महाराष्ट्रातल्या गुहेची गोष्ट, जिथं राहतात जवळपास 150 गाई, 10 म्हशी, शेळ्या आणि 3 कुटुंब

- Author, प्राची कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठीसाठी
संध्याकाळ होऊन अंधार पडायला सुरुवात होते, तसं फोफसंडीच्या डोंगरावर गुरांच्या गळ्यातल्या घंटांचे आवाज ऐकू यायला लागतात.
गायी, म्हशी, शेळ्या ठरलेल्या वाटेने चालत राहतात. मागे मालक असो किंवा नसो, ठरलेल्या वेळी अंधार पडता पडता ती सगळी जनावरं गुहेच्या दारात पोहोचतात आणि एक एक करत गुहेत आपल्या ठरलेल्या जागी जाऊन उभी राहतात.
अहिल्यानगरच्या फोफसंडीची ही छोटेखानी गुहा जवळपास 150 गाई, 10 म्हशी शेळ्या आणि 3 कुटुंबांचं घर आहे.
गायी म्हशी आत जात असतात, तेव्हा खरंतर डोळ्यांना सवय होऊनही काही दिसणार नाही, इतका अंधार असतो. पण ज्या कुटुंबाच्या गायी म्हशी, त्यांच्या दिशेने जाऊन त्या बरोबर उभ्या राहतात.
मागे राहिलेली वासरं-रेडकं यांना चाहूल लागली की, ते ओरडायला सुरुवात करतात. अशातच एकीकडे ही जनावरं परतत असताना कुटुंबाच्या छोटेखानी जागेतल्या कोपऱ्यात दिवा लागतो आणि स्वयंपाकाची सुरुवात होते.
यातलंच एक घर आहे कुशाबा मगदेंचं. गुहेत आत शिरल्यावर सगळ्यात उजवीकडची जागा मदगेंची. त्यांची चौथी पिढी या गुहेत राहते आहे.

दरवर्षी पावसाळा सुरू होण्याच्या आसपास हे कुटुंब आपली जनावरं घेऊन इथं आसऱ्याला येतं. गुहेतल्या गुहेत आडोसा तयार करुन खोल्यासदृश्य जागा तयार केली जाते. त्यातच विटा, दगडांचं पार्टीशन शेणाने सारवून माणसांची रहायची जागा तयार होते. उरलेली सगळी जागा प्राण्यांसाठी.
सारवलेल्या छोट्याशा जागेत चूल आणि थोडी भांडी असं करून संसार थाटला जातो. सोबत आणलेले गाठोड्यातले कपडे आणि थोडकी भांडी वगळली तर संसार म्हणून फारसं काही साहित्य नाही.
पशुधनच गुहेत राहण्याला कारणीभूत
ही गुहेत राहायची सुरुवात होण्यालाही हे पाळीव प्राणीच कारणीभूत ठरल्याचं मदगे सांगतात, "सुरुवात म्हणजे आमची गावात लक्ष्मी गाय होती तिने इथं खोदलं होतं. औतानी माती बाहेर काढली. मग गड्यांनी आत खणून उकरून बाहेर नेली. त्यानंतर इथं राहायला सुरुवात झाली."
यात भर घालत गुहेतच पलीकडच्या बाजूला राहणारे म्हातारबाबा नामदेव मुठे सांगतात, "इथं पाऊस जास्त असतो. त्यामुळे पावसामुळे गाई म्हशी चरून इथं निवाऱ्याला बसायच्या. सकाळी चरायला सोडून दिलं की फिरून ही गुहा आहे तिथं बसायच्या. त्या वेळी खूप पाऊस पडायचा."

आता देखील हे पशुधनच त्यांच्या इथे राहण्याल्या कारणीभूत ठरतंय. खरंतर या प्रत्येकाची गावात घरं आहेत.
मात्र, पाळलेल्या गाई म्हशींची संख्या लक्षात घेता त्यांच्या गावातल्या छोटेखानी घरात एवढ्या जनावरांसाठी निवारा नाही. गोठा बांधणं शक्य नाही. त्यामुळे पावसाळ्यात जवळ आला की परिसरातल्या दोन गावांमधील ही लोकं गुहेचा रस्ता धरतात.
मुठे सांगतात, "आम्ही जनावरांसाठी गुहेत राहतोय. गावात गुरांना चरायला सोडलं, तर मग याच्या क्षेत्रात गेलं, त्याच्या क्षेत्रात गेलं असं होतं. त्यावरून वाद होतात. डोंगरात चरायला मोकळं सोडता येतं. त्यामुळे आम्ही इथं चार महिने राहतो."
असा असतो गुहेतला दिवस
पहाटे चार वाजताच या कुटुंबांचा गुहेतला दिवस सुरु होतो. पहाटे शेणकूर झालं की धारा काढायच्या.
मग घरातला एक सदस्य ते दूध घेऊन गावात जातो. गावातल्या गाडीतून दूध डेअरीला पाठवलं जातं. या कुटुंबांच्या उत्पन्नाचं हेच एकमेव साधन.
दुधासाठी कॅन घेऊन बाहेर पडतानाच इतर लोक जनावरांनाही मोकळं करत चरायला सोडतात.
डोंगरातल्या रोजच्या ठरलेल्या वाटेने मग या गायी म्हशी चरायला जातात. गायी म्हशींना सोबत केली नाही तरी काही फरक पडत नसल्याचं ते सांगतात.
ठरलेल्या वाटेनं डोंगराच्या वर असलेल्या मंदिराजवळ या गायी म्हशी चरायला जातात. शेळ्यांच्या मागे मात्र एक माणूस जावा लागतो.

हे होतानाच मागे असलेल्या लोकांची स्वयंपाकाची लगबग सुरू होते. एकीकडे स्वयंपाक तर दुसरीकडे पाणी भरण्याची धांदल. सकाळच्या स्वयंपाकासाठी किमान दिसतं तरी.
रात्री मात्र किर्र अंधारातच चिमण्या पेटवून चुलीच्या उजेडात अन्न शिजतं. स्वयंपाकापासून वापरण्यापर्यंत लागणारं पाणी आणण्यासाठी पुन्हा पायपीट करत इथल्या महिला जातात.
बीबीसी मराठीशी बोलताना वनिता मदगे म्हणाल्या, "आम्ही 6 महिने इथं राहतो. नंतर घरी जातो. दिवस आमचा साफसफाई करण्यात जातो. परत संध्याकाळ झाली की दिवा लावायचा आणि कामाला सुरुवात. रात्री स्वयंपाक करायचा आणि गाईंची धार काढायची. सकाळी उठलं की शेणकूर करायचं आणि धार काढायची."

गुहेतल्या अंधारात काम करण्याबद्दल विचारल्यावर वनिता सांगतात की, अंधारात काम करण्याची सवय झाली.
या गुहेत वीज नसली तरी इथून साधारण एक किलोमीटर भरच्या अंतरावर असणार्या वळे कुटुंबाच्या घरात मात्र वीजचे एक बल्ब जरा उजेड करतो. या कुटुंबासाठीच विजेच्या तारा डोंगरावर टाकल्या गेल्या आहेत.
मदगे मुठे सहा महिन्यांनी घरी जातात. मात्र वळेंसाठी ही गुहा हेच त्यांचं कायमचं घर आहे. गुहेच्या खाली डोंगर उतारावर वळेंची शेती आहे. आणि गुहेत पशुधन.
कायमच इथं राहत असल्याने त्यांनी इतर कपाऱ्यांमध्ये चारा ठेवण्यासाठी, जनावरं ठेवण्यासाठी जागा तयार केली आहे. इथं बिबट्याचा वावर असल्यानं बंदिस्त जागा आवश्यक असल्याचं वळे सांगतात.
या कुटुंबात लग्न होऊन येताना जवळच्या गावात लहानपण घालवलेल्या संगीता लक्ष्मण वळे यांना मात्र पूर्ण वेळ गुहेत राहावं लागेल याचा अंदाज नसल्याचं त्या प्रांजळपणे सांगतात.
गुहेत रहायची सवय करावी लागल्याचं त्या नोंदवतात. संगीता म्हणाल्या, "गुहेबद्दल माहीत होतं. पण इतकं गर्दीने इथंच राहतात ते माहित नव्हतं. लग्न झाल्यावर त्यांनी इथंच आणलं तेव्हा कळालं. यांचे कुटुंबिय मात्र पूर्वीपासूनच इथे राहतात. ही त्यांची चौथी पिढी आहे."
'अधिकाऱ्यांना वाटतं आम्ही त्यांना घरकुल देत नाही'
गुहेत राहणं प्राचीन काळातलं वाटत असलं तरी या सगळ्यांसाठी ते नव्या जुन्याची सांगड घालणारं आहे.
अंधारात दिवस घालवणाऱ्या या लोकांकडे मोबाईलची फोन आहेत. ते चार्ज करण्यासाठी खाली गावातल्या घरांमध्ये त्यांचं येणं जाणं चालू असतं. मात्र, या घरांमध्ये जनावरांसाठी निवारा नसल्याने पावसाळा इथं घालवण्याशिवाय गत्यंतर नसल्याचंही ते सांगतात.
त्यांची नवी पिढी मात्र खाली गावातच राहते. मुलं शाळांमध्ये जातात. कुटुंबातला एक सदस्य मुलांसोबत गावातल्या घरात राहतो.
गुहेत राहणार्या या लोकांबद्दल प्रशासनाला कळाल्यावर सरकारी लोकांची बरीच धावपळ झाल्याची आठवण हे ग्रामस्थ सांगतात.

अगदी वरिष्ठ पातळीवरचे अधिकारी देखील गुहांना भेटी देण्यासाठी आल्याचं ते नोंदवतात. याबाबत अहिल्यानगरमधील फोफसंडी गावचे सरपंच सुरेश वळेंना विचारलं.
बीबीसी मराठीशी बोलताना वळे म्हणाले, "अधिकाऱ्यांना वाटतं आम्ही त्यांना घरकुल देत नाही. पण तशी परिस्थिती नाही. त्यांची घरं आहेत. त्यांच्यासाठी प्रश्न आहे तो त्यांच्या जनावरांचा आणि त्यांना चारण्याचा".
हेच प्रश्न घेत या कुटुंबांच्या पिढ्यानुपिढ्या या गुहांमध्ये आपलं निम्मं अर्धं आयुष्य घालवत आहेत.
कमी गरजांमध्ये जुन्या काळात राहत असल्यासारखं जगत आहेत.
तुटपुंज्या साहित्यात गुहेतले संसार नव्या पिढीला दिशा देण्यासाठी पोटापाण्याची सोय करत आजही जगत आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











