ए. राजा स्वतंत्र तामिळनाडू, भारताची एकसंघता आणि श्रीरामाबद्दल नेमकं काय म्हणालेत

तामिळनाडूच्या सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांच्या एका वक्तव्यावरुन वादाला सुरुवात झाली आहे. ए. राजा यांच्या वक्तव्यामुळं काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडी बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळत आहे.

गेल्या आवड्यात ए. राजा यांनी भारत हा पारंपरिकदृष्ट्या एक भाषा आणि एक संस्कृती असलेला देश नाही, असं म्हटलं होतं.

'भारत हा एक देश नसून उपखंड आहे', असं ते म्हणाले होते.

एक मार्च रोजी कोइंबतूरमध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात राजा बोलत होते.

"एक देशचा अर्थ एक भाषा, एक संस्कृती, एक परंपरा असा आहे. भारत एक देश नाही तर उपखंड होता. याठिकाणी तामिळनाडू एक देश आहे. त्याची भाषा आणि संस्कृती एक आहे. मल्याळम एक वेगळी भाषा आणि संस्कृती आहे. त्या सर्वांच्या एकत्र येण्यानं भारत देश तयार झाला आहे. त्यामुळं भारत हा उपखंड ठरतो, देश नाही."

. राजा यांनी तामिळमध्ये केलेल्या या भाषणाची क्लिप इंग्रजी सबटायटलसह सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजप याबाबत इंडिया आघाडी आणि काँग्रेसवर टीका करत आहे.

ए. राजा आणखी काय म्हणाले?

ए. राजा यांनी बिलकिस बानो गँगरेप केसमधील दोषींच्या सुटकेवर 'जय श्री राम' आणि 'भारत माता की जय' अशा घोषणा दिल्याचा उल्लेख केला. "आम्ही अशाप्रकारे लोकांच्या घोषणा कधीही सहन करणार नाही. तामिळनाडू कधीही हे स्वीकारणार नाही. तुम्ही लोकांना आम्ही रामाचे शत्रू आहोत, असं जाऊन सांगा," असंही ते म्हणाले.

ए. राजा यांनी पंतप्रधान मोदींच्या एका वक्तव्याचाही उल्लेख केला. मोदींनी या व्क्तव्यामध्ये निवडणुकीनंतर डीएमके पक्षाचं अस्तित्व संपेल, असं म्हटलं होतं.

या वक्तव्यावर राजा म्हणाले की, जोपर्यंत भारत असेल तोपर्यंत डीएमके असेल.

"तुम्ही म्हणाले की, निवडणुका झाल्यानंतर डीएमकेचं अस्तित्व राहणार नाही. पण निवडणुकीनंतर डीएमकेचं अस्तित्व राहिलं नाही तर भारतही शिल्लक राहणार नाही हे लक्षात ठेवा. तुम्ही शब्दांचा खेळ करत आहात का?" असं ए राजा म्हणाले होते.

याशिवाय पुढं राजा यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचा उल्लेख केला होता. "भारत शिल्लकच राहणार नाही असं मी का म्हणत आहे? कारण तुम्ही पुन्हा सत्तेत आले तर भारतीय संविधानच नसेल म्हणजे भारतही नसेल. जर भारताचं अस्तित्वच शिल्लक राहिलं नाही तर तामिळनाडूचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं जाईल. आपल्याला ती स्थिती हवी आहे का?" असंही ते म्हणाले.

भारत वैविध्य आणि अनेक संस्कृती असलेला देश आहे, असं ए. राजा म्हणाले होते.

"तुम्ही जर तामिळनाडूला आले तर त्याठिकाणी एक संस्कृती आहे. केरळची वेगळी आणि दिल्ली आणि ओडिशाची संस्कृती वेगळी आहे. मणिपुरी लोक कुत्र्याचं मांस खातात, ती एक वेगळी संस्कृती आहे. ती त्यांची संस्कृती आहे."

"पाण्याच्या एका टाकीतून पाणी येतं. हेच पाणी स्वयंपाकघर आणि शौचालयातही जातं. आपण स्वयंपाकघरासाठी शौचालयातून पाणी घेत नाही. असं का? कारण अशाप्रकारे आपण फरक स्वीकारत असतो. आपसांतील फरक आणि वैविध्य स्वीकारायला हवं. तुमची (भाजप-आरएसएस) अडचण काय आहे. तुम्हाला कोणी गोमांस खाण्यास सांगितलं आहे का? त्यामुळं विविधतेतील एकता हीच भारतासाठी महत्त्वाची आहे. या देशातील विविधता स्वीकारा," असं ए राजा म्हणाले होते.

"माझे नाक आणि कान अगदी हुबेहूब दुसऱ्या व्यक्तीसारखे आहेत का? नाही. ते सर्वांसाठी सारखे कशासाठी असावेत. प्रत्येकाला ती व्यक्ती आहे तसंच स्वीकारायला हवं. त्यातच अधिक समजूतदारपणा आहे. जर तुम्ही सर्व सारखे बनण्याचा प्रयत्न केला तर काय होईल. हाच धोका आता निर्माण झाला आहे," असंही ए राजा म्हणाले होते.

काँग्रेस, आरजेडी दोन हात लांब

ए. राजा यांच्या या वक्तव्यावरून केवळ भाजपच नव्हे तर त्यांच्यात आघाडीतील सहकारीही त्यांच्यावर टीका करत आहेत. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गिरिराज सिंह म्हणाले की, अशा लोकांना 'सनातन संस्कृती उध्वस्त करायची आहे.'

आरजेडी नेते तेजस्वी यादव म्हणाले की, "हे वक्तव्य म्हणजे ए राजा यांचे वैयक्तिक विचार आहेत. संपूर्ण आघाडीचं तसं मत नाही."

काँग्रेस प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत यांनीही याबाबत त्यांचं मत मांडलं. काँग्रेस या वक्तव्याशी पूर्णपणे असहमत असून राम सर्वांचे आहेत, असं त्या म्हणाल्या.

भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी याबाबत एक्सवर त्यांचं मत मांडलं.

"डीएमकेची द्वेषपूर्ण भाषणं सुरुच आहेत. उदयनिधि स्टॅलीन यांनी सनातन धर्म नष्ट करण्याचं आव्हान केल्यानंतर आता राजादेखिल भारताच्या विभाजनाचं आवाहन करत आहेत. ते प्रभू श्रीरामावर टीका करत आहेत. एक राष्ट्र म्हणून भारताच्या विचारांवर ते प्रश्न उपस्थित करत आहेत."

काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी काँग्रेस ए राजा यांच्या वक्तव्याचा निषेध करत असल्याचं म्हटलं आहे.

"मी त्यांच्या वक्तव्याशी 100 टक्के असहमत आहे. मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करते. माझ्या मते इमाम-ए-हिंद अशी ओळख असलेले राम समुदाय, धर्म आणि जातींच्या पलिकडले होते. राम जीवन जगण्याचा आदर्श आहेत. राम मर्यादा आहेत. राम मर्यादा आणि प्रेमही आहेत," असंही त्या म्हणाल्या.

"मी या वक्तव्याचा पूर्णपणे निषेध करतो. हे त्यांचं ( ए राजा ) वक्तव्य असू शकतं. मी त्याचं समर्थन करत नाही. मी त्याचा निषेध करते. मला वाटतं लोकांनीही बोलताना थोडा संयम ठेवावा."

सनातन धर्माबाबत काय म्हणाले उदयनिधी

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा आणि राज्य सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी गेल्यावर्षी दोन सप्टेंबरला तमिळनाडूमध्ये आयोजित एका कार्यक्रमात अनेक वाईट सामाजिक गोष्टींसाठी सनातन धर्माला जबाबदार ठरवलं होतं. तसंच समाजातून ते नष्ट करण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं.

"सनातन धर्म लोकांत जात आणि धर्माच्या नावावर विभाजन करणारा विचार आहे. तो संपवणं म्हणजे मानवता आणि समानता याला प्रोत्साहन देणं आहे," असं ते म्हणाले होते.

"ज्या प्रकारे आपण मच्छर, डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनाला संपवतो त्याचप्रकारे फक्त सनातन धर्माला विरोध करणं पुरेसं नाही. याला समाजातून पूर्णपणे नष्ट करणं गरजेचं आहे," असं उदयनिधी म्हणाले होते.

या वक्तव्यावर आरएसएस, भाजप आणि डाव्यांकडून अत्यंत प्रखर प्रतिक्रिया पाहायला मिळाली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी, "हा आमच्या धर्मावरील हल्ला आहे," असं म्हटलं होतं.

मात्र, या वक्तव्यावरून अनेक वाद झाल्यानंतरही उदयनिधी यांनी वक्तव्यावर ठाम असल्याचं म्हटलं होतं.

आम्ही समाजातील पीडित आणि वंचितांचा आवाज उठवला आहे. त्यांना सनातन धर्मामुळं त्रास सहन करावा लागत आहे, असं ते म्हणाले होते.

आम्ही आमच्या मुद्द्यावर ठाम आहोत. कोणत्याही कायदेशीर आव्हानाचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आम्ही द्रविड भूमीवरून सनातन धर्म हद्दपार करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि त्यावरून आम्ही एक इंचही मागे हटणार नाही, असंही उदयनिधी म्हणाले होते.

उदयनिधी यांच्या या वक्तव्याच्या विरोधात प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं आणि सर्वोच्च न्यायालयानं सोमवारी त्यांना याबाबत कठोर शब्दांत सुनावलं.

सोमवारी सुप्रीम कोर्टात उदयनिधी स्टॅलिन यांच्या एका अपिलावर सुनावणी झाली. त्यात त्यांनी महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये त्यांच्या विरोधात दाखल झालेल्या एफआयआर एकत्र करण्याची मागणी केली होती.

या प्रकरणी सुनावणी करताना न्या. संजीव खन्ना आणि जस्टीस दीपांकर दत्ता यांच्या पीठानं एक मंत्री या नात्यानं उदयनिधी स्टॅलिन यांनी बोलताना तारतम्य बाळगायला हवं आणि त्याच्या परिणामांसाठी सज्ज राहायला हवं असं म्हटलं होतं.

"तुम्ही कलम 19(1)(अ) (अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार) अंतर्गत तुमच्या अधिकारांचा गैरवापर करत आहात. तुम्ही कलम 25 (विवेकाचं स्वातंत्र्य, धर्म स्वीकारणे आणि त्याचा प्रचार करण्याचं स्वातंत्र्य) या अंतर्गत अधिकारांचा गैरवापर करत आहात. आपण जे बोललात त्याचा परिणाम काय होईल हे तुम्हाला माहिती नाही का? तुम्ही आता सामान्य व्यक्ती नाही. तुम्ही मंत्री आहात. तुम्हाला परिणाम माहिती असायला हवे," असं न्यायालयानं म्हटलं.