नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू, पोलिसांनी काय सांगितलं?

    • Author, मुस्तान मिर्झा
    • Role, बीबीसी मराठीसाठी

(बातमीतील तपशील विचलित करू शकतात)

नांदेड जिल्ह्यातील एका गावात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (24 नोव्हेंबर) उघडकीस आली आहे.

नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार या गावात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. नेमकं काय घडलं, एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूमागे नेमकं कारण असू शकतं, पोलीस काय म्हणाले, जाणून घेऊन या.

नेमकं काय घडलं?

नांदेड जिल्हयातील मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावात राहणारं हे लखे कुटुंब.

मिळालेल्या माहितीनुसार, या कुटुंबात मोजून चारच जण राहात होते. 51 वर्षीय रमेश होनाजी लखे आणि 44 वर्षीय राधाबाई रमेश लखे आणि त्यांची दोन मुलं 22 वर्षीय बजरंग रमेश लखे आणि 25 वर्षीय उमेश रमेश लखे.

यातल्या बजरंग आणि उमेश या दोन्ही सख्ख्या भावांनी मुदखेड तालुक्यातील मुगट रेल्वे स्थानक परिसरात आत्महत्या केली असल्याचं पोलिसांनी सांगितले.

तर त्यांचे आईवडील रमेश आणि राधाबाई आपल्या घरात मृतावस्थेत आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.

आई-वडिलांनी आत्महत्या केली असावी की घातपात झाला असावा याचा पोलीस तपास करत आहेत.

जवळा मुरार गावच्या सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडे ते सहा सातच्या दरम्यान लखे दांपत्य मृत अवस्थेत आढळून आले तर, सकाळी साठे आठला त्यांची दोन्ही मुलं घराबाहेर मृत अवस्थेत सापडली.

तर यामागचं कारण काय असावं असं विचारलं असता त्यांचे नातेवाईक बालाजी लखे यांनी आपल्याला याबाबत काही माहिती नसल्याचं माध्यमांना सांगितलं.

"ते शेती करायचे, सगळं समाधानी होतं, दोन्ही पोरं कामही करायचे. पण आता काय झालं असावं ते त्या चौघांनाच माहिती", असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

या घटनेमागचं कारण अजून समोर आलं नसलं तरी, आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडला असल्याचा प्राथमिक अंदाज लावला जात आहे.

घटनास्थळी फॉरेन्सिक पथकदेखील दाखल झालं असून, घराची आणि परिसराची बारकाईनं तपासणी करण्यात येत आहे.

जवळा मुरार गावात सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच वरिष्ठ अधिकारीदेखील गावात दाखल झाले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी अर्चना पाटील, बारड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि अन्य पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

गावात तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

चौघांचेही मृतदेह पोस्टमार्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

उमेश लखे हा मनसेचा मूदखेड तालुक्याचा माजी उपाध्यक्ष होता.

तो सामाजिक कार्यात सक्रिय असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे ही घटना राजकीय व सामाजिक वर्तुळातही चर्चेचा विषय ठरली आहे.

पोलीस काय म्हणाले?

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेची माहिती घेतली.

त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "प्राथमिक तपासात ही घटना आत्महत्येची असल्याचं दिसत असलं तरी, आम्ही कोणताही निष्कर्ष घाईनं काढणार नाही. सर्व बाजूंनी तपास सुरू असून, पोस्टमार्टम अहवाल आणि फॉरेन्सिक तपासानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल."

दरम्यान, आर्थिक अडचणींमुळे हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, याबाबत कोणतेही ठोस पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत.

महत्त्वाची सूचना

औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे.

तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212

सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)

इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000

विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.