नव्या मुंबईचं नवं विमानतळ: हवेत सिंगापूर-दुबईशी स्पर्धा, जमिनीवर ट्रॅफिकशी झुंज

    • Author, निखिल इनामदार,
    • Role, बीबीसी न्यूज, मुंबई

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पहिल्यांदाच उतरणं हा त्या प्रवाशासाठी एक वेगळाच अनुभव असू शकतो.

विमान उतरताना विशाल अरबी समुद्र आणि खारफुटीची दलदल ओलांडत येतं. त्याचवेळी खिडकीतून रेल्वे ट्रॅकचं जाळं दिसतं, उंचच्या उंच चकचकीत इमारती दिसतात आणि त्याच वेळी दिसते विमानतळाच्या भिंतीलगत असलेली आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी.

शहराच्या मध्यभागी असलेल्या या गजबजलेल्या विमानतळाहून विमानांचं उड्डाण घेणं हे धोकादायक असल्याचं एव्हिएशन एक्सपर्ट अनेक वर्षांपासून सांगत आहेत.

इथल्या इमारतींमुळे विमान उड्डाणात अडथळे येतात. तसेच विमानतळावर दोन धावपट्ट्या आहेत पण त्या एकमेकांना छेदून जातात त्यामुळे त्या एकाच वेळी वापरता येत नाही.

पण ज्या पर्यायाची अनेक दिवसांपासून वाट पाहिली जात होती तो पर्याय आता लवकरच उपलब्ध होत आहे.

अनेक अडथळे आणि विलंबानंतर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) लवकरच सुरू होणार आहे आणि येत्या काही महिन्यांत ते पूर्ण क्षमतेने सुरू होईल.

हे नवं विमानतळ भारताच्या आर्थिक राजधानी मुंबईतील 'गर्दी मोठ्या प्रमाणात कमी' करेल, असं अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचे सीईओ अरुण बन्सल यांनी बीबीसीला सांगितलं.

बन्सल पुढे म्हणाले, "सध्याचं विमानतळ दरवर्षी 5.5 कोटी प्रवाशांच्या मर्यादेपर्यंत पोहोचलं आहे. आता आणखी 2 कोटी प्रवाशांची मागणी आहे आणि ती गरज आम्ही नवी मुंबई विमानतळावर पूर्ण करू."

कनेक्टिव्हिटी, एकत्रीकरण आणि धोरणाशी संबंधित अडचणी किंवा अडथळे दूर करायच्या आहेत. तरी, हे विमानतळ सुरू होण्यामुळे भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात एक महत्त्वाचा नवीन अध्याय सुरू होणार आहे.

1100 हेक्टरवरील अत्याधुनिक विमानतळ, 9 कोटी प्रवाशांची क्षमता

हे नवं विमानतळ 1,100 हेक्टर क्षेत्रावर पसरलेलं आहे. मुंबईच्या जुन्या व्यावसायिक केंद्रापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आहे. हे बेट मुंबई शहराशी भारतातील सर्वात मोठ्या सागरी पुलाने जोडलेलं आहे.

विमानतळावर दोन समांतर धावपट्ट्या आहेत. विस्ताराच्या पुढच्या टप्प्यानंतर ते दरवर्षी 9 कोटी प्रवाशांना सेवा देऊ शकणार आहे.

सिंगापूरच्या इनाडू अॅनालिटिक्समधील शुकोर युसुफ म्हणाले, "नवी मुंबई विमानतळामुळे मुंबई हे भारतातील पहिलं मोठं शहर बनेल जिथे दोन विमानतळ असतील. यावरून दिसून येतं की भारत हवाई बाजारपेठेत किती महत्त्वाचा आहे. कारण इथली प्रवासी आणि हवाई वाहतूक वेगानं वाढत आहेत."

मागील चार वर्षांत या क्षेत्रात दुप्पट वाढ झाली आहे, जी जगातील इतर क्षेत्रांपेक्षा जास्त आहे. भारतीय विमान कंपन्यांनी सुमारे 1,900 नवीन विमानांची ऑर्डर दिली आहे. त्यापैकी 1,000 विमान पुढील पाच वर्षांत मिळणार आहेत.

त्यामुळे या नवीन विमानांसाठी योग्य विमानतळ आणि इतर पायाभूत सुविधा तयार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

अदानी म्हणतात की, नवी मुंबई विमानतळ भारतातील पहिलं पूर्णपणे डिजिटल विमानतळ असेल. हे विशेष हब विमानतळ म्हणून डिझाइन आणि विकसित केलेलं आहे.

चेक-इन, सुरक्षा, सामान हाताळणी आणि बोर्डिंगसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येईल. ज्यामुळे वेळ तर कमी लागेल आणि प्रवाशांसाठी ट्रान्सफरही (हस्तांतरण) सुलभपणे होऊ शकेल.

विमानतळाने आधीच भारताच्या मोठ्या आणि नवीन विमान कंपन्या, इंडिगो आणि अकासा एअरलाइन्ससोबत भागीदारीची घोषणा केली आहे. या कंपन्या नवीन मार्ग सुरू करत आहेत. तसेच, एअर इंडिया या विमानतळावरून हळूहळू 15 शहरांमध्ये उड्डाणे सुरू करणार आहे, ज्यात आंतरराष्ट्रीय मार्गांचाही समावेश आहे.

सध्या मुंबईच्या विमानतळावर खूप गर्दी आहे. त्यामुळे विश्लेषकांच्या मते, नवीन मार्ग सुरू करण्यासाठी विमान कंपन्या नवी मुंबई विमानतळावरील पार्किंग स्लॉटसाठी मोठ्या प्रमाणात मागणी करतील.

परंतु, येत्या काही महिन्यांत विमानतळ सुरू होताच मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

दोन विमानतळांमधील वाहतूक मोठी समस्या

विमानतळ जास्त अंतरावर असल्यामुळे प्रवाशांसाठी ते गैरसोयीचं ठरू शकतं. नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण करताना किंवा येताना, आणि विशेषतः ट्रान्सफर किंवा कनेक्टिंग फ्लाइटसाठी वापरताना ते गैरसोयीचं ठरू शकतं.

मुंबईतील काही उपनगरांपासून विमानतळापर्यंत पोहोचायला दोन ते तीन तास सहज लागू शकतात.

जुन्या आणि नवीन विमानतळांना थेट जोडणारी 20 मिनिटांची मेट्रो लाईन काही वर्षांनीच तयार होईल. त्याआधी, नवी मुंबई विमानतळ प्रवाशांसाठी नियमित अंतरावर इलेक्ट्रिक बस सेवा देण्याची योजना आखली जात आहे.

बंगळुरू येथील एव्हिएशन सल्लागार आलोक आनंद म्हणतात की, 'हे आदर्श नाही,' पण भारतात अनेक प्रकल्पांमध्ये असं होतं की, आवश्यक पायाभूत सुविधा नंतर तयार होतात. त्यांचं काम प्रकल्पासोबत एकत्रितपणे होत नाही.

आलोक आनंद म्हणतात, "जोपर्यंत शेवटच्या टप्प्याची कनेक्टिव्हिटी तयार होत नाही, तोपर्यंत कोणीही एका विमानतळावर उतरून दुसऱ्या विमानतळावर जाऊन विमान पकडेल असं मला वाटत नाही."

कदाचित त्यामुळेच सध्या दोन्ही विमानतळ, जुनं आणि नवीन हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही उड्डाणं हाताळतील. भविष्यात, जेव्हा कनेक्टिव्हिटी सुधारेल, तेव्हा परदेशी उड्डाणं फक्त नवी मुंबई विमानतळावरूनच होतील.

कनेक्टिव्हिटीसाठी अडथळा

कनेक्टिव्हिटी आणि नियमांमुळे नवी मुंबई विमानतळाला मुंबईला सिंगापूर किंवा दुबईसारखं आंतरराष्ट्रीय हब बनवण्यात अडथळा येऊ शकतो. याचा अर्थ असा की, प्रवाशांना जगभर जी उड्डाणं होतात त्यांच्याशी कनेक्ट करुन देता येणं कठीण होऊ शकतं.

तज्ज्ञांच्या मते, नवी मुंबई विमानतळ, हैदराबाद आणि बंगळुरूसारखी काही इतर विमानतळं तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत असून जगातील सर्वोत्तम विमानतळांशी स्पर्धा करू शकतात.

परंतु, भारताला अजून काही नियम बदलण्याची गरज आहे. ज्यामुळे प्रवाशांचे ट्रान्सफर किंवा हस्तांतरण सुलभ होईल. हब म्हणून यशस्वी होण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे.

लाइव्ह फ्रॉम अलाऊंजचे संपादक आणि ऑनलाइन एव्हिएशन हॉस्पिटॅलिटीचे अजय आवटने उदाहरण देऊन सांगतात की, "देशांतर्गत टर्मिनलवरून आंतरराष्ट्रीय टर्मिनलवर जाण्यास किंवा उलट मार्गावर जाण्यास प्रवाशांना पुन्हा सुरक्षा तपासणी करावी लागते, जे जगातील अनेक प्रमुख विमानतळांवर आवश्यक नसतं."

अजय आवटने पुढे म्हणतात, "याशिवाय, प्रवाशांच्या तपासणीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी, ती वेगाने होण्यासाठी आपल्या सुरक्षा नियमांचे पुनर्मूल्यांकन करणं गरजेचं आहे. इतर विमानतळांनी बॉडी स्कॅनरचा वापर सुरू केला आहे, पण येथे जास्त वेळ जातो."

मुंबईचं विमानतळ जागतिक स्तरावर नेण्यासाठी हे सर्व बदल आधीच करणं आवश्यक आहे, यासाठी बन्सल हे सहमत आहेत.

ते म्हणतात की, नियम बदलल्यावरही विमान कंपन्यांनी आपल्या उड्डाणांची यादी वाढवण्याची तयारी दाखवणं गरजेचं आहे. त्यांना आपलं विमानतळ आणि कनेक्शन नीट नियोजन करून युरोप, अमेरिका आणि आशियाच्या दरम्यान मुंबईच्या स्थानिक फायदा घ्यावा लागेल.

सध्यातरी नवी मुंबई विमानतळ शहराची गंभीर हवाई वाहतुकीची समस्या तात्काळ सोडवत आहे.

हे विमानतळ मोठ्या परिसरासाठी सेवा देईल. याचा लाभ शेजारील पुणे शहरापर्यंतही पोहोचू शकतो. पुणे एक महत्त्वाचे आयटी आणि शैक्षणिक केंद्र आहे.

अजय आवटने म्हणतात, "जगातील काही मोठ्या शहरांमध्ये, जसं की न्यूयॉर्क, लंडन, दुबई आणि टोकियो इथे दोन ते तीन विमानतळ आहेत. मुंबईही आता या खास क्लबमध्ये सामील होणार आहे."

दिल्लीजवळही असं होणार आहे. तिथे तिसरं विमानतळ जेवर येथे काही महिन्यांत सुरू होणार आहे. हे राजधानीच्या उपनगरी भागांना सेवा देईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)