You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जगभरातली टॉपची 5 शहरं, जिथं मानवी जीवन सोपं आहे
- Author, लिंडसे गॅलोव्हे
- Role, बीबीसी ट्रॅव्हल
कोरोना साथरोगानंतर जगभरातील शहरांचं जीवनमान पुन्हा एकदा रुळावर येत आहे.
इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या वार्षिक ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्सनुसार, लोकांच्या राहणीमानाचा स्तर मागील 15 वर्षांत जास्त सुधारला आहे.
या अहवालात जगातील 173 शहरांचं सर्वेक्षण करण्यात आलं असून स्थैर्य, आरोग्य, संस्कृती, पर्यावरण, शिक्षण आणि पायाभूत सुविधा हे मापदंड लावण्यात आले आहेत.
लोकांच्या जीवनमानात जी सुधारणा झाली आहे त्याचं श्रेय आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील आरोग्य आणि शिक्षणाच्या दर्जातील सुधारणांना देण्यात आलं आहे.
पण युक्रेन युद्धामुळे जगात चलनवाढीचं संकट उद्भवलं आणि स्थिरता पातळीत थोडीशी घसरण झाली.
दुसरीकडे कोरोना काळात लादण्यात आलेले निर्बंध शिथिल केल्यानंतर जग पूर्वपदावर आलं आहे आणि एकूणच लोकांचं जीवनमान देखील सुधारलं आहे.
माहितीच्या आधारावर या अहवालात सांगण्यात आलंय की, एखादं शहर राहण्यास किती चांगलं आहे. पण या प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्षात त्या शहरात राहणारे लोक त्यांच्या अनुभवाच्या आधारावरच देऊ शकतात.
त्यामुळे या अहवालातील 10 सर्वोत्तम शहरांपैकी पाच शहरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची आम्ही भेट घेतली आणि त्यांनी राहण्यासाठी त्या शहराची निवड का केली? हे जाणून घेतलं.
व्हिएन्ना, ऑस्ट्रिया
ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
या शहराचा क्रमांक केवळ 2021 मध्येच खाली घसरला होता. कारण त्यावर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे शहरातील संग्रहालयं आणि रेस्टॉरंट्स बंद होती.
पण स्थैर्य, आरोग्यसेवा, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत हे शहर सर्वोत्तम असल्याचं व्हिएन्नातील रहिवाशांचं म्हणणं आहे.
मॅन्युएला फिलिपो या मिशेलिन-स्टारच्या दोन रेस्टॉरंटच्या व्यवस्थापक आहेत. त्या आपल्या पतीला व्यवसाय सांभाळण्यासाठी मदत करतात.
त्या सांगतात, शहराचा इतिहास, सार्वजनिक वाहतुकीची विश्वासार्हता, कॅफे, थिएटर्स आणि इतर मनोरंजन स्थळांमध्ये सहज प्रवेश या कारणांमुळे व्हिएन्ना शहर राहण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
त्या पुढे सांगतात, "कधीकधी जेव्हा आम्हाला खूप काम असतं आणि बाहेर जायला वेळ मिळत नाही तेव्हा आमचं शहर आमच्या मनोरंजनाच्या सर्व गरजा पूर्ण करतं."
रिचर्ड वॉस हे व्हिएन्ना येथील हॉटेल दास टिग्रा येथे विक्री आणि विपणन व्यवस्थापक आहेत.
त्यांचा असा विश्वास आहे की एखाद्या शहराचा सांस्कृतिक इतिहास आणि सांस्कृतिक गोष्टींमुळे लोकांचं जीवनमान उंचावतं.
ते म्हणतात, "व्हिएन्नामध्ये शॉनब्रुन पॅलेस, हॉफबर्ग आणि व्हिएन्ना सिटी हॉल सारख्या अनेक ऐतिहासिक इमारती आहेत. हे शहर आपल्या संगीत परंपरेसाठी प्रसिद्ध आहे कारण मोझार्ट, बीथोव्हेन आणि स्ट्रॉस इथलेच रहिवासी होते."
शहरातील अनेक संग्रहालयं, थिएटर्स आणि ऑपेरा हाऊसमुळे येथील लोकांकडे अनेक पर्याय असल्याचं ते सांगतात.
लोकांनी व्हिएन्नाच्या खाद्यपदार्थांचाही आस्वाद घ्यावा, असं ही ते सुचवतात.
मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न आणि सिडनी या दोन्ही शहरांनी यावेळी क्रमवारीत अनुक्रमे तिसरं आणि चौथं स्थान पटकावलं आहे.
मेलबर्नने संस्कृती आणि पर्यावरणाच्या बाबतीत विशेषतः चांगले गुण मिळवले आहेत आणि स्थानिकांना त्याचा अभिमान आहे.
जेन मॉरेल करिअर सोल्युशन्स कंपनीच्या सीईओ आहेत.
त्या सांगतात की, मेलबर्न हे येथील खाद्यपदार्थ, सांस्कृतिक उपक्रम, कार्यक्रम तसंच ऑस्ट्रेलियन फॉर्म्युला वन आणि ऑस्ट्रेलियन ओपन यांसारख्या आंतरराष्ट्रीय खेळांमुळे प्रसिद्ध आहे.
ट्राममुळे शहरात प्रवास करणंही खूप सोपं झाल्याचं त्या सांगतात.
मेलबर्न हे जगप्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपासून थोड्याच अंतरावर आहे.
किमी कॉनर कॅलिफोर्नियामधील ब्लॉगर आहे. ती मेलबर्नपेक्षा सिडनी चांगलं शहर असल्याचं म्हणते.
ती म्हणते, "सिडनी सुंदर आहे कारण तिथं खूप सुंदर दृश्यं, समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक वास्तू आहेत. पण मेलबर्नमध्ये अशा ऐतिहासिक वास्तू नाहीत. इथे संस्कृती आहे आणि तिथे फिरायला थोडा वेळ लागतो."
ती सांगते, "मेलबर्न अनुभवण्यासाठी, तुम्हाला एका कॅफेमध्ये बसून तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम कॉफी प्यावी लागेल. तुम्हाला शहरातील विविध रेस्टॉरंट्समध्ये खावं लागेल आणि छुपे बार शोधावे लागतील."
ती म्हणते की मेलबर्नचे लोक सिडनीच्या लोकांपेक्षा चांगले आहेत.
जेन मॉरेल, शहराच्या चांगल्या गुणसंख्येचं कारण रहिवाशांच्या सकारात्मक दृष्टिकोनालाही देतात.
त्या म्हणतात "मेलबर्नमधील लोक स्वभावाने मनमिळावू आहेत "
व्हँकुव्हर, कॅनडा
या यादीत तीन कॅनेडियन शहरं टॉप 10 मध्ये आहेत. यात व्हँकुव्हर, कॅल्गरी आणि टोरंटो या शहरांचा समावेश आहे.
संस्कृती आणि पर्यावरणात मिळालेल्या गुणांमुळे व्हँकुव्हर पहिल्या पाचमध्ये आहे. त्यामुळे स्थानिकांना व्हँकुव्हर शहर आवडतं.
टोनी हो एक व्यावसायिक आहेत.
ते सांगतात, "व्हँकुव्हर मध्ये जंगल, समुद्र आणि मोकळं आकाश आहे."
"आमचे रस्ते आणि कनेक्टिव्हिटी इतकी चांगली आहे की तुम्हाला एका दिवसात एका सुंदर समुद्रकिनाऱ्यावरून उंच पर्वतीय प्रदेशात जाता येऊ शकतं. मग तुम्ही बसने, सायकलने किंवा बोटीने प्रवास करत असाल तरीही."
"आम्ही शहराच्या विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतो, आणि हा शहराच्या बहुसांस्कृतिक ओळखीचा भाग आहे. आमच्याकडे इथिओपियन इंजेरा ते तिबेटी मोमोजपर्यंत सर्व काही मिळतं."
टोनी यांना एक लहान मुलगा देखील आहे. ते म्हणतात की शहरात असंख्य उद्यानं आहेत आणि समुद्रकिनारा फक्त 20 मिनिटांच्या अंतरावर आहे.
इथल्या इमिग्रेशन धोरणामुळे जगातील विविध देशांतील लोकांना इथली भुरळ पडते.
जो टॉल्झमन हे रॉकेट प्लॅन नावाच्या मोबाईल प्लॅटफॉर्मचे सीईओ आहेत.
ते सांगतात, "मी क्रोएशियाचा आहे आणि मी अशा शहराच्या शोधात होतो जे विकासाला प्रोत्साहन देईल. पण तिथलं वातावरण देखील उत्साही आणि स्वागतार्ह असावं."
व्हँकुव्हरमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे इथले लोक असल्याचं ते सांगतात.
"तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर इथल्या लोकांकडून मदत मिळू शकते. येथील व्यापारी समुदायाचा पाठिंबा मिळतो."
व्यवसायाव्यतिरिक्त येथील निसर्गरम्य दृश्यही अतिशय सुंदर आहेत.
ते सांगतात, "जेव्हा मला कामातून विश्रांतीची गरज असते, तेव्हा शहरातच एका बाजूला समुद्र आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पर्वत आहे, त्याचा मी आनंद लुटतो."
ओसाका, जपान
ओसाका या यादीत 10 व्या क्रमांकावर आहे आणि हे आशियातील एकमेव शहर आहे जे शीर्ष 10 शहरांमध्ये मोडतं. ओसाकाने स्थिरता, आरोग्य व्यवस्था आणि शिक्षणात 100% गुण मिळवले आहेत.
जगभरातील लोक महागाईमुळे त्रस्त आहेत. पण या शहरातील लोक मात्र आनंदी आहेत, कारण हे अतिशय परवडणारं शहर आहे.
शर्ली झेंग या मूळच्या व्हँकुव्हरच्या आहेत, पण आता त्या जपानमधील ओसाका इथे राहतात.
त्या म्हणतात की, ओसाकामधील भाडं जपान आणि जगातील इतर मोठ्या शहरांपेक्षा कमी आहे.
त्या सांगतात की, "मला दरमहा पाणी, इंटरनेट आणि इतर गोष्टींसाठी सुमारे 410 युरो किंवा 700 कॅनेडियन डॉलर्स लागतात. हे एक लहान अपार्टमेंट असलं तरी नवीन आणि स्वच्छ आहे. जर तुम्ही व्हँकुव्हरमध्ये असं घर घेतलं तर त्यासाठी तुम्हाला 1200 कॅनेडियन डॉलर्सपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील."
जेम्स हिल्स म्हणतात, "मी मूळ ब्रिटनचा आहे, आणि तिथलं खाणं खूप महाग आहे. पण ओसाकामध्ये तुम्ही चांगल्या रेस्टॉरंटमध्ये खूप स्वस्त खाऊ शकता आणि तुम्ही दररोज बाहेर जेवू शकता."
हे शहरही इतर शहरांच्या तुलनेत अधिक सुरक्षित मानलं जातं.
शर्ली झेंग सांगतात, "मला इथे रात्री फिरतानाही सुरक्षित वाटतं."
माझं पाकीट चोरी जाईल अशी भीती मला कधीही वाटली नाही.
यासोबतच येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही खूप फायद्याची आहे.
जोनाथन लुकास सांगतात, "शहरात आणि शहराबाहेर एक ट्रेन लाइन आहे. इथून शहराबाहेर म्हणजे क्योटो, नारा आणि कोबे सारख्या शहरांमध्ये जाणं खूप सोपं आहे."
ऑकलंड, न्यूझीलंड
ऑकलंड आणि ओसाका ही दोन्ही शहरं 10 व्या स्थानावर आहेत. गेल्या वर्षी हे शहर या यादीत 25 व्या स्थानावर होतं. यामागचं कारण म्हणजे सप्टेंबर 2022 पर्यंत शहरात कोरोनाचे निर्बंध कायम होते.
या शहराने शिक्षणाबरोबरच, शहराची संस्कृती आणि पर्यावरणातही चांगले गुण मिळवले आहेत. येथील रहिवाशांचाही या आकडेवारीवर विश्वास असल्याचं दिसतं.
मेगन लॉरेन्स एक ब्लॉगर आहेत. त्या सांगतात, ऑकलंडमध्ये 20 मिनिटांच्या अंतरावर एक सुंदर समुद्रकिनारा आहे.
"शहराभोवती भरपूर हिरवळ आहे. या शहरात न्यूझीलंडमधील जागतिक दर्जाचे कार्यक्रम आयोजित होतात. 2023 महिला फिफा विश्वचषक याच शहरात आयोजित झालाय."
ग्रेग मॅरियट एका ट्रॅव्हल कंपनीत काम करतात. ते म्हणतात, "आमच्याकडे उत्तम मैफिली, कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धा आयोजित होतात. पुढील आठवड्यात ऑकलंड म्युझियममध्ये इजिप्शियन फारोबद्दल एक शो होणार आहे."
जगातील अनेक देशांतील लोक न्यूझीलंडमध्ये येतात आणि राहतात, त्यामुळे जगभरातील खाद्यपदार्थ इथे उपलब्ध आहेत.
लॉरेन्स सांगतात की, या सगळ्या गोष्टी असूनही इथली सगळ्यांत चांगली गोष्ट म्हणजे लोकांचे स्वभाव.
"बहुतेक लोक मदत करण्यास नेहमी पुढे असतात. आणि इथले लोक हसतमुख आहेत. ते आपण जाता येता स्मितहास्य करून आपल्याला हाय, बाय करतात."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)