You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुकर्रम जाहः शेवटच्या निजामाच्या नातवाने आपली 4 हजार कोटींची संपत्ती कशी उडवली?
- Author, नितीन श्रीवास्तव
- Role, बीबीसी प्रतिनिधी
हैदराबादचे आठवे निजाम मुकर्रम जाह हे 1980 च्या दशकात स्वित्झर्लंडच्या एका ज्योतिषाला भेटले.
“तुमचा मृत्यू 86 वर्षापेक्षा कमी वयात होणार नाही.” असं त्या ज्योतिषाने त्यावेळी मुकर्रम यांना सांगितलं होतं.
त्यानंतर काही वर्षांनी मुकर्रम जाह हे पत्रकार-लेखक जॉन झुबरिस्की यांना तुर्कीतील अनातोलियामध्ये भेटले. त्यावेळी मुकर्रम यांचं वय 71 वर्षे होतं. त्यावेळी ते मधुमेहावर औषध घ्यायचे. पण सिगारेट खूप प्यायचे.
त्यांनी जॉन झुबरिस्कींना म्हटलं, “माझे आजोबा मीर उस्मान अली खाँ हे चेन स्मोकर तर होतेच, त्याशिवाय ते रोज 11 ग्रॅम अफूचं सेवन करायचे. तरीही ते 80 वर्षे जगले. मी तर त्यांच्यापेक्षाही जास्त जगेन.”
2023 मध्ये मुकर्रम जाह यांचं निधन झालं, त्यावेळी त्यांचं वय 89 वर्षे होतं.
त्यांचा मृत्यू अनातोलियामध्येच तीन बेडरूमच्या एका फ्लॅटमध्ये झाला. तिथे एक नर्स, एक स्वयंपाकी आणि एक मदतनीस त्यांच्यासोबत राहायचा.
निजाम मुकर्रम जाह यांचे आजोबा (आईकडून) ऑटोमन साम्राज्याचे शेवटचे खलिफा अब्दुल माजीद-दुसरे होते. 1924 साली त्यांना देशातून तडीपार करण्यात आलं होतं.
इतकी मोठी व्यक्ती आपल्या शेजारी राहतेय, याची मुकर्रम जाह यांच्या शेजाऱ्यांना बिलकुल कल्पना नव्हती.
स्वित्झर्लंडमध्ये शरण घेतलेल्या खलिफा अब्दुल माजीद-दुसरे यांच्या मुलीचा विवाह मुकर्रम जाह यांचे वडील प्रिन्स आझम यांच्याशी झाला होता.
त्यांच्यानंतर 1967 साली हैदराबादचे आठवे निजाम म्हणून मुकर्रम जाह गादीवर बसले.
त्यांना आपल्या आजोबांकडून वारसाहक्काने 10-15 महाल, मुघलकालीन कलाकृती, शेकडो किलो सोन्या-चांदीचे दागिने, हिरे आणि मौल्यवान वस्तू मिळाल्या होत्या.
पण मृत्यूपूर्वी त्यांनी अंदाजे 4 हजार कोटींची मालमत्ता गमावली, किंवा ती त्यांनी उडवली, असंही म्हणता येईल.
मुकर्रम जाह यांचं चरित्र लिहिणारे जॉन झुबरिस्की यांनी ‘द लास्ट निझाम : राईज अँड फॉल ऑफ इंडियाज ग्रेटेस्ट प्रिन्सली स्टेट’ या पुस्तकात त्यांच्याविषयी लिहिलं आहे.
झुबरिस्की लिहितात, “मुकर्रम अत्यंत उत्साहाने एक किस्सा नेहमी सांगायचे. त्यांचे पूर्वज असलेल्या पहिल्या निझामाने कशा प्रकारे गोवळकोंडा किल्ल्यावर असलेल्या पहारेकऱ्यांना लाच देऊन दरवाजा उघडला आणि मुघलांना दक्षिणेत विजय मिळवून दिला, याविषयी ते भरभरून बोलायचे.”
“यानंतर उंटांवर भरून सोने-चांदी, हिऱ्या-मोत्यांचे दागिने औरंगजेबांच्या दरबारात पाठवण्यात आले होते.”
जॉन झुबरिस्की पुढे लिहितात, “ज्या हैदराबादच्या निझामाचं साम्राज्य फ्रान्सच्या क्षेत्रफळाइतकं मोठं होतं, ते आता आक्रसून काही शे एकरपर्यंतच मर्यादित राहिलं आहे, हा केवळ योगायोग नाही.”
मुकर्रम जाह यांचा मृत्यू झाला, त्यावेळी निजामाच्या हैदराबादच्या संपत्तीबाबत वारसदारांमध्ये कोर्टात शेकडो खटले सुरू आहेत. त्यांची सुनावणी आजही सुरुच आहे.”
पण हैदराबादच्या शेवटच्या निजामाने आपल्याकडची भरमसाठ संपत्ती कशी गमावली, याची माहिती घेण्यासाठी आपल्याला इतिहासातही डोकावून पाहावं लागेल.
कारण, त्यांचे आजोबा दादा मीर उस्मान अली यांनी आपला पुत्र प्रिन्स आझम याच्याऐवजी नातू मुकर्रम याला आपला वारसदार निवडलं होतं.
मीर उस्मान अली खान यांचं चरित्र लिहिणारे डीएफ कराका यांनी फॅब्युलस मुघल पुस्तकात लिहिलं आहे, “उस्मान अली खान यांनी वारशातून प्रचंड संपत्ती मिळवली होती. त्यांनी किंग कोठी महालात आपला जनानखाना बनवला होता. तिथे 1920 च्या दशकात त्यांच्या 200 पत्नी राहायच्या. 1967 पर्यंत म्हणजेच सातव्या निझामाच्या मृत्यूपर्यंत त्यांची संख्या घटून 42 पर्यंत खाली आली होती. सातवे निझाम हे कोणताच शाही खर्च करायचे नाहीत. त्यांना कंजूष म्हणून ओळखलं जात असे.”
लेखक जॉन झुबरिस्की यांनी लिहिलंय, “माझे आजोबा मीर उस्मान अली खान संध्याकाळी त्या महालाच्या बगीचात जायचे. तिथे त्यांच्या सगळ्या पत्नी जात असत. आजोबा ज्या पत्नीच्या खांद्यावर पांढरा रुमाल ठेवायचे, ती पत्नी महारालाद त्यांच्या खोलीत रात्री नऊ वाजता भेटायला येईल, असं ठरलेलं असायचं.”
या काळात सातवे निझाम मीर उस्मान अली यांची अपत्ये आणि नातवंडं यांची संख्या वाढू लागली होती. त्यांच्या मृत्यूवेळी त्यांची संख्या 100 च्या आसपास होती, ती 500 च्याही पुढे गेली.
यामधील जवळपास सर्वांनीच आठवे आणि शेवटचे निझाम मुकर्रम जाह यांच्याविरुद्ध संपत्तीत वाटा मिळण्यासाठी खटले दाखल केलेले आहेत.
1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला, त्यावेळी हैदराबाद संस्थान हे देशातील सर्वात श्रीमंत संस्थान होतं. ब्रिटनच्या पंतप्रधानांनीही त्याबाबत बोलून दाखवलं होतं.
जुलै 1948 मध्ये विन्स्टन चर्चिल यांनी ब्रिटिश संसदेत म्हटलं होतं, “संयुक्त राष्ट्राच्या 52 सदस्य देशांमध्ये 20 देश हे हैदराबाद संस्थानापेक्षा लहान होते. त्यांच्यापैकी 16 सदस्यांचं उत्पन्न हे हैदराबादपेक्षा कमी होतं.”
हा तो काळ होता, ज्यावेळी प्रिन्स मुकर्रम जाह यांना त्यांची आई दुरुशेवर यांनी आपले सासरे निझाम मीर उस्मान अली यांच्या इच्छेविरुद्ध दून स्कूल, पुढे केम्ब्रिज, इंग्लंडला शिक्षणासाठी पाठवलेलं होतं.
दरम्यान, याच कालावधीत हैदराबाद संस्थानाचं भारतात विलिनीकरण झालं. निझाम हैदराबादच्या एकूण संपत्तीबाबत अनेक कयास त्यावेळी लावले जात होते.
मीर उस्मान अली यांचे चरित्रकार डीएफ कराका यांच्या मते, “1950 च्या दशकात निझामाची एकूण संपत्ती 1.35 अब्ज रुपये होती. त्यामध्ये 35 कोटी रुपये रोख होते, दागिन्यांची किंमत 5 कोटी होती, इतक्याच किंमतीचे महाल आणि इतर संपत्ती होती.”
न्यूयॉर्क टाईम्स वृत्तपत्राने 1949 साली एक बातमी दिली. त्यानुसार निझामाची एकूण संपत्ती 2 अब्ज अमेरिकन डॉलरच्या आसपास असू शकते, असं त्यामध्ये म्हटलं होतं.
निझाम हैदराबादच्या संपत्तीबाबत जो काही अभ्यास करण्यात आला, त्यामध्ये भारतीय स्टेट बँकेने त्यांच्याकडील दिलेल्या आकडेवारीनुसार 4 हजार कोटींच्या आसपास ही संपत्ती असल्याचं सांगितलेलं आहे.
निझाम मीर उस्मान अली यांनी अखेरीस मुलगा आझमला वारसदार न नेमता मुकर्रम जाहला आपला वारसदार नेमलं.
14 जून 1954 च्या दिवशी भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना लिहिलेल्या एका पत्रात उस्मान अली यांनी लिहिलं होतं, “दारूचं व्यसन आणि पैसे उधळण्याची सवय यांमुळे प्रिन्स आझम कुटुंबप्रमुख बनण्यास पात्र नाही. त्यामुळे माझा नातू मुकर्रम जाह माझ्या वैयक्तिक संपत्तीचा वारसदार असेल.”
यानंतर की वर्षांपर्यंत भारत सरकारने जुन्या राजघराण्यांची संस्थाने खालसा करणं सुरू ठेवलं होतं.
या काळात मुकर्रम जाह इंग्लंड आणि युरोपात बांधकाम कलेपासून ते खाणकामापर्यंतच्या कामांचं शिक्षण घेत होते.
हैरो स्कूल, लंडनमध्ये आपले मित्र राशिद अली यांच्याशी बोलताना ते म्हणाले होते, “मला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून आयुष्याचं आनंद घ्यायचा आहे. त्यामुळे मी माझी सगळी हौस पूर्ण करून घेत आहे. मला पाहिजे तो चित्रपट मी पाहीन, किंवा जॅझ संगीताचा आनंद घेईन.”
1958 साली इस्तांबूलमध्ये सुट्टी घालवत असताना त्यांची भेट एसरा बर्जिन यांच्याशी झाली. त्यानंतर मुकर्रम यांनी लंडनच्या केन्सिंगटन कोर्टात गुपचूप लग्न उरकूनही घेतलं होतं.
इतिहासकार अनिता शाह यांच्याशी झालेल्या चर्चेत मुकर्रम यांनी त्यांना सांगितलं, “माझे आजोबा निझाम मीर उस्मान अली आणि माझी आई या विवाहाविरोधात होती. पण माझ्याकडे त्यावेळी कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता.”
अखेर, 1967 साली सातवे निझाम मीर उस्मान अली यांचं निधन झालं, त्यावेळी मुकर्रम जाह हे गादीवर आले. त्यावेळी त्यांच्यासमोर असलेल्या असंख्य अडचणींमध्ये सर्वात मोठी अडचणी होती ती शाही खर्च.
अनेक वर्षांनंतर त्यांनी तुर्कीमध्ये जॉन झुबरिस्की यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, “माझ्या आजोबांच्या कर्मचाऱ्यांची संख्या 14 हजार 718 होती. त्याशिवाय त्यांच्या 42 पत्नी, 100 अपत्यांचा खर्चही होता.”
“हैदराबादच्या चौमहल्ला महाल परिसरात 6 हजार स्टाफ तैनात केलेला होता. सगळ्या महालांमध्ये मिळून सुमारे 5 हजार सुरक्षारक्षक होते. याशिवाय निझामाच्या स्वयंपाकघरात रोज 2 हजार लोकांचं जेवण बनवलं जायचं. काही स्टाफ आजूबाजूच्या हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये यापैकी मोठा भाग गुपचूप विकून टाकत.
मुकर्रम जाह यांनी हेसुद्धा सांगितलं की निझामाच्या शाही गॅरेजमध्ये रोल्स रॉईस गाड्यांची गर्दी होती. त्याशिवाय इतर सगळ्या वाहनांचा पेट्रोलचा खर्च त्यावेळी वार्षिक 90 हजार अमेरिकन डॉलर इतका होता.
1968 साली आंध्र प्रदेश हायकोर्टाने निझामाची सगळी संपत्ती त्यांच्या वारसदारांमध्ये समसमान वाटण्याचा आदेश दिला. या निर्णयाने मुकर्रम जाह यांना पहिला धक्का बसला.
विशेष म्हणजे, मुकर्रम जाह यांची बहीण शहजादी पाशा हिनेच हा खटला दाखल केला होता. आजोबा मीर उस्मान अली यांनी तिचा विवाह होऊ दिलेला नव्हता.
पुढच्या दोन वर्षांत मुकर्रम यांची पत्नी एसरा आणि मुले इंग्लंडला निघून गेले. त्यानंतर हैदराबादेत आपली संपत्ती वाचवण्याच्या मुकर्रम यांच्या मनसुब्यांना एकामागून एक धक्के बसत गेले.
इंजिनिअरिंग आणि वाहनांच्या देखभालीचा छंद असलेले मुकर्रम जाह आपल्या कामातून वेळ मिळताच आपल्या आजोबांच्या गॅरेजमधील बंद पडलेल्या 56 वाहनांच्या दुरुस्तीच्या कामात गुंतून जात.
अनेक वर्षांनंतर इंग्लंडमध्ये त्यांची पहिली पत्नी एसरा यांनी जॉन झुबरिस्की यांच्याशी बोलताना म्हटलं, “त्यांना एक तर लष्करात जायचं होतं, किंवा वाहन उद्योगात जायचं होतं. त्यांना वाटलं संपत्तीसंदर्भातील कामात जवळच्या मित्रांवर विश्वास ठेवून काम होईल. पण तसं काही घडलं नाही. मुळात ते या सगळ्या गोष्टींसाठी बनलेच नव्हते.”
हैदराबादमध्ये निझाम मुकर्रम जाह यांना एकाएकी आपल्या हैरो स्कूल आणि केंम्ब्रिजमधील एका मित्राची आठवण आली. जॉर्ज हॉबडे असं त्याचं नाव होतं.
तो पश्चिम ऑस्ट्रेलियात डॉक्टर म्हणून कार्यरत होता. मुकर्रम हे त्याला जाऊन भेटले.
पण या भेटीनंतर त्यांच्या आयुष्याने एक वेगळंच वळण घेतलं. केवळ हैदराबादच नव्हे तर त्यांची संपत्तीही त्यांच्यापासून त्यानंतर दूर होत गेली.
पश्चिम ऑस्ट्रेलियातील पर्थ शहराच्या आजूबाजूचा परिसर त्यांना इतका आवडला की तिथे त्यांनी एक फार्महाऊस विकत घेण्याचा निर्णय घेतला.
त्यांना तिथे मर्चिसन हाऊस स्टेशन नामक एका बकऱ्यांच्या फार्मची माहिती मिळाली.
टाईम मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत मुकर्रम जाह यांनी म्हटलं होतं, “मर्चुसन नदीच्या निळ्या पाण्याने मोठमोठाल्या फार्मच्या आजूबाजूच्या लाल सँडस्टोनच्या पर्वतांमध्ये एक वळणदार नकाशा बनवलेला आहे. ते पाहून मला हैदराबादजवळची डोंगरं आणि जंगलांची आठवण आली. तिथं मी आजोबांसोबत शिकारीला जायचो.”
मुकर्रम जाह यांनी ऑस्ट्रेलियातील मर्चिसन हाउस स्टेशनवर लक्ष केंद्रीत केलं. हा परिसर पाच लाख एकरमध्ये पसरलेला होता.
त्याच्या एका बाजूला हिंद महासागर तर दुसऱ्या बाजूला पर्वत आणि दऱ्या असा हा परिसर होता.
एकीकडे भारतातील संपत्तीवर इतरांचा कब्जा वाढत चाललेला असताना मुकर्रम ऑस्ट्रेलियात कित्येक मिलियन डॉलरच्या संपत्तीची खरेदी करण्यात व्यग्र होते.
यामध्ये एक जहाज, सर्वात मोठा बुलडोझर, भूसुरुंग शोधणाऱ्या मशिन्स आणि एक सोन्याची खाण यांचाही समावेश होता.
बायोग्राफर जॉन झुबरिस्की यांच्या मते, “वाढता खर्च पाहून मुकर्रम यांनी त्यांच्याकडील अनेक मौल्यवान दागदागिने स्वित्झर्लंडमध्ये जाऊन विकले. त्यातून जगभरातील आपल्या कर्मचाऱ्यांचा आणि महागड्या हॉटेलांचा खर्च भागवण्याचं त्यांनी नियोजन केलं होतं. पण ऑस्ट्रेलियामध्ये त्यांचा खर्च दुप्पट-तिपटीवर गेला. लोकांनी त्यांच्या पैशाचा अपहार करणं सुरू केलं.”
एकीकडे संपत्तीवर कब्जा, कर्जदारांचा तगादा सुरू असताना भारत सरकारद्वारे निझाम ट्रस्टच्या दागिन्यांची विक्री परदेशात करण्यापासून रोखण्याचा आदेश आला. यामुळे मुकर्रम दिवसेंदिवस खचत चालले होते.
1996 येता-येता त्यांना ऑस्ट्रेलिया आणि युरोपातील आपली संपत्ती गहाण ठेवावी लागली. त्यानंतर विकावीही लागली.
कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांना असे काही निर्णय घ्यावे लागले.
त्यांचं जहाज जप्त करण्यात आलं. वाहनं, बुलडोझर यांचा लिलाव करण्यात आला.
ऑस्ट्रेलियाच्या 'द वेस्टर्न मेल' या वर्तमानपत्राने एक बातमी प्रसिद्ध केली होती. त्यात म्हटले होते, शाह यांच्या कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पैसे खर्च केले असून फसवणूकही केली आहे. मुलांचा ताबा मिळवण्यातही त्यांची बाजू कमकुवत आहे, त्यांना जबर दंड द्यावा लागेल.
त्याचवर्षी एका शुक्रवारी निजाम मुकर्रम जाह यांनी पर्थमधील आपल्या सचिवाला आपण नमाजासाठी जात असल्याचं सांगितलं. त्यानंतर ते ऑस्ट्रेलियात दिसलेच नाहीत. त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या खटल्यांमुळे कारवाई होईल या भीतीने ते तुर्कस्थानात पळून गेले आणि तिथंच राहिले.
हां. या काळात त्यांची दोन लग्नं झाली खरी... पण ती काही फार टिकली नाहीत.
भारत सरकारने 2002 साली निजाम ट्रस्टमधून सरकारी कोषागारात आणलेल्या दागिन्यांसाठी 2.2 कोटी डॉलर्स दिले, पण ही किंमत बाजारभावाच्या एक चतुर्थांशाहून कमी असल्याचं सांगितलं जातं.
यावर्षी मुकर्रम जाह यांचं निधन झाल्यावर त्यांचं पार्थिव हैदराबादेत आणून सन्मानपूर्वक दफन करण्यात आलं. यापूर्वी ते 2012 साली शेवटचे हैदराबादेत आले होते.
काही वर्षांपूर्वी त्यांचे चरित्रकार जॉन झुबरिस्की यांनी त्यांना कोणती इच्छा अपुरी राहिलीय का विचारलं होतं.
तेव्हा तुर्कस्थानात अँटालियामध्ये एका कॅफेत टर्किश चहा पिताना ते म्हणाले, “हां माझ्या एका मित्रानं इंग्लंडमध्ये मला एक गोष्ट सांगितली होती. काही वर्षांपुर्वी इंग्लंडमध्ये माझ्या मित्राला दुसऱ्या महायुद्धात फुटलेली पाणबुडी मिळाली होती. त्यात तुला रस आहे का असं त्यानं विचारलं होतं. पण पुढे काहीच झालं नाही...”
हे ही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)