आधी महिला आयपीएस अधिकाऱ्याला कॉल केल्याचा व्हीडिओ व्हायरल, आता महसूल अधिकाऱ्यांना मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल, आतापर्यंत काय घडलं?

    • Author, मुस्तान मिर्झा
    • Role, बीबीसी मराठीसाठी

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात अवैध मुरूम उत्खननाचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळत चाललाय. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला खडसावल्याचा व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला.

अवैध उत्खननाविरोधातील कारवाई थांबवण्याचे आदेश त्यांनी दिल्याचं दिसून आलं. हे प्रकरण ताजं असतानाच 3 सप्टेंबरला अवैध उत्खननाविरोधात कारवाईसाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

याप्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण करत जमाव जमावण्यात आल्याचा आरोप आहे. एफआयआरमध्ये चौघांना आरोपी करण्यात आलं आहे, तर 15 ते 20 जण अज्ञात आरोपी असल्याचं म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं होतं?

माढा तालुक्यातील एका गावातील व्हीडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. याच व्हीडिओमुळे विरोधकांकडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका होत आहे. हे प्रकरण आहे माढा तालुक्यातील कुर्डू गावचं कथित बेकायदेशीर मुरुम उत्खनन प्रकरण.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोन करून "कारवाई थांबवा" असे आदेश दिल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

यानंतर प्रशासकीय कारवायांमध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप होत आहे.

सुरुवातीला अजित पवार यांनी या प्रकरणावर भाष्य करणं टाळलं. मात्र, राष्ट्रीय स्तरावर या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर आता अजित पवार यांनी यावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी आपला उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणची परिस्थिती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता, अशी प्रतिक्रिया 'एक्स'वरील एका पोस्टच्या माध्यमातून दिली.

अजित पवार यांनी म्हटलं, "सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हीडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता."

"आपल्या पोलीस दलाबद्दल, धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे."

"मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे", असंही अजित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलं.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाला पत्र लिहित महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीची मागणी केली आहे. यावरूनही अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

'आयपीएस अंजना कृष्णा यांच्या कागदपत्रांची चौकशी करा'

आयपीएस अंजना कृष्णा यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत केंद्रीय लोकसेवा आयोगाला लिहिलेल्या पत्रात अमोल मिटकरी म्हणाले, "महाराष्ट्र विधान परिषदेचा सदस्य म्हणून, आयपीएस अंजना कृष्णा यांनी सादर केलेल्या शैक्षणिक, जात प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांची सखोल चौकशी किंवा पडताळणी करणं अत्यंत आवश्यक आहे. याकडे मी तुमचे लक्ष वेधू इच्छितो."

"सादर केलेल्या कागदपत्रांच्या आणि माहितीच्या सत्यतेबद्दल शंका व्यक्त करण्यात आल्या आहेत",असं म्हणत त्यांनी आयोग स्तरावर याची सविस्तर चौकशी करावी, त्याची सत्यता पडताळून पाहावी आणि संबंधित विभागांना योग्य माहिती द्यावी, अशी मागणी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे केली.

नेमकं काय घडलं?

रविवारी (31 ऑगस्ट) कुर्डू गावात रस्त्याच्या कामासाठी मुरूम उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) अंजना कृष्णा व्ही. एस. घटनास्थळी दाखल झाल्या.

पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांनी सुरुवातीला संबंधितांकडे मुरूम उत्खननाची रॉयल्टी पावती दाखवण्यास सांगितली. मात्र, त्यांना तशी पावती दाखवता आली नाही. त्यामुळे अंजना कृष्णा यांनी हे मुरूम उत्खनन बेकायदेशीर असल्याचं सांगत थांबवण्यास सांगितलं.

यावरूनच पोलीस अधिकारी अंजना आणि ग्रामस्थ यांच्यात वाद झाला.

याच वेळी गावचे सरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन केला.

यानंतर बाबा जगताप यांनी त्यांचा फोन अंजना कृष्णा यांच्याकडे देत अजित पवारांशी बोलण्यास सांगितलं. मात्र डीवायएसपी अंजना केवळ आवाजावरून अजित पवार यांना ओळखू शकल्या नाहीत.

व्हॉईस कॉलवरून त्यांना "मी डिप्टी सीएम अजित पवार बोलतोय" असं सांगण्यात आलं. यावर अंजना कृष्णा यांनी "माझ्या मोबाईलवर फोन करा", असं उत्तर दिलं.

यानंतर अजित पवार संतापले आणि त्यांनी अंजना कृष्णा यांना व्हीडिओ कॉल करून "इतकी डेरिंग आहे तुमची? माझा चेहरा तरी ओळखाल ना?" असं म्हणत खडसावलं.

तसेच "कारवाई थांबवा, तहसीलदारांना सांगा माझा फोन आला आहे", असे आदेश अजित पवार यांनी दिले. हाच व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गावकऱ्यांचा दावा काय?

बीबीसीशी बोलताना सरपंच बाबा जगताप यांनी सांगितलं, "कुर्डू ग्रामपंचायतमार्फत शासकीय कामे सुरू होती. अशा कामांसाठी गौणखनिज उत्खननाची रॉयल्टी बिलातून आकारली जाते. मात्र प्रशासनाला चुकीची माहिती देऊन आम्ही बेकायदेशीर उत्खनन करतोय, असं दाखवलं गेलं."

"डीवायएसपी मॅडम आल्या आणि कारवाई सुरू केली. काही पोलिसांनी गावकऱ्यांवर बळाचा वापरही केला. त्यामुळे मी अजित पवारांना फोन केला. त्यांनी सांगितलं की, ही कारवाई चुकीची आहे, ती थांबवा. त्यानंतर कारवाई थांबली," अशी माहिती बाबा जगताप यांनी दिली.

या प्रकरणात काही व्हीडिओ समोर आले आहेत. त्यात गावकरी आक्रमक होत अधिकाऱ्यांशी धक्काबुक्की करताना दिसत आहेत. मात्र, या प्रकरणी अद्याप कुठलीही अधिकृत तक्रार नोंदवली गेलेली नाही. अजित पवारांच्या हस्तक्षेपानंतर अधिकारी शांत बसले का? असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित केला जातो आहे.

विरोधकांकडून सडकून टीका

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी याप्रकरणावरून फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, "अधिकाऱ्यांना झापणे, पदाचा रुबाब दाखवणे, कधीकधी शिवीगाळ करणे याबाबतच्या बातम्या आत्तापर्यंत फक्त संजय शिरसाट, संजय गायकवाड, अनिल बोंडे, गीता जैन, संतोष बांगर, अमित साटम, मेघना बोर्डीकर यांच्याबाबत येत होत्या. पण असे का होते त्याचा उलगडा आज झाला. सरकारच गुंडांना अभय देणारे असेल, तर त्यात सामील असणाऱ्या मंत्री किंवा आमदारांकडून वेगळी अपेक्षा ती काय करायची?"

"महिला डिएसपीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोनवरून गुंडांना सोडण्यास स्पष्टपणे नकार दिला. खरंतर अशा धाडसी पोलीस अधिकाऱ्याचे आपण कौतुक करायला हवे. महिला पोलीस अधिकाऱ्याने फक्त फोन कॉलवर कुणाला का सोडावे? हा साधा प्रश्न आहे. बरं ज्याच्या संदर्भात कॉल केलेला आहे तो कोणी सद्गुणी संत महापुरुष आहे का तर तसेही नाही," असं मत सुषमा अंधारेंनी व्यक्त केलं.

"समजा एका फोन कॉलवर सोडून दिले, पण उद्या जर लक्षात आले की, असा कुठलाही कॉल राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलाच नव्हता, तर मग पोलीस अधिकाऱ्याला दिवसा ढवळ्या गुंडांनी चुना लावला याच्या बातम्यांची रंगतदार चर्चा वाढेल ती वेगळीच. मात्र महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नोकरीवर संकट येईल त्याची जबाबदारी कोण घेणार?" असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारला.

सीएम म्हणजे कॉमन मॅन, डीसीएम म्हणजे डेडिकेटेड कॉमन मॅन असे जाहिरातीमध्ये सांगणारे सरकार डीसीएम म्हणजे डिफॉल्टर केस मॅनेजमेंट असं काही वास्तवात आहे का? असाही प्रश्न अंधारेंनी विचारत सरकारची कोंडी केली.

'8 दिवसात कारवाई न झाल्यास हजारो शेतकऱ्यांसह मोर्चा काढणार'

जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे हे म्हणाले, "राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी तातडीने महिला पोलीस अधिकारी यांची माफी मागून राजीनामा द्यावा. ज्या पद्धतीने महिला अधिकाऱ्यांशी भाषा वापरली आणि त्यानंतर अधिकाऱ्यांना संबंधिताने धमकवण्याचा प्रयत्न केला, याची चौकशी करून संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करावी."

8 दिवसात कारवाई न झाल्यास हजारो शेतकऱ्यांसह सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे, असा इशारा खूपसे यांनी दिला आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना आपचे विजय कुंभार यांनी अजित पवार अवैध उत्खनन करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला.

ते म्हणाले, "हे सगळं चुकीचं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे अधिकाऱ्यांना बेकायदेशीर गोष्टींकडे कानाडोळा करायला लावतायेत, हे उघड झालं. कार्यकर्त्याने फोन लावून दिल्यामुळे अजित पवारांना न ओळखणे ही काय त्या अधिकाऱ्याची चूक नाहीये."

"याच कारणामुळे वरिष्ठ नेत्यांना आपापल्या भागात आपल्या मर्जीतील अधिकारी नेमायचे असतात. एकूणच बघायचं झालं तर अवैध उत्खनन करणाऱ्यांना अजित पवार पाठीशी घालतायेत, हे सिद्ध झालं," असा आरोप विजय कुंभार यांनी केला.

पोलीस प्रशासनाची भूमिका काय?

या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार किंवा गुन्हा नोंदवला गेलेला नाही. डीवायएसपी अंजना कृष्णा, तहसीलदार, प्रांताधिकारी यांनी अधिकृत प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. "चौकशी सुरू आहे" एवढंच प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. बीबीसीने वारंवार संपर्क साधूनही अंजना कृष्णा यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

अजित पवार आणि त्यांच्या पक्षानं काय म्हटलं?

या प्रकरणावर अजित पवार यांची बाजू जाणून घेण्यासाठी पुण्यात पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. मात्र, ते उत्तर न देताच निघून गेले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "काही माध्यमं जाणूनबुजून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डीवायएसपींची खरडपट्टी काढली, अशा खोडसाळ बातम्या चालवत आहेत. वस्तूस्थिती अशी आहे की, माढा तालुक्यातील एका गावचे सर्व शेतकरी तहसिलदारांच्या कारवाईचा विरोध करत होते. तेव्हा अजित पवार यांनी तेथे उपस्थित असलेल्या डीवायएसपी अंजना कृष्णा यांना कॉल करून ती कारवाई थांबवण्याच्या सूचना दिल्या. तसेच फोन आल्याची माहिती तहसिलदारांना देण्यास सांगितलं."

"डीवायएसपी रँकची एखादी महिला अधिकारी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना ओळखत नसेल, तर हेदेखील चुकीचं आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की, अजित पवार स्पष्ट बोलतात आणि योग्य तो निर्णय घेतात. लोकशाहीत शेतकऱ्यांचीही बाजू जाणून घेतली पाहिजे. तोपर्यंत कारवाई थांबवावी, अशाप्रकारचे ते निर्देश होते. मात्र, जाणूनबुजून एका महिला अधिकाऱ्याची खरडपट्टी काढली, अशा खोडसाळ बातम्या माध्यमं चालवत आहेत. हे चुकीचं आहे," असं मत आनंद परांजपे यांनी व्यक्त केलं.

कोण आहेत आयपीएस अंजना कृष्णा?

आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांचे पूर्ण नाव अंजना कृष्णा व्ही. एस. आहे. सध्या त्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे उपअधीक्षक (डीएसपी) म्हणून तैनात आहेत. यापूर्वी त्या पंढरपूरमध्ये प्रशिक्षणार्थी अधिकारी होत्या.

करमाळा हे अंजना कृष्णा यांचे पहिले स्वतंत्र कार्यक्षेत्र आहे. अंजना कृष्णा यांनी 2022-23 मध्ये यूपीएससी सीएसई परीक्षेत संपूर्ण भारतातून 355 वी रँक मिळवली.

केरळमधील तिरुवनंतपुरम येथे जन्मलेल्या अंजना कृष्णा यांनी प्राथमिक शिक्षण पुजापुरा येथील सेंट मेरीज सेंट्रल स्कूलमधून घेतले. त्यांचे उच्च शिक्षण तिरुवनंतपुरम येथील एचएचएमएसपीबी एनएसएस कॉलेज फॉर वुमन (नीरमंकारा) येथे झाले.

त्यांनी केरळ विद्यापीठातून सायन्सची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी केली आणि यश मिळवले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)