क्रिकेट महिला विश्वचषकाविषयी या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? सर्वाधिक वेळा कोणत्या देशाने जिंकलाय हा कप?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
दोनदा उपविजेतेपद आणि तीनवेळा उपांत्य फेरी. आयसीसी महिला विश्वचषकात आजवर विजयाच्या असं जवळ येऊनही भारताला विजेतेपदाचा आनंद साजरा करता आलेला नाही.
पण हाच इतिहास बदलण्याची चांगली संधी भारताकडे आहे, कारण आज (30 सप्टेंबर 2025) पासून भारत आणि श्रीलंकेत पुन्हा या स्पर्धेला सुरुवात होते आहे.
स्पर्धेच्या पहिल्या लढतीत आज हेच दोन संघ, म्हणजे भारत आणि श्रीलंका गुवाहाटीत एकमेकांना भिडतील. भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता या लढतीला सुरुवात होईल. त्याआधी गुवाहाटीमध्ये उदघाटन सोहळ्याचंही आयोजन करण्यात आलं आहे.
गुवाहाटीची लढत झाल्यावर पाच ऑक्टोबरला कोलंबोमध्ये भारताला पाकिस्तानचा मुकाबला करायचा आहे.
दोन्ही संघांमधली चुरस, दोन्ही देशांमधला अलीकडच्या काळातला तणाव आणि नुकत्याच पुरुषांच्या आशिया चषकात झालेले वाद यांमुळे या सामन्यावर क्रिकेट चाहत्यांचं विशेष लक्ष राहील.
महिला क्रिकेटमधल्या या सर्वात प्रतिष्ठेच्या स्पर्धेचं स्वरुप कसं असणार आहे, जाणून घ्या.
अशी असेल स्पर्धा
भारत, श्रीलंका, इंग्लंड, ऑस्ट्रेलियाशिवाय न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश आणि पाकिस्तानचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून आठही संघ आधी साखळी फेरीत राऊंड रॉबिन पद्धतीनं खेळतील, म्हणजे प्रत्येक संघ प्रत्येकाशी खेळेल.
त्यानंतर चार अव्वल संघ उपांत्य फेरीत जातील. उपांत्य फेरीतल्या विजेत्या संघांमध्ये फायनलची लढत रंगेल तर पराभूत संघ तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठीच्या लढतीत खेळतील.
गुवाहाटी आणि कोलंबोसह नवी मुंबई, विशाखापट्टणम आणि इंदूरमध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत. या मैदानांवर पहिल्यांदाच महिला क्रिकेटमधले आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जात आहेत.

भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या सर्व सामन्यांचं आयोजन कोलंबोमध्ये केलं जाईल. तसंच, स्पर्धेची एक उपांत्य फेरीही कोलंबोमध्ये खेळवली जाणार आहे.
या स्पर्धेची फायनल 2 नोव्हेंबरला नवी मुंबईत होणार असून, पाकिस्तान त्यासाठी पात्र ठरल्यास हाही सामना कोलंबोमध्येच खेळवला जाईल.
महिला विश्वचषकात कुणाचं पारडं जड?
एरवी महिला क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व पाहायला मिळतं. वन डे विश्वचषकाचाही त्याला अपवाद नाही.
दर चार वर्षांनी होणारी ही स्पर्धा पहिल्यांदा 1973 साली खेळवण्यात आली होती, तेव्हा इंग्लंडनं त्यात विजय मिळवला होता. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियानं सात वेळा ही स्पर्धा जिंकली आणि ऑस्ट्रेलियाचत विद्यमान विजेता आहे.
इंग्लंडनं एकूण चार वेळा तर न्यूझीलंडनं एकदा विश्वचषक जिंकला होता.

भारतासाठी सुवर्णसंधी
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली खेळणारी भारतीय टीम सध्या वन डे क्रिकेटच्या जागतिक क्रमवारीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड खालोखाल तिसऱ्या स्थानावर आहे.
सध्याचा फॉर्म पाहिला तर भारताची कामगिरी मिश्र स्वरुपाची आहे. विश्वचषकाआधी बंगळुरूत झालेल्या सराव सामन्यात आधी इंग्लंडनं 153 धावांनी हरवलं होतं तर त्यानंतर भारतानं न्यूझीलंडवर चार विकेट्स राखून मात केली होती
त्याआधी सप्टेंबरमध्येच मायदेशात झालेल्या मालिकेत भारतानं ऑस्ट्रलियाला चांगली टक्कर दिली होती. ऑस्ट्रेलियानं ती 2-1 अशी मालिका जिंकली, पण त्यात सलामीवीर स्मृती मंधाना आणि जलदगती गोलंदाज क्रांती गौडनं शानदार कामगिरी बजावली होती.
स्मृतीनं तीन सामन्यांत तीनशे धावा केल्या होत्या तर क्रांती गौडनं सर्वाधिक पाच विकेट्स काढल्या होत्या.
पण जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये झालेल्या वन डे मालिकेत भारतानं इंग्लंडला त्यांच्याच देशात धूळ चारत 2-1 असा मलिका विजय साजरा केला होता. क्रांती गौडनं त्याही मालिकेत तीन सामन्यांत 9 विकेट्स काढत चमकदार कामगिरी बजावली होती.

त्याशिवाय फिरकी गोलंदाज दीप्ती शर्मा, स्नेह राणा, राधा यादव आणि फलंदाजी स्मृतीसोबतच हरमनप्रीत, जेमिमा यांच्यावरही भारताची भिस्त राहील.
फलंदाजांच्या कामगिरीत सातत्य नसणं, हे भारतीय संघासमोरचं सर्वात मोठं आव्हान ठरू शकतं.
आजवर तीन वेळा म्हणजे 1978, 1997 आणि 2013 मध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं होतं, पण विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न मात्र अजून पूर्ण झालेलं नाही.

2022 मध्ये भारताचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं होतं, पण त्याआधी 2017 आणि 2005 मध्ये भारतानं उपविजेतेपद मिळवलं होतं.
स्पर्धेसाठी घसघशीत बक्षीस
यावेळी महिला विश्वचषक जिंकणाऱ्या टीमला घसघशीत रोख बक्षीसही मिळणार असल्याची घोषणा आयसीसीनं केली आहे. 2022 च्या तुलनेत बक्षीसाच्या रकमेत 239 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
यात चौदा पंच आणि चार सामनाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यात मुंबईतील वृंदा राठी यांचाही समावेश आहे.

फोटो स्रोत, Getty Images
हा विश्वचषक जिंकणाऱ्या टीमला 44.8 लाख अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस मिळेल. भारतीय चलनात ही रक्कम होते, सुमारे 39 कोटी 75 लाख 52 हजार रुपये.
तसंच 2023 साली पुरुषांचा वन डे विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला मिळालेल्या रकमेपेक्षाहीह ही रक्कम जास्त आहे. त्यावेळी ऑस्ट्रेलियाला सुमारे 35 कोटी 31 लाख 35 हजार रुपये बक्षीस मिळालं होतं.
या स्पर्धेतील एकूण प्राईझ मनी म्हणजे सर्व बक्षीसांची एकूण रक्कम सुमारे 1.23 अब्ज रुपये एवढी निश्चित करण्यात आली आहे.
महिला आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये अधिक समानता यावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
तसंच यावेळच्या महिला विश्वचषकात पहिल्यांदाच आयसीसीनं सामनाधिकारी आणि पंच म्हणून पूर्णतः महिलांचं पॅनेल नियुक्त केलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











