गाझातील भीषण संकट : ओलिसांचे दयनीय अवस्थेतील व्हीडिओ समोर, उपासमारीने अशी झाली अवस्था

    • Author, ह्युगो बाशेगा, मॅलरी मोंच
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

गाझामधील युद्ध सुरू होऊन अनेक महिने झाले, परंतु जगासमोर आता एक वेगळंच भीषण चित्र उभं राहत आहे. अशक्त ओलिसांचे व्हीडिओ, उपासमारीने होणारे मृत्यू आणि वाढतं मानवी संकटाचं भीषण वास्तव.

इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षामुळे केवळ राजकारणच नव्हे तर सामान्य लोकांचं जीवनही उद्ध्वस्त झालं आहे. एकीकडे ओलिसांच्या सुटकेसाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आंदोलनं होत आहेत, दबाव वाढत आहे.

दुसरीकडे इस्रायलवर युद्धातील त्यांची भूमिका आणि मदतीवरील निर्बंधांमुळे टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर ओलिसांची स्थिती, गाझातील दयनीय अवस्था आणि जागतिक संतापाचं एकत्रित चित्र समोर येताना दिसत आहे.

गाझामध्ये पकडून ठेवलेल्या अशक्त आणि खंगलेल्या अवस्थेतील ओलिसांचे व्हीडिओ समोर आल्याने पाश्चिमात्य देशातील नेत्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या ओलिसांपर्यंत त्वरीत मदत पोहोचावी यासाठी रेड क्रॉसने परवानगीची मागणी केली आहे.

31 जुलैला पॅलेस्टिनियन इस्लामिक जिहादने अशक्त आणि रडत असलेल्या रॉम ब्रास्लावस्कीचा व्हीडिओ प्रसिद्ध केला, तर 2 ऑगस्टला हमासने अत्यंत अशक्त अवस्थेतील एव्यातार डेव्हिडचा व्हीडिओ जारी केला, त्यानंतर ही मागणी पुढे आली आहे.

इस्रायली नेत्यांनी हमासवर ओलिसांना उपाशी ठेवल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, ओलिसांचे व्हीडिओ पाहून मन सुन्न झाल्याचे ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांनी म्हटले आहे. ओलिसांना तात्काळ आणि बिनशर्त सोडलं पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

परंतु, गाझामधील उपासमारीच्या संकटात ओलिसांना उपाशी ठेवत असल्याचा आरोप हमासच्या सशस्त्र गटाने फेटाळला आहे. जे अन्न हमासचे सैनिक आणि स्थानिक लोक खातात, तेच अन्न ओलिसांना दिलं जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

गाझामधून मिळालेल्या वृत्तानुसार, मदतीसाठी जमलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांवर रविवारी दोन ठिकाणी इस्रायली सैनिकांनी गोळीबार केला. या गोळीबाराच्या घटनेत किमान 27 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाल्याचे गाझामधील रूग्णालयातून सांगण्यात आलं आहे.

ब्रास्लावस्की (21) आणि डेव्हिड (24) या दोघांनाही 7 ऑक्टोबर 2023 रोजी दक्षिण इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यादरम्यान नोव्हा म्युझिक फेस्टिव्हलमधून ओलिस बनवण्यात आलं होतं.

मुळात 251 लोकांना ओलिस बनवण्यात आलं होतं, त्यापैकी 49 अजूनही गाझामध्ये कैदेत असल्याचं इस्रायलनं सांगितलं आहे. या 49 जणांमध्ये 27 जण मरण पावले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दुसरीकडे हे व्हीडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दोन्ही ओलिसांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला आणि त्यांना यामुळे धक्का बसल्याचे सांगत आपल्या भावना व्यक्त केला.

त्याचबरोबर त्यांनी सर्व ओलिसांना परत आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू असून ते थांबणार नाहीत, असं आश्वासनही दिलं आहे.

'रेड क्रॉसच्या भूमिकेवरही प्रश्न'

3 ऑगस्टला नेतन्याहू यांनी त्या भागातील रेड क्रॉसच्या प्रमुखांशी चर्चा केली आणि ओलिसांना अन्न आणि वैद्यकीय मदत तात्काळ मिळावी यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समितीने (आयसीआरसी) हे व्हीडिओ पाहून त्यांना धक्का बसल्याचे म्हटले आहे. या व्हीडिओंमधून ओलिसांचा जीव धोक्यात आहे हे स्पष्टपणे दिसून येते, असंही त्यांनी म्हटलं आहे.

ओलिसांपर्यंत पोहोचण्याची परवानगी मिळावी, ज्यामुळे त्यांची अवस्था, परिस्थिती तपासता येईल, त्यांना वैद्यकीय मदत देता येईल आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधता येईल, अशी मागणी रेड क्रॉसने केली आहे.

परंतु, रेड क्रॉसवरही टीका होताना दिसत आहे. गाझामधील ओलिसांना मदत करण्यात ते अपयशी ठरल्याच्या त्यांच्यावर आरोप केला जात आहे. युद्धात त्यांच्या भूमिकेबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, रेड क्रॉसने त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांना उत्तरही दिलं आहे. अशा परिस्थितीत काम करण्यासाठी ते दोन्ही पक्षांच्या सहकार्यावर अवलंबून असतं आणि त्यांच्या भूमिकेला मर्यादा आहेत, असं रेड क्रॉसनं स्पष्ट केलं.

हमासची सशस्त्र शाखा, अल-कसाम ब्रिगेड्सने गाझामध्ये नियमित आणि कायमस्वरूपी मानवतावादी मार्ग खुले केले आणि मदत येताना हवाई हल्ले थांबवले, तर ओलिसांना अन्न व औषधं पोहोचवण्यासाठी रेड क्रॉसच्या विनंतीला ते सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी भूमिका मांडली.

दरम्यान, पॅलेस्टिनी लोकांकडूनही टीका यावर झाली आहे, कारण 7 ऑक्टोबर 2023 पासून इस्रायली तुरुंगात ठेवलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांना भेटण्याची अद्याप परवानगी मिळालेली नाही.

आठवड्याच्या अखेरीस तेल अवीवमध्ये पुन्हा एकदा ओलिसांचे कुटुंबीय आणि अनेक आंदोलनकर्ते एकत्र जमले. त्यांनी इस्रायली सरकारने ओलिसांची त्वरीत सुटका करावी, अशी मागणी केली.

2 ऑगस्टला झालेल्या एका सभेत डेव्हिड आणि ब्रास्लावस्की यांच्या कुटुंबीयांनी, "सगळ्यांना आता या नरकातून बाहेर काढलं पाहिजे," असं म्हटलं.

एका व्हीडिओमध्ये ब्रास्लावस्की रडताना दिसतो आणि म्हणतो की, त्याच्याकडे खाण्यासाठी अन्न आणि पाणी शिल्लक नाही. त्या दिवशी त्याने फक्त तीन छोटे फलाफल्सचे तुकडे खाल्ले. तो म्हणतो की, "आता तो उभा राहू शकत नाही, चालूही शकत नाही, मी मरणाच्या दारात आहे."

ब्रास्लावस्कीच्या कुटुंबीयांनी एका निवेदनात म्हटलं, "त्यांनी आमच्या रॉमला मानसिकदृष्ट्या खचवून टाकलं आहे." त्यांनी त्यांच्या मुलाला घरी परत आणण्यासाठी इस्रायली आणि अमेरिकन नेत्यांना विनंती केली आहे.

दुसऱ्या व्हीडिओमध्ये डेव्हिड म्हणतो, "मी कित्येक दिवसांपासून काहीही खालेल्लं नाही. पिण्यासाठी पाणीही जेमतेम मिळालं."

त्याच व्हीडिओमध्ये तो स्वतःसाठी कबर खोदताना दिसतो.

त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, "हमासच्या बंकरमध्ये डेव्हिडला मुद्दाम आणि निर्दयीपणे उपाशी ठेवलं आहे. तो जिवंत सांगाडा बनला आहे, जणू जिवंतपणीच गाडला गेला आहे."

जगातील विविध देशाच्या प्रमुखांनाही धक्का

जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांनी हे चित्र पाहून खूप धक्का बसल्याचं म्हटलं आहे. ते असंही म्हणाले की, इस्रायल आणि हमासमधील शस्त्रसंधी होण्यासाठी सर्व ओलिसांची सुटका ही अत्यावश्यक अट आहे.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी "हमास म्हणजे अत्यंत अमानवी क्रूरतेचे प्रतीक" असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी असंही सांगितलं की, फ्रान्स ओलिसांची सुटका, शस्त्रसंधी पुन्हा लागू होणं आणि गाझामध्ये मदत पोहोचवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे.

त्यांनी सांगितलं की, हे सगळे प्रयत्न राजकीय तोडग्यासोबतच व्हायला हवेत म्हणजेच दोन देशांचा तोडगा, जिथे इस्रायल आणि पॅलेस्टाईन शांततेत एकमेकांच्या शेजारी राहतील.

फ्रान्सने अलीकडेच सांगितलं आहे की, काही अटींनुसार ते पॅलेस्टिनला मान्यता देण्याचा विचार करत आहेत. कॅनडा आणि ब्रिटननेही असाच विचार व्यक्त केला आहे. इस्रायलने या निर्णयांचा तीव्र निषेध केला आहे.

अत्यंत अशक्त अवस्थेतील ओलिसांचे चित्र समोर येत असतानाच, संयुक्त राष्ट्रांच्या पाठिंब्याने काम करणाऱ्या संस्थांनी सांगितलं आहे की, गाझामध्ये सध्या 'उपासमारीचं सर्वात भीषण चित्र दिसतंय' आणि रोज कुपोषणामुळे मृत्यू होत आहेत.

इस्रायलनं मात्र आरोप फेटाळले

3 ऑगस्टला हमास संचलित आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत 175 जणांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला आहे, यामध्ये 93 मुलांचा समावेश आहे.

संयुक्त राष्ट्र, मदत संस्था आणि इस्रायलचे काही सहकारी देश गाझामधील उपासमारीसाठी इस्रायलने लावलेल्या मदतीवरील निर्बंधांना दोष देतात. मात्र इस्रायलने हे आरोप नाकारले असून ते त्यासाठी हमासला जबाबदार धरतात.

ठोस पुरावे असतानाही, इस्रायली अधिकारी आणि देशातील काही माध्यमं गाझामध्ये उपासमारीचं अस्तित्वच नाकारतात. ही सगळी संकटाची गोष्ट हमासने बनवलेली आहे आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी ती पसरवली आहे, असा आरोप ते करतात.

गाझामधील उपासमारीचं वास्तव दाखवण्यासाठी काही इस्रायली आंदोलनकर्त्यांनी अत्यंत अशक्त मुलांचे फोटो दाखवले आणि हमाससोबत करार करण्याची मागणी केली. तरीही इस्रायलमधील अनेक लोकांना तिथल्या गंभीर परिस्थितीची जाणीव नाही, असं दिसून येतं.

युद्ध चालू असताना, गाझामधील मोठ्या प्रमाणावर झालेल्या विध्वंसामुळे आणि पॅलेस्टिनी लोकांच्या हालअपेष्टांमुळे इस्रायलवर आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका वाढत चालली आहे आणि ते हळूहळू एकटे पडत आहेत.

जगभरातील सर्वेक्षणांमधून दिसतं आहे की, लोकांचं मत इस्रायलविरोधात वाढत आहे, आणि त्यामुळे तिथल्या नेत्यांवर काहीतरी कारवाई करण्यासाठी दबाव वाढत आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.