अमेरिकेत चिनी महिलेची हेरगिरी; लाच म्हणून खाण्यासाठी मिळाली बदकंही

लिंडा सन आणि त्यांचे पती क्रिस्तोफर हू

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, लिंडा सन आणि त्यांचे पती क्रिस्तोफर हू यांना हेरगिरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. सध्या त्यांना जामीन मिळाला आहे.
    • Author, सॅम कॅब्रल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्यातील एका वरिष्ठ अधिकारी महिलेवर चीनसाठी हेरगिरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर सध्या खटला चालवण्यात येत आहे.

लिंडा सन असं या अधिकारी महिलेचं नाव असून त्यांनी कोरोना साथीच्या काळात न्यूयॉर्क राज्याच्या एका अधिकृत ऑनलाइन मीटिंगमध्ये सहभागी होण्यासाठीचा अॅक्सेस चीन सरकारच्या अधिकाऱ्यांना दिल्याच्या आरोपांसह इतरही काही आरोप त्यांच्यावर करण्यात आलेले आहेत.

लिंडा सन यांच्यावर लावण्यात आलेल्या इतर आरोपांनुसार त्या अमेरिकेमध्ये अंडरकव्हर एजंट म्हणून चीनसाठी हेरगिरी करत होत्या. जवळपास 14 वर्षांपासून अमेरिकेमध्ये राहून चीनसाठी काम करत होत्या, असाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

या 14 वर्षांच्या काळात लिंडा यांनी खूप प्रगती केली. न्यूयॉर्क राज्याच्या गव्हर्नरचे 'डेप्यूटी चीफ ऑफ स्टाफ' पद मिळवण्यापर्यंत त्यांनी मजल मारली.

सरकारी वकिलांच्या मते, 41 वर्षीय लिंडा सन यांनी सातत्यानं त्यांच्या पदाचा वापर चीनमधील अधिकाऱ्यांची मदत करण्यासाठी केला.

तैवानच्या परराष्ट्र अधिकाऱ्यांना न्यूयॉर्क राज्य सरकारबरोबर संपर्क साधायचा होता. मात्र, त्यामध्ये त्यांनी अडथळे निर्माण केले; तसंच चीनला काही अंतर्गत दस्ताऐवजही पुरवले, असा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

या बदल्यात लिंडा आणि त्यांचे पती क्रिस्तोफर हू यांना चीनकडून लाखो डॉलर्सचा मोबदला आणि भेटवस्तू मिळाल्याचं म्हटलं जात आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

'सगळी काळजी घेतली'

सरकारी वकिलांच्या मते, चीनकडून मिळालेल्या पैशांच्या आधारे लिंडा आणि त्यांच्या पतीनं न्यूयॉर्कमध्ये 41 लाख अमेरिकन डॉलर किमतीचं आलिशान घर खरेदी केलं.

या दोघांनी अमेरिकेतील होनोलुलू मध्येही 21 लाख अमेरिकन डॉलरचे महागडे घर खरेदी केले, असंही आरोपपत्रात म्हटलं आहे.

याशिवाय दाम्पत्याने 2024 फेरारी रोमा स्पोर्ट्स कारच्या नव्या मॉडेलसह अनेक अलिशान अशा गाड्याही खरेदी केल्या.

लाल रेष
लाल रेष

या दोघांनाही मंगळवारी ब्रूकलीन फेडरल कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांनी त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले. परदेशी एजंट म्हणून नोंदणी न करणे, व्हिसामध्ये फसवणूक, आणि मनी लाँडरिंगसह इतर आरोप त्यांनी फेटाळले.

अमेरिकेतील कायद्यानुसार इतर देशांसाठी अथवा राजकीय पक्षांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना 'फॉरेन एजंट' म्हणून नोंदणी करणे अनिवार्य असते.

सरकारी वकिलांच्या मते, लिंडा यांनी जाणीवपूर्वक चीनचे अधिकारी आणि प्रतिनिधी यांच्या सल्ल्याने त्यांच्यासाठी काम करत असल्याची बाब अमेरिकेपासून लपवली.

त्यांनी 2020 मध्ये कोरोनाची साथ असताना चीनच्या अधिकाऱ्यांची न्यूयॉर्कच्या नेत्यांशी भेट घालून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.

त्या एवढ्या बिनधास्तपणे सगळं करत होत्या की, एकदा ऑनलाइन मीटिंगमध्ये चिनी अधिकाऱ्याला सहभागी होण्यासाठी त्यांनी अॅक्सेसही दिला होता.

मंगळवारी वकिलांसह ब्रूकलिनच्या न्यायालयाबाहेर येणाऱ्या लिंडा सन.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, मंगळवारी वकिलांसह ब्रूकलिनच्या न्यायालयाबाहेर येणाऱ्या लिंडा सन.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

न्यूयॉर्कचे माजी सरकारी वकील होवार्ड मास्टर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "न्यू जर्सीच्या माजी सीनेटर बॉब मेनेंडेज यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर विदेशी सरकारांकडून भेटवस्तू घेतल्याचे आरोप झाले आहेत. हे आरोप अत्यंत चिंताजनक आहेत."

"त्या एवढे दिवस बेमालूमपणे अशी कृत्ये कसं काय करत होत्या, हा तपासाचा भाग आहे. पण पकडले जाण्यापासून वाचण्यासाठी त्या अनेक प्रयत्न करत राहिल्या," असंही ते म्हणाले.

लिंडाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या लेखी आरोपपत्रानुसार, त्यांनी तैवानच्या प्रतिनिधींना अमेरिकेच्या सरकारला भेटण्यापासून किंवा चर्चा करण्यापासून रोखण्याचे प्रयत्न केले.

तैवाननं आयोजित केलेल्या कार्यक्रमात न्यूयॉर्कच्या एका वरिष्ठ राजकीय नेत्याला सहभागी होण्यापासून रोखण्याचं काम यशस्वीपणे पार पाडल्यानंतर लिंडा यांनी 2016 मध्ये एका चीनी अधिकाऱ्याला संदेश पाठवला होता. त्यात त्यांनी "सगळं काही योग्य पद्धतीने झालं," असं म्हटलं होतं.

एवढंच नाही तर, 2019 मध्ये तैवानच्या राष्ट्रपतींनी न्यूयॉर्क दौरा केला तेव्हा चीनच्या समर्थकांनी केलेल्या निषेध आंदोलनातही त्या सहभागी झाल्या होत्या.

उईगर मुस्लिमांचा उल्लेखही हटवला

जानेवारी 2021 पर्यंत, त्यांनी पडद्यामागं राहून चीनमधील मूळच्या शिनजियांग प्रांतात राहणाऱ्या उईगर मुस्लिमांना ताब्यात घेतल्याचा उल्लेखही कुणाला कळणार नाही, अशाप्रकारे हटवण्याचं काम केलं होतं.

चिनी नववर्षाच्या निमित्ताने न्यूयॉर्कच्या गव्हर्नरकडून एखादा व्हीडिओ मिळेल का? अशी मागणी चीनच्या अधिकाऱ्यांनी केली होती. तेव्हा "या व्हीडिओ मेसेजमध्ये त्यांच्याकडून काय वदवून घ्यायचं आहे?" असं त्यांनी विचारलं होतं.

तेव्हा चीनच्या अधिकाऱ्यांनी "सुट्ट्यांसाठी शुभेच्छा आणि सहकार्य तसेच मैत्रीसाठीची आशा व्यक्त व्हावी. फार काही राजकीय नको," असं म्हटलं होतं.

संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

त्यानंतर गव्हर्नरच्या भाषणामधून 'उईगर मुस्लिमांचा उल्लेख वगळण्यासाठी' त्यांच्या स्पीचरायटरबरोबरही (भाषण लिहिणारी व्यक्ती) त्यांचा वाद झाल्याचं लिंडा यांनी एका चिनी अधिकाऱ्याला सांगितलं होतं.

लिंडा यांनी 2023 मध्ये न्यूयॉर्क लेबर डिपार्टमेंटसाठी काम करताना गव्हर्नर कॅथी होचूल यांचे चिनी नववर्षासाठीचे अधिकृत भाषण आधीच मिळवले आणि ते चीनी अधिकाऱ्यांना दाखवले होते.

भाषण गव्हर्नर होचूल यांच्या कार्यालयीन आणि रितसर परवानगीशिवाय मिळवलं होतं.

एवढंच नाही तर लिंडा यांनी चीनच्या राजकीय नेत्यांनी अमेरिकेचा दौरा करावा यासाठी बनावट निमंत्रण पत्रिकांचा मसुदाही तयार केला होता.

न्यूयॉर्कच्या गव्हर्नरच्या आशियाई अमेरिकन सल्लागार परिषदेत त्यांच्या देशातील व्यक्तीची वर्णी लागावी यासाठी त्यांनी अनधिकृतपणे 'एम्प्लॉयमेंट लेटर'ही लिहिलं होतं.

चीनकडून महागडा मोबदला?

सरकारी वकिलांच्या आरोपांनुसार, या हेरगिरीच्या मोबदल्यात लिंडा आणि त्यांच्या पतीला चीनच्या अधिकाऱ्यांकडून भरपूर पैसे आणि महागड्या भेटवस्तू मिळाल्या. दोघांना मिळालेल्या मोबदल्यांमध्ये चीनच्या प्रवासासाठीच्या सगळ्या खर्चाचाही समावेश आहे. त्यांना मोठे शो, संगीत कार्यक्रम आणि विविध खेळ प्रकारांच्या स्पर्धांची तिकीटंही मिळायची.

तसंच लिंडाच्या चुलत भावाला चीनमध्ये नोकरीही देण्यात आली. एवढंच नाही तर चीनच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या खासगी आचाऱ्याने तयार केलेली 'नॉनजिंग सॉल्टेड डक डिश'ची (बदकापासून तयार करण्यात आलेला पदार्थ) होम डिलीव्हरीही त्यांना करण्यात आली.

आरोपपत्रानुसार, बदकांपासून तयार केलेला हा पदार्थ लिंडा आणि त्यांच्या आई-वडिलांच्या घरी तब्बल 16 वेळा वेळी पाठवण्यात आला.

'सॉल्टेड डक' डिश.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 'सॉल्टेड डक' डिश.

मंगळवारी (3 सप्टेंबर) सकाळी लिंडा आणि त्यांच्या पतीवर 10 गुन्ह्यांचा ठपका ठेवत त्यांना त्यांच्या घरातून अटकही करण्यात आली.

लिंडाचे वकिल जारोफ सोरफ यांनी एपी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं की, "या आरोपांचा न्यायालयामध्ये सामना करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. माझ्या अशिलांवर लावण्यात आलेल्या आरोपांमुळं ते चिंतित आहेत."

न्यायालयानं या दाम्पत्याची जामिनावर सुटका केली आहे, मात्र त्यांना अमेरिकेतील फक्त तीन राज्यांमध्ये प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

तसंच, न्यायालयानं लिंडा यांना त्यांनी न्यूयॉर्कमधील चीनच्या अधिकाऱ्यांशी किंवा त्यांच्या प्रतिनिधींशी संपर्क करू नये, असा आदेशही दिला आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.