे वैचारिक मतभेद होते. त्यांनी या फेलोशिपला स्पष्ट नकार दिला. ज्ञानरंजन यांच्यासारखे तर फक्त ज्ञानरंजनच असू शकत होते."
अनेक वर्षांपूर्वी ज्ञानरंजन यांनी लिहिलं होतं, "आपल्याकडे महान लेखकांना लक्षात ठेवण्याचे, त्यांना समजून घेण्याचे आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे काही खूपच पारंपारिक आणि मर्यादित मार्ग आहेत."
"परिसंवाद, व्याख्यान आणि पुस्तक किंवा एखादा ट्रस्ट, त्यांच्या नावानं एखादा पुरस्कार किंवा एक पुतळा. या मार्गांनी आपण आपल्या अद्वितीय लेखकांची, साहित्यिकांची आठवण ठेवतो."
"महान आणि लोकप्रिय लेखकांचं तर खूप कौतुक होतं. परंतु पारंपारिक आठवणींपलीकडे त्यांच्यातील महानतेपर्यंत पोहोचणं अनेकदा कठीण असतं."
ज्ञानरंजन यांच्या बाबतीतदेखील असंच आहे.
ज्ञानरंजन यांच्या 'पिता' या कथेतील मुख्य पात्र एका अशा नैतिक हट्टीपणाचा प्रतिनिधी आहे, जो सुविधा, मन वळवणं आणि तडजोड या तिन्ही गोष्टी नाकारतो. रात्री बाहेर एकटं झोपणं ही त्याच्यासाठी दु:खाची निवड नाही, तर स्वाभिमानाची बाब आहे. हे मौन म्हणजे निष्क्रिय शांतता नाही. उलट एक नैतिक विधान आहे.
ज्ञानरंजन त्यांच्या 90 वर्षांच्या प्रवासात, जीवन आणि साहित्यात 'होयबांची गर्दी' आणि सोयीच्या भूमिकेपासून दूर राहिले.
मात्र ते सखोल विचार, लेखन आणि वाचनाच्या जगात शेवटपर्यंत सक्रिय राहिले.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.