दुबईतून किती तोळं सोनं भारतात आणता येतं? परदेशातून सोनं आणण्याचा नियम काय सांगतो?

आखाती देशांमधून त्यातही दुबईतून भारतात सोनं तस्करी करुन आणल्याच्या बातम्या माध्यमांत येत असतात.

कन्नड आणि तामिळ चित्रपटांमधील अभिनेत्री रान्या राव दुबईहून परतत असताना बंगळुरू विमानतळावर महसूल गुप्तहेर विभागानं त्यांना 14.8 किलो सोन्यासह अटक केली आहे.

या सोन्याची किंमत जवळपास 12 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं आहे.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, अभिनेत्री रान्या राव कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांची मुलगी आहे.

रान्या राव मंगळवारी (4 मार्च) बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती, तेव्हा तिच्याकडे सोनं होतं, असं सांगितलं जातं आहे.

विमानतळावर अटक करण्यात आल्यानंतर, महसूल गुप्तहेर विभागाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी रावच्या घराची देखील झडती घेतली.

या झडती दरम्यान रान्या रावच्या घरातून 2.06 कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 2.67 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

याआधी 2020 साली तिरुवनंतपुरम विमानतळावर केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क बोर्डानं एका मुत्सद्दी अधिकाऱ्याच्या बॅगेतून 14.82 कोटी रुपयांचे 30 किलो सोनं जप्त केलं होतं.

यामुळे केरळच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपाचं वादळच आलं होतं. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचे सचिव एम. शिवशंकर यांच्यावर देखील हा ठपका आला होता आणि शेवटी त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.

भारतीय लोकांना सोन्याचं प्रचंड आकर्षण आहे तसंच गुंतवणुकीसाठीही ते सोनं घेत असतात. त्यामुळेच सोनं खरेदीत भारतीय लोक आघाडीवर आहेत. सोन्याच्या मूळ किमतीवर कर आकारला जातो. त्यामुळे त्याची किंमत वाढते.

त्यामुळे आखाती देशात गेल्यावर भारतीय लोक तिथं सोनं खरेदी करतात. तिथं सोन्यावर कर नाही. त्यामुळे भारताच्या तुलनेत सोनं तिथं स्वस्त पडतं. आणि मग कमी किंमतीचं सोनं भारतीयांना जास्तच आकर्षक वाटतं.

संयुक्त अरब अमिरातमध्ये 5 मार्च 2025 रोजी 24 कॅरेटच्या सोन्याची किंमत प्रति तोळा (10 ग्रॅम) 83,670 रु. होती तर तीच भारतात 87,980 रु. होती.

परदेशातून आल्यावर विमानतळावर आपण मर्यादेपेक्षा जास्त सोनं आणलं असेल तर त्याची माहिती द्यावी लागते अन्यथा त्याला तस्करी समजलं जातं.

परदेशातून कोणताही पुरुष 20 ग्रॅम तर महिला 40 ग्रॅम सोनं आणू शकते. त्यावर सीमा शुल्क लागत नाही.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डानं म्हणजेच सीबीआयसीनं सोनं आणण्यावर शुल्क निश्चित केलेले आहे.

15 वर्षांखालील मुलांना सर्वांना 40 ग्रॅम सोनं आणण्याची सूट आहे. त्यासाठी त्या मुलांना नातं सिद्ध करावं लागेल.

पासपोर्ट कायदा 1967 नुसार भारतीय नागरिक दागिने, नाणी अशा सर्वप्रकारचे सोनं आणू शकतात.

आखाती देशातून सोन्याची तस्करी होते कारण तिथं सोनं स्वस्त आहे. तिथलं सरकार सोन्यावर कर घेत नसल्यामुळे तिथं किंमती कमी आहेत.

भारतात मात्र सोन्यावर भरपूर कर आहे. त्यामुळे मुळ किमतीपेक्षा आपल्या देशात सोनं महाग होतं. म्हणून आखाती देशात स्वस्त सोनं घ्यायचं आणि भारतात विकायचं अशा हेतूने तस्करी होते.

गुन्हेगारी विश्वात सोने तस्करीलाही जुना इतिहास आहे. अंडरवर्ल्डमधला प्रमुख हाजी मस्तान आणि दाऊद इब्राहिम सागरी मार्गाने सोनं तस्करी करत असत. आता सोनं तस्करीनं वेगवेगळी रूपं घेतलेली दिसतात.

भारतात सर्वात जास्त सोनं संयुक्त अरब अमिरातीतून येतं. त्यानंतर म्यानमारचा नंबर लागतो. त्यानंतर अफ्रिकेतील काही देशांतून भारतात सोनं येतं.

डीआरआयच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार एकूण तस्करीतलं केवळ 10 टक्के सोनंच पकडलं जातं. सीबीआयसीने 2023-24 मध्ये जवळपास 4,869 किलो सोनं पकडलं होतं.

महाराष्ट्र, केरळ आणि तामिळनाडूत तस्करी केलेलं सोनं सर्वाधिक पकडलं जातं. जवळपास 60 टक्के खटले इथंच दाखल होतात.

सीबीआयसीचे प्रमुख संजय अग्रवाल सांगतात आयात शुल्क 15 वरुन 6 टक्क्यांवर आणल्यावर सोनंतस्करी कमी झाली आहे.

सोन्याची तस्करी करताना पकडले गेल्यास विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल होतो. त्यात दोषी आढळल्यास पाच लाख दंड, जन्मठेप आणि परदेशी जाण्यावर आयुष्यभरासाठी बंदी येऊ शकते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)