सांगलीत शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार, ओळखीतील तरुणांनी धमकावत केला अत्याचार

    • Author, सर्फराज सनदी
    • Role, बीबीसी मराठीसाठी

(सूचना : या बातमीमधील काही मजकूर तुम्हाला विचलित करू शकतो.)

सांगलीच्या ईश्वरपूर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

इयत्ता आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी बलात्कार केल्याचा अमानुष प्रकार उघडकीस आला आहे.

या घटनेनंतर पीडित मुलीला आक्षेपार्ह अवस्थेत जवळपास 1 किलोमीटर अंतर चालत जावं लागलं, त्यानंतर ही घटना समोर आली.

या घटनेनं संपूर्ण सांगली जिल्हा हादरला आहे, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे, पोलीस काय म्हणाले, जाणून घेऊ.

प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर (आधीचं इस्लामपूर) परिसरात राहणारी 14 वर्षांची पीडित मुलगी इयत्ता आठवीत शिकते.

16 डिसेंबरच्या रात्री 8.30 च्या सुमारास तिच्या ओळखीतल्या दोन तरुणांनी तिला फोन करून घरातून बाहेर बोलावलं.

त्यानंतर तिला गाडीवर बसवून जवळच्या परिसरातील एका हॉस्पिटलच्या मागील बाजूस असणाऱ्या ऊसाच्या शेतात नेलं.

तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी विरोध केला असता तिला मारहाण केली. शिवाय, तिनं आरडाओरडा सुरू केल्यावर त्यांनी तिला मारून टाकण्याची धमकी दिली.

त्यानंतर या दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे आणि त्यानंतर तिला तशाच अवस्थेत सोडून तिथून पळ काढला.

या घटनेनंतर भेदरलेल्या मनःस्थितीत ही मुलगी आहे त्याच अवस्थेत शेतातून बाहेर पडली आणि घराच्या दिशेनं चालण्यास तिनं सुरुवात केली.

जवळपास 1 किलोमीटर चालत गेल्यानंतर, ईश्वरपूर परिसरातील एका ठिकाणी ती पोहोचली त्यावेळी आसपासच्या नागरिकांचं तिच्याकडे लक्ष गेलं.

तिची अवस्था पाहून लोकांनी तिला मदत केली आणि तिला कपडे दिले. त्यानंतर या घटनेसंदर्भात ईश्वरपूर पोलिसांना कळवण्यात आलं.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी धाव घेत तिला पोलीस ठाण्यात नेलं आणि तिची चौकशी केली.

पोलीस काय म्हणाले?

या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुलीच्या आईनं ईश्वरपूर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली असल्याची माहिती ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली.

वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 डिसेंबरच्या रात्री 12.30 च्या सुमारास 112 क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीनं फोन करून ईश्वरपूर परिसरात एकेठिकाणी ही मुलगी दिसल्याचं सांगितलं होतं.

"माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ त्याठिकाणी धाव घेतली आणि मुलीला घेऊन ते पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आम्ही मुलीकडं याबाबत विचारपूस केली तेव्हा तिनं सांगितलं की, तिला तिच्या ओळखीतल्याच ऋतिक महापुरे आणि त्याचा मित्र आशिष खांबे या दोघांनी 16 डिसेंबरच्या रात्री मोटरसायकलवर बसवून प्रकाश हॉस्पिटलच्या मागे असलेल्या उसाच्या शेतात नेलं.

तिथं त्या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिला सोडून पळून गेले," असं पोलिसांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, "मिळालेली माहिती आणि मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, या प्रकरणातील आरोपी 27 वर्षीय ऋतिक महापुरे आणि त्याचा 26 वर्षीय मित्र आशिष खांबे या दोघांना तातडीनं ताब्यात घेऊन अटक करण्यात आली."

आरोपी सराईत गुन्हेगार

या दोघांच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत आणि विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबतचा अधिक तपास करून दोघांच्या विरोधात न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केलं जाईल, अशी माहितीही पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतिक महापुरे आणि आशिष खांबे या दोघांवरही वेगवेगळ्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असून हे पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे.

आरोपी ऋतिक महापुरे व पीडित मुलगी ही दोघेही एकमेकांना आधीपासून ओळखतात.

ऋतिक हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधीही पोलिसांनी मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

त्याच्या विरोधात खून, खुनाचे प्रयत्न, चोरी यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, असं समोर आलं आहे. आरोपी ऋतिक किंवा त्याच्या वकिलांची बाजू अद्याप मिळालेली नाही. ती उपलब्ध होताच येथेच अपडेट करण्यात येईल.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.