PAK vs NZ : बेंगळुरूच्या पावसात फखर झमानची षटकारांची बरसात, पाकिस्तानचा न्यूझीलंडवर महत्त्वाचा विजय

PAK vs NZ : बेंगळुरूच्या पावसात फखर झमानची षटकारांची बरसात, पाकिस्तानचा न्यूझीलंडवर महत्त्वाचा विजय

फोटो स्रोत, Getty Images

फखर झमानच्या वादळी शतकामुळे पाकिस्ताननं न्यूझीलंडचा 21 धावांनी पराभव केलाय. बेंगळुरूमधील हा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानला विजयी घोषित करण्यात आलं.

पाकिस्तानचा सलामीवीर फखर झमान या स्पर्धेत खराब फॉर्म आणि दुखापतीमुळे पाच सामने खेळू शकला नाही. त्याचा या स्पर्धेतील तिसराच सामना होता.

बांगलादेशविरुद्ध 81 धावा काढणाऱ्या फखरनं न्यूझीलंडविरूद्ध षटकारांची बरसात करत वादळी शतक झळकावलं.

न्यूझीलंडनं दिलेल्या 401 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानला आक्रमक सुरूवातीची गरज होती. फखरनं ती गरज पूर्ण केली.

फखरनं 81 बॉलमध्ये 8 चौकार आणि 11 षटकारांसह नाबाद 126 धावा केल्या.

वन-डे विश्वचषकातील एकाच सामन्यात 10 पेक्षा जास्त षटकार लगावणारा फखर झमान हा चौथा फलंदाज बनलाय. या विश्वचषक स्पर्धेत ही कामगिरी करणारा तो आत्तापर्यंतचा एकमेव खेळाडू आहे.

फखर आणि बाबरनं दुसऱ्या विकेटसाठी नाबाद 194 धावांची भागिदारी केली. बाबरनं 63 बॉलमध्ये नाबाद 66 धावा काढल्या.

पाकिस्तानचा महत्त्वाचा विजय

बेंगळुरूमधील पावसामुळे संपूर्ण सामना होऊ शकली नाही. पावसामुळे खेळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा डकवर्थ लुईस पद्धतीनुसार पाकिस्तान 21 धावांनी पुढं होतं. त्यामुळे पाकिस्तानला विजयी घोषित करण्यात आलं.

पाकिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

या विजयानंतर पाकिस्तान आणि न्यूझीलंड दोन्ही संघाचे प्रत्येकी आठ पॉईंट्स झाले आहेत. आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी दोन्ही संघांना शेवटचा सामना जिंकणं आवश्यक आहे.

न्यूझीलंडचा शेवटचा सामना 9 नोव्हेंबरला श्रीलंकेविरुद्ध होणार असून पाकिस्तानचा 11 नोव्हेंबरला इंग्लंडविरुद्ध होणार आहे.

न्यूझीलंडची सर्वोच्च धावसंख्या

त्यापूर्वी राचिन रविंद्रच्या दमदार शतकामुळे न्यूझीलंडनं पाकिस्तानसमोर विजयासाठी 402 धावांचं आव्हान ठेवलं होतं. न्यूझीलंडनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 बाद 401 धावा केल्या.

वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील न्यूझीलंडची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 2015 साली 6 बाद 393 धावा केल्या होत्या.

रवींद्रचा विक्रम

न्यूझीलंडचा 23 वर्षांचा तरुण खेळाडू राचिन रविंद्र हा या मोठ्या धावसंख्येचा शिल्पकार ठरला. त्यानं या स्पर्धेतील तिसरं शतक झळकावताना 108 धावा केल्या.

राचिननं यापूर्वी इंग्लंडविरुद्ध अहमदाबादमध्ये नाबाद 123 तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध धरमशालामध्ये 116 धावा केल्या होत्या.

राचिन

फोटो स्रोत, Getty Images

विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वात कमी वयात ( 23 वर्ष 351 दिवस) तीन शतक झळकावणारा तो खेळाडू बनलाय.

पहिल्याच विश्वचषक स्पर्धेत तीन शतक झळकावणारा एकमेव खेळाडू तसंच एकाच विश्वचषक स्पर्धेत तीन शतक झळकावणारा पहिला न्यूझीलंडचा फलंदाज हे विक्रम त्यानं या सामन्यात केले.

रविंद्र – विल्यमसनची भागिदारी

राचिन रविंद्रला न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यानं खंबीर साथ दिली. विल्यमसन दुखापतीमुळे या स्पर्धेतील दुसराच सामना खेळतोय.

त्यानं या सामन्यात 79 बॉलमध्ये 95 धावा केल्या. या खेळीत 10 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.

रविंद्र आणि विल्यमसन या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी 180 धावांची भागिदारी केली.

अन्य फलंदाजांचीही फटकेबाजी

रविंद्र आणि विल्यमसन बाद झाल्यानंतर अन्य फलंदाजांनीही फटकेबाजी करत पाकिस्तानला कोणतीही संधी दिली नाही.

डॅरील मिचेल 29, मार्क चॅपमन 39, ग्लेन फिलिप्स 41 आणि मिच सँटनरनं नाबाद 26 धावा करत न्यूझीलंडला 400 धावांचा टप्पा ओलांडून दिला.

आफ्रिदीवर नामुश्की

पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं 3 विकेट्स घेतल्या. हसन अली, हॅरीस रौफ आणि इफ्तिखार अहमद यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीसाठी हा सामना निराशाजनक ठरला. त्यानं 10 ओव्हर्समध्ये 90 रन दिले. आफ्रिदी विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील पाकिस्तानचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)