दुर्गा भाभी : भगतसिंग यांची पत्नी बनून ज्यांनी इंग्रजांना चकवा दिला

फोटो स्रोत, NATIONAL BOOK TRUST
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
सायमन कमिशनला विरोध करत असताना झालेल्या लाठीचार्जमध्ये 'पंजाब केसरी' लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला. त्यानंतर 10 डिसेंबर 1928 रोजी लाहोरमध्ये क्रांतिकारकांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी दुर्गादेवी होत्या.
दुर्गादेवी या क्रांतिकारक भगवती चरण वोहरा यांच्या पत्नी होत्या. भगवती चरण वोहरा यांनी 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन'चा जाहीरनामा लिहिला होता. लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेतला जाईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
प्रसिद्ध पत्रकार कुलदीप नय्यर त्यांच्या 'विदाऊट फियर, द लाइफ अँड ट्रायल ऑफ भगतसिंग' या पुस्तकात लिहितात, "दुर्गादेवींनी सर्वांना विचारलं की, स्कॉटची हत्या तुमच्यापैकी कोण करू शकतं? भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि चंद्रशेखर आझाद यांनी हात वर केले. आधी सुखदेव यांना हे काम एकट्यानं करायचं होतं. पण त्यांना मदत करण्यासाठी आणखी चार कॉम्रेड भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद आणि जयगोपाल यांची निवड करण्यात आली.”
17 डिसेंबर 1928 रोजी दुपारी 4 वाजता भगतसिंग आणि राजगुरू यांनी इंग्रज अधिकारी सँडर्सची हत्या करून लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेतला. तीन दिवसांनी सुखदेव त्यावेळी भूमिगत असलेल्या भगवतीचरण वोहरा यांच्या घरी गेले.
त्यांनी दुर्गादेवींना विचारलं, ‘तुमच्याजवळ थोडे पैसे आहेत का?' दुर्गा यांनी त्यांना पती भगवतीचरण यांनी दिलेले 500 रुपये दिले. सुखदेव त्यांना म्हणाले की, काही लोकांना लाहोरमधून बाहेर काढायचे आहे. तुम्ही माझ्याबरोबर लाहोरच्या बाहेर जाऊ शकता का?
त्या काळात दुर्गा भाभी लाहोरच्या महिला महाविद्यालयात हिंदीच्या शिक्षिका होत्या. नाताळच्या सुट्ट्या तीन-चार दिवसांत येणार होत्या. त्यांना नाताळच्या आधी सुट्टी मिळेल, असं सुखदेवनं सांगितलं.

फोटो स्रोत, HARPER COLLINS
मलविंदर जीत सिंग वढाईच त्यांच्या 'भगत सिंग, द इटर्नल रिबेल' या पुस्तकात लिहितात, "दुर्गा भाभींनी मला सांगितलं की दुसऱ्या दिवशी सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू माझ्या घरी येतील. तोपर्यंत मी भगतसिंगला वाढलेल्या केसांसहित पाहिलं होतं. सुखदेवनं मला विचारलं, तुम्ही आम्हाला ओळखता का? मी राजगुरूला यापूर्वी कधीच भेटले नव्हते, म्हणून मी नकार दिला.
"मग सुखदेवने भगतसिंग यांच्याकडे एक खोडकर स्मित करून सांगितलं की, हा तोच 'जट्टू' आहे जो संत्री खाण्याचा शौकीन आहे. हे ऐकून भगतसिंग मोठ्याने हसले. मग तो भगतसिंग असल्याचे मी त्याच्या हसण्यातून ओळखलं. भगतसिंग हसले आणि म्हणाले, भाभी, जेव्हा तुम्ही मला ओळखू शकला नाहीत तर ब्रिटीश पोलिसही मला ओळखू शकणार नाहीत."
दुर्गा भाभी आणि भगतसिंग पती-पत्नी बनले
दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 20 डिसेंबरला भगतसिंग एका अधिकाऱ्यासारखा पोशाख परिधान करुन टांग्यावर चढले. त्यांनी ओव्हरकोट घातला होता. चेहरा दिसू नये म्हणून कोटची कॉलर उंच ठेवली होती.
महागडी साड्या आणि उंच टाचा असलेली चप्पल घालून दुर्गा भाभी त्यांच्या पत्नीच्या रूपात प्रवास करत होत्या. दुर्गा भाभींचा तीन वर्षांचा मुलगा शची भगतसिंगांच्या मांडीवर होता. राजगुरू त्यांच्या नोकराच्या वेषात होते. भगतसिंग आणि राजगुरू या दोघांकडे बंदुक होती.
लाहोर रेल्वे स्टेशनवर एवढा पोलीस बंदोबस्त होता की तो जणू त्याला एखाद्या किल्ल्याचं स्वरुप आलं होतं. या प्रवासासाठी भगतसिंग यांचे नाव रणजीत आणि दुर्गा भाभी यांचे नाव सुजाता ठेवण्यात आले.
कुलदीप नय्यर त्यांच्या 'विदाऊट फियर, द लाइफ अँड ट्रायल ऑफ भगतसिंग' या पुस्तकात लिहितात, "त्या काळात प्रथम श्रेणीतील प्रवाशाला ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी त्याचे नाव सांगावे लागत होते. भगतसिंग यांनी टीसीला त्यांचे नाव सांगण्याऐवजी तिकीट दाखवले.”

फोटो स्रोत, UNISTAR BOOKS
जेव्हा हे लोक त्यांच्या डब्यात पोहोचले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या एका पोलिसाने आपल्या सहकाऱ्याला म्हटलं, "हे लोक साहेब आहेत. कुटुंबासह प्रवास करणारे ज्येष्ठ अधिकारी आहेत."
राजगुरू त्यांचे नोकर म्हणून थर्ड क्लासच्या डब्यात प्रवास करत होते. डेहराडून एक्स्प्रेसने लाहोर स्टेशन काही वेळातच सोडले. प्लॅटफॉर्मवरून ट्रेनमध्ये चढणाऱ्या आपल्या बायका आणि मुलांकडे पाहून रुमाल हलवणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नजरेतून हे सगळे जण सुटले.
त्यावेळी भगतसिंग यांच्या शोधासाठी 500 सुरक्षा कर्मचारी स्टेशनवर तैनात करण्यात आले होते.

फोटो स्रोत, alamy
दुर्गा भाभींनी कलकत्त्याला पाठवला टेलिग्राम
या प्रवासाचे वर्णन करताना दुर्गा भाभी यांनी मलविंदर जित सिंग वढाईच यांना सांगितलं होतं की, "फर्स्ट क्लासमध्ये आम्ही सर्व एकटेच होतो. एक वृद्ध जोडपे आमच्यासोबत काही अंतर चालले आणि नंतर ट्रेनमधून उतरले. एकच प्रवासी उशिरापर्यंत आमच्यासोबत होता, पण तो संपूर्ण प्रवासात झोपेत होता. एकंदरीत आम्हाला क्षणभरही वाटले नाही की आमच्यावर नजर ठेवली जात आहे."
गाडी कानपूरला पोहोचल्यावर तिघांनीही कलकत्त्यासाठी ट्रेन पकडली. दरम्यान, भगतसिंगांनी पोलिसांना चकवा देण्यासाठी एक नाटक केलं. आयडी गौड त्यांच्या ‘मार्टियर्स एज ब्राइडग्रूम’ या पुस्तकात लिहितात, "संपूर्ण प्रवासाला नैसर्गिक रुप देण्यासाठी साहेब लखनऊच्या चारबाग स्टेशनवर चहा प्यायला उतरले."
नोकर बाळाचे दूध घेण्यासाठी निघून गेला. दूध दिल्यानंतर राजगुरू वेगळ्या दिशेने निघाले. येथूनच दुर्गा भाभींनी त्यांच्या सहकारी सुशीला दीदी यांना कलकत्ता येथे तार पाठवली, ज्यामध्ये लिहिले होते- 'कमिंग विथ ब्रदर - दुर्गावती'.

त्या काळी दुर्गा भाभींचे पती भगवतीचरण वर्मा सुशीला दीदी यांच्याकडे राहत होते. आपल्या भावासोबत कलकत्त्याला येणारी ही दुर्गावती कोण आहे, अशी तार मिळाल्यानं दोघांनाही आश्चर्य वाटले.
22 डिसेंबर 1928 रोजी सकाळी सुशीला दीदी आणि भगवतीचरण वोहरा दुर्गा भाभींना घेण्यासाठी कलकत्त्याच्या हावडा स्टेशनवर पोहोचले.
सत्यनारायण शर्मा त्यांच्या 'क्रांतीकारी दुर्गा भाभी' या पुस्तकात लिहितात, "त्या दिवसांत भगवतीचरण वर्मा भूमिगत होते, त्यामुळे त्यांनी कुलीचे कपडे घातले होते, दाढी वाढवली होती आणि गुडघ्यापर्यंतचे धोतर नेसले होते. पत्नी दुर्गा, मुलगा शची आणि भगतसिंग यांना पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्यांच्या तोंडून अचानक बाहेर पडलं, दुर्गा, आज तुला ओळखलं."

फोटो स्रोत, NATIONAL BOOK TRUST
दुर्गा भाभी यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1907 रोजी अलाहाबादमधील शहजादपूर येथे झाला. त्यांचे वडील बांके बिहारीलाल भट्ट हे अलाहाबादचे जिल्हा न्यायाधीश होते. 1918 मध्ये त्यांचं लग्न प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक भगवतीचरण वोहरा यांच्याशी झालं. 3 डिसेंबर 1925 रोजी त्यांना पुत्रप्राप्ती झाली. पतीसोबत राहून त्या क्रांतिकारकांना साथ देऊ लागल्या.
सत्यनारायण शर्मा लिहितात, "सहकारी क्रातिकारकांना तुरुंगात जे कपडे पाठवले जात, त्या माध्यमातून दुर्गा भाभी कोडवर्डमध्ये लिहिलेले संदेश पाठवत असत. रुईचा चिक आणि कांद्याचा रस यांच्या सहाय्यानं कागदावर संदेश लिहिला जायचा. चिक किंवा रस सुकल्यानंतर तो कोरा कागद दिसून येई. मग तुरुंगातील सहकारी तो संदेश सहज वाचू शकत.
बॉम्बस्फोटात पतीच्या हौतात्म्यानंतर दुर्गा भाभींनी केवल कृष्णा या त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरी 15 दिवस मुस्लिम महिला म्हणून वास्तव्य केलं. ती बुरखाधारी व्यक्ती आहे आणि तिचा नवरा केवल कृष्णचा मित्र आहे आणि त्यावेळी तो हजला गेला होता, असं शेजाऱ्यांना सांगण्यात आलं. तो येईपर्यंत ती आमच्यासोबत राहील, असंही सांगण्यात आलं.

फोटो स्रोत, NATIONAL BOOK TRUST
दुर्गा भाभींनी जयपूरहून त्यांच्या पक्षाच्या सदस्यांसाठी दोनदा पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हर आणले होते आणि ब्रिटिश पोलिसांना जराही संशय आला नव्हता, असं दुर्भा भाभींनी मला सांगितलं होतं, सत्यनारायण शर्मा लिहितात.
भगतसिंग यांना कलकत्त्यात सोडल्यानंतर दुर्गा भाभी लाहोरला परतल्या आणि त्यांच्या शिकवण्याच्या कामात व्यस्त झाल्या.
सार्जंट टेलरचा खून
संपूर्ण भारतात क्रांतिकारी कार्ये वेगाने घडत नाहीत, असा विचार 1930 मध्ये चंद्रशेखर आझाद यांच्या मनात येत होता.
म्हणून त्यांनी दुर्गा भाभी, विश्वनाथ वैशंपायन आणि सुखदेव यांना मुंबईला पाठवले. तिथे पोलीस आयुक्त लॉर्ड हॅलीला मारायचे असे ठरले. त्यांची कार लॅमिंग्टन रोडवरील पोलीस ठाण्याजवळ उभी होती. तेवढ्यात मलबार हिलवरून एक कार येताना दिसली. त्यांना वाटले की कारवर गर्व्हनरचा झेंडा आहे. एक इंग्रज अधिकारी गाडीतून उतरला.
सत्यनारायण शर्मा लिहितात, पृथ्वीसिंह आझाद यांनी 'गोळी मार' असा आदेश दिला. दुर्गा भाभींनी लगेच गोळीबार केला. सुखदेवनेही गोळीबार केला. गोळीबारात सार्जंट टेलर आणि त्याची पत्नी ठार झाले. दुर्गाभाभींचा चालक जनार्दन बापट याने तिथून तात्काळ गाडी पळवली. घटनेनंतर लगेचच दुर्गा देवी आणि सुखदेव राज कानपूरला रवाना झाले.

फोटो स्रोत, NATIONAL BOOK TRUST
शर्मा लिहितात, "नंतर दुर्गा भाभींनी मला या घटनेचा तपशील सांगितला. जेव्हा आम्ही बॉम्बे सोडले तेव्हा आम्ही खूप घाबरलो होतो. आम्हाला पाहून चंद्रशेखर आझाद रागाने लाल झाले होते. योजना यशस्वी झाली असती तर आझाद यांना कदाचित त्यातील चुकांकडे लक्ष दिलं नसतं. पण हेलीऐवजी पोलिस सार्जंट आणि त्याच्या पत्नीची हत्या झाली, यातली जोखीम त्यांना अजिबात मान्य नव्हती. पण काही वेळानं राग निवळल्यावर आझाद शांत झाले."
भगतसिंगांना भेटण्यासाठी लाहोरहून दिल्लीला
ज्या दिवशी भगतसिंग यांनी सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकला, त्या दिवशी दुर्गा भाभी त्यांना भेटण्यासाठी खास दिल्लीत आल्या. त्यांनी नंतर मलविंदर जीत सिंग वढाईच यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "मी सियालकोटमध्ये असताना, मला माझ्या पतीकडून एका मेसेंजरद्वारे एक पत्र मिळालं. ज्यामध्ये मला सुशीला दीदींसोबत दोन दिवसांसाठी ताबडतोब दिल्लीला पोहोचण्यास सांगितलं.
“आम्ही लाहोरसाठी बस पकडली आणि तिथून रात्रभर ट्रेनने प्रवास करून 8 एप्रिलच्या पहाटे दिल्लीला पोहोचलो. आम्ही कुदेसिया गार्डनमध्ये गेलो. जिथे सुखदेव भगतसिंगला आमच्याशी भेटायला घेऊन आले होते. आम्ही लाहोरहून आमच्यासोबत जेवण आणले होते, जे आम्ही सर्वांनी मिळून खाल्ले.”

फोटो स्रोत, NATIONAL BOOK TRUST
दुर्गा भाभी यांनी पुढे सांगितलं, "सुशीला दीदींनी आपले बोट कापले आणि भगतसिंगांच्या कपाळावर रक्तानं टिळा लावला. भगतसिंग कोणत्या मिशनवर जात आहेत हे आम्हाला त्यावेळी माहीत नव्हते. ते कोणत्यातरी 'कृती'साठी जात आहेत एवढंच आम्हाला माहिती होतं.
"आम्ही जेव्हा विधानसभेजवळ पोहोचलो तेव्हा सगळीकडे पोलिस होते. तेव्हा आम्ही पाहिलं की भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांना पोलिसांच्या गाडीत घेऊन जात आहेत. माझा मुलगा शची माझ्या मांडीवर बसलेला असताना त्यानं जसं भगतसिंगला बघितलं, तसा तो जोरात ओरडला, 'लंबू चाचा'.
"मी लगेच माझ्या हाताने त्याचे तोंड बंद केले. भगतसिंग यांनीही शचीचा आवाज ऐकला आणि ते आमच्याकडे पाहू लागले. पुढच्या क्षणार्धात ते आमच्या डोळ्यांसमोरून निघून गेले."
दुर्गा भाभी आणि महात्मा गांधींची भेट
भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा जाहीर झाल्यापासून चंद्रशेखर आझाद यांनी ही शिक्षा थांबवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांनी दुर्गा भाभींना महात्मा गांधींची भेट घेण्यासाठी दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतला.
पण, भगतसिंग त्यांची फाशीची शिक्षा थांबवण्याच्या विरोधात होते. 26 फेब्रुवारी 1931 रोजी गाझियाबादचे प्रमुख काँग्रेस नेते रघुनंदन शरण दुर्गा भाभी आणि सुशीला देवी यांच्यासोबत रात्री 11 वाजता दर्यागंज येथील डॉ. एमए अन्सारीच्या कोठीत पोहोचले. गांधीजी तिथेच थांबले होते.

फोटो स्रोत, Getty Images
सत्यनारायण शर्मा दुर्गा भाभींच्या चरित्रात लिहितात, “जवाहरलाल नेहरू कोठीच्या बाहेर फिरत होते. त्यांनी दोन्ही महिलांना कोठीच्या आत नेले. दुर्गा भाभींनी गांधीजींना सांगितले की, मी चंद्रशेखर आझाद यांच्या सूचनेवरून त्यांना भेटायला आले आहे आणि भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांची फाशी थांबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत अशी आमची इच्छा आहे.
“या तिघांची फाशीची शिक्षा जर महात्मा गांधी बदलू शकले, तर क्रांतिकारक त्यांच्यापुढे शरणागती पत्करतील, असा आझादांचा संदेशही त्यांनी गांधींना दिला. पण गांधीजींनी ही सूचना मान्य केली नाही. ते म्हणाले की, त्यांना वैयक्तिकरित्या भगतसिंग आवडतात पण त्यांच्या कार्यपद्धतीशी ते सहमत नाहीत.”
गांधीजींचे उत्तर दुर्गा भाभींना आवडले नाही आणि त्या गांधींना नमस्कार करून परत गेल्या.
दुर्गा भाभींना अटक
भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना 23 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात आली. याच्या काही दिवस आधी 27 फेब्रुवारी 1931 रोजी चंद्रशेखर आझादही पोलीस चकमकीत ठार झाले.
त्यावेळी आत्मसमर्पण करून स्वतःला अटक करून इतर मार्गाने देशसेवा करावी, असं दुर्गा भाभींनी ठरवलं. 12 सप्टेंबर 1931 रोजी दुर्गा भाभींचे याबाबतचे विधान लाहोरच्या वर्तमानपत्रात छापून आले.
पोलिसांनी त्यांना दुपारी बारा वाजता राहत्या घरातून अटक केली. त्यानंतर दुर्गा भाभी एका मुलाखतीत म्हणाल्या, “मला अटक करण्यासाठी पोलीस तीन गाड्यांमध्ये आले. मला लाहोरच्या किल्ल्यावर नेण्यात आले.
"तिथं एसएसपी जेकिन्स मला धमकावत म्हणाले, तुमच्याबद्दलची सर्व माहिती मला तुमच्या साथीदारांकडून मिळाली आहे. मी पटकन त्यांना उत्तर दिले, "तुमच्याकडे माझ्याविरुद्ध पुरावे असतील तर माझ्यावर खटला चालवा, नाहीतर मला सोडून द्या."

फोटो स्रोत, NATIONAL BOOK TRUST
पण जेनकिन्सने त्यांचं ऐकलं नाही. पहिल्या रात्री दुर्गा भाभींना अत्यंत भयानक महिला गुन्हेगारांसोबत तुरुंगात ठेवण्यात आलं. पोलिस त्यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे गोळा करू शकले नाहीत, तेव्हा डिसेंबर 1932 मध्ये त्यांची तुरुंगातून सुटका झाली. पण, पुढील तीन वर्षांसाठी त्यांना लाहोरच्या बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली.
1936 मध्ये, दुर्गा भाभी लाहोरहून गाझियाबादला गेल्या आणि तिथल्या प्यारेलाल गर्ल्स हायस्कूलमध्ये शिकवू लागल्या. 1940 मध्ये त्यांनी लखनौ मॉन्टेसरी स्कूलची स्थापना केली. नंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या इमारतीचे उद्घाटन केलं.
एप्रिल 1983 मध्ये, आजारपणामुळे त्यांनी अध्यापनातून सुट्टी घेतली. 15 ऑक्टोबर 1999 रोजी दुर्गा भाभींनी या जगाचा निरोप घेतला.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








