अॅस्ट्राझेनकाने कोव्हिड लस का मागे घेतली? TTS दुष्परिणाम काय आहे?

कोव्हिड लस

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी

अॅस्ट्राझेनका ही ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी सध्या चर्चेत आहे. या कंपनीनेच ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सोबत मिळून कोव्हिडवरची लस (Vaxzevria) तयार केली होती. भारतामध्ये पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने या लशीचं उत्पादन केलं आणि ती देशात - कोव्हिशील्ड (Covishield) नावाने दिली गेली.

अॅस्ट्राझेनकाच्या या लशीचा एक दुर्मिळ साईड इफेक्ट - TTS ती घेणाऱ्या व्यक्तीवर होऊ शकतो अशी कबुली नुकतीच कंपनीने कोर्टात दिली आणि वादाला तोंड फुटलं.

आता अॅस्ट्राझेनका कंपनीने ही Vaxzevria लस बाजारातून काढून घेतलीय. 'आपल्याला या लशीचा अत्यंत अभिमान असून लस मागे घेणं हा व्यावसायिक निर्णय' असल्याचं कंपनीने म्हटलंय.

'कोरोना व्हायरसचे नवनवीन व्हेरियंट्स आता आलेले आहेत, त्यामुळे आता नव्या अपडेटेड लशींना मागणी असल्याने या लशीच्या मागणीत घट झाली होती, या लशीचं नव्याने उत्पादन करण्यात येत नव्हतं' असं कंपनीने म्हटलंय.

कोरोना व्हायरसच्या जागतिक साथीमुळे 2020 मध्ये जगभरात लॉकडाऊन लागले होते. कोव्हिड होऊ नये म्हणून आणि पर्यायाने लॉकडाऊन उठवता यावा या हेतूने जगभरात वेगाने या कोरोना व्हायरसवरच्या लशी विकसित करण्यात आल्या.

ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या संशोधकांनी विक्रमी वेळेत ही कोव्हिड लस विकसित केली. ज्या प्रक्रियेला साधारणपणे 10 वर्षं लागतात ती प्रक्रिया सुमारे 10 महिन्यांत करण्यात आली. लस विकसित करण्यात आल्यानंतर फार्मास्युटिकल कंपनी अॅस्ट्राझेनकाने तिचं उत्पादन केलं.

TTS काय आहे?

TTS म्हणजे Thrombotic Thrombocytopenia Syndrome (थ्राँम्बॉटिक थ्रॉम्बोसायटोपिनिया सिंड्रोम)

कोव्हिडवर देण्यात आलेल्या लशीमुळे होणारा हा एक अत्यंत दुर्मिळ पण अत्यंत गंभीर साईड इफेक्ट आहे.

अॅस्टाझेनका आणि जॉन्सन अँड जॉन्सनच्या जॅनसेन (Janssen) लशीच्या दुर्मिळ साईड इफेक्ट्समध्ये TTS ची गणना होतेय.

रक्ताची गुठळी

फोटो स्रोत, Getty Images

थ्रॉम्बोसिस (Thrombosis) म्हणजे रक्ताच्या गुठळ्या होणं आणि त्यामुळे रक्तप्रवाहाला अडथळा येणं किंवा रक्तप्रवाह थांबणं.

थ्रॉम्बोसायटोपिनिया (Thrombocytopenia) म्हणजे रक्तामध्ये प्लेटलेट्सचं प्रमाण कमी असणं.

या प्लेटलेट्समुळेच रक्ताची गुठळी व्हायला मदत होते. जखम झाली तर अधिक रक्त वाहून जाऊ नये, म्हणून याच यंत्रणेचा फायदा होतो आणि रक्त वहायचं थांबतं.

याबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्रासाठीचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे सांगतात, "मानवी रक्तामध्ये 1.5 ते 4.5 लाख प्लेटलेट्स 1 मिलीलीटर रक्तामध्ये असतात. त्या दीड लाखांपेक्षा जेव्हा कमी होतात, त्यावेळी त्याला थ्रॉम्बोसायटोपिनिया म्हणतात. अशा प्रकारच्या आजारांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होऊन ती व्यक्ती अतिशय गंभीर होऊ शकते."

मेंदूत वा हृदयात अशा रक्तगुठळ्या झाल्या तर ते घातक ठरू शकतं.

TTS ची लक्षणं काय आणि निदान कसं होतं?

भयंकर आणि सततची डोकेदुखी, धूसर दिसणं, चक्कर येणं बोलणं कठीण होणं, गळून जाणं, आकडी किंवा गोंधळून जाणं, धाप लागणं, छातीत दुखणं, पायाला सूज, ओटीपोटात सतत दुखणं, त्वचेखाली रक्ताच्या गुठळ्या होणं ही याची लक्षणं आहेत.

डॉ. भोंडवे सांगतात, "या प्रकारचा हा TTS हा लस घेतल्यानंतर होऊ शकतो किंवा इतरही अनेक आजारांमध्ये हे घडू शकतं. यामध्ये मेंदूमध्ये रक्ताची गाठ जाऊ शकते किंवा मेंदूमधल्या रक्तवाहिनीमध्ये ती निर्माण होऊ शकते. फुफ्फुसामध्ये, हृदयामध्ये, पोटामध्ये, आपल्या हातापायांमध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या छोट्यामोठ्या रक्तवाहिनीमध्ये हा TTS तयार होऊ शकतो. आणि त्याने रुग्ण अतिशय गंभीर होऊ शकतो.

कोव्हिड लस परिणाम

फोटो स्रोत, Getty Images

रक्ताच्या चाचण्या आणि सीटीस्कॅनद्वारे या TTSचं निदान होऊ शकतं. रक्ताच्या गुठळ्या होऊ न देणारी औषधं आणि काही वेगळ्या प्रकारची औषधं या सिंड्रोमवरचा उपचार म्हणून दिली जातात.

WHO ने याबद्दल काय म्हटलं होतं?

थ्राँम्बॉटिक थ्रॉम्बोसायटोपिनिया सिंड्रोमबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने ( वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन - WHO) एप्रिल 2023 मध्येच मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या होत्या.

निरुपद्रवी अडिनो व्हायरसच्या आधारे तयार करण्यात आलेल्या अॅस्ट्राझेनका कोव्हिड 19 ChAdOx1 (चिंम्पांझी अडिनोव्हायरस ऑक्सफर्ड कोव्हिड व्हॅक्सिन) आणि जॉन्सन अँड जॉन्सन जॅनसेन COVID-19 Ad26.COV2-S या लशींचा नवा दुष्परिणाम थ्राँम्बॉटिक थ्रॉम्बोसायटोपिनिया सिंड्रोम आढळल्याचं WHO ने म्हटलं होतं. TTS हा गंभीर आणि जीवघेणा दुष्परिणाम असल्याचंही त्यांनी म्हटलं.

कोव्हिड 19 च्या लसीकरणानंतर TTS बद्दलची जागरूकता वाढवणं आणि असे रुग्ण आढळल्यास उपाययोजना यासाठीची मार्गदर्शक तत्त्वं WHO ने प्रसिद्ध केली होती.

सीरम इन्स्टिट्यूटने काय म्हटलं?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अॅस्ट्राझेनकाने आंतरराष्ट्रीय बाजारातून लस मागे घेतल्यानंतर भारतात या लशीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय, " 2021 आणि 2022 मध्ये भारतामध्ये लसीकरणाचा उच्चांक गाठला गेला होता. सोबतच या लशीला दाद न देणारे व्हायरसचे नवे व्हेरियंट आल्यानंतर जुन्या लशींना असलेली मागणी मोठ्या प्रमाणात कमी झाली. परिणामी डिसेंबर 2021पासून आम्ही कोव्हिशील्डचे डोस बनवणं वा पुरवणं बंद केलेलं आहे.

सध्या व्यक्त करण्यात येत असलेली काळजी आम्ही समजू शकतो. पारदर्शकता आणि सुरक्षिततेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सुरुवातीपासूनच आम्ही सगळ्या दुर्मिळ ते अति दुर्मिळ साईड इफेक्टसबद्दलची माहिती जाहीर करत आलो आहोत. यात थ्रॉम्बोसिस विथ थ्रॉम्बोसायटोपिनिया सिंड्रोमचाही समावेश आहे. 2021पासूनच पॅकेजिंगच्या आतील कागदावर याची माहिती होती.

जागतिक साथीदरम्यान अनेक आव्हानांचा सामना करावा लागला असला तरी लस सुरक्षित असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अॅस्ट्राझेनकाची वॅक्सजर्वरिया (Vaxzervria) असो वा आमची कोव्हिशील्ड, दोन्ही लशींनी जगभरातील लाखो आयुष्य वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जागतिक साथीला उत्तर देण्यासाठी जगभरातील सरकारं आणि मंत्रालयांनी मिळून केलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत."