'आम्ही पोलीस स्टेशनमध्येच होतो, तिथून माझी बहीण अचानक गेली; तिचं काय झालं माहीत नाही'

फोटो स्रोत, UGC
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"माझी बहीण पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवण्यासाठी गेली होती. तिच्या घरात वाद झाला होता. आम्ही पोलीस स्टेशनच्या आवारातच थांबलो होतो.
एक अर्ज ड्राफ्ट करण्यासाठी माझा भाऊ गेला होता, तोपर्यंत ती निघून गेली. तिचं पुढे काय झालं माहिती नाही. आता तीन महिने उलटले, ती बेपत्ता आहे."
मुंबईत वास्तव्यास असलेल्या शेहबाज खान यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
शेहबाज खान यांची बहीण 30 वर्षीय मारिया फातिमा खान 18 मे 2023 पासून बेपत्ता आहे. 21 मे रोजी यासंदर्भातील मिसींग तक्रार त्यांनी भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे.
एमबीएपर्यंतच शिक्षण पूर्ण केलेल्या मारिया खान मुंबईतील एका खासगी शाळेत प्राथमिक वर्गाच्या शिक्षिका आहेत.
गेल्या 90 दिवसांपासून भोईवाडा पोलीस स्टेशन परिसरातून त्या बेपत्ता आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
नेमकं काय घडलं?
मारिया खान यांचं साधारण चार वर्षांपूर्वी लग्न झालं. 17 मे 2023 रोजी मारिया आणि त्यांच्या पतीमध्ये वाद झाला आणि त्यांनी मारियाला त्यांच्या माहेरी आणलं.
मारियाच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, "त्यांनी तिला खेचून घरी आणलं. हे आम्ही सीसीटीव्हीमध्ये पाहिलं. तिचा हात पकडून तिला खेचत घरी आणलं. त्यांच्यातील वाद ऐकल्यानंतर आम्हीही तिला समजावलं आणि घटस्फोट घेण्याबाबत आमची चर्चा झाली."
"मारियाची सर्व कागदपत्र तिच्या पतीकडे असल्याने आम्ही त्यांना संपर्क केला. परंतु संपर्क न झाल्याने आम्ही पोलीस स्टेशनला जायचं ठरवलं. मारियाचा फोनही तिच्या पतीकडेच होता,"

फोटो स्रोत, UGC
18 मे रोजी मारिया खान आपल्या काही कुटुंबियांसोबत भोईवाडा पोलीस स्टेशनला पोहचल्या. परंतु तिथून मारिया खान कुठे गेल्या किंवा नेमकं काय झालं हे अद्याप कोणालाही माहिती नाही.
यानंतर 21 मे रोजी मारिया खानच्या भावाने त्या बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
"आम्ही तिच्यासोबत पोलीस स्टेशनलाच होतो. आम्ही मागच्या बाजूला उभे होतो. ती आतमध्ये होती. नंतर बाहेरच्या बाकावर बसली होती. माझा दुसरा भाऊ एका अर्जाचा ड्राफ्ट तयार करण्यासाठी बाहेर गेला होता. त्याने तिला फोन लावला पण ती फोन उचलत नसल्याने तो धावत आला आणि मग आम्ही तिला शोधलं पण ती सापडली नाही." असं शहबाज खान सांगतात.
मारियाला कुठे जायचं असतं तर ती घरातून किंवा त्याआधीच जाऊ शकली असती त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करावा अशी मागणी मारिया यांच्या कुटुंबियांनी केली आहे.
मारिया खान मुंबईतील भोईवाडा परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होत्या. चार वर्षांपूर्वी लग्न झाल्यानंतर त्या आपल्या पतीसह राहत होत्या.
मारियाचं शिक्षण मुंबईत झालं असून त्यांनी फायनॅन्स या विषयात एमबीए केलं आहे. त्यानंतर त्या मुंबईतील एका खासगी शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत होत्या.
'आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासलं पण... '
भोईवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारिया खान यांचे लग्न तीन चार वर्षांपूर्वी साॅफ्टवेअर इंजीनिअर तरुणाशी झाले. काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू झाले.
पोलीस अधिका-याने सांगितलं, "नवरा-बायकोमध्ये वाद होता, तक्रार करण्यासाठी 18 मे रोजी मारिया खान पोलीस स्टेशनला आल्या होत्या. आम्ही नव-यालाही बोलवून घेतले. तिचा फोन परत द्यायला सांगितला. तोपर्यंत तिचा भाऊ लेखी अर्ज लिहून देत होता."

फोटो स्रोत, UGC
"पोलीस स्टेशनबाहेर एक बाक आहे. त्या बाकावर मारिया बसली होती. पण तिथून हातातला फोन सोडून ती एकटीच निघून गेली,"
भोईवाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना, मारिया पोलीस स्टेशनमधून एकटीच बाहेर जाताना आढळली.
आतापर्यंत तिचे कुटुंबिय, नातेवाईक, मित्रपरिवार अशा सर्वांना संपर्क केला, परंतु कोणालाही याबाबत काही माहिती नसल्याचं समोर आल्याचं पोलीस सांगतात.
तसंच हाॅस्पिटल्स, रेल्वे, विविध महिला यंत्रणा, हेल्पलाईन नंबर्स याठिकाणीही शोध मोहीम राबवली असून अद्याप संबंधित महिलेबाबत कोणीही माहिती दिलेली नाही असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, पासपोर्ट नंबरच्या आधारे शोध घेतल्याचंही पोलीस सांगतात.
दरम्यान मारिया खानचे पती अक्रम खान यांनी सांगितलं की, "पोलिसांनी 18 मे रोजी मला बोलवलं होतं. त्यांच्यासमोर मी माझी बाजू मांडली. पोलिसांनी आमची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मी तिथून दुपारी दोन वाजताच्या आधीच निघून गेलो होतो. मला नंतर काही दिवसांनी कळालं की त्या बेपत्ता आहेत. मला याबाबत काहीही माहिती नाही. पोलीस अजूनही त्यांचा शोध घेत आहेत."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








