You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विठ्ठल राव 'गदर': ज्याच्या क्रांतिकारी कवितांनी अनेक पिढ्यांना दिशा दाखवली
- Author, श्रीराम गोपीशेट्टी
- Role, संपादक बीबीसी तेलगू
तेलगूमधील प्रसिद्ध लोकगायक विठ्ठल राव 'गदर' (74) यांचं रविवार 7 ऑगस्ट रोजी हैदराबाद येथे निधन झालं.
फुप्फुसं आणि मूत्राशयात संसर्ग झाल्यामुळे त्यांच्यावर हैदराबादमधील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते, तेथेच त्यांचं निधन झालं.
त्यांच्या निधनानंतर काँग्रेस, केसीआरसह अनेक राजकीय पक्षांनी, चित्रपट कलाकार आणि लोकांनी दुःख व्यक्त केले आहे.
विठ्ठल राव 'गदर' यांचं मूळ नाव गुम्मडी विठ्ठल राव होतं. त्यांच्या कुटुंबात पत्नी विमला, मुलगा सूर्यूडू आणि मुलगी वेनेल्ला आहेत.
त्यांच्या जन्म 1949 साली आंध्र प्रदेशातील मेदक (आता तेलंगणमधील) जिल्ह्यात तुप्रानमध्ये एका दलित कुटुंबात झाला होता.
त्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं त्यानंतर 1970 च्या दशकात त्यांनी काही काळासाठी कॅनरा बँकेत काम केलं.
त्यानंतर ते 'आर्ट लवर्स असोसिएशन'मध्ये सहभागी झाले. त्या संस्थेची स्थापना चित्रपट दिग्दर्शक बी. नरसिंहराव यांनी केली होती. त्यांनी पथनाट्याद्वारे लोकजागृतीचं काम केलं.
यानंतर ते नक्षल राजकारणात प्रवेश केला. ते जननाट्य मंडळीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. ही एक लोकजागृती करणारी एक सांस्कृतिक संघटना होती आणि 'पिपल्स वॉर ग्रुप'शी संबंधित होती.
1980मध्ये तेव्हाच्या आंध्र प्रदेशात 'पीपल्स वॉर ग्रुप' तयार झाला होता. त्याची स्थापना कोंडापल्ली सीतारामय्या यांनी केली होती. ते त्या काळातले प्रसिद्ध नक्षली नेत्यांमध्ये गणले जात. नक्षल आंदोलनामुळे त्यांना भूमिगतही व्हावं लागलं होतं.
'गदर' यांच्या गाण्यांचा प्रभाव
त्यांचं मुख्य काम गुजरात आणि इतर प्रदेशातील मार्क्सवादी-लेनिनवादी विचारांनी प्रेरित झालेल्या सांस्कृतिक संघटनांना एकत्र करणं हे होतं.
त्यांच्या गाण्यांमुळे अनेक तरुणांनी नक्षल आंदोलनात प्रवेश केला असं सांगितलं जातं. ते प्रमाण इतकं होतं की त्यांना प्रजायुद्ध नौका म्हणजे सामान्य लोकांच्या संघर्षाची नौका असं नाव देण्यात आलं होतं.
1990 च्या दशकाच्या सुरुवातीला ते प्रकाशझोतात आले. त्यापूर्वी ते भूमिगत होते. त्यानंतर ते नागरिकांच्या अधिकारासाठी काम करणाऱ्या संघटना आणि इतर चळवळीच्या गटांत काम करू लागले.
90 च्या दशकाच्या मध्यातच त्यांचे नक्षलवाद चळवळीशी मतभेद झाले आणि ते वाढत गेले.
1997 साली काही अज्ञात लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचे प्राण वाचले मात्र शरीरात घुसलेली एक गोळी आता मृत्यू होईपर्यंत शरीरातच राहिली. हा हल्ला पोलिसांनी केला होता, असा आरोप नागरिकांच्या अधिकारांसाठी काम करणाऱ्यांनी संघटनांनी केला होता.
1990 च्या दशकाच्या अखेरीस त्यांनी राजकीय विचारधारेत बदल केला आणि ते आंबेडकरवादाकडे झुकले. त्यांनी आंबेडकरवादाला मार्क्सवादाशी जोडण्यावर भर दिला. वर्ष 2000 नंंतर त्यांनी तेलंगण या वेगळ्या राज्यासाठी सुरू असलेल्या आंंदोलनात भाग घेतला.
त्यांचं 'पोस्दुस्थुन्ना पोद्दुमीदा नाडुस्थुन्ना कालमा' हे गाणं तेलंगण आंदोलनाचं मुख्य गीत झालं होतं.
काळानुरुप बदलत गेले
गेल्या 10 वर्षांत ते संसदीय राजकारणाकडे पाहात होते आणि मतदानाद्वारे बदलाचा विचार मांडत होते.
ही त्यांची भूमिका त्यांच्या सुरुवातीच्या भूमिकेपेक्षा एकदम वेगळी होती, पूर्वी ते निवडणुकांवर बहिष्कार घालत. 2018 साली त्यांनी पहिल्यांदा मतदान केलं. ते काहीकाळ काँग्रेसबरोबर होते. मात्र 2 महिन्यांपूर्वी त्यांनी अचानक नव्या पक्षाची सुरुवात करून तो पक्ष तरुणांना जागरूक करेल अशी घोषणा केली.
या महिन्याभराच्या काळात त्यांना आजारपणामुळे अनेकदा रुग्णालयात दाखल केलं गेलं. नुकतीच त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया झाली होती.
फुप्फुसं आणि मूत्राशयात झालेल्या गंभीर संसर्गामुळे आणि वयोमानानुसार असलेल्या व्याधींमुळे त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, तेलंगणचे मुख्यमंत्री के. सी. राव, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
त्यांना श्रद्धांजली वाहताना राहुल गांधी लिहितात, "तेलंगणचे प्रतिष्ठित कवी, गीतकार आणि उग्र कार्यकर्ता गुम्मडी विठ्ठल राव यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झालं. तेलंगणच्या लोकांवरच्या प्रेमामुळे समाजातील अंतिम स्तरातील लोकांसाठी अथक संघर्ष करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली. त्यांचा वारसा आम्हालाही प्रेरणा देत राहील. "
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे लिहितात, "गुम्मडी विठ्ठल राव समाजातील दुर्बल वर्गातील आकांक्षांसाठी ते सदैव एक आशास्थान म्हणून राहातील. त्यांच्या कविता, जोशपूर्ण गाणी, सामाजिक न्यायासाठी सक्रीय राहाणं सतत तेलंगण आणि तिथल्या लोकांच्या प्रेरणेचा स्रोत म्हणून राहातील. त्यांचे कुटुंबीय आणि अनुयायंप्रती आम्ही सहवेदना व्यक्त करत आहोत."
भारत राष्ट्र समितीने लिहिलं आहे, "तेलंगणचं गीत जगभरात प्रसिद्ध करणारे आणि आपल्या गीतांद्वारे तेलंगण राज्याचा विचारप्रवाह प्रसारित करणारे गदर यांच्या निधनाचं वृत्त समजल्यावर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शोक व्यक्त केला आहे."
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार लिहितात, "तेलंगणचे लोकगायक गदर यांच्या निधनामुळे एक युग संपलं आहे."
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दिन औवेसी यांनीही दुःख व्यक्त केले असून, "गदर गरिबांचा आवाज झाले होते असं लिहिलं आहे."
सिनेअभिनेता पवन कल्याण यांचा राजकीय पक्ष जनसेना पार्टीनेही गदर यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे आणि "ते एक क्रांतिकारी नायक होते त्यांच्या गीतांनी, शब्दांनी तेलंगण आंदोलनाला प्रेरणा मिळाली", असं म्हटलं आहे.
चित्रपट कलाकार मनोज मांचू यांनीही दुःख व्यक्त केले आहे. ते लिहितात, "त्यांच्या आवाजाने हजारो लोकांच्या आत्म्याला जागृत केलं होतं. त्यांचं आता आपल्यात नसणं जाणवत राहिल."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)