You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'सॉरी मम्मी, आपका आखरी बार दिल तोड रहा हूं', म्हणत दहावीत शिकणाऱ्या सांगलीच्या मुलाची दिल्लीत आत्महत्या
- Author, सर्फराज सनदी
- Role, बीबीसी मराठीसाठी
मूळच्या सांगलीच्या असलेल्या एका विद्यार्थ्यानं दिल्लीमध्ये मेट्रो स्टेशनवर आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं त्यानं चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं.
शौर्य प्रदीप पाटील, असं मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो मूळचा सांगली जिल्ह्यातला खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा रहिवासी आहे.
त्याचे वडील प्रदीप पाटील हे सोने-चांदी गलाई व्यवसायाच्या निमित्तानं गेल्या अनेक वर्षापासून दिल्लीमध्ये स्थायिक आहेत.
शौर्यही त्याच्या कुटुंबीयांसह दिल्लीतील राजीवनगर भागात वास्तव्यास होता.
तो दिल्लीतील सेंट कोलंबाज विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता.
याबाबत पोलीस उपायुक्त (मेट्रो) यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले, "आम्ही सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहोत. सध्या शाळा आणि मेट्रो स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवले आहे. त्याची तपासणी होईल. याशिवाय सोबत शिकणाऱ्या 4-5 मुलांची चौकशी केली जाईल. या चौकशीच्या आधारावर आम्ही कारवाई करू."
दरम्यान, शाळेतील तीन शिक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यांना "आपल्या विरोधात नोंदवलेल्या एफआयआरची (क्रमांक 336A, तिस हजारी कोर्ट, दिनांक 19 नोव्हेंबर 2025) माहिती शाळेला देण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आरोपांच्या गंभीरतेच्या पार्श्वभूमीवर प्राधिकरणाने आपल्याला तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि सक्षम प्राधिकरणाकडून पुढील आदेश येईपर्यंत आपण निलंबित राहाल", असं कळवण्यात आलं आहे.
बीबीसीनं शाळेची बाजू मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र, शाळेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. शाळेची बाजू आल्यानंतर या बातमीत ती अपडेट करण्यात येईल.
नेमकं काय घडलं?
मंगळवार 18 नोव्हेंबर रोजी राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनवर शौर्यनं आत्महत्या केली.
शौर्यच्या या कृत्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली.
जखमी अवस्थेतील शौर्यला पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्याचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
शौर्यचे वडील कामानिमित्त गावी ढवळेश्वरला आले होते. या घटनेची माहिती ते तातडीनं दिल्लीत पोहोचले.
आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं एक सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे. ज्यामध्ये शाळेतील प्राचार्यांसह चार शिक्षिकांनी आपला मानसिक छळ केल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं त्यानं लिहिलं आहे.
या प्रकरणी राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी संबंधित शिक्षिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, 20 नोव्हेंबर रोजी ढवळेश्वर या मूळगावी शौर्यवर अंत्यसंस्कार होणार आहेत.
सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय?
दिल्ली पोलिसांना शौर्य पाटील याच्या स्कूल बॅगमध्ये सुसाइड नोट सापडली.
त्यात त्यानं लिहिलं आहे की, "मेरा नाम शौर्य पाटील हैं. इस मोबाइल नंबर पर कॉल कर देना प्लीज. आय ॲम व्हेरी सॉरी..आय डीड धीस...पर स्कूलवालोंने इतना बोला की, मुझे यह करना पडा.
यदी किसी को जरूरत हो तो मेरे अंग दान कर देना. मेरे पॅरेंट्सने बहुत कुछ किया, आय ॲम सॉरी, मैं उनको कुछ नहीं दे पाया...सॉरी भैय्या...सॉरी मम्मी, आपका आखरी बार दिल तोड रहा हूं...स्कूल की टीचर है ही ऐसी क्या बोलू..."
कुटुंबीय काय म्हणाले?
शौर्य पाटीलचे वडील प्रदीप पाटील यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, ते व्यवसायानिमित्त गेली 20 वर्ष दिल्लीमध्ये राहतात.
शौर्यचे वडील म्हणाले, "माझा मुलगा दहावीला दिल्लीतील सेंट कोलंबाज शाळेमध्ये शिकत होता. गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून त्याला शाळेतील शिक्षकांकडून खुप टॉर्चर केलं जात होतं. त्यानं ते आम्हाला सांगितलं होतं. पण मागच्या चार दिवसांपूर्वी एका टिचरनं त्याला सांगितलेलं की तुला टीसी देणार आहे, तुला काढून टाकणार आहे. पण दहावीला असल्यामुळे आणि शाळेच्या अधिकारात 20 गुण असल्यामुळे आम्ही त्यांची तक्रार केली नाही. पण त्याला धमक्या दिल्या गेल्या, टॉर्चर केलं गेलं."
पुढे ते म्हणाले, "काल शाळेत प्रॅक्टीस करताना तो पाय घसरून पडला तर त्याला सांगितलं गेलं की तू मुद्दाम केलं, तू ओव्हर ॲक्टींग करतोय. मग तो रडायला लागला, नाही मी नाही केलं म्हणायला लागला तर त्याची टीचर म्हणाली की, 'तू रोने का ड्रामा मत कर. मुझे पता है और इससे मुझे कुछ फर्क नही पडेगा.'"
अशा छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टींमुळे त्याला अशी वागणूक मिळाल्यानं आपल्या मुलानं टोकाचं पाऊल उचललं असल्याचा आरोप प्रदीप पाटील यांनी केला आहे.
याला सर्वस्वीपणे शाळा आणि संबंधित शिक्षक जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले, "माझ्या मुलानं सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. ती प्रत्येक पालकांसाठी संवेदनशील अशी आहे. त्यानं सांगितलंय की माझे जे शरीराचे अवयव आहेत ते गरजूंना द्या. त्यानं माझी, माझ्या पत्नीची आणि त्याच्या भावाची माफी मागितली, की तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं केलं पण मी तुमच्यासाठी चांगलं काही बनू शकलो नाही, काही रिटर्न देऊ शकलो नाही."
प्रदीप पाटील म्हणाले की त्याने शेवटी सांगितलंय की त्याने जे केलंय त्यासाठी त्याला न्याय मिळावा. जेणेकरून असंच दुसऱ्या कुठल्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत होऊ नये.
यासाठी त्यांना शिक्षा मिळावी हिच त्याची शेवटची इच्छा असल्याचं शौर्यच्या वडिलांनी सांगितलं आहे.
'शौर्यची आत्महत्या महाराष्ट्र आणि सांगलीसाठी दुर्दैवी घटना'
दिल्लीतील सांगलीच्या ढवळेश्वर परिसरातील विद्यार्थ्याची आत्महत्या ही महाराष्ट्र तसेच सांगली जिल्ह्यासाठी दुर्दैवी घटना असल्याचं मत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.
तसेच, परराज्यातील मुलगा आहे, म्हणून शौर्यला त्रास झाला की अन्य कारणानं शौर्यला त्रास झाला? त्यामुळे त्यानं आत्महत्या का केली याचा तपास करावा, अशी मागणी देखील चंद्रहार पाटील यांनी केली आहे.
ढवळेश्वरमधील मृत शौर्यच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करण्यासाठी ते आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे.
तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.