लैंगिक छळाच्या नैराश्यातून महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या; तक्रारीनंतरही दखल न घेतल्याने टोकाचे पाऊल?

    • Author, सुब्रतकुमार पती
    • Role, बीबीसी हिंदीसाठी, भुवनेश्वरहून

ओडिशाच्या बालासोर येथील फकीर मोहन कॉलेजमधील विद्यार्थिनीने विभागप्रमुखाकडून झालेल्या लैंगिक छळामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी संबंधित तरुणीने प्रशासनाकडं मदतीची विनंती केली होती. सोशल मीडियावरही तिनं हा मुद्दा उपस्थित केला होता. पण तिच्या तक्रारीची दखलच घेतली गेली नाही. अखेर या साऱ्याला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचललं.

ही घटना शनिवारी दुपारी घडली होती. या विद्यार्थिनीवर भुवनेश्वर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये (एम्स) उपचार सुरू होते.

विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, गेल्या अनेक महिन्यांपासून तिचा लैंगिक छळ होत होता. तिने याबाबत कॉलेज प्रशासनाकडे तक्रारही केली होती. परंतु, काहीच कारवाई न झाल्यामुळे ती खूपच त्रस्त होती.

ही विद्यार्थिनी बीएड करत होती. तिने विभागप्रमुखावर (एचओडी) लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते आणि कॉलेज प्रशासनाकडे तक्रारही केली होती.

इतकंच नाही, तर तिने ही घटना सोशल मीडियावरही पोस्ट केली होती. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना टॅग करून न्यायाची मागणीही केली होती.

या प्रकरणात संशयित आरोपीसह कॉलेजचे प्रिन्सिपल आणि आणखी एक व्यक्तीला निलंबित करण्यात आलं आहे.

दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपी विभागप्रमुख समीर साहू यांना अटक केली आहे आणि राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आहेत.

याबाबत 'बीबीसी'ने कॉलेजचे निलंबित प्रिन्सिपल दिलीप घोष यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी बोलण्यास नकार दिला.

तर दुसरीकडे, रविवारी काँग्रेस आणि बिजू जनता दलाचे आमदार व कार्यकर्त्यांनी भुवनेश्वरमध्ये आंदोलन केलं आणि पीडित विद्यार्थिनीला न्याय मिळावा अशी मागणी केली.

(आत्महत्या हा एक गंभीर मानसिक आणि सामाजिक प्रश्न आहे. तुम्हीही तणावात असाल, तर भारत सरकारची 'जीवनसाथी हेल्पलाइन' – 1800 233 3330 वर कॉल करून मदत घेऊ शकता. आपल्या मित्रमैत्रिणींशी, कुटुंबीयांशी मोकळेपणाने बोलणंही खूप गरजेचं आहे.)

विद्यार्थिनीच्या प्रकृतीबद्दल एम्सने काय माहिती दिली?

तत्पूर्वी, एम्सचे संचालक आशुतोष बिस्वास यांनी विद्यार्थीनीची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले होते. तिला वाचवण्याचा डॉक्टरांच्या टीमकडून भरपूर प्रयत्न करण्यात आले.

रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पीडित विद्यार्थिनीच्या किडनीसह शरीरातील विविध अवयवांवर गंभीर परिणाम झाले होते.

याबाबत दिल्लीतील एम्सच्या डॉक्टरांचाही सल्ला घेण्यात आला होता.

मुख्यमंत्री मोहन चरण माझींनी काय म्हटलं...

दरम्यान, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी रविवारी भुवनेश्वर येथील एम्स रुग्णालयात जाऊन डॉक्टरांशी चर्चा केली होती.

हे प्रकरण सरकारने गांभीर्याने घेतल्याचे त्यांनी सांगितले.

"ही घटना नेमकी कुठल्या परिस्थितीत घडली याची चौकशी सुरू आहे," असं त्यांनी सांगितलं. सरकार या प्रकरणात कठोर कारवाई करणार असून, अशा घटना पुन्हा कुठल्याही कॉलेज किंवा विद्यापीठात घडू नयेत, यासाठी खबरदारी घेतली जाईल," असं ते म्हणाले.

त्यांनी सांगितलं की, त्यांनी विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांची आणि तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमचीही भेट घेतली आहे.

"पुढचे 24 तास खूप नाजूक आहेत. गरज भासल्यास विद्यार्थिनीला उपचारासाठी एअर लिफ्ट करून दिल्लीला नेलं जाईल," असं त्यांनी रविवारी सांगितलं होतं.

ओडिशाचे उच्च शिक्षण मंत्री सूर्यवंशी सूरज यांनी सांगितलं की, आरोपी प्राध्यापक आणि प्रिन्सिपल दिलीप घोष यांना तात्पुरतं निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचेही आदेश दिले आहेत.

"विद्यार्थिनीने तक्रार केल्यानंतर कॉलेजच्या अध्यक्षांनी सरकारला का माहिती दिली नाही, हाही एक गंभीर प्रश्न आहे. हे लक्षात घेऊन अध्यक्षांनाही निलंबित करण्यात आलं आहे," असं त्यांनी सांगितलं.

कुटुंबीयांनी काय सांगितलं?

विद्यार्थिनीसोबत शिकणाऱ्या एका मुलीने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, पीडित तरुणी शिक्षकाच्या वागणुकीमुळे अनेक दिवसांपासून त्रस्त होती. त्याचा मानसिक धक्काही तिला बसला होता.

ती पुढे म्हणाली की, "शिक्षकाच्या छळवणुकीविरोधात तिने कॉलेजच्या अध्यक्षांकडे तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली."

विद्यार्थिनीच्या आजोबांनी बीबीसीला सांगितलं की, "या चौकशी समितीने अहवालात शिक्षकाच्या लैंगिक शोषणाचा उल्लेखही केला नाही. उलट हे प्रकरण दडपण्यासाठी दबाव आणण्यात आला."

या छळाची कल्पना विद्यार्थिनीने घरीही दिली होती, असं आजोबा पुढे सांगत होते.

ते म्हणाले, "तिचा मानसिक छळही केला जात होता. तिला काही विषयांत मुद्दाम नापास करण्यात आले आणि कमी हजेरी दाखवून परीक्षेला बसू दिलं नाही."

पोलीस काय म्हणतात?

प्रकरणाची चौकशी सुरू असून त्यासाठी एका विशेष पथकाची‌ नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बालासोरचे पोलीस अधीक्षक राज प्रसाद म्हणाले, "या घटनेची सखोल चौकशी केली जाईल. फॉरेन्सिक टीमही तपासात सहभागी आहे. डीएसपी स्तराच्या एका अधिकाऱ्याला या चौकशीची जबाबदारी देण्यात आली आहे."

ते पुढे म्हणाले, "विद्यार्थिनीने पहिल्यांदा कॉलेजच्या अंतर्गत तक्रार समितीकडे अर्ज केला होता. त्या समितीकडून नेमकी काय चौकशी करण्यात आली आणि प्राचार्यांना याबाबत काय अहवाल दिला गेला याचाही तपास केला जाईल. घटनेनंतर लगेच आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे."

विरोधी पक्षांकडून राज्य सरकारवर टीका

ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्यपालांना या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, "ओडिशातील एका प्रतिष्ठित विद्यापीठातील एका तरुण विद्यार्थिनीला आत्महत्येसारखं पाऊल उचलण्यास भाग पाडलं गेलं हे अत्यंत धक्कादायक आणि त्रासदायक आहे. ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो."

नवीन पटनायक यांनी लिहिलं आहे की, "विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करण्यात आला होता. शिक्षकाकडून तिच्याकडे वारंवार शारीरिक संबंधांची मागणी होत होती.

तिनं या आधीही एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तिला वाचवण्यात आलं, असं मुख्याध्यापकांना लिहिलेल्या एका पत्रात विद्यार्थिनीनं म्हटलं होतं."

"अनेक महिन्यांपासून ती भीती आणि वेदनेत जगत होती. त्यानंतर 1 जुलैला तिनं हताश होऊन मदत मिळवण्यासाठी सोशल मीडियावर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना टॅग करून तिच्या त्रासाबद्दल सांगितलं.परंतु तरीही कोणतीही कारवाई केली गेली नाही."

माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी लिहिलं आहे की, "दुःखाची गोष्ट म्हणजे तिनं तिचा त्रास संपवण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून मुख्याध्यापकांच्या खोलीबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तिला न्याय मिळाला नाही, हे सत्य या घटनेमुळे समोर आलं आहे. तिनं महाविद्यालयाचे प्राचार्य, उच्च शिक्षण मंत्री, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री या सगळ्यांकडे वारंवार मदतीसाठी याचना केली."

त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये राज्यपाल हरी बाबू कंभमपती आणि मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करत लिहिलंय की, "उच्च शिक्षणाच्या चौकटीत राज्यपाल हे सरकारी विद्यापीठांचे कुलगुरू असतात, ते एफएम कॉलेजचे देखील कुलगुरू आहेत. मी राज्यपालांना या प्रकरणाची दखल घेण्याचं आणि या विद्यार्थिनीला न्याय मिळावा यासाठी हस्तक्षेप करण्याचं आवाहन करतो."

बिजू जनता दलाचे नेते आणि बालासोर जिल्ह्यातील भोगराईचे आमदार गौतम बुद्ध दास यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, गेल्या सहा महिन्यांपासून विद्यार्थिनीचा छळ केला जात होता. तिचा लैंगिक छळ करण्यात आला होता आणि तिच्या तक्रारीचीही गांभीर्यानं दखल घेतली गेली नव्हती.

ते म्हणाले, "कॉलेजच्या चौकशी समितीनं विद्यार्थिनीवर आरोपी शिक्षकाविरुद्ध न बोलण्यासाठी आणि तडजोड करण्यासाठी दबाव आणला होता, त्यामुळे ही घटना घडली. भाजप सरकारसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे."

तर बारबाटी-कटकच्या काँग्रेस आमदार सोफिया फिरदौस यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत ओडिशा सरकारवर टीका केली आहे.

या घटनेनंतर सोफिया म्हणाल्या, "सरकार कधी जागं होईल? त्यांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वी विद्यार्थिनीनं स्वतः सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली होती. परंतु या प्रकरणात कोणतीही कारवाई केली गेली नाही. विद्यार्थिनीवर दबाव आणण्यात आला, त्यामुळे तिनं जीव देण्याचा प्रयत्न केला."

त्या म्हणाल्या, "दुर्दैवानं ती देखील एबीव्हीपीची सदस्य आहे आणि यावरून स्पष्ट होतं की जेव्हा पक्षाच्याच महिला सुरक्षित नसतात आणि नेते देखील त्यांना वाचवू शकत नाहीत, तर राज्यातील इतर महिलांची स्थिती काय असेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)