अॅस्ट्राझेन्काच्या कोव्हिड लशीविरोधातील नुकसान भरपाईच्या लढाईत याचिकाकर्त्यांचा दावा मजबूत

फोटो स्रोत, EPA
ब्रिटनमधील जेमी स्कॉट नावाच्या एका व्यक्तीने दावा केला आहे की, अॅस्ट्र्राझेन्काच्या कोव्हिड लशीमुळं त्याच्या मेंदूला हानी पोहोचली आहे.
या प्रकरणी आता औषध कंपनीनं कायदेशीर भूमिकेमध्ये बदल केला असल्याचा दावा वकिलांनी बीबीसीबरोबर बोलताना केला.
त्यांच्या कोव्हिड लशीमुळं अत्यंत दुर्मिळ असे साईड इफेक्ट होण्याची शक्यता असल्याचं अॅस्ट्राझेन्का कंपनीनं न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये प्रथमच मान्य केलं आहे.
कोव्हिड लशीसंदर्भात या औषध कंपनीच्या विरोधात विविध वर्गातून अनेक दावे केले जात असल्याचं समोर येत आहे.
यातील काही दाव्यांमध्ये नागरिकांनी त्यांचे नातेवाईक गमावल्याचा दावा केला आहे, तर इतर प्रकरणांमध्ये आरोग्याच्या दृष्टीनं गंभीर दुखापती झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
अॅस्ट्राझेन्कासह कोव्हिडच्या इतर लशींच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांचे प्राण वाचल्याचे दावे यापूर्वीच्या अभ्यासांमधून समोर आले आहेत.
पण गेल्यावर्षी जॅमी स्कॉट यांनी या लशीच्या विरोधात पहिला दावा केला होता. रक्तामध्ये गाठी झाल्यानं मेंदूच्या डाव्या भागाचं नुकसान झालं होतं. एप्रिल 2021 मध्ये लस घेतल्यानंतर त्यांना कामावर परतताच आलं नाही, असा दावा त्यांनी केला होता.
या प्रकरणी युकेमधील ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. लोकांना अपेक्षा होती, त्यापेक्षा ही लस कमी प्रभावी आणि दोषपूर्ण असल्याचा आरोप करण्यात आला होता.
युकेमध्ये कोव्हिडसाठी मान्यता मिळालेली अॅस्ट्राझेन्का ही पहिलीच लस होती.
अॅस्ट्राझेन्का कंपनीच्या विरोधात करण्यात आलेले आरोप आणि दाव्यांच्या विरोधात कोर्टात लढत आहे.
पण त्यांनी, फेब्रुवारी महिन्यात दाखल केलेल्या एका दस्तऐवजात, "त्यांच्या लशीमुळं अत्यंत दुर्मिळ प्रकरणांत TTS होऊ शकतं," असं म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
TTS म्हणजे थ्रोंबोसिस थ्रोंबोसायटोपेनिया सिंड्रोम. पण लसीकरणानंतर जेव्हा हा त्रास होतो, तेव्हा त्याला VITT (Vaccine-induced Immune Thrombosis with Thrombocytopenia) असंही म्हटलं जातं, असं कोर्टात सांगण्यात आलं.
TTS/VITT हा एक दुर्मिळ सिंड्रोम असून त्यामुळं थ्रोंबोसिस (रक्ताच्या गाठी) आणि थ्रोंबोसायटोपेनिया (प्लेटलेटची संख्या घटने) या संदर्भातील वैशिष्टे आढळतात.
TTS/VITT आणि यामुळं होणारे दुष्परिणाम जीवघेणे ठरू शकतात. त्यात स्ट्रोक, मेंदूला इजा, हार्ट अटॅक, फुफ्फुसांसंबंधीच्या समस्या आणि अवयवांना हानी पोहोचण्याची शक्यता असते, असं वकिलांचं म्हणणं आहे.
पण लस घेतलेली नसलेल्यांनाही थ्रोंबोसिसचा त्रास होण्याची दाट शक्यता असते. मात्र, TTS/VITT हा दुर्मिळ सिंड्रोम फक्त लसीकरणानंतरच आढळतो.
भारतात कोव्हिशिल्ड नावाने वितरण
सुरुवातीला निर्मिती मूल्याच्या किमतीतच या लसीची विक्री करण्यात आली होती. अनेक गरीब देशांमध्ये या लशीचा पुरवठा करण्यात आला. उदाहरण द्यायचं झाल्यास मेक्सिकोच्या जलिस्कोसारख्या राज्यात कमी उत्पन्न गटापर्यंत एका मोहीमेच्या माध्यमातून ते पोहोचवण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
"TTS हे सर्वसाधारणपणे (मोठ्या प्रमाणावर) लसीकरणामुळंच होतं, हे आम्ही मान्य करू शकत नाही," असं अॅस्ट्राझेन्कानं सांगितलं होतं.
स्कॉट यांच्या वकिलांनी बीबीसीला मे 2023 मधील एका पत्राच्या माध्यमातून ही माहिती दिली.
पण फ्रेबुवारी महिन्यात अॅस्ट्राझेन्कानं हायकोर्टात एक कायदेशीर दस्तऐवज सादर केला. त्यात त्यांनी 'अतिशय दुर्मिळ प्रकरणांमध्ये AZ लशीमुळं TTS होण्याची शक्यता' असल्याचं मान्य केलं होतं. पण त्याचं नेमकं कारण माहिती नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
दावा करणाऱ्या प्रत्येकानं त्यांना होणारा थ्रोंबोसिस म्हणजे TTS चा त्रास इतर कशामुळं नसून फक्त लशीमुळंच होत असल्याचं सिद्ध करावं, असं कंपनीचं म्हणणं आहे.
“त्याचवेळी, लसीकरण झालेलं नसलं तरी TTS होऊ शकतो. अशा प्रत्येक प्रकरणातील कारण हे तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीवर अवलंबून असेल,” असं त्यांनी म्हटलं.
महाराष्ट्रातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं 2021 मध्ये अॅस्ट्राझेन्काबरोबर किमान 1 अब्ज लशींच्या निर्मितीसाठी करार केला होता. भारतामध्ये या लशीचं वितरण कोव्हिशिल्ड नावानं करण्यात आलं होतं.
‘भूमिकेत उल्लेखनीय बदल’
या प्रकरणी अॅस्ट्राझेन्काच्या भूमिकेतील हा बदल महत्त्वाचा असल्याचं, स्कॉट यांच्यासह एकूण 51 जणांची बाजू मांडणारे वकील म्हणाले.
लेह डे या कायदेविषयक संस्थेच्या सारा मूर यांनी बीबीसीबरोबर बोलताना याबाबत माहिती दिली.
“अॅस्ट्राझेन्का लस ही खासकरून TTS आणि VITT च्या त्रासासाठी सर्वसाधारणपणे कारणीभूत ठरू शकते, याबाबत ही अत्यंत महत्त्वाची कबुली आहे,” असं त्यांनी म्हटलं.
“त्यांनी या प्रकरणी युक्तिवाद करण्यासाठी त्यांच्या भूमिकेमध्ये बदल केल्याची बाब अत्यंत उल्लेखनीय आहे,” असंही त्या म्हणाल्या.

फोटो स्रोत, Getty Images
या कबुलीमुळं याचिकाकर्त्यांना योग्य मोबदला किंवा नुकसान भरपाईच्या रुपानं आर्थिक संरक्षण मिळण्यासाठीचा एक मार्ग खुला झाला आहे.
अॅस्ट्राझेन्कानं मंगळवारी याबाबत बीबीसीला माहिती दिली. मात्र, त्यांनी सारा मूर यांनी मांडलेल्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली नाही.
"ज्या लोकांनी आप्तेष्टांना गमावलं आहे किंवा आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे, त्या सर्वांबरोबर आमच्या संवेदना आहेत. आम्ही रुग्णांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देतो. तसंच औषधांचा वापर करण्यापूर्वी ती सुरक्षित आहेत किंवा नाही, हे ठरवण्यासाठी अधिकृत संस्थांकडून कठोर मानकांचा वापर केला जातो," असं त्यांनी एका निवेदनाद्वारे बीबीसीला सांगितलं.
“चाचण्यांमध्ये समोर आलेले परिणाम आणि प्रत्यक्ष वापरासंदर्भातील आकडेवारीचा विचार करता अॅस्ट्रेझेन्का ऑक्सफर्ड लस सुरक्षित असल्याचं समोर आलं आहे. तसंच जगभरातील नियामकांनीही सातत्यानं या लसीचे फायदे हे त्यापासून होणाऱ्या अत्यंत दुर्मिळ दुष्परिणामांच्या तुलनेत खूप जास्त असल्याचं म्हटलं आहे.
चीनबाहेर लॉकडाऊनला सुरुवात झाल्यानंतर एका वर्षभराच्या आत जगभरात अॅस्ट्राझेन्काच्या लशीचा वापर सुरू झाला होता. केनियामधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मार्च 2021 मध्ये या लसीचं लसीकरणही करण्यात आलं होतं.
वैद्यकीय सल्ल्यांतही बदल
जून 2022 मध्ये जागतिक आरोग्य संघटननं अॅस्ट्राझेन्काची लस ही '18 वर्षे आणि त्यावरील वयाच्या लोकांसाठी सुरक्षित आणि प्रभावी' असल्याचं म्हटलं होतं.
तर 7 एप्रिल 2021 रोजी लसीकरणासंदर्भातील सहसमितीनं (जॉइंट कमिटी ऑन व्हॅक्सिनेशन अँड इम्युनायझेशन) 30 वर्षाखालील प्रौढांसाठी अॅस्ट्राझेन्काशिवाय दुसऱ्या लशीचा पर्याय देण्याचा सल्ला दिला होता.
काही दुर्मिळ प्रकरणांत रक्ताच्या गाठींची समस्या आढळली होती. त्यामुळं त्रास झालेल्यांचा आकडा कमी असला, तरी त्यानंतर हा सल्ला देण्यात आला होता.

फोटो स्रोत, Getty Images
या सल्ल्यानंतर त्याबाबत उल्लेख करण्यासाठी लसींच्या बॉक्सवरचं लेबलिंग बदलण्यात आल्याची माहितीही अॅस्ट्राझेन्कानं दिली.
त्यानंतर 7 मे 2021 रोजी 40 वर्षाखालील प्रौढांसाठी या सूचना लागू करण्यात आल्या.
"आजतागायत जगभरात अशा 30 हून अधिक प्रकरणांमध्ये खटले मागे घेण्यात आले आहेत किंवा त्याचे निकाल अॅस्ट्राझेन्काच्या बाजुनं आलेले आहेत," असं अॅस्ट्राझेन्कानं बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.
‘योग्य मोबदला’
"जेमी याला स्मरणशक्तीच्या समस्येमुळं उपचारांसाठी तज्ज्ञांबरोबर जवळपास 250 पेक्षा जास्त सेशन करावे लागले. त्याला चालणं, बोलणं अगदी गिळणंही पुन्हा शिकावं लागलं," असं जेमी यांच्या पत्नी केट स्कॉट यांनी बीबीसीला सांगितलं.
"त्यानं या उपचारांना खूप चांगला प्रतिसाद दिला. पण तरीही जेमीचं हे नवं रुप नेमकं कसं असेल आणि त्याचं भविष्य याबाबत आम्ही विचारात आहोत. त्याला अनुभव किंवा जाणीवेसंदर्भातील समस्या आहेत. तसंच अफासिया (एखाद्या व्यक्तिला भाषेबाबत किंवा बोलण्याबाबत अडचणी) प्रचंड डोकेदुखी आणि अँधत्वाबाबतच्याही समस्या आहेत.
"सरकारनं (युके) लशीसदंर्भातील नुकसान भपाईच्या धोरणात सुधारणा करण्याची गरज आहे. हा मोबदला अपुरा आणि अन्यायकारक आहे, त्यामुळं आम्हाला न्याय्य मोबदला हवा आहे," असंही केट यांनी म्हटलं.











