You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गो-तस्कर समजून आर्यन मिश्राला गोळ्या घालून संपवलं, फरीदाबादमधून ग्राऊंड रिपोर्ट
- Author, दिलनवाज पाशा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Reporting from, फरीदाबाद
दिल्लीच्या जवळील फरीदाबादच्या एनआयटी-5 परिसरातील अंधाऱ्या पायऱ्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटपर्यंत जातात. हताश आणि थकलेल्या उमा मिश्रा पायऱ्यांजवळ बसल्या आहेत. त्यांच्या डोळ्यातील अश्रू सुकले आहेत.
फ्लॅटमधील खोलीच्या भिंतीवर 19 वर्षांच्या आर्यन मिश्राचा फोटो टांगलेला आहे आणि त्या फोटोवर हार लावण्यात आलेला आहे.
बाहेर उघड्या छतावर आर्यनचे वडील सियानंद मिश्रा उभे आहेत. ते फोनवर पत्रकारांशी बोलण्यात गुंतलेले आहेत.
त्यांना सारखे फोन येत आहेत आणि प्रत्येकवेळी ते एकच गोष्ट म्हणत आहेत, "आता आम्हाला प्रसारमाध्यमांची आवश्यकता नाही. आमच्या मुलाला आता न्याय मिळणार नाही."
दिल्लीला लागूनच असणाऱ्या हरियाणातील फरीदाबाद मध्ये 23-24 ऑगस्टच्या रात्री (23 च्या रात्री आणि 24 च्या पहाटे) ही घटना घडली होती. 19 वर्षांच्या आर्यन मिश्राची संशयास्पदरित्या हत्या करण्यात आली होती.
या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी पाच कथित गोरक्षकांना अटक केली आहे.
आर्यनच्या वडिलांनी घेतली आरोपीची भेट
मिश्रा कुटुंब मूळचं अयोध्येतील असून ते आता फरीदाबादमध्ये राहत आहेत. त्यांच्या मुलाची हत्या कथित गोरक्षकांनी केली आहे, या गोष्टीवर त्यांचा विश्वासच बसत नाही.
आर्यनचं अस्थी विसर्जन करण्यासाठी सियानंद मिश्रा प्रयागराजला (अलाहाबाद) गेले होते. त्यावेळेस 28 ऑगस्टला त्यांना आरोपींना अटक झाल्याचं कळालं.
30 ऑगस्टला सियानंद मिश्रा यांनी फरीदाबाद पोलीस लाईनस्थित गुन्हे अन्वेषण शाखेच्या (क्राईम ब्रँच) कार्यालयात अनिल कौशिक या मुख्य आरोपीची भेट घेतली.
त्या भेटीबद्दल सियानंद मिश्रा सांगतात, "अनिल कौशिकला माझ्यासमोर आणण्यात आलं. त्यावेळेस तो माफी मागत म्हणाला की, गो-तस्कर असल्याचं समजून मी गोळ्या मारत होतो. मात्र, गोळी चुकून तुमच्या मुलाला लागली."
सियानंद मिश्रा म्हणतात, "अनिल कौशिकनं माझे पाय धरले आणि म्हणाला की माझ्याकडून चूक झाली. मुस्लिम असल्याचं समजून मी गोळी चालवत होतो. मुस्लिम व्यक्ती मारला गेला असता तर दु:ख झालं नसतं. मात्र, माझ्याकडून ब्राह्मण व्यक्ती मारला गेला. आता मला फाशीची शिक्षा झाली तरी त्याचं दु:ख होणार नाही."
सियानंद मिश्रा बाइक टॅक्सी सर्व्हिस बरोबर काम करतात. तेच त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे.
आर्यन ओपन स्कूलमधून बारावीची परीक्षा देण्यासाठी तयारी करत होता.
सियानंद मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन धार्मिक वृत्तीचा होता. अलीकडेच त्यानं अनेक हिंदू धार्मिक स्थळांची तीर्थयात्रा केली होती. मागील दोन वर्षांपासून तो डाक कांवड देखील आणत होता.
(श्रावण महिन्यात केल्या जाणाऱ्या कांवड यात्रेचं डाक कांवड हे कठीण रुप आहे. यात भक्त न थकता आणि न थांबता गंगाजल घेऊन पळत किंवा वेगानं चालत भगवान शंकराच्या मंदिरापर्यंत जातात.)
सियानंद पुढे सांगतात, "आर्यन मोबाइल दुरुस्तीचं काम देखील शिकत होता. जेणेकरून त्याला त्यातून काही कमाई करून घर खर्चाला हातभार लावता आला."
आर्यनच्या मित्रांनी केली दिशाभूल?
ज्या रात्री ही घटना घडली त्याबद्दल सियानंद सांगतात, "रात्री जवळपास साडे तीन-चार वाजता घर मालकाच्या मोठ्या मुलानं मला सांगितलं की लगेच माझ्याबरोबर पलवलला चला."
"मग त्यानं सांगितलं की, पलवलऐवजी एसएसबी हॉस्पिटलमध्ये जाऊया. तिथे आम्ही काही मिनिटंच थांबलो होतो. तेवढ्यात एक अॅम्ब्युलन्स आली. त्यात रक्तानं माखलेला माझा मुलगा होता. काही वेळानं हॉस्पिटलमध्येच त्याचा मृत्यू झाला."
ज्या रात्री ही घटना घडली त्या रात्री आर्यन त्यांचा शेजारी आणि घर मालकाच्या मुलासह एकूण चार जणांबरोबर लाल रंगाच्या डस्टर कारमधून जात होता. कारमध्ये त्यांची घर मालकीण आणि इतर एक महिला देखील होती. या दोन्ही महिलांचं वय जवळपास 50 वर्षे आहे.
या गाडीत आर्यनच्या घरमालकाचा मुलगा शॅंकी गुलाटी देखील होता. त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
पोलिस आणि प्रसार माध्यमांना कारमधील चार जणांनी जो पहिला जबाब दिला होता, त्यात त्यांनी सांगितलं होतं की, शॅंकी गुलाटीनं ज्या लोकांवर हल्ला केल्याचा आरोप आहे, त्या चार जणांनी आर्यनची हत्या केली आहे.
मात्र नंतर पोलिसांनी केलेल्या तपासात हा जबाब खरा नसल्याचं आढळून आलं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या फरीदाबाद पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेनं 28 ऑगस्टला आर्यनच्या हत्येच्या आरोपाखाली चार जणांना अटक केली.
त्यात फरीदाबादचा कथित गोरक्षक अनिल कौशिकसह इतर तीन जणांचा समावेश होता. पाचव्या आरोपीला पोलिसांनी 30 ऑगस्टला अटक केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना घडली त्या रात्री फरीदाबादच्या सेक्टर 21 पासून ते पलवल जिल्ह्याच्या भगौला गावापर्यंत एका स्विफ्ट कारनं डस्टर कारचा पाठलाग केला होता. या डस्टर कारमध्ये आर्यन आणि इतर लोक बसलेले होते.
गुन्हे अन्वेषण विभागाचे (क्राईम ब्रँच) पोलिस सहआयुक्त अमन यादव सांगतात की, "आमच्यासाठी हा एक ब्लाईंड मर्डर होता. पहिल्यांदा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ज्या लोकांवर हत्येचा आरोप करण्यात आला होता, ते लोक इतर ठिकाणी असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले होते. त्यानंतर आम्हाला टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज मिळालं. यात लाल रंगाची डस्टर कार अडथळा तोडताना आणि पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार तिचा पाठलाग करताना दिसली."
या बातम्याही वाचा :
सीसीटीव्हीमुळे आरोपींपर्यंत पोहोचले पोलिस
सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर पोलिसांनी इतर पुरावे गोळा केले आणि शेवटी 28 ऑगस्टला अनिल कौशिक, वरुण, आदेश आणि कृष्णा यांना अटक केली. तर त्यानंतर 30 ऑगस्टला सौरभ शर्मा नावाच्या आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत अनिल कौशिकनं सांगितलं की त्यानं गैरसमजातून डस्टर कारवर गोळ्या चालवल्या होत्या.
पोलिसांचं म्हणणं आहे की, एकूण तीन गोळ्या झाडण्यात आल्या. एक गोळी हवेत चालवली गेली तर दोन गोळ्या आर्यनला लागल्या होत्या. एक गोळी मागील बाजूनं त्याच्या गळ्याला लागली होती आणि दुसरी गोळी समोरच्या बाजूनं छातीत लागली होती.
आर्यनच्या पोस्ट मॉर्टम अहवालात देखील त्याला दोन गोळ्या लागण्याच्या गोष्टीची पुष्टी झाली आहे.
मात्र, अजूनही पोलिस अधिकृतपणे हे मान्य करण्यास तयार नाहीत की अटक करण्यात आलेला आरोपी गोरक्षक आहे.
अमन यादव म्हणतात, "प्रसार माध्यमांमधून आलेल्या बातम्यांमध्ये आरोपीला गोरक्षक म्हटलं जातं आहे. मात्र तो कोणत्याही एका संघटनेशी जोडलेला नाही."
पोलिसांनी सांगितलं की, हत्या गैरसमजामुळे झाली. मात्र हल्लेखोरांचा यामागचा हेतू काय होता, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
अमन यादव म्हणतात, "हत्येमागचा हेतू काय होता, याचा तपास सुरू आहे. जर आणखी काही पुरावे समोर आले तर त्यांचा समावेश देखील तपास अहवालात करण्यात येईल आणि तो अहवाल न्यायालयासमोर ठेवला जाईल."
गोरक्षक म्हणून अनिल कौशिकची ओळख
मात्र, फरीदाबादमध्ये अनिल कौशिकची ओळख एक चर्चेत असणारा गोरक्षक अशीच आहे. तो 'लिव्ह फॉर नेशन' नावाची एक संघटना देखील चालवतो.
फरीदाबादच्या पर्वतीय कॉलनीमध्ये त्याचं दोन मजली घर आहे. त्याच्या नातेवाईकांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
मात्र, अनिल कौशिकची आई असं म्हणतात की त्यांच्या मुलानं काहीही चुकीचं केलेलं नाही.
त्या म्हणतात, "त्यानं गाईंची खूप सेवा केली आहे. अनेकवेळा पोलिसांच्या बोलावण्यावरून देखील तो गाई वाचवण्यासाठी गेला आहे."
कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्यास नकार देत त्या म्हणतात, "माझ्या मुलानं जे केलं त्याचा न्याय परमेश्वर करेल."
तर अनिल कौशिकचे शेजारी किंवा आजूबाजूचे लोक देखील या घटनेवर बोलणं टाळतात. ते एवढंच म्हणतात की अनिल कौशिक एक गौरक्षक आहे आणि त्यानं गाईंची खूप सेवा केली आहे.
अनिल कौशिकनं अनेकवेळा गो-तस्करांच्या विरोधात खटले दाखल केले आहेत. आर्यनच्या हत्येच्या घटनेच्या एक दिवस आधी म्हणजे 22 ऑगस्टलाच फरीदाबादच्या सराण पोलिस स्टेशनात त्यानं कथित गो-तस्करांच्या विरोधात तक्रार नोंदवली होती.
आरोपीच्या मित्रानं काय सांगितलं?
भुवनेश्वर हिंदुस्तानीचा अनिल कौशिकशी मागील 6-7 वर्षांपासूनचा परिचय आहे. भुवनेश्वर हिंदुस्तानी सांगतो, "अनिल गोरक्षेबरोबरच गोसेवा देखील करतो. गाईची सेवा करत असतानाचे शेकडो व्हिडिओ त्यानं अपलोड केले आहेत."
"ज्या प्रकरणांमध्ये पोलिसांना देखील गोसेवा करणं शक्य होत नसे, तिथे त्याला मदतीसाठी बोलावलं जायचं."
अनिल कौशिकच्या अटकेनंतर त्याच्या समर्थनासाठी फरीदाबादमधील कोणतीही हिंदुत्ववादी संघटना पुढे आलेली नाही.
यामागचं कारण सांगताना भुवनेश्वर म्हणतात, "जे झालं ते खूपच चुकीचं झालं आहे. एका निर्दोष व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हा गुन्हा आहे."
मात्र भुवनेश्वर असंही सांगतात की, जोपर्यंत गो-तस्करी थांबवणार नाही, तोपर्यंत गाईंच्या रक्षणासाठी गोरक्षक पुढे येत राहतील.
भुवनेश्वर म्हणतात, "ज्यावेळेस गो-तस्करी बंद होईल, त्यावेळेस गोरक्षक आपोआप गप्प बसतील. अनिल कौशिककडून जे घडलं, ते खूपच चुकीचं होतं. त्या गोष्टीचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. मात्र, हे देखील समजून घ्यावं लागेल की एखादी व्यक्ती गोरक्षक का बनते आहे."
या हत्याकांडात अटक करण्यात आलेल्या पाच जणांपैकी एकाचं नाव कृष्णा आहे. तो फरीदाबादजवळच्या खेडी गुजरान गावचा रहिवासी आहे.
या गावातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा बेरोजगार होता. दोन वर्षांपूर्वी त्याची अनिल कौशिकच्या जवळीक वाढली होती. त्यानंतर तो गोरक्षक झाला होता.
कृष्णाच्या घराला आतून कुलूप लागलेलं होतं. त्याच्या नातेवाईकांनी बोलण्यास नकार दिला.
मात्र त्याच्या कुटुंबाशी निगडीत एका व्यक्तीनं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, "ही गोष्ट खरी आहे की तो गोरक्षक आहे. मात्र आम्हाला वाटतं की या घटनेत त्याला अडकवण्यात आलं आहे."
पोलिसांना कॉल केला नाही
फरीदाबाद आणि आसपासच्या परिसरात गोरक्षक खूपच सक्रिय आहेत.
सोशल मीडियावर कथित गो-तस्करांना पकडण्याच्या आणि त्यांच्या विरोधातील हिंसक कारवायांचे व्हिडिओ देखील समोर येत राहिले आहेत. अशा घटनांमध्ये अनेक कथित गो-तस्करांचा मृत्यू देखील झाला आहे.
मात्र एखाद्या हिंदू तरुणाच्या मृत्यूत कथित गोरक्षकांचा सहभाग असल्याची गोष्ट पहिल्यांदाच समोर येते आहे.
फरीदाबादचे क्राइम रिपोर्टर कैलाश गठवाल म्हणतात, "फरीदाबादच्या आसपासच्या परिसरात अनेक मुस्लिम बहुसंख्या असलेले भाग आहेत. त्यामुळे या परिसरात गो-तस्कर आणि गोरक्षकांमध्ये चकमकी होत असतात. मात्र कथित गोरक्षकांमुळे एखाद्या हिंदू तरुणाचा मृत्यू होण्याचं प्रकरण पहिल्यांदाच समोर आलं आहे."
कैलाश गठवाल पुढे सांगतात, "याआधी देखील गोळीबार झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत. मात्र सहसा हवेत गोळीबार केला जायचा. सर्वसाधारणपणे गोरक्षक जेव्हा गो-तस्करांना पकडण्याचे प्रयत्न करतात तेव्हा पोलिसांना देखील त्याची माहिती देतात. मात्र, या प्रकरणात सहभागी असणाऱ्या लोकांनी आणि त्यांचा पाठलाग करणाऱ्या गोरक्षकांनी देखील पोलिसांना कळवलं नाही."
त्या रात्री नेमकं काय घडलं होतं?
23 ऑगस्टच्या रात्री जवळपास दोन वाजता फरीदाबादच्या सेक्टर 21 मध्ये या घटनेची सुरूवात झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल कौशिक आणि त्याची टीम इथे आधीपासून उपस्थित होती. त्यांना लाल रंगाच्या डस्टर कारवर संशय आला.
आरोपी अनिल कौशिक आणि त्याच्या टीमला अशी खबर मिळाली होती की या परिसरात डस्टर कारमधून कथित गो-तस्कर जात आहेत.
पोलिसांनुसार, अनिल कौशिक आणि त्याच्या टीमनं जेव्हा डस्टर कारचा पाठलाग केला तेव्हा डस्टर कारमध्ये असणाऱ्यांनी कार थांबवण्याऐवजी पळवण्यास सुरुवात केली.
त्यानंतर जवळपास 30 किलोमीटर अंतरापर्यंत डस्टर कार पुढे जात होती आणि स्विफ्ट कार त्यांचा पाठलाग करत होती.
हा सर्व प्रकार फरीदाबादकडून पलवलच्या दिशेनं जाणाऱ्या महामार्गावर झाला. पोलिसांनी असंही सांगितलं की महामार्ग असल्यामुळे इथे पोलिसांची चेकिंग नव्हती.
क्राइम ब्रॅंचचे एसीपी अमन यादव यांच्यानुसार, "हा सर्व प्रकार अर्ध्या तासाहून अधिक वेळ सुरू होता. मात्र आरोपी आणि डस्टर कारमध्ये असणाऱ्या लोकांपैकी कोणीही पोलिसांना फोन केला नाही की कळवलं नाही."
गोरक्षकांशी संबंधित एका व्यक्तीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींना संशयास्पद डस्टर कारबद्दल माहिती देण्यात आली होती. 23 ऑगस्टच्या रात्री डस्टर कार दिसल्यावर त्यांनी कारचा पाठलाग करण्यास सुरूवात केली.
क्राइम ब्रॅंच चे एसीपी अमन यादव डस्टर कार न थांबता वेगानं पुढे जात असण्यामागचं सांगतात. ते म्हणाले, "डस्टर कारमध्ये शँकी गुलाटी नावाचा तरुण देखील होता. एका हत्येच्या प्रकरणात तो हवा होता. त्यामुळे डस्टर कारमध्ये बसलेल्या लोकांना शंका वाटली की पोलिस त्यांच्या मागावर आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या स्विफ्ट कारमध्ये एक दिवादेखील (पोलिसांच्या गाडीसारखा) लावण्यात आलेला होता. तो पाहून डस्टर कारमधील लोकांचा संशय आणखी बळावला असेल."
या घटनेनंतर आरोपींनी शस्त्र आणि कारवर लावलेला दिवा फेकून दिला. पोलिसांनी आरोपींकडून एक बेकायदेशीर पिस्टल आणि कारवर लावलेला दिवा हस्तगत केल्याचा दावा केला आहे.
पोलिसांनुसार, या प्रकरणात हल्लेखोरांनी ज्या स्विफ्ट कारचा वापर केला होता, त्या कारवर नंबर प्लेट लावण्यात आलेली नव्हती.
आर्यन कारच्या ड्रायव्हरच्या शेजारी बसला होता
आर्यन डस्टर कारच्या ड्रायव्हरच्या शेजारी पुढच्या सीटवर बसला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींकडून हत्येत वापरण्यात आलेल्या पिस्टलसह एक टॉय गन देखील जप्त करण्यात आली आहे. या टॉय गनचा वापर गोळीबाराचा आवाज करण्यासाठी केला गेला होता.
कारमध्ये बसलेले इतर लोक पहिल्या दिवशी प्रसार माध्यमांमध्ये वक्तव्यं दिल्यापासून समोर आलेले नाहीत. मात्र पोलिसांनी घटनेसंदर्भात त्यांची चौकशी केली होती आणि त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं.
मात्र सियानंद मिश्रा प्रश्न विचारतात, "पोलिसांनी गोरक्षकांना अटक केली. मात्र पोलिसांनी या गोष्टीचा देखील तपास केला पाहिजे की घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी आणि आर्यन बरोबर कारमध्ये असलेल्या या लोकांनी पोलिस आणि प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती का दिली. त्यांनी तपास भरकटवण्याचा प्रयत्न का केला?"
सियानंद म्हणतात, "माझ्या मुलाला न्याय मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. घटनेचे प्रत्यक्षदर्शी न्यायालयात त्यांचा जबाब फिरवतील, मग माझ्या मुलाला न्याय कसा मिळेल."
सियानंद यांच्या कुटुंबाला आणखी एका गोष्टीचं शल्य आहे, ते म्हणजे त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर कोणत्याही राजकीय पक्ष किंवा सामाजिक संघटनेशी संबंधित कोणतीही व्यक्ती त्यांना भेटायला आली नाही.
मात्र, माकपा नेत्या वृंदा करात गुरुवारी (5 सप्टेंबर) सियानंद यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी आर्यनच्या मृत्यूसंदर्भात स्थानिक प्रशासन आणि सरकारवर प्रश्न उपस्थित केले.
या घटनेनंतर सियानंद यांच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारची सरकारी किंवा इतर कोणतीही मदत मिळालेली नाही.
सियानंद म्हणतात, "माझा तरुण मुलगा गेला. माझ्या पत्नीला या गोष्टीचा प्रचंड धक्का बसला आहे. ती कोलमडून गेली आहे. आमच्या सर्व कुटुंबाची वाताहात झाली आहे. मला आणखी दोन मुलं आहेत. आता त्यांच्या सुरक्षेची चिंता वाटते आहे."
घटना घडल्याच्या दिवसापासूनच आर्यनच्या आई उमा मिश्रा आजारी पडल्या आहेत. आता तर पायऱ्या उतरण्यासाठीही त्यांना मुलांचा आधार घ्यावा लागतो आहे.
उमा मिश्रा म्हणतात, "स्वत:ला गोरक्षक म्हणवणारे हे लोक एखाद्याचा जीव कसे काय घेऊ शकतात. त्यांना गोळी मारण्याचा अधिकार कोणी दिला? एखादी व्यक्ती खरोखरंच गाय जरी घेऊन जात असेल तर हे लोक गोळी कसे काय मारू शकतात? हे सर्व का घडू दिलं जातं आहे?"
हे बोलताना त्यांच्या घशाला कोरड पडते आणि त्या घरात निघून जातात.
सियानंद म्हणतात, "हिंदू-मुस्लिम भाऊ भाऊ नाहीत का, मुस्लिमांचं रक्त काळं असतं का? त्यांचं रक्तसुद्धा लालच असतं. मग या जगात हा भेदभाव का केला जातो?"
"तुम्ही गोरक्षक असा, तुमचं कोणाशीही शत्रूत्वं असो, गोळी घालायची आणि सांगायचं की गाय घेऊन जात होता. माझ्या मुलाला गोळी घातली. तो कोणती गाय घेऊन जात होता."
सियानंद यांनी आणखी असंख्य प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र त्या प्रश्नांची उत्तरं मिळणं कठीण आहे. या प्रश्नांमुळे ते अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे त्यांची तब्येती देखील ढासळत चालली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)