'आम्ही जिवंत असूनही मेल्यासारखेच आहोत,' हसनाळ गाव पाण्याखाली जाण्याला जबाबदार कोण? - ग्राऊंड रिपोर्ट

"आम्ही वाचून सुद्धा मेलेलो आहोत. आज आम्ही जिवंत असूनसुद्धा काही अर्थ नाही. आम्हाला अंघोळ करायला जागा नाही."

पत्र्याच्या शेडसमोर अंघोळीसाठी ठेवलेल्या दगडाकडे बोट करत ज्ञानेश्वर जुरावाड बोलत होते.

ज्ञानेश्वर यांच्याप्रमाणे हसनाळमधील अनेकांच्या वास्तव्यासाठी प्रशासनानं पत्र्याचे शेड बांधून दिलेत. गावातील अनेकांकडे सध्या केवळ एवढं शेडच शिल्लक आहे. त्यांचं बाकी सगळं पाण्यामध्ये वाहून गेलंय.

18 ऑगस्ट 2025 रोजी ढगफुटीसदृश पाऊस झाला आणि नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातलं हसनाळ गाव पाण्याखाली गेलं. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला.

आम्ही हसनाळमध्ये पोहचलो, तेव्हा सगळीकडे पडकी घरं दिसत होती. पाण्यामुळे घरांची झालेली नासधूस दिसत होती.

ज्या शाळेत गावातली मुलं जायची, ती शाळाही उद्ध्वस्त झाल्याचं दिसून आलं.

गावात आमची भेट यादव मादाळे यांच्याशी झाली. ते सांगू लागले,"या घरी कमीत कमी 30-35 फूट पाणी होतं. हे जे खांब आहेत ना तेसुद्धा दिसत नव्हते. त्या खांबाच्या वर पाणी होतं.

"घराची अवस्था अशीच आहे. तुमच्या डोळ्यासमोर दिसायला लागली, अशीच अवस्था आहे. आणि आमची अवस्था पण अशीच आहे सर. आम्हाला कुठलीच मदत भेटली नाही, शासनाचे फक्त 10 हजार रुपये भेटले," यादव पुढे म्हणाले.

हसनाळ दुर्घटना मानवनिर्मित?

हसनाळमधील दुर्घटना ही पूर्णपणे नैसर्गिक नव्हती, तर शासन, लोकप्रतिनिधी आणि अभियंत्यांच्या निष्काळजीपणामुळे ओढवलेलं मानवनिर्मित संकट होतं, असं या घटनेचा अभ्यास करणाऱ्या सत्यशोधन समितीच्या अहवालात नमूद करण्यात आलंय.

या अहवालाचं नुकतंच प्रकाशन करण्यात आलं. नांदेडमधील सारिका उबाळे या सत्यशोधन अहवाल समितीच्या सदस्य आहेत.

बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "आधी पुनर्वसन मग धरण हे तत्व लेंडी धरण प्रकल्पाच्या बाबतीत अजिताबतच पाळलं गेलं नाही. ग्रामस्थांनी घळभरणीला विरोध करुनसुद्धा त्याच महिन्यात घळभरणीचं काम पूर्ण करुन आपल्या कामाचा टप्पा पार पाडायचा, हे प्रशासन आणि अभियंत्यांनी ठरवलेलं होतं.

"जेव्हा दुर्घटना घडली तेव्हा त्याबाबतची कुठलीही पुर्वसूचना ग्रामस्थांना मिळाली नाही. कुठलंही सायरन किंवा धोक्याची घंटा वाजली नाही. केवळ अतिवृष्टी हे गाव पाण्यात जाण्याचं कारण नसून बळजबरीनं केलेली घळभरणी हेच त्यामागचं कारण असल्याचं तिथल्या ग्रामस्थांनी सांगितलं."

हसनाळच्या ग्रामस्थांना भेटून, प्रत्यक्षात तिथली परिस्थिती जाणून घेऊन समितीनं हा अहवाल तयार केल्याचं सारिका उबाळे यांनी सांगितलं.

दरम्यान, हसनाळमधील ग्रामस्थांना ढगफुटीसदृश्य पावसाच्या आदल्या दिवशी पूर्वसूचना दिल्याचं स्थानिक प्रशासनानं बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं.

हसनाळ आणि आजूबाजूची गावं ही लेंडी धरणक्षेत्रात येतात. पण, गावात पाणी येणारच नाही, अशी चुकीची माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी दिल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

घळभरणीला स्थानिकांचा विरोध का?

यादव मादळे त्यांच्या पडक्या घरासमोर उभे होते. या घरात 2 लाख रुपये किंमतीची पुस्तके होती. पावसात ती वाहून गेल्याचं सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.

यादव म्हणाले, "आम्ही अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले की तुम्ही जर मे महिन्यात घळभरणी करत आहात आणि जूनमध्ये पाऊस पडणार आहे, तर आमच्या गावात पाणी येणार नाही का? तर त्यांनी म्हटलं की, मला लेकरं आहेत. मला आई-वडील आहेत. तुम्हाला मारुन टाकून मी हे काम कसं करू? मला पाप घ्यायचं का? त्यांनी वारंवार सांगितल्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही इथं राहिलो."

याच मुद्द्यावर बोलताना ज्ञानेश्वर जुरावाड म्हणाले, "आमचं शासनाला म्हणणं होतं की तुम्ही घळभरणी करा, आमचा त्यासाठी तीळभरसुद्धा विरोध नाही. पण आमची पुनर्वसनाची कामं करा. आम्हाला नवीन ठिकाणी जाऊन तिथं राहू द्या. आमच्यासाठी सुविधा करा. नळ-पाणी सगळं करा. 18 सुविधा ज्या आहेत कायद्यानं त्या द्या ना."

हसनाळच्या नागरिकांचे आक्षेप स्थानिक प्रशासनानं फेटाळलेत.

नांदेड पाटबंधारे मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "याप्रकरणी विभागाच्या वतीनं समिती नेमण्यात आली होती. लेंडी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना तेव्हापासून सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. रस्ते, गटारी, शाळा, ग्रामपंचायत अशा नागरी सुविधा पूर्ण करुन घळभरणीचं काम करण्यात आलं. प्रशासनानं नागरिकांना चुकीची माहिती दिली, असं काही झालेलं नाहीये."

पुनर्वसनाचा प्रश्न

प्रशासनानं हसनाळ गावचं योग्य पद्धतीनं पुनर्वसन केलं नसल्याचा ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

यादव मादाळे सांगतात, "पुनर्वसनाचा अतिशय गंभीर प्रश्न आहे, कुणाला प्लॉटिंग भेटली, कुणाला प्लॉटिंग भेटली नाही. कुणी सामायिक मधी आहे, कुणाला प्लॉटिंग भेटून ती जागा दुसऱ्याच्या नावावर आहे."

हसनाळच्या ग्रामस्थांच्या काही मागण्या या स्थानिक प्रशासनाच्या हातात नसल्याचं नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितलं.

बीबीसी मराठीशी बोलताना राहुल कर्डिले म्हणाले, "ढगफुटीसदृश पावसाचा फटका रावणगाव आणि हसनाळला मोठ्या प्रमाणावर बसला. लेंडी धरण हा प्रकल्प गेल्या 40 वर्षांपासून चालू आहे. आणि त्याच्या घळभरणीचं काम यावर्षी केलं. याबाबत बेसिक अॅमेनिटीज करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. काही अत्यंत जे कमी प्रमाणातले प्रश्न होते ते बाकी होते. काही प्रश्न धोरणात्मक होते, काही मागण्या पुनर्वसन कायद्यातल्या चौकटीच्या बाहेरच्या होत्या.

"जसं की अविवाहित मुलींना मोबदला देणं असेल, सानुग्रह अनुदान पावणेसात लाख देण्यात आलंय, पण वरच्या 2 लाखांची अधिकची मागणी होती. किंवा वाहतूक भत्ता 10 हजार मिळतो, पण मागणी 50 हजार किंवा त्यापेक्षा जास्तीची होती. या मागण्या स्थानिक प्रशासनाच्या हातात नव्हत्या."

हसनाळ गावात जिथं 4 महिन्यांपूर्वी चिरेबंदी वाडे होते, ते 18 ऑगस्ट 2025 च्या पावसानंतर पूर्णपणे बेचिराख झालेत. या वाड्यांमध्ये जी लोक राहत होती, ती गावाजवळील एका माळावर शिफ्ट झाली.

ही माणसं तिथं अक्षरश: 10 बाय 10 च्या शेडमध्ये राहत आहेत. प्रशासनाकडून तिथं त्यांच्यासाठी शौचालय, वीज, पाण्याची उपलब्धता करुन देण्यात आलीय.

मनावरचे आघात कायम

गाव पाण्याखाली गेलं, नुकसान झालं, शासन-प्रशासनाचे प्रतिनिधी आले, त्यांनी आश्वासनं दिली, पण याहीपलीकडे जाऊन गाव पाण्याखाली गेल्यामुळे इथल्या लोकांच्या मनावर जे आघात झालेत ते फार भयंकर आहेत.

ज्ञानेश्वर जुरावाड सांगतात, "आम्ही वाचून सुद्धा मेलेलो आहोत. आज आम्ही जिवंत असूनसुद्धा काही अर्थ नाही. अंघोळ करायला जागा नाही. इथं अंघोळ करायलोत. प्रत्येक घरी जाऊन बघा, परिस्थिती बघा. आता तुम्ही गावात वाडे बघितलात. त्या वाड्यात पिढ्यानपिढ्या राहणारे माझे वडील, आमच्या घरी दोन नोकरदार होते, आज माझ्यावर नोकरदार राहण्याची वेळ आलीय."

प्रशासनातील अधिकारी पाहणी करायला आले, असं समजून काही महिला आमच्याकडे आल्या. पत्रकार आहोत असं सांगितल्यावर त्यातल्या काही बोलायला लागल्या.

"मला तर तो दिवस आठवला की रडायलाच येतं. काहीच बोलता येत नाही. आमचं सगळं वाहून गेलं," यापैकी एक असलेल्या म्हादाबाई इबितदार म्हणाल्या.

हसनाळसारखी दुर्घटना पुन्हा घडू नये, यासाठी पावसाबाबतचे अलर्ट स्थानिक पातळीवर योग्य पद्धतीने पोहचवणं गरजेचं असल्याचं मत तज्ज्ञ मांडतात.

जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे म्हणतात, "पावसाचे जे अलर्ट असतात ते नुसतं पाऊस पडेल, नुसतं ढगफुटी होईल असं म्हणून चालणार नाही. आपल्याला अलर्ट कसे दिले पाहिजे, तुमच्या धरणामध्ये अमुक इतक्या वेळी, इतकं पाणी येण्याची शक्यता आहे. तर ते अॅक्शनेबल राहील. त्याच्यावर कार्यवाही करता येईल."

हसनाळमधील दुर्घटनेचा सर्वाधिक फटका हा महिला आणि भूमीहिन शेतमजुरांना बसलाय.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)