You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नागपुरातून निघालेली महिला गुगल मॅपच्या आधारानं कशी पोहोचली पाकिस्तानात?
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
ऑपरेशन सिंदूरनंतर एलओसी ओलांडून पाकिस्तानमध्ये गेलेली नागपूरची महिला ही गुगल मॅपच्या सहाय्याने रस्ता शोधत पाकिस्तानात पोहोचली असल्याची माहिती चौकशीदरम्यान समोर आली आहे.
सुनिता जामगडे असं या महिलेचं नाव असून नागपूरची ही महिला एलओसी ओलांडून पाकिस्तानमध्ये गेली होती.
नागपुरात आणल्यानंतर तिच्यावर 'ऑफिशीअल सीक्रेट ऍक्ट'नुसार कपिलनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस चौकशी पूर्ण झाल्यानंतर तिला सोमवारी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
यादरम्यान, पोलीस कोठडी राखीव ठेवण्यात आली असून आणखी चौकशी करायची असल्यास पोलीस तिचा ताबा घेणार आहेत.
तसेच कारगिल पोलीसदेखील या महिलेचा ताबा घेण्यासाठी आज (3 जून) कोर्टात अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती कपिलनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी दिली.
ही महिला नेमकी कोण आहे आणि ती कधी बेपत्ता झाली होती? तसंच नेमकं काय घडलं? ती पाकिस्तानमध्ये गेल्याची माहिती कशी मिळाली? याबाबत जाणून घेऊयात.
नेमकं काय आहे हे प्रकरण?
नागपूरच्या महिलेनं कारगिलमधून नियंत्रण रेषा पार ओलांडून पाकिस्तानमध्ये प्रवेश केल्याचा प्रकार नुकताच समोर आला.
या महिलेला अमृतसर पोलिसांकडे सोपवण्यात आलं होतं.
त्यानंतर नागपूर पोलिसांनी महिलेला नागपुरात आणण्याची तयारी सुरू केली. 28 मे रोजी रात्री उशिरा या महिलेला नागपुरात आणलं गेलं.
सध्या हेरगिरीच्या अनेक प्रकरणांची चर्चा सुरू असल्यामुळं या महिलेच्या प्रकरणाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
महिलेने एलओसी कशी पार केली?
या महिलेने कारगिलच्या शेवटच्या गावातून एलओसी पार केली. यासाठी, गुगल मॅपच्या सहाय्याने आपण रस्ता शोधत पाकिस्तानमध्ये पोहोचलो, असं त्या महिलेने चौकशीदरम्यान सांगितलं आहे.
तसेच ती क्रिस्टल स्टोनच्या व्यवसायाची माहिती घेण्यासाठी झुल्फिकारला भेटायला गेली होती, असंही तिने सांगितलं आहे.
तिच्या 13 वर्षांच्या मुलाला देखील नागपुरात आणलं असून पोलिसांनी त्याचीही विचारपूस केली. याआधीही आम्ही नेपाळसारख्या देशात फिरायला गेलो होतो, असं त्याने सांगितल्याची माहिती कपिलनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी दिली.
पोलिसांनी तिचा मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. त्यानंतर तिने हेरगिरी केली होती का? काही गुप्त माहिती पुरवली होती का? हे समोर येईल.
नागपूर ते पाकिस्तान; कसा केला प्रवास?
43 वर्षीय सुनिता जामगडे या 4 मे रोजी आठवीत शिकणाऱ्या मुलाला घेऊन घरातून निघाल्या होत्या.
अमृतसरला जात असल्याचं त्यांनी कुटुंबीयांना सांगितलं होतं. पण त्या मुलासह कारगिलला पोहोचल्या होत्या.
त्यांनी कारगिलमध्ये मुलासह एका हॉटेलमध्ये चेक-इन केलं. पण त्यानंतर मात्र मुलाला तिथं एकटं सोडून त्या तिथून निघून गेल्या.
त्यानंतर हॉटेलमधील लोकांना याबाबत समजलं तेव्हा त्यांनी पोलिसांना कळवलं. हॉटेलमध्ये पर्यटक आले होते. तिथे मुलाला एकटं ठेवून महिला बेपत्ता झाल्याचं कारगिल पोलिसांना समजलं.
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ही महिला नागपूरची असल्याची माहिती तिच्या आधार कार्डवरून मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी मुलाकडंही चौकशी केली. तसंच महिलेच्या नागपुरातील नातेवाईकांना फोन करूनही माहिती घेण्यात आली.
शेवटी महिला नागपूरची असल्याची खातरजमा झाल्यानंतर कारगिल पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला.
कारगिल सीमेवरील हंदरमन गावातही महिलेचा शोध घेण्यात आला. पण महिला कुठेही सापडली नाही. शेवटी पोलिसांनी बेपत्ता असल्याचा एफआयआर नोंदवला.
त्यानंतर मुलाला बाल कल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती, कारगिलचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्रीराम यांनी दिली.
आधीही पाकिस्तानमध्ये जाण्याचा प्रयत्न
या महिलेचा तपास सुरू असतानाच तिनं पाकिस्तानची सीमा ओलांडली की नाही याचा पोलीस शोध घेत होते. त्याचवेळी चौकशी दरम्यान अमृतसर पोलिसांकडून काही माहिती मिलाली.
या महिलेनं यापूर्वीही पाकिस्तानात जाण्याचा प्रयत्न केला असल्या पोलिसांना आमृतसर पोलिसांकडून समजलं.
एप्रिल महिन्यामध्ये या महिलेनं वाघा-अटारी सीमेवरून पाकिस्तानमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यावेळी अमृतसर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं होतं.
या प्रकारानंतर ही महिला पुन्हा नागपुरात परतली. त्यावेळीही तिला कारगीलमधल्याच हंदरमन गावातून सीमा पार करायची होती, अशीही माहिती मिळाली आहे.
पण, त्यावेळी सोनमर्गपासूनचा मार्ग पूर्णपणे बंद असतो. त्यामुळं या महिलेनं वाघा - अटारी सीमेवरून पाकिस्तानमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता.
पाकिस्तानने केले भारताकडे सुपूर्द
या महिलेचा गेल्यावेळी केलेला प्रयत्न फसल्यानंतर ती आता पुन्हा कारगिलमध्ये आली. यावेळी ती सीमा ओलांडून पाकिस्तानात जाण्यात यशस्वीदेखील झाली.
त्यानंतर पाकिस्ताननं दोन दिवसांपूर्वी या महिलेला पाकिस्तानमधून भारताकडे सोपवलं अशी माहिती अमृतसर पोलिसांनी दिली आहे.
या महिलेला आता नागपूर पोलिसांच्या स्वाधीन केलं जात आहे, अशी माहितीही वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्रीराम यांनी दिली.
हेरगिरीच्या अँगलने तपास करणार
संबंधित महिला नागपुरातील कपिल नगर भागातील रहिवासी आहे. मुलाला घेऊन ती आईच्या घरी राहायची.
नागपुरातील एका हॉस्पिटलमध्ये ही महिला परिचारिका म्हणून काम करत होती. ती मूळची नागपूरची असल्यानं नागपूर पोलिसही या प्रकरणी तपास करत आहेत.
कपिल नगर पोलिसांचं पथक महिलेला नागपुरात आणण्यासाठी अमृतसरला गेलं होतं. बुधवारी रात्री उशिराते महिलेसह नागपुरात पोहोचणार होते.
अमृतसर पोलिसांनी नोंदवलेला झिरो एफआयआर इकडे वर्ग करून महिलेची चौकशी केली जाणार आहे.
महिलेनं भारताबाबतची काही गुप्त माहिती पाकिस्तानला दिली होती का? महिला पाकिस्तानात कोणाला भेटायला गेली होती? तिनं नियंत्रण रेषा का पार केली? ती हेरगिरी करत होती का? अशा सगळ्या दृष्टीनं तपास करणार असल्याचं झोन 5 चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितलं.
तसंच अमृतसर पोलिसांनी या महिलेचा मोबाईल तपासला त्यावेळी त्यामध्ये पाकिस्तानी नागरिकासोबत काही चॅटींग आढळून आल्याची माहितीही देण्यात आली आहे.
या महिलेचे तिकडे काही संबंध होते का? यादृष्टीनं देखील आम्ही तपास करत आहेत असं पोलिसांनी सांगितलं.
कारगिल पोलिसही ताब्यात घेणार
नागपूर पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर कारगिल पोलीसदेखील महिलेला ताब्यात घेणार आहेत. त्यांच्याकडूनही महिलेची चौकशी केली जाणार आहे.
महिला पाकिस्तानात जाण्यामागे तिचा नेमका काय उद्देश होता? तिनं काही गुप्त माहिती तिकडे पुरवली का? याचा तपास पोलीस करतील.
तसेच पोलिसांना काही गुप्त माहिती मिळाल्याचंही समोर आलं आहे. त्यादृष्टीनं या महिलेचा तपास केला जाणार आहे, असं कारगिलचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्रीराम यांनी सांगितलं.
या सगळ्या प्रकरणाबद्दल आम्ही सुनिता जामगडे या महिलेच्या कुटुंबीयांशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण 'बोलण्याच्या मानसिकतेत नाही', असं म्हणत भाऊ सुनील जामगडे यांनी बोलण्यास नकार दिला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)