जम्मू-काश्मीरमधील 'दुधाचं गाव', जिथे आहे विजेविना चालणाऱ्या 'देशी फ्रीज'ची अनोखी परंपरा

दुदरन गावामध्ये 'डडूर'मध्ये दूध टिकवून ठेवण्याची परंपरा खूप जुनी आहे.
फोटो कॅप्शन, दुदरन गावामध्ये 'डडूर'मध्ये दूध टिकवून ठेवण्याची परंपरा खूप जुनी आहे.
    • Author, माजिद जहांगीर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

काश्मीरच्या उंचंच उंच पर्वतरांगा आणि दऱ्याखोऱ्यांनी वेढलेल्या उरी जिल्ह्यातलं दुदरन हे गाव. जे नियंत्रण रेषेच्या (एलओसी) अगदी जवळ आहे.

आम्ही गावात पोहोचलो तेव्हा वातावरण अगदीच आल्हाददायक होतं. पानगळ सुरू झाली होती. थंडीची चाहूल लागल्यामुळे इथले लोक हिवाळ्यासाठी चारा आणि धान्याचा साठा करू लागले होते.

हे गाव दूध आणि खाण्यापिण्याच्या गोष्टी सुरक्षित ठेवण्यासाठी एका खास गोष्टीचा वापर करत. इथले लोक याला 'देशी रेफ्रिजरेटर' सुद्धा म्हणतात. याबद्दल जेव्हा आम्ही गावकऱ्यांशी बोलायला सुरुवात केली, तेव्हा ते अगदी आनंदाने आम्हाला हे देशी रेफ्रिजरेटर दाखवायला घेऊन गेले.

तिथे लाकूड आणि दगडांनी बनवलेली छोटी-छोटी घरं होती. यातला लाकडी दरवाजा उघडताच आत एका गुहेसारखी जागा दिसते, जिथे दुधाने भरलेली भांडी ठेवलेली होती.

संध्याकाळ होत आली होती आणि आम्ही हे पाहत असताना जरीना बेगम दूध घेऊन आल्या आणि त्यांनी ते या देशी फ्रीजमध्ये ठेवलं. त्यांनी नेहमीप्रमाणे संध्याकाळी आपल्या गाईची धार काढली होती आणि ते दूध घेऊन त्या येथे आल्या होत्या. इथल्या स्थानिक भाषेत या फ्रीजला 'डडूर' म्हटलं जातं.

जरीना सांगतात, "आम्ही लाकडाच्या या डडूरमध्ये दूध ठेवतो. दुधाचं दही बनतं, मग आम्ही लोणी काढतो आणि त्यापासून तूप बनवतो. ते तूप आम्ही स्वतः वापरतो. कधी कोणाला देतो, तर कधी विकतो सुद्धा."

"डडूरमध्ये दूध आठ-दहा दिवस चांगलं राहतं. विजेवर चालणाऱ्या फ्रिजमध्ये दूध खूप गोठतं आणि अनेकदा मुलं आजारी पडतात. डडूरमध्ये ठेवलेलं दूध आरोग्यासाठी चांगलं असतं."

गाव वसलंय तेव्हापासून आहे 'डडूर'

श्रीनगरपासून साधारण 95 किलोमीटर लांब असलेल्या या गावातले लोक सांगतात की, दुदरनची ओळखच दुधाशी जोडलेली आहे.

मोहम्मद हाफीज शेख म्हणतात, "आमच्या या देशी रेफ्रिजरेटरला काश्मिरी भाषेत डडूर म्हणतात. हे तितकेच जुने आहेत जितकं हे गाव. जेव्हापासून लोक इथे राहू लागले, तेव्हापासून हे डडूर बनवलेले आहेत. आधी इथे दूधदुभतं खूप असायचं, म्हणून गावाचं नावच 'दुदरन' पडलं, म्हणजेच अशी जागा जिथे भरपूर दूध मिळतं."

मोहम्मद हाफीज शेख यांच्या मते, 'दूध' या शब्दामुळेच 'दुदरन' गावाचे नाव पडले आहे.
फोटो कॅप्शन, मोहम्मद हाफीज शेख यांच्या मते, 'दूध' या शब्दामुळेच 'दुदरन' गावाचे नाव पडले आहे.

मोहम्मद शफी सांगतात, "डडूरला थंड ठेवण्याचं फक्त एकच साधन आहे ते म्हणजे पाणी. यासाठी वीज किंवा जनरेटरची गरज नसते. खाली पाणी साठवायला जागा केली जाते, ज्यामुळे गारवा टिकून राहतो. हे डडूर नेहमी अशाच ठिकाणी बनवले जातात जिथे नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत, कोरड्या जमिनीवर नाही."

लोणी आणि तूप बनवण्याची देशी पद्धत

या देशी फ्रिजचा वापर मार्च ते नोव्हेंबरपर्यंत होतो. हिवाळ्यात जेव्हा तापमान खूप खाली जातं, तेव्हा यांचा वापर केला जात नाही.

अनेकदा गावातले अनेक कुटुंब मिळून एक डडूर बनवतात. काही लोक स्वतःच्या घरासाठी वेगळा डडूर सुद्धा बनवतात. दूध काढण्यापासून ते तूप बनवण्यापर्यंतचं सगळं काम गावातल्या महिलाच करतात.

नूरजा अनेक वर्षांपासून आपल्या घरी लोणी आणि तूप बनवतात.
फोटो कॅप्शन, नूरजा अनेक वर्षांपासून आपल्या घरी लोणी आणि तूप बनवतात.

नूरजा आपल्या घराच्या वरच्या मजल्यावर अनेक वर्षांपासून तूप बनवत आहेत. त्या सांगतात, "गायीचं दूध काढून आम्ही ते डडूरमध्ये ठेवतो. काही दिवसांनी ते बाहेर काढून एका भांड्यात टाकतो आणि 'गुरूस मंथन' करतो. म्हणजेच खूप वेळ दूध घुसळतो, मग त्याचं लोणी बनतं आणि नंतर ते उकळून तूप तयार करतो. या प्रक्रियेला साधारण एक तास लागतो."

'ही परंपरा कधीच संपणार नाही'

गावातले अब्दुल अहद शेख यांनी सुद्धा स्वतःचा डडूर बनवला आहे. ते म्हणतात, "आमचं गाव अनेक गल्ल्यांमध्ये विभागलं गेलं आहे. प्रत्येक गल्लीत लोकांनी आपले स्वतःचे डडूर बनवले आहेत. ही परंपरा अशीच चालू राहील. आता इथे आधीसारखं जास्त दूध निघत नाही, पण आम्ही ते विकत नाही. स्वतःच्या वापरासाठी ठेवतो. कोणाकडे एक गाय आहे, तर कोणाकडे चार."

दुदरन या गावाची खरी ओळखच दुधामुळे आहे.
फोटो कॅप्शन, दुदरन या गावाची खरी ओळखच दुधामुळे आहे.

गावात आता काही घरांमध्ये विजेवर चालणारे फ्रिज सुद्धा आहेत, पण त्यांचा वापर जास्त करून भाज्या किंवा इतर गोष्टी ठेवण्यासाठी होतो. दूध आजही डडूरमध्येच ठेवलं जातं.

मोहम्मद कासिम सांगतात, "आमचे वडीलधारे म्हणायचे की या लाकडी फ्रिजला कधीच सोडू नका. पूर्वी जेव्हा विजेचे फ्रीज नव्हते, तेव्हा लोक कित्येक महिने याच डडूरमध्ये दूध, मटण आणि जेवण ठेवायचे. आता प्रत्येक घरात फ्रिज आहे पण जुनी माणसं आजही डडूरचं महत्त्व जाणतात."

बर्फवृष्टीत फुटण्याची भीती

गुलाम रसूल म्हणतात, "जेव्हा जास्त बर्फ पडतो, तेव्हा कधी कधी हे देशी फ्रीज तुटतात किंवा मोडतात. ते पुन्हा पुन्हा बनवावे लागतात. ज्यांच्याकडे दूध आहे, तेच हे बनवतात. आता हे काम हळूहळू कमी होत चाललं आहे."

ग्राफिक्स

हाफीज शेख सांगतात की, "नवीन पिढी आता गुरं पाळण्यात रस दाखवत नाहीये. जेव्हा गुरं राहणार नाहीत, तेव्हा दूधही राहणार नाही. आधी प्रत्येक घरात गाय, मेंढी किंवा शेळ्या होत्या. आता लोक कष्ट करायला कंटाळतात. भीती वाटते की येणाऱ्या काळात दुधाचं उत्पादन आणि ही परंपरा दोन्ही कमी होऊन जातील."

शेतीवर अवलंबून असलेलं गाव आणि आव्हानं

दुदरनचे बहुतेक लोक शेती आणि मजुरीवर अवलंबून आहेत. उंचावर वसलेल्या या गावात हिवाळ्यात खूप बर्फ पडतो, ज्यामुळे जगणं कठीण होतं.

सीमेजवळ असल्यामुळे लोकांना गोळीबाराची भीती सुद्धा असते. मात्र गावकऱ्यांनी सांगितलं की, यावेळी 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान गावात गोळीबार झाला नाही.

गावातील तरुणांमध्ये पशुपालनाची आवड कमी दिसून येते.
फोटो कॅप्शन, गावातील तरुणांमध्ये पशुपालनाची आवड कमी दिसून येते.

आजही हे गाव आपला साधेपणा आणि पारंपरिक जीवनशैली जपून आहे आणि 'डडूर' म्हणजे त्याच आयुष्याचा एक जिवंत भाग आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)