जेव्हा शिवराज पाटील यांना सांगण्यात आलं होतं, 'पक्ष वाचवण्यासाठी तुम्हाला राजीनामा द्यावाच लागेल, दुसरा मार्ग नाही'

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांचं निधन झालं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांचं निधन झालं
    • Author, प्रेरणा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झालं आहे. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते.

12 डिसेंबरच्या सकाळी लातूरमधील त्यांच्या घरी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते 91 वर्षांचे होते.

शिवराज पाटील 7 वेळा खासदार होते. ते देशाचे गृहमंत्री, लोकसभेचे अध्यक्ष, पंजाबचे राज्यपाल होते. याशिवाय इतरही अनेक प्रतिष्ठित पदांवर होते.

बहुतांश नेते आणि ज्येष्ठ पत्रकार त्यांना एक मृदुभाषी, मवाळ आणि आदरणीय नेते म्हणून ओळखतात.

बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे, शिवराज पाटील यांच्याबद्दल म्हणाले की, त्यांची काम करण्याची शैली अगदी नोकरशहांसारखीच होती. घटनात्मक बाबींबद्दल त्यांना उत्तम जाण होती. कारण ते वकीलदेखील होते.

त्यांच्या निधनाचं वृत्त आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून काँग्रेस आणि इतर पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या सोशल मीडियावर लिहिलं, "ते एक अनुभवी नेते होते. त्यांच्या सार्वजनिक जीवनात त्यांनी एक आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राच्या विधानसभेबरोबर लोकसभेचे स्पीकर म्हणूनही काम केलं."

"समाजाच्या कल्याणासाठी काम करण्यासाठी ते तत्पर असायचे. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्याशी अनेकदा बोलणं होत असे. काही महिन्यांपूर्वी ते माझ्या निवासस्थानी आले होते. या दु:खाच्या प्रसंगी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत."

तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शिवराज पाटील यांच्या निधनामुळे 'काँग्रेसचं कधीही भरून न निघणारं नुकसान झाल्याचं' म्हटलं आहे.

त्यांनी लिहिलं, "माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील जी यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद आहे. यामुळे पक्षाचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालं आहे."

"लोकसेवेसाठीचं त्यांचं समर्पण, राष्ट्रासाठी त्यांनी दिलेलं योगदान नेहमीच लक्षात ठेवलं जाईल. या दु:खाच्या क्षणी माझ्या संवेदना संपूर्ण पाटील कुटुंब, त्यांचे शुभचिंतक आणि समर्थकांबरोबर आहेत."

सोनिया गांधींचे निकटवर्तीय

शिवराज पाटील यांना सोनिया गांधींच्या अतिशय जवळच्या लोकांमध्ये गणलं जायचं.

याबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक रशीद किडवई यांनी एका लेखात लिहिलं आहे, "1981चं वर्ष... त्या दोघांमधील संबंधांसाठी अतिशय महत्त्वाचं वर्ष मानलं जाऊ शकतं. त्यावेळेस तरुण असलेल्या शिवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 50 खासदारांचा एक गट इंदिरा गांधींना भेटण्यासाठी गेला होता."

"या खासदारांची मागणी होती की, राजीव गांधींनी राजकारणात यावं. त्यावेळेस संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर मेनका गांधीदेखील राजकारणात येण्याचा प्रयत्न करत होत्या."

"यूपीएच्या काळात शिवराज पाटील सोनिया गांधींच्या अतिशय विश्वासू नेत्यांपैकी एक होते. लोकसभा निवडणुकीत पराभूत होऊनदेखील शिवराज पाटील यांना गृहमंत्री बनवण्यात आलं होतं. त्यांना राष्ट्रपती बनवण्याची देखील तयारी होती."

"मात्र काँग्रेसच्या सहकारी पक्षांनी विरोध केल्यामुळे सोनिया गांधी यांना आणखी एक 'पाटील' म्हणजे प्रतिभा पाटील यांची निवड राष्ट्रपतीपदासाठी करावी लागली," असं किडवई नमूद करतात.

शिवराज पाटील यांच्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई लिहितात की ते सोनिया गांधींच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक होते

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शिवराज पाटील यांच्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई लिहितात की ते सोनिया गांधींच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक होते

बीबीसीला दिलेल्या जुन्या मुलाखतीत काय म्हणाले होते?

2004 मध्ये देशात यूपीएचं सरकार स्थापन झालं. शिवराज पाटील यांनी गृहमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळून फार जास्त दिवस झाले नव्हते. त्यावेळेस ते बीबीसी न्यूज हिंदीच्या 'आपकी बात, बीबीसी के साथ' या एका विशेष कार्यक्रमात सहभागी झाले होते.

या कार्यक्रमात एका श्रोत्यानं दोन वर्षांपूर्वी (2002) गुजरातमध्ये झालेल्या दंगलींविषयी प्रश्न विचारला. श्रोत्यानं विचारलं, "गुजरात दंगलींचा जेव्हा विषय येतो, तेव्हा नेहमीच मुस्लीम पीडितांबद्दल बोललं जातं. मात्र हिंदूदेखील पीडित होते. त्यांच्याबद्दल कोणीही का बोलत नाही?"

या प्रश्नाला उत्तर देताना शिवराज पाटील म्हणाले होते, "आम्ही अनेकवेळा याबद्दल बोललो आहोत. मरणारा किंवा पीडित व्यक्ती कोणीही असो, हिंदू असो, मुस्लीम असो की शीख असो की ख्रिश्चन असो, ते सर्व आपलंच रक्त आहे. ती सर्व आपलीच भावंडं आहेत."

"त्यांच्याबद्दल आम्हाला दु:ख वाटतं. कोणत्याही जात, धर्माचं नाव घेऊन न्याय दिला जाऊ शकत नाही. माणुसकीच्या नावावर न्याय केला जातो. मात्र ऐकणारे फक्त एकच बाजू ऐकतात," असं मत शिवराज पाटील यांनी व्यक्त केलं होतं.

2004 मध्ये देशाच्या गृहमंत्री पदाची जबाबदारी सांभाळल्यानंतरचा शिवराज पाटील यांचा फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2004 मध्ये देशाच्या गृहमंत्री पदाची जबाबदारी सांभाळल्यानंतरचा शिवराज पाटील यांचा फोटो

आणखी एका श्रोत्यानं विचारलं, "गेल्या एनडीए सरकारनं अयोध्या प्रकरण मार्गी लावण्यासाठी अयोध्या सेलची स्थापना केली होती. सरकार ते कायम ठेवेल का?"

या प्रश्नावर शिवराज पाटील म्हणाले होते, "आपल्याला पाहावं लागेल की हा सेल काय आहे. मात्र या प्रकरणाबाबत आमची भूमिका आहे की, धर्मामुळे माणसं जोडली गेली पाहिजे, विभागली जाता कामा नयेत. मंदिर असो, मशीद असो, चर्च असो, या जागा माणसाला देवाशी जोडणाऱ्या जागा आहेत."

"त्यांना माणसाला माणसापासून तोडण्याच्या जागा बनवता कामा नये. जर अशी गोष्टी समोर आली की, ज्यामुळे तोडण्याचा प्रयत्न झाला असेल, तर त्यावरचा मार्ग न्यायालयातूनच येईल."

त्यावेळेपर्यंत, शिवराज पाटील यांना कदाचित या गोष्टीची जाणीवदेखील झाली नसेल, की गृहमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ सोपा असणार नाही. देशात एकापाठोपाठ एक होणाऱ्या कट्टरतावादी घटनांमुळे त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागेल.

गृहमंत्रीपदाचा राजीनामा

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई यांनी त्यांच्या लेखात शिवराज पाटील यांच्या राजीनाम्यामागची कहाणी सांगितली आहे.

त्यांनी लिहिलं, "30 नोव्हेंबर 2008 ला काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होती. त्यावेळेस सोनिया गांधी एकाचवेळी अनेक जबाबदाऱ्या सांभाळत होत्या. त्या यूपीएच्या चेअरपर्सन होत्या, काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या, नॅशनल ॲडव्हायझरी कौन्सिलच्या चेअरपर्सन होत्या आणि संसदेत काँग्रेस पक्षाच्या प्रमुखदेखील होत्या."

"त्यांनी बैठकीची सुरुवात केली. त्या सुरुवातीला म्हणाल्या की, 'संवेदना किंवा प्रस्तावानं काम होणार नाही. आता कारवाई करण्याची आणि काही कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे.' डॉ. मनमोहन सिंग यांनी पदाचा राजीनामा देऊ केला. प्रचंड टीकेच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री ए. के. अँटनी आणि परराष्ट्र मंत्री प्रणब मुखर्जी यांनीदेखील पदाचा राजीनामा देऊ केला."

"शेवटी डॉ. करण सिंग उभे राहिले, ते राहुल गांधींच्या अगदी शेजारीच बसलेले होते. त्यांनी थेट केंद्रीय गृह मंत्री शिवराज पाटील यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले की, मिस्टर शिवराज पाटील, पक्षाला वाचवण्यासाठी तुम्हाला जावं लागेल. दुसरा कोणताही मार्ग नाही."

वादांशी असलेलं नातं

शिवराज पाटील यांच्याशी संबंधित वादांवर बोलताना बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे म्हणाले की, तसं तर शिवराज पाटील यांची प्रतिमा 'नो नॉन्सेंस' म्हणजे वादांपासून दूर राहणाऱ्या नेत्याची होती. मात्र असे काही प्रसंग आले की, इच्छा असूनही त्यांना वाद टाळता आले नाहीत.

उदाहरणार्थ, यूपीए-1 च्या सरकारमध्ये गृह मंत्रालयाची सूत्रं शिवराज पाटील यांच्या हाती होती. त्यावेळेस नक्षल हिंसाचार आणि कट्टरतावादी घटनांचं मोठं आव्हान निर्माण झालं होतं. अशा परिस्थितीत 2008 मध्ये जेव्हा मुंबईवर 26/11 चा हल्ला झाला. तेव्हा शिवराज पाटील यांनी केलेली काही वक्तव्यं आणि पोशाखांबाबत मोठा वाद झाला होता.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत शिवराज पाटील

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत शिवराज पाटील

ज्या दिवशी ही घटना घडली होती. त्यादिवशी शिवराज पाटील प्रसारमाध्यमांमध्ये वेगवेगळ्या कपड्यांमध्ये दिसले होते. त्यावेळेस सर्वत्र या गोष्टीची चर्चा होत होती की, जेव्हा देशात इतकी मोठी घटना घडली आहे, तेव्हा गृहमंत्र्यांचं लक्ष त्या घटनेऐवजी वारंवार कपडे बदलण्यावर आहे. त्यांना खरोखरंच या घटनेचं गांभीर्य लक्षात आलं आहे की नाही.

इतकंच नाही, तर 2022 मध्ये गीता आणि जिहादवर केलेल्या वक्तव्यामुळे देखील शिवराज पाटील यांना भाजपा आणि हिंदुत्ववादी संघटनांची नाराजी आणि टीकेला सामोरं जावं लागलं होतं.

राजकीय कारकीर्द

शिवराज पाटील यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात लातूर शहराचे नगराध्यक्ष म्हणून केली होती. 1 ऑगस्ट 1966 ते 31 मार्च 1970 दरम्यान ते लातूरचे नगराध्यक्ष होते. नंतर 2 वर्षांनी ते लातूरमधूनच आमदार म्हणून निवडून गेले.

त्यांच्या कार्यकाळात ते महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आणि काही महिन्यांसाठी अध्यक्ष देखील होते.

1980 मध्ये शिवराज पाटील लातूरमधून लोकसभेचे खासदार म्हणून निवडून गेले. खासदारकीच्या पहिल्या कार्यकाळातच त्यांना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्याची जबाबदारी देण्यात आली.

त्यांनी दोन वर्षे या मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला. त्यानंतर एक वर्षासाठी त्यांना वाणिज्य मंत्री करण्यात आलं आणि नंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री करण्यात आलं.

2004 मधील शिवराज पाटील यांच्या सरकारी निवासस्थानाबाहेरचा फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2004 मधील शिवराज पाटील यांच्या सरकारी निवासस्थानाबाहेरचा फोटो

1990 मध्ये ते आधी लोकसभेचे उपसभापती झाले आणि नंतर पुढील 6 वर्षांसाठी ते लोकसभेचे अध्यक्ष होते.

1980 ते 1999 दरम्यान ते लातूरमधून लोकसभेचे खासदार म्हणून निवडून गेले. मात्र 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.

तरीदेखील पक्षानं त्यांना राज्यसभेचा खासदार केलं. मग त्याचवर्षी ते देशाचे गृहमंत्रीदेखील झाले.

22 जानेवारी 2010 ला राज्यसभेतील कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना पंजाबचा राज्यपाल करण्यात आलं. 2015 पर्यंत ते या पदावर होते. नंतर हळूहळू ते राजकारणापासून दूर होत गेले.

ज्येष्ठ पत्रकार राशिद किडवई म्हणतात की, त्यांची साईंबाबांवर श्रद्धा होती.

ते म्हणायचे, "संसदेत जेव्हा गदारोळ व्हायचा, तेव्हा मी डोळे बंद करून बाबांचं स्मरण करायचो. स्वत:ला शांत करायचो आणि मग थोड्याच वेळाच संसदेत गोष्टी सुरळीत होऊ लागायच्या."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)