गोवा नाईटक्लब आगीत 25 जणांचा मृत्यू, 36 तास उलटल्यावर तेथील लोक काय म्हणत आहेत? - ग्राऊंड रिपोर्ट

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

उत्तर गोव्याच्या आरपोरा या गावात 'बर्च बाय रोमिओ लेन' या नाईट क्लबमध्ये 6 डिसेंबरच्या रात्री आग लागून त्यात 25 जणांचा जीव गेला. या घटनेला जवळपास 36 तास उलटून गेल्यावर आम्ही जवळच असलेल्या बागा बिचकडे जाणाऱ्या गल्ल्यांची स्थिती जाणून घेतली.

ज्या कोणाला गोव्याचं नाईट लाईफ अनुभवायचं आहे, समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यासोबतच रात्रीच्या संगीतावर थिरकायचं आहे, कामाचा सगळा ताण गोव्याच्या रेतीत गाडून टाकायचा आहे ते सगळेच कधी ना कधीतरी या लेनमध्ये आले असणारच.

इथे अनेक रेस्टॉरन्टस् आहेत, समुद्रकिनाऱ्यावरचे शॅक्स आहेत आणि रात्री उशीरापर्यंत सुरू असणारे नाईटक्लब्स आणि पब्जही आहेत.

भारतीय आणि विदेशी पर्यटकांची मोठी गर्दी इथे जवळपास वर्षभर असते. डिसेंबर-जानेवारी तर ख्रिसमस आणि नवीन वर्षं यांच्या काळातला 'पिक सिझन'.

यंदाही या सिझनमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येणं सुरू झालं होतं. मात्र, जेव्हा आम्ही फिरतो, तेव्हा या सगळ्यावर एका दु:खाची, चिंतेची छाया जाणवते. एक झाकोळ आहे. तो अर्थातच आगीच्या दुर्घटनेमुळे आणि त्यातल्या मृत्यूंमुळे आहे.

सगळं उघडं आहे. पब्जही उघडे आहेत. आम्ही संध्याकाळी सूर्यास्तानंतरच्या वेळी तिथे गेलो. त्यावेळी तिथे लोक येण्याची वेळ सुरू झाली आहे. पण तरीही ते नेहमीपेक्षा मोकळेच वाटतात.

त्याच वेळेस इथे काही पोलीस आणि स्थानिक प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची एक टीमही येते. ते एकेक करून प्रत्येक पबमध्ये जातात.

आरपोराच्या घटनेनंतर गोवा सरकारनं सगळ्याच अशा मोठ्या हॉटेल, पब्जची तपासणी करण्याचे आदेश काढले आहेत. ही टीम प्रत्येकाचे परवाने, सुरक्षा व्यवस्था, आगीच्या घटनेदरम्यानच्या व्यवस्था हे सगळं आहे का हे तपासायला सुरुवात करते.

"ज्या रेस्टॉरंट्समध्ये जास्त गर्दी असते, जास्त फुटफॉल आहे, तिथे ही जॉईंट मॉनिटरिंग कमिटी जाईल आणि त्यांना जे तपासण्यासाठी 12 मुद्दे दिले आहेत ते तपासेल. ते सगळे व्यवस्थित असतील, तीच आस्थापनं खुली राहतील," मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केलं आहे.

'पर्यटकांवर परिणाम तर होणार'

सरकारपासून हॉटेलचालकांपासून सगळ्यांनाच भीती आहे की, या घटनेचा पर्यटनावर, पर्यटकांच्या संख्येवर विपरित परिणाम होईल का त्याची.

याच आठवड्यात इंडिगो एअरलाईन्सचा जो गोंधळ झाला, विमानांची उड्डाणं रद्द झाली, प्रवासी अडकले, त्याचा परिणाम भर 'पिक सिझन'मध्ये गोव्यावर तर झालाच आहे. पण त्याहीपेक्षा गंभीर हे पबमधल्या आगीचं प्रकरण आहे.

बागा बिचजवळच्या या गल्ल्यांमध्ये आम्ही जेव्हा फिरतो, इथल्या हॉटेल-पबचालकांशी जेव्हा बोलतो तेव्हा चिंता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसते. 2 दिवसांपासून इथला पर्यटकांचा ओघ रोडावला आहे, असं ते सांगतात.

मनिंदर सिंग भेटतात. त्यांचा 'डाऊनटाऊन गोवा' नावाचा पब आहे. संध्याकाळी उन्हं उतरल्यावरही तो मोकळा आहे. "जेव्हा शनिवारी रात्री आग लागली, तेव्हापासून हे असंच आहे. सगळे एकदम पॅनिक झाले. घाबरले. प्रशासन एकदम हाय अलर्टवर गेलं," मनिंदर सांगतात.

ते सांगतात की, जेव्हापासून ही घटना घडली, तेव्हापासून इथले पब्ज जणू बंदच आहेत.

कलंगुटच्या याच गल्लीत शेजारी शुभग सिंग यांचाही 'क्लब माया' हा पब आहे. ते आम्हाला बोलावतात. आत पबमध्ये घेऊन जातात. आतले लाईट्सही बंद आहेत. शुभम ते सुरू करायला सांगतात. त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता लपत नाही.

"हा एक अपघात होता. तो कुठंही होऊ शकला असता. गोव्यात झाला नसता, तर दिल्लीत झाला असता किंवा मुंबईतही होऊ शकला असता. असे अपघात जगात कुठंही होऊ शकतात. हे समजून घ्यायला हवं. पण आता असं कुठंही होऊ नये म्हणून आम्ही पूर्ण तयारीत आहोत," शुभम म्हणतात.

दुसरीकडे, जेव्हा आम्ही पर्यटकांशी बोलतो, तेव्हा त्यांच्याही बोलण्यात चिंता जाणवते. बिचवर भरपूर गर्दी आहे, पण तुलनेनं पब्जमध्ये कमी आहे, असं चित्र आहे.

पुण्याहून आलेले एक पर्यटक आम्हाला सांगतात की, त्या 7 डिसेंबरपासून कोणत्याही अशा पबमध्ये गेल्या नाहीत भितीनं.

"माझ्या माहितीतही अनेकांनी आपले प्लान्स रद्द केले आहेत. कारण सगळ्यांना आजवर इथं असं काही होणार नाही असा विश्वास होता. आता जे झालं ते दुःखद झालं. पण आता सगळे विचार करतील. आम्ही म्हणूनच तेव्हापासून कोणत्याही नाईटक्लबमध्ये गेलो नाही. जर सुरक्षेच्या बाबतीत एवढं दुर्लक्ष असेल, तर ते काही बरोबर नव्हे," या पर्यटक आम्हाला सांगतात.

'या एका अपघातामुळे गोव्यानं जे कमावलं आहे ते जाऊ नये'

साहजिक आहे की, पर्यटन हा उत्पन्नाचा सर्वात महत्वाचा स्त्रोत असलेल्या गोव्याला असा परिणाम परवडणारा नाही. तसंही गेल्या काही वर्षांपासून, विशेषत: कोविडनंतर, गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटते आहे का, हा प्रश्न सातत्यानं चर्चेत आहे.

अनेकांनी, विशेषत: परदेशी पर्यटकांनी, गोव्यापेक्षा पूर्वेच्या देशांना म्हणजे सिंगापूर, मलेशिया, व्हिएतनाम, कंबोडिया या देशांना पसंती दिली, असं म्हटलं गेलं.

अर्थात गोवा सरकार म्हणतं की, तसं काही झालं नाही आणि उलट पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी गोव्यानं जे प्रयत्न केले त्यामुळे इथं येणाऱ्यांची संख्या वाढते आहे.

गोवा सरकारच्या म्हणण्यानुसार या वर्षी नोव्हेंबरपर्यंत जवळपास 70 लाख पर्यटक गोव्यात येऊन गेले आहेत. डिसेंबरमध्ये ही संख्या अजून वाढेल. ही वाढ गेल्या वर्षीपेक्षा 6 टक्क्यांनी जास्त आहे.

पण आकड्यांचे दावे एका बाजूला, मुख्य प्रश्न हा आहे की, ज्या नाईटलाईफसाठी लोक गोव्यात येतात, तिथंच जर आवश्यक उपाय नसल्यानं आगीत मृत्यू होतात, तर त्याचा परिणाम होईल किंवा नाही.

गोवा सरकारचे पर्यटन मंत्री रोहन खौंटे यांनी 10 डिसेंबरला घेतलेल्या पत्रकार परिषदेत वारंवार असं म्हटलं की, सरकार योग्य ती पावलं उचलतं आहे आणि त्यामुळे गोव्यावरचा विश्वास कमी होऊ नये.

खौंटे पुढे म्हणाले, "अशा घटना आपल्याला अस्वस्थ करणाऱ्या, परंतु आवश्यक सत्यांची आठवण करून देतात. सुरक्षिततेशी तडजोड करता येणार नाही. नियम हे पर्यायी असू शकत नाही. बेकायदेशीर आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली पाहिजे. त्यामुळे पर्यटक आणि स्थानिकांना धोका निर्माण होऊ नये."

"खूप मोठा परिणाम होईल, असं नाही. सहाजिक आहे की, पर्यटकांना काळजी वाटणार. पण जी या क्षेत्रातली जुनी नावं आहे, जे पब्ज गेल्या काही दशकांपासून उभे आहेत, तिथे लोक नक्की जातील. त्यांच्या सगळ्या सुरक्षेच्या यंत्रणाही जागेवर आहेत आणि एक विश्वासही लोकांना आहे," गोव्याच्या 'ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन'चे अध्यक्ष जॅक सुखिजा सांगतात.

पण सरकार अगोदरच जागं का झालं नाही?

हा प्रश्न ६ डिसेंबरच्या आगीनंतर सगळ्यात कळीचा बनला आहे आणि त्याचं उत्तर देतांना सरकारची परिस्थिती कठीण बनली आहे. ज्या ठिकाणी आग लागली त्या 'बर्च बाय रोमिओ लेन' या नाईटक्लबबद्दल अनेक अनियमिततांच्या गोष्टी नंतर समोर आल्या.

सगळे परवाने नसणं, अतिक्रमणाची नोटीस दिली जाणे, तरीही पुढे परवानगी दिली जाणे असे प्रकार समोर आले. सरकारनं तडकाफडकी काही स्थानिक अधिकाऱ्यांवर कारवाई केली, पण त्याला उशीर झाला होता.

आपण जागे झालो आहोत हे सांगण्यासाठी या अपघातग्रस्त पबचे मालक लुथरा बंधूंचं वागातोर इथलं एक अतिक्रमणही पाडण्यात आलं. प्रश्न हा आहे की हे अगोदरच का केलं गेलं नाही?

अजून एक गोष्ट समोर आली की, अरपोरामध्ये जिथे हा अपघात घडला, ती जागा मिठागरांची होती. या पबच्या बाहेर छोटा रस्ता आहे आणि पलिकडे मिठागराचा खड्डा आहे. त्यात पाणी आहे.

तिथे झालेल्या अतिक्रमणावरून मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकर यांनी गोवा विधानसभेत प्रश्नही विचारला होता. एवढं हे प्रकरण अगोदरपासूनच डोळ्यासमोर होतं.

"सॉल्ट पैनमध्ये जाऊन बांधकाम करणं याला कायद्यानं संपूर्ण बंदी आहे. 2021 मध्ये जो गोवा रिजनल प्लान झाला त्यात मिठागरात, शेतामध्ये, लो-लायिंग एरियामध्ये अशा ठिकाणी बांधकाम करायला संपूर्ण बंदी आहे. शक्यच नाही. त्यामुळे सगळ्यांच्या पुढ्यात जेव्हा हे बांधकाम उभं राहतं आणि त्यात सगळ्या प्रकारचं बेकायदेशीर कामं उभारतात. हे सगळ्यांना दिसतं, तरीही ते कसं काय चालतं?" ज्येष्ठ पत्रकार संदेश प्रभुदेसाई विचारतात.

आरपोराच्या पबमध्ये लागलेल्या आगीमुळे गोव्याला गेल्या काही वर्षांपासून छळणारे प्रश्न पुन्हा एकदा समोर आले आहेत.

बाहेरच्या राज्यांतून इथं वाढलेली गुंतवणूक, त्यातून तयार झालेल्या बेबंद लॉबीज, त्यांचं राजकीय आणि सरकारी व्यवस्थेशी जमलेलं सूत आणि त्यातून झालेली नियमांची पायमल्ली, हे सगळंच आता चव्हाट्यावर आलं आहे. अगदी सत्ताधारी आमदारही हे स्पष्टपणे सांगताहेत.

ज्यांच्या विधानसभा मतदारसंघात हा नाईटक्लब होता त्या कलंगुटचे भाजपाचे आमदार मायकेल लोबो आम्हाला सांगतात, "भारतातल्या इतर भागातून अनेक लोक गोव्यात नाईट क्लब सुरू करायला आले आहेत. जवळपास 90 टक्के नाईटक्लब हे बाहेरच्या लोकांचे आहेत ज्यांना इथे व्यवसाय करायचा आहे. त्यांनी सगळ्या बाबतीत शॉर्ट कट घेतले आहेत. मी सांगतो की, गोव्यात 50 टक्के अशी कामं शॉर्ट कट घेऊन केलेली आहेत."

'प्रुडंट मीडिया'चे संपादक प्रमोद आचार्य सांगतात की, अनेक बाबतीत सरकारी व्यवस्था दादच लागू देत नाहीत.

"या क्लबवर कारवाई होत नव्हती. अजून एक उदाहरण सांगतो. अशा क्लबच्या आवाजाचा त्रास म्हणून स्थानिक अनेकदा कोर्टात गेले आहेत. कोर्टानं कारवाईचे आदेश दिले. पण अजूनही ती होत नाही. अशी ही व्यवस्था आहे," ते सांगतात.

त्यामुळेच पर्यटकांच्या मानसिकतेवर आणि पर्यायानं एकूण पर्यटन व्यवसायावर होणारा परिणाम थांबवण्यासाठी गोव्याचं नेतृत्व सगळे प्रयत्न करतो आहोत, असं सांगतं आहे. पण प्रश्न हा आहे की, जी व्यवस्था या दुर्घटनेकडे घेऊन गेली, ती व्यवस्था बदलणार आहे किंवा नाही?