3000 वर्षांपूर्वी असं काय घडलं की अख्खा समुद्र या शहरासह वाळवंटात अदृश्य झाला?

ढोलाविरा

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
    • Reporting from, कच्छ, गुजरातहून

जवळपास पाच हजार वर्षं जुनी हडप्पा संस्कृती. सिंधू नदीच्या खोऱ्यात ही संस्कृती बहराला आली. आजच्या पाकिस्तानातल्या बलुचीस्तानपासून चे भारतातल्या उत्तर प्रदेश पर्यंत आणि अफगाणिस्तानपासून भारतातल्या गुजरात पर्यंत या संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.

इतक्या प्राचीन काळी एवढी प्रगत असणारी संस्कृती म्हणजे हडप्पा किंवा सिंधू संस्कृती खासच म्हणावी लागले.

उत्खनानात या संस्कृतीची साक्ष देणारी दोन मोठी शहरं सापडली. हडप्पा आणि मोहेंजडदो. पण सध्या ती दोन्ही पुरातन शहरं पाकिस्तानात आहेत, त्यामुळे सर्वसामान्य भारतीय पर्यटकांना तिथपर्यंत पोहचणं जरा मुश्कीलच.

तरी नाराज होण्याचं कारण नाही कारण यातलं एक शहर, जे खरं या संस्कृतींचे जे अवशेष सापडले आहेत त्यातल्या सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे...ढोलावीरा. ते गुजरातमधल्या कच्छच्या पांढऱ्या वाळवंटाच्या काठाशी वसलेलं आहे. या ढोलावीराला एका रहस्याची झालर आहे.

कच्छचं हे पांढरं वाळवंट, ज्याला कच्छचं रण असंही म्हणतात, खरं म्हणजे मिठाचा अवाढव्य असा साठा आहे. पुरातत्व अभ्यासकांच्या मते इथे पूर्वी समुद्र होता.

धोलाविरा

ढोलावीरा सिंधू संस्कृतीच्या काळातलं एक महत्त्वाचं बंदर होतं आणि एकेदिवशी अचानक हा समुद्र नाहीसा झाला, इथल्या संस्कृतीला घेऊन. त्या समुद्राचे अवशेष म्हणजे मिठाने भरलेलं कच्छचं रण इथल्या लोकांचं काय झालं, ही लोक अचानक आपलं शहर सोडून कुठे गेली, मुळात ही लोक कुठून आली होती, त्यांच्याकडे इतकं प्रगत शहर वसवण्याचं ज्ञान, विज्ञान, कला कुठून आली या प्रश्नांची ठोस उत्तरं संशोधक अजूनही शोधत आहेत. काळाच्या ओघात हे शहर कच्छच्या वाळूत सामावून गेलं.

वाळवंट आणि समुद्राच्यामध्ये वसलेलं शहर

कच्छमधल्या गांधीधाम या शेवटच्या मोठ्या शहरापासून साधारण 200 किलोमीटर लांब खदीरबेट नावाची जागा आहे. याच बेटावर ढोलाविरा नावाचं एक लहानसं गाव आहे. आणि याच ठिकाणी पाच-साडेपाच हजार वर्षांपूर्वी सिंधू संस्कृतीचं एक गजबजलेलं बंदर होतं.

ढोलाविरा

त्याकाळी ही संस्कृती सर्वात प्रगत असलेल्या संस्कृतींपैकी एक होती. पुण्यातल्या डेक्कन कॉलेजचे माजी उप-प्राचार्य डॉ वसंत शिंदे यांचा ढोलाविरावर विशेष अभ्यास आहे. त्यांच्या मते ढोलाविरा हे त्याकाळी हडप्पा संस्कृतीच्या व्यापारातलं महत्त्वाचं बंदर असलं पाहिजे. विशेषतः सिंध ते सौराष्ट्र या मार्गावर व्यापाऱ्यांना मुक्कामासाठी, तसंच त्यांच्या संरक्षणासाठी सोय असावी म्हणून हे शहर वसवलं गेलं असावं.

त्याकाळी इथे समुद्र होता आणि बाजूला वाळवंट. या समुद्राच्या आणि वाळवंटाच्या मध्ये हे शहर वसलं आहे.

अनोखी पाणीपुरवठा प्रणाली

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

वाळवंटी भागात वसलं असल्याने नक्कीच त्याकाळी या शहराला पाण्याचा प्रश्न भेडसावत असणार. काही महिन्यांपूर्वी आम्ही गुजरात विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने या भागाला भेट दिली तेव्हाही इथली सर्वात मोठी समस्या पाणी हीच होती. रापर तालुक्यापासून ही जागा 105 किलोमीटर अंतरावर आहे. आणि एवढ्या परिघात तुम्हाला फक्त चार-दोन लहानशी गावं दिसतील, बाकी सगळं ओसाड.

इथे आम्हाला भेटले सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणारे नागजी परमार. ते म्हणाले, "माझी, माझ्या वाडवडिलांची हयात गेली इथे. पाण्याची वाट बघतोच आहोत. त्या पाण्यापायी ना आमची मुलं शाळेत जाऊ शकतं, ना आमच्या आया-बाया काही दुसरं काम करू शकत, ना आमच्या आयुष्यात काही चांगलं घडतं."

जे आज अत्याधुनिक तंत्रज्ञान असताना शक्य होत नाही, ते पाच-साडेपाच हजार वर्षांपूर्वी कसं शक्य झालं?

पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळीच्या कर्त्या-धर्त्यांची इच्छाशक्ती आणि दुसरं म्हणजे त्या काळी वापरलेलं आधुनिक तंत्रज्ञान आणि दूरदृष्टी.

डॉ शिंदे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणतात, "प्राचीन काळातलं ढोलाविरा हे शहर खरं दोन नद्यांच्या मध्ये वसलं आहे. त्याची रचना समजून घ्यायची असेल तर तुम्हाला आधी हे समजून घ्यावं लागेल की वाळवंटात पावसाळा कशा प्रकारचा असतो."

ढोलाविरामध्ये पाणी साठवण्यासाठी केलेले हौद
फोटो कॅप्शन, ढोलाविरामध्ये पाणी साठवण्यासाठी केलेले हौद

वाळवंटात पाऊस पडतच नाही, आणि जेव्हा पडतो तेव्हा ढगफुटीसारखा पडतो. त्यामुळे सिंधू संस्कृतीच्या रचनाकर्त्यांनी ढोलाविरा हे शहर इथून वाहाणाऱ्या मनसर आणि मनहर या दोन नद्यांच्या मध्ये वसवलं होतं.

इथे अभ्यास करणाऱ्या संशोधकांना या भागात सिंचनाच्या आणि पाणीपुरवठ्याच्या अत्याधुनिक सोयी आढळून आल्या.

इथे मोठाले हौद आहे, विहिरी आहेत, शहराच्या चारी बाजूनी पाण्याचे खंदक आहेत, तसंच शहरात चरे खोदलेत. सगळीकडून पाणी खेळतं राहील अशी व्यवस्था आहे. त्याच प्रमाणे सांडपाण्याच्या व्यवस्थापनाचीही चांगली व्यवस्था आहे.

वाळवंटात वसलेल्या शहराचं तापमान कमी राहावं म्हणून शहराच्या चारी बाजूने पाणी खेळतं ठेवण्याची व्यवस्था केलीये, तसंच पाणी जमिनीत मुरवण्यासाठी खास व्यवस्था आहे.

डॉ शिंदे म्हणतात, “जेव्हा वाळवंटात ढगफुटीसारखा पाऊस यायचा, तेव्हा या दोन्ही नद्यांना मोठाले पूर यायचे. त्या पाण्यावर अनेक बांध घालून ते पाणी त्यांनी शहरात वळवलं. तसंच अशी व्यवस्था केली की हे पाणी चरांव्दारे शहरातल्या हौदांमध्ये येईल. आधी खालचा, तो भरला की पुढचा, तो भरला की पुढचा असे सगळे हौद भरण्याची व्यवस्था होती.”

ढोलाविराच्या या प्राचीन शहरात जमिनीखालीही पाण्याचे प्रवाह वळवून, पाणी मुरवून अंडर ग्राऊंड पाणी साठवण्याची उत्तम व्यवस्था केलेली आढळते. म्हणजे जेव्हा जमिनीवरच्या हौदातलं आणि बंधाऱ्यांमधलं पाणी संपेल, तेव्हा जमिनीत मुरवलेलं पाणी विहिरींतून काढून वापरता येईल.

शिंदे यांच्या मते, “इथे तुम्हाला स्टॉर्म वॉटर ड्रेनेजही दिसेल. त्यामागे उद्देश हा होता की एकदम पाणी आलं तर वसाहतीला धोका होऊ नये. तत्कालीन जगातल्या पाणीपुरवठ्याच्या इतक्या आधुनिक सोयींचा ठळक पुरावा जगात कुठेही आढळलेला नाही.”

शहराची रचना

ढोलाविरातल्या प्राचीन शहराचे तीन भाग संशोधकांना सापडले आहेत. त्याला अप्पर टाऊन, मिडल टाऊन आणि लोअर टाऊन असं म्हणतात. या तिन्ही भागांना मजबूत तटबंदी बांधलेली आढळून येते. इथलं सगळं बांधकाम हे दगडी आहे. या भागात दगड मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होता, आजही आहे.

या भागातलं सगळं बांधकाम दगडी आहे
फोटो कॅप्शन, या भागातलं सगळं बांधकाम दगडी आहे

या तटबंदीच्या चारी बाजूंनी प्रवेशद्वारं आहेत. इथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची चौकशी होत असल्याचीही शक्यता आहे कारण या प्रवेशद्वारांच्या बाजूला सुरक्षारक्षकांसाठी खोल्या आहेत.

ढोलाविरा व्यापारी मार्गावरती असल्यामुळे उत्कृष्ट बांधकामाचा नमूना होतं. शहरातले अंतर्गत रस्तेही त्या काळाच्या तुलनेत प्रशस्त आणि उत्तर-दक्षिण, पूर्व-पश्चिम अशा चारी दिशांना जोडणारे, व्यवस्थित आखणी केलेले रस्ते आहेत.

रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना घरं तसंच इतर वास्तू आहेत.

अप्पर, मिडल आणि लोअर या तिन्ही भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची वस्ती असेल असा संशोधकांचा अंदाज आहे.

डॉ शिंदे म्हणतात, “वरच्या भागात व्यवस्थित बांधलेली आणि मोठ्या आकाराची घरं पाहायला मिळतात. त्या काळातले समाजमान्य महत्त्वाचे लोक तेव्हा तिथे राहात असावेत. प्रशासकीय अधिकारी तिथे राहात असावेत. मधल्या भागात कदाचित त्यांची ऑफिसेस असावीत. व्यापारी वर्ग, महत्त्वाचे कलाकार आणि कारागिर तिथे राहात असावेत. लोअर टाऊनमध्ये सामान्य लोक, कामगार वर्ग राहात होता.”

लोअर टाऊनमध्ये हस्तकलांचा कारखाना आढळून आला आहे. या कारखान्यात दगडापासून मणी बनवण्याचं काम व्हायचं.

शंखापासून दागिने बनवले जात असावेत अशा प्रकारचे अवशेषही इथे आढळून आले आहेत.

ढोलाविरा व्यापारी मार्गावर असल्यामुळे इथे बाजारपेठही तगडी होती.

त्सुनामीपासून संरक्षण

ढोलाविराचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य, जे जगात कुठेही आढळत नाही, ते म्हणजे या शहराला असलेली तटबंदी.

डॉ शिंदे म्हणतात, “जेव्हा आपण तटबंदीचं निरीक्षण करतो, तेव्हा असं दिसतं की तटबंदी जवळजवळ 18 मीटर रूंदीची आहे. आणि खालच्या भागामध्ये जवळजवळ 25 मीटर रूंदीची आहे. तर अशा मजबूत तटबंदीची त्यांना गरज होती का? त्यांना इतका धोका होता का तर नव्हता.”

ढोलाविरा हे सिंधू संस्कृतीलं प्रमुख व्यापारी शहर होतं
फोटो कॅप्शन, ढोलाविरा हे सिंधू संस्कृतीलं प्रमुख व्यापारी शहर होतं

त्यांच्यामते त्याकाळी जगात अशा फारच थोड्या प्रगत संस्कृती होत्या ज्या सिंधू संस्कृतीच्या लोकांवर हल्ले करू शकतील. त्यामुळे परकीय आक्रमकांपासून संरक्षण मिळावं म्हणून या तटबंदी नक्कीच बांधल्या गेल्या नव्हत्या.

मग काय कारण असावं?

अभ्यासकांच्या मते समुद्राजवळ असल्याने या प्राचीन शहराला त्सुनामीचा धोका असावा.

“त्सुनामीच्या मोठ्या लाटा आदळल्या, तरी शहराचं संरक्षण व्हावं या हेतूने शहराच्या तिन्ही भागांना तटबंदी बांधल्या गेल्या असाव्यात. ही संस्कृती किती प्रगत आणि आधुनिक होती याचा अत्यंत महत्त्वाचा पुरावा म्हणजे ही तटबंदी आहे. अशा प्रकारचा पुरावा जगात कुठेही आढळत नाही,” डॉ शिंदे विशद करतात.

एक खास स्टेडियम

ढोलाविराच्या प्राचीन शहरात अनेक काळाच्या पुढे असलेल्या गोष्टी सापडतात. त्यातच एक आहे इथलं स्टेडियम.

हे शहर फक्त व्यापाराचं केंद्र नसून इथे खेळ, करमणुकीचे कार्यक्रम होत असल्याचे दाखले मिळतात.

डॉ शिंदे सांगतात की अप्पर टाऊन आणि मिडल टाऊनच्या मध्ये विस्तृत अशी मोकळी जागा दिसते आणि त्यामध्ये काही पायऱ्या केलेल्या दिसतात.

“जसं स्टेडियममध्ये बांधकाम केलेलं असतं त्या प्रकारचं बांधकाम इथे केलेलं आढळतं. त्यामुळे उत्खनन करणाऱ्यांचं म्हणणं आहे की कदाचित हे त्या काळातलं खेळाचं मोठं मैदान असावं. इथे खेळाबरोबरच इतरही महोत्सव, यात्रा होत असाव्यात. सार्वजनिक वापरासाठी ही जागा असावी. लक्षात घेण्यासारखी बाब अशी, की इथला स्टेडियमचा पुरावा हा जगातला सर्वात पहिल्या स्टेडियमचा पुरावा मानला जातो,” डॉ शिंदे म्हणतात.

2021 साली युनेस्कोने या स्थळाला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिला. प्राचीन सिंधू संस्कृतीच्या ज्या खुणा, जे अवशेष जगात शिल्लक आहेत, त्यापैकी भारतात जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळणारं हे एकमेव ठिकाण. युनेस्कोच्या साईटवर याबद्दल अधिक माहिती दिली आहे.

या स्थळाचा शोध 1968 साली लागला. जवळच्याच ढोलाविरा खेड्याच्या नावावरून या भागालाही ढोलाविरा हे नाव पडलं. भारतीय पुरात्त्व खात्याचे माजी संचालक जगतपती जोशी यांना या शोधाचं क्रेडिट जातं. असं म्हणतात की ढोलावीरामध्ये जवळपास 1500 वर्षं मानवी वस्ती होती.

ढोलाविरामध्ये जवळपास 1500 वर्षं मानवी वस्ती होती
फोटो कॅप्शन, ढोलाविरामध्ये जवळपास 1500 वर्षं मानवी वस्ती होती

म्हणजे हे शहर तब्बल दीड हजार वर्षं नांदतं-जागतं होतं. याठिकाणी सापडलेले अवशेष इसवी सन पूर्व 3000 ते दीड हजार या कालखंडातले आहेत. 1989 पासून 2005 पर्यंत इथे उत्खननाचं काम झालं.

काही अभ्यासकांच्या मते या बंदरावरून मेसोपोटामिया म्हणजे आताचा इराण, इराक, सीरिया आणि कुवेत हे देश तसंच ओमान पेनिन्सुला म्हणजे आताचे ओमान, कतार, दुबई हे देश.. इथंपर्यंत व्यापार चालायचा.

मग या शहराचा ऱ्हास कसा झाला?

त्यावरून संशोधकांमध्ये मतभिन्नता आहे.

एक मतप्रवाह असा सांगतो की सिंधू संस्कृतीच्या नाशाला आर्य कारणीभूत ठरले. आजच्या कझाकिस्तानातून आर्यांच्या घोडेस्वारीत निपुण असणाऱ्या आणि गायी पाळणाऱ्या टोळ्या आल्या. त्यांची युद्धकुशलता प्रभावी असल्यामुळे त्यांच्यासमोर हडप्पा संस्कृती टिकू शकली नाही.

याच आर्यांनी नंतर भारतात वैदिक धर्माचा पाया घातला असं म्हणतात.

ब्रिटिश सैन्यअधिकारी आणि पुरात्तत्व अभ्यासक सर रॉबर्ट एरिक मॉर्टिमर व्हीलर यांनी लिहून ठेवलंय की, ‘मध्ये आशियातून आलेल्या आर्यांनी सिंधू नदीच्या खोऱ्यात वसलेल्या हडप्पा संस्कृतीचा नाश केला.’

सिंधू संस्कृतीचा नाश होत असताना त्याला या संस्कृतीतलं महत्त्वाचं शहर ढोलाविरा तरी कसं अपवाद ठरणार?

तर काही अभ्यासकांच्या मते या संस्कृतीचा नाश पाण्यामुळे झाला. म्हणजे त्सुनामीमुळे.

द नॅशनल इंस्टिट्युट ऑफ ओशोनोग्राफीच्या अभ्यासात असं दिसून आलंय की समुद्राला लागून असणाऱ्या या गावाचा शेवट त्सुनामीमुळे झाला.

पण डॉ शिंदे यांचं मत वेगळं आहे.

सिंधू संस्कृतीचा ऱ्हास होण्याचं एक कारण हवामान बदल हेही सांगितलं जातं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सिंधू संस्कृतीचा ऱ्हास होण्याचं एक कारण हवामान बदल हेही सांगितलं जातं

ते म्हणतात, या शहराच्या, आणि एकूणच सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाला ‘हवामान बदल’ हे कारण आहे.

“इसवी सनपूर्व 1900 च्या सुमारास या संस्कृतीचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते आणि इसवी सन 1500 पर्यंत इथली वसाहत संपूर्ण रिकामी झालेली दिसते.”

ते पुढे म्हणतात, “प्राचीन काळातलं हवामान यावर सगळीकडे अभ्यास होतोय. त्यावरून लक्षात येतं की हवामान बदलाला बळी पडणारी फक्त सिंधू संस्कृती नव्हती. हवामानात बदल होत गेले आणि “आणि त्याचा वाईट परिणाम, मानवी संस्कृतीवर झालेला दिसतो. त्याच काळामध्ये, इसवी सनपूर्व 2000 च्या दरम्यान इजिप्तच्या संस्कृतीचा ऱ्हास होण्यास सुरूवात होते. मेसोपोटमियाच्या संस्कृतीचा ऱ्हास होण्यास सुरूवात झालेली दिसते आणि हरप्पन किंवा सिंधू संस्कृतीचा ऱ्हास होण्याची सुरूवात झालेली दिसते.”

कोणत्या का कारणाने असेना, पण हे शहर काळाच्या ओघात हरवलं. याला लागून जो समुद्र होता तोही आटला. त्याच आटलेल्या समुद्रातलं मीठ म्हणजे कच्छचं पांढरं वाळवंट.

पण या संस्कृतीचे अवशेष अजूनही शिल्लक आहेत, आणि त्यातून आपण काही धडे घेणार की नाही हे आपल्याला ठरवावं लागेल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)