You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गरम की थंड, हिवाळ्यात कोणत्या पाण्यानं अंघोळ करणं जास्त चांगलं असतं?
- Author, इफ्तेखार अली
- Role, बीबीसी प्रतिनिधी
थंडीचे दिवस सुरू होताच अनेक लोकांना अंघोळीचा कंटाळा यायला लागतो. मग सकाळी अंघोळ करावी की नाही?' असा प्रश्न समोर येतो.
अगदी धाडस करून अंघोळीसाठी मनाची तयारी जरी केली तरी, पुढे आणखी एक प्रश्न असतो, "अंघोळ गरम पाण्यानं करावी की थंड पाण्यानं?"
बरेच लोक म्हणतात की, थंडीत गरम पाण्यानं अंघोळ करणं चांगलं असतं. यामुळे शरीराला आराम मिळतो, थकवा दूर होतो आणि सर्दीपासून संरक्षण होतं, असं त्यांचं म्हणणं असतं.
पण दुसरीकडं, काही लोकांचं असंही म्हणणं असतं की, गरम पाण्यानं अंघोळ केल्यानं त्वचा कोरडी होते, केसांचं नुकसान होतं आणि शरीरावरील तेलाचा नैसर्गिक थर नष्ट होतो.
मग नेमकं सत्य काय आहे? प्रत्येक ऋतूत आपण थंड पाण्यानं अंघोळ केली पाहिजे की थंडीत गरम पाण्यानं अंघोळ केली पाहिजे?
तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घेऊया?
इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायंटिफिक रिसर्च अँड इंजिनीअरिंग डेव्हलपमेंटमध्ये, 2022 मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधन अहवालानुसार, शरीराच्या बाह्य पृष्ठभागावर केराटिन पेशी असतात.
गरम पाण्यानं अंघोळ केल्यानं या पेशींचं नुकसान होतं. यामुळे एक्जिमासारखे त्वचारोग आणखी वाढू शकतात.
गरम पाण्यानं अंघोळ केली तर काय होतं?
हिवाळ्याच्या दिवसांत लोक अनेकदा गरम पाण्यानं अंघोळ करणं पसंत करतात, परंतु त्वचारोगतज्ज्ञ याला एक मोठा धोका मानतात.
त्यांच्या मते, जास्त गरम पाण्यामुळे आपल्या त्वचेवर असलेल्या नैसर्गिक संरक्षणात्मक थराचं नुकसान होतं.
उत्तर प्रदेशातील नोएडा येथील कैलास रुग्णालयातील वरिष्ठ सल्लागार त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अंजू झा म्हणतात की, थंडीत गरम पाण्यानं अंघोळ करता येते, परंतु पाणी कोमट असलं पाहिजे, जास्त गरम नाही.
डॉ. अंजू झा यांच्या मते, "खूप गरम पाण्यानं अंघोळ केल्यानंतर त्वचेवर कोरडेपणा येऊ शकतो, त्याला आपण 'झेरोसिस' म्हणतो."
अपोलो हॉस्पिटलमधील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. डी. एम. महाजन म्हणतात की, थंडीत अंघोळ करताना पाणी गरम असलं पाहिजे, परंतु तुम्हाला थंडी जाणवणार नाही इतकंच ते गरम असलं पाहिजे.
आपल्या त्वचेच्या वरच्या थरात सीबम आणि लिपिडचा पातळ तेलकट थर असतो, जो शरीराला बॅक्टेरिया, धूळ आणि बाह्य संक्रमणांपासून वाचवतो.
हा थर त्वचेचा ओलावा राखण्यास देखील मदत करतो.
डॉ. डी. एम. महाजन म्हणतात की, "जर तुम्ही शरीरावर जास्त गरम पाणी ओतलं तर त्यावर आधीपासूनच असलेलं गरजेचं तेल धुवून जाईल. कोणी खूप गरम पाण्याचा वापर केला तर तो थर वेगानं फाटू लागतो."
त्यांच्या मते, तेलाचा थर निघून गेल्यास थोडी अस्वस्थता येऊ शकते. गरम पाण्यामुळे त्वचा कोरडी होते आणि शरीराला खाज येऊ लागते.
कोणाला जास्त धोका?
पाणी खूपच गरम असेल, तर अशा परिस्थितीत कोणत्याही सामान्य व्यक्तीला त्रास होऊ शकतो. परंतु काही वेळा, जर पाणी नेहमीपेक्षा गरम असेल तर यामुळे काही लोकांना अधिक समस्या उद्भवू शकतात.
डॉ. अंजू सांगतात की, "जर त्वचेवर आधीच कोरडेपणा असेल आणि तुम्ही जास्त गरम पाण्यानं अंघोळ केली तर त्वचारोग आणि एक्जिमा होण्याची शक्यता वाढते."
त्वचारोग ही एक सामान्य समस्या आहे ज्यामुळे त्वचेत जळजळ आणि खाज सुटते. यामुळे त्वचा लाल होते.
डॉ. डी.एम. महाजन यांचंही असंच म्हणणं आहे की, जर एखाद्याला आधीच एक्जिमा (एटोपिक डर्माटायटीस) असेल तर गरम पाण्यानं अंघोळ करणं त्यांच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतं.
एक्जिमा हा त्वचेचा आजार आहे ज्यामुळे त्वचा कोरडी आणि लाल होते. तसेच यामुळे खूप खाज सुटते.
डॉ. डी.एम. महाजन म्हणतात की, जर तुम्ही पॉलीसिथेमिया व्हेरा (एक असा आजार ज्यामध्ये शरीरात खूप जास्त लाल रक्तपेशी तयार होतात) चे रुग्ण असाल तर गरम पाण्यानं अंघोळ करण्याच्या बाबतीत तुम्हाला अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
ते म्हणतात की, "जर या आजारानं ग्रस्त असलेल्या लोकांनी जास्त गरम पाण्यानं अंघोळ केली तर त्यांची त्वचा अधिक लालसर दिसू लागेल."
थंडीत अचानक थंड पाण्यानं अंघोळ केली तर?
जर कडाक्याची थंडी असेल आणि तुम्ही शरीरावर थंड पाणी ओतत असाल तर ते प्राणघातक देखील ठरू शकतं.
अधिक माहितीसाठी आम्ही दिल्लीच्या बीएलके-मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार न्यूरोलॉजिस्ट आणि न्यूरोव्हास्क्युलर इंटरव्हेन्शन डॉक्टर प्रतीक किशोर यांच्याशी चर्चा केली.
ते सांगतात की, जेव्हा आपलं शरीर अचानक खूप थंड किंवा खूप गरम पाण्याच्या संपर्कात येतं तेव्हा रक्तवाहिन्या त्वरित प्रतिक्रिया देतात.
डॉक्टर प्रतीक म्हणतात, "त्वचेवर खूप थंड पाणी पडताच रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयाचे ठोके अचानक वाढू शकतात.
तसंच खूप गरम पाणी पडतं तेव्हा रक्तवाहिन्या विस्तारू लागतात, यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो आणि त्यामुळे चक्कर किंवा अशक्तपणा येऊ शकतो. म्हणूनच, जास्त गरम पाणी टाळणं महत्वाचं आहे."
त्यांच्या मते, ज्या लोकांना आधीच हृदयरोग, रक्तवाहिन्या ब्लॉक होणं, उच्च रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित इतर कोणताही आजार असेल, त्यांच्यासाठी तापमानात अचानक बदल होणं आणखी धोकादायक ठरू शकतं.
ते म्हणाले, "खूप थंड पाण्यामुळे रक्तदाब वेगानं वाढू शकतो, त्यामुळं हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढू शकतो."
थंड पाण्यानं अंघोळ करण्याबाबत डॉ. अंजू सांगतात की, "कडाक्याच्या थंडीत खूप थंड पाण्यानं अंघोळ करणं शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं."
ते म्हणाले, "अशा परिस्थितीत चिलब्लेनचा धोका वाढतो. चिलब्लेनमध्ये बोटं, बोटांची टोकं आणि बोटांमध्ये निळसरपणा, सूज किंवा जळजळ होऊ शकते. सर्दीमुळे रक्ताभिसरण खराब झाल्यामुळे ही समस्या उद्भवते."
हिवाळ्यात जास्त थंड पाण्यानं अंघोळ करणं टाळलं पाहिजे तसेच शरीराचं तापमान संतुलित ठेवणं महत्वाचं आहे, असा सल्ला त्या देतात.
डॉ. अंजू म्हणतात, "लहान मुलं आणि वृद्धांची त्वचा आधीपासूनच संवेदनशील असते, म्हणून जास्त गरम पाण्यानं अंघोळ केल्यानं कोरडेपणा, चिडचिड आणि त्वचा फाटण्याचा धोका वाढू शकतो."
त्या म्हणतात, "हिवाळ्यात कोमट पाण्यानं आंघोळ करणं चांगलं. याशिवाय अंघोळीनंतर त्वचेवर मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे, जेणेकरून कोरडी त्वचा, खाज यापासून बचाव होऊ शकेल."
हातपंप किंवा बोअरवेलचं पाणी
ग्रामीण भागात लोक अनेकदा हातपंप किंवा बोअरवेलचा वापर करतात. थंड हवामान असलं की, या हातपंपातून किंवा बोअरवेलमधून किंचित कोमट पाणी बाहेर पडतं.
हेच कारण आहे की, आजही ग्रामीण भागात लोक पाणी न तापवता आंघोळ करतात. परंतु डॉक्टर बऱ्याच प्रकरणांमध्ये याबद्दल इशारा देतात.
अनेक ग्रामीण भागात जमिनीतून बाहेर पडणाऱ्या पाण्यातही हलक्या खनिजांचे घटकही असतात.
तापमानानुसार हे पाणी हिवाळ्यात थोडं गरम आणि उन्हाळ्यात थोडं थंड वाटतं, त्यामुळे अंघोळीसाठी हे पाणी लोकांना आरामदायक वाटतं.
पण डॉ. डीएम महाजन म्हणतात की, या पाण्यामुळे कधीकधी त्वचेवर जळजळ आणि खाज सुटणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
त्यांच्या मते, त्यात असलेल्या खनिजांचं प्रमाण हे या मागचं कारण आहे. या पाण्यात क्लोराइड्स, सल्फेट्स किंवा इतर विरघळलेल्या क्षारांचं प्रमाण जास्त असेल, तर ते पाणी 'हार्ड वॉटर' या वर्गवारीत येतं.
त्यांच्या मते, "जेव्हा जडपणा वाढतो तेव्हा हे पाणी त्वचेचा नैसर्गिक तेलाचा थर नष्ट करते. यामुळे त्वचेत कोरडेपणा, खाज सुटणे आणि जळजळ यासारख्या समस्या वाढतात.
याशिवाय अशा पाण्यात जास्त प्रमाणात खनिजं आढळल्यानं केसांचा पोत देखील बिघडू शकतो आणि केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात."
त्यामुळे जमिनीतून बाहेर पडणारं पाणी तापमानाच्या दृष्टिनं चांगलं वाटत असलं तरी त्याची गुणवत्ता आणि त्यात असलेल्या खनिजांचं प्रमाण त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करतं.
यावर डॉ. प्रतीक म्हणतात, "पूर्वी जीवनशैलीशी संबंधित इतके आजार नव्हते. गावातील वडीलधारी मंडळी बहुतेक शारीरिकदृष्ट्या सक्रिय होती. ते शेतात कठोर परिश्रम करायचे. त्यांचं शरीर असे 'तापमानाचे धक्के' सहन करू शकत होतं. परंतु जे आधीच हृदय किंवा रक्तदाबाचे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी धोका अजूनही कायम आहे."
केसांवर काय परिणाम होतो?
खूप गरम पाण्यानं अंघोळ केल्यानं केवळ त्वचेवरच नव्हे तर केसांवरही परिणाम होतो.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, गरम पाण्यानं अंघोळ केल्यानं केसांमधील नैसर्गिक ओलावा कमी होतो, त्यामुळं केस कोरडे होऊ शकतात. हे एकमेकांत अडकू शकतात आणि तुटू शकतात.
डॉ. डीएम महाजन सांगतात की, त्वचेप्रमाणेच आपल्या केसांमध्ये देखील नैसर्गिक तेल असतं आणि जेव्हा आपण आपल्या केसांवर जास्त गरम पाणी ओततो तेव्हा ते निघून जातं, ज्यामुळे आपले केस कोरडे होतात.
या कारणास्तव, डॉक्टरांनी शिफारस केली आहे की, थंडी असेल किंवा उन्हाळा आपण नेहमी अंघोळीसाठी कोमट पाणी वापरावं, जास्त गरम पाणी टाळावं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.